Categories

Most Viewed

11-12 जानेवारी 1936 भाषण

धर्मांतराने सर्व अल्पसंख्यांकांचे कल्याण होईल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येवला येथील अस्पृश्यवर्गीय परिषदेत धर्मातराची घोषणा केल्यापासून हिंदुस्थानात मोठी खळबळ उडून गेली. या घोषणेमुळे स्पृश्य हिंदूसमाज हादरून गेला. या त्यांच्या धर्मांतराच्या घोषणेस हिंदू अस्पृश्य बांधवांकडून दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळू लागला आहे. या घोषणेस महाराष्ट्रातर्फे पाठिंबा देण्याकरिता गेल्या जानेवारी महिन्याच्या तारीख 11 व 12 जानेवारी 1936 रोजी पुणे येथे अहिल्याश्रमाच्या भव्य पटांगणात उभारलेल्या मंडपात अखिल महाराष्ट्रीय अस्पृश्य तरुण परिषद भरविण्यात आली. या परिषदेचे अध्यक्षस्थान मद्रासचे सुप्रसिद्ध पुढारी रा. सा. प्रो. शिवराज. बी. ए. बी. एल. यांना देण्यात आले होते. परिषदेच्या पूर्वी अध्यक्षांची प्रचंड मिरवणूक पुणे कॅम्प विभागातून काढल्यानंतर सायंकाळी 5.30 वाजता अधिवेशनास सुरवात झाली. परिषदेस दहा हजार स्त्रीपुरुष समुदाय हजर होता. यात काही थोडे स्पृश्य हिंदू मुसलमान व शीख मंडळीही दिसत होती. हजर असलेल्या मंडळीत सर गोविंदराव माडगावकर, रा. सा. त्रिभुवन शेठ किराड, श्री. भाऊराव पाटील, श्री. शांताराम पोतनीस, मि. आश्रफ अल्ली, मीर मुनशी भालदार, श्री. आर. बी. भागवत, डॉ. वि. म. उर्फ अण्णासाहेब नवले. सरदार दरबारसिंग, सुभेदार घाटगे, सुभेदार घुत्रे, महाडचे श्री. सुरेंद्रनाथ टिपणीस, श्री. अ. वि. चित्रे, श्री सीताराम लांडगे, अमृतसरचे सरदार गुरुमुखसिंग, स. तुळशीसिंग, स. दिवाणसिंग स. नारायणसिंग, स. इंद्रसिंग. स. तेजसिंग, स. सुमेरसिंग, वे. आग्रवाल, मि. एस. एस. जगताप मि. जे. टी. आल्हार, मि. ससाने, श्री. तात्याबा शिंदे वगैरे याशिवाय बाहेरगावचे बरेच प्रतिनिधी हजर होते.

अस्पृश्यांचे मुख्य पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कार्यक्रमाच्या ठिकाणी थोडे उशिरा पोहचले. त्यामुळे सुरवातीला लोकांची निराशा झालेली दिसत होती. त्यामुळे मंडपाच्या मुख्य भागी अध्यक्षांच्या खुर्चीजवळच एका खुर्चीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुष्पहारमंडित फोटो ठेवण्यात आला होता.

महाराष्ट्र अस्पृश्य तरुण परिषदेत डॉ. सोळंकी यांचे भाषण झाल्यानंतर अस्पृश्य वर्गाचे लोकप्रिय पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बोलावयास उमे राहिले. त्यावेळी सुमारे पाच मिनिटे एकसारखा टाळ्यांचा कडकडाट चालू होता. शिंगे व तुता-या वाजत होत्या. आंबेडकरांच्या जयजयकाराने तेथील संबंध वातावरण दुमदुमून गेले होते. डॉ. आंबेडकर यांना पाहाण्यासाठी लोक एकसारखे पुढे घुसत होते. त्यावेळी स्वयंसेवकांना बंदोबस्त ठेवणे मुष्किलीचे झाले. अखेरीस पाच मिनिटेपर्यंत डॉक्टर साहेबांना पाहून झाल्यानंतर प्रत्येकाचे समाधान झाले. मग आपोआप सर्वत्र शांतता झाली. त्या शांत वातावरणात डॉक्टर साहेबांनी गंभीर आवाजात आपल्या भाषणास सुरवात केली. ते म्हणाले,

सभापती, माझे बांधव व भगिनींनो,
आज या ठिकाणी कोणाही वक्त्याने भाषण करण्यापूर्वी आपली जात सांगावी असा दंडक अध्यक्षांनी घातला आहे. तेव्हा माझ्या या काळ्या रंगाच्या दोऱ्यावरून (घड्याळाची काळी फीत दाखवून) आपणास माझी जात समजून आली असेलच (हंशा). आजच्या या परिषदेपुढे माझे निराळे भाषण करण्याचे काही प्रयोजन आहे, असे मला वाटत नाही. ज्यावेळी ही परिषद होण्याचे ठरले त्यावेळी येथील तरुणांनी या परिषदेचे अध्यक्षस्थान स्वीकारावे असे मी सुचविले होते. परंतु मी स्वतःची गणना तरुणात करीत नसल्यामुळे ते अध्यक्षपद नाकारले. तरीपण आज एका कारणाकरिता तरी मला बोलणे भाग आहे. ते कारण म्हणजे आपले आजचे अध्यक्ष प्रो. शिवराज यांचे आभार मानणे हे होय. प्रो. शिवराज यांच्यामागे त्यांच्या कॉलेजची अनेक कामे असताही ते स्वतःची अडचण सोसून या ठिकाणी आले. आपली ही परिषद त्यांनी यशस्वीरीतीने पार पाडली याबद्दल त्यांचे आभार मानणे हे माझे कर्तव्य आहे. (टाळ्या). जातीभेद आहे तसा या देशात प्रांतभेदही जबरदस्त आहे. आपल्या उन्नतीकरिता या देशातील सर्व प्रांतांच्या अस्पृश्यांचे संघटन होणे जरूर आहे. परंतु प्रांताप्रांतातील भाषाभेद अस्पृश्यांच्या एकीकरणाला घातक आहेत. त्या दृष्टीने पाहता आज मुंबई इलाख्यातील व महाराष्ट्रातील अस्पृश्य समाजाने मद्रदेशीय अस्पृश्य पुढा-यास हे अध्यक्षस्थान दिले ही आनंदाची व संघटनेच्यादृष्टीने उत्तेजनपर अशीच गोष्ट घडली आहे. (टाळ्या) यापुढेही आमच्यातील तरुण व वृद्ध सर्वच अशी संघटना वाढवून या देशातील सर्व अस्पृश्य समाजात प्रेम व सहकार दृढ करतील अशी मला आशा आहे.

सध्या अस्पृश्यांची म्हणजे आपली ही जी चळवळ चालू आहे तिला एका गारुड्याचा तमाशा किंवा One man show म्हणून संबोधले जाते. कोणत्याही समाजात केवळ एका माणसाने केलेली चळवळ यशाच्या कळसापर्यंत जात नाही. तेव्हा आपली ही चळवळ यशस्वी व्हावयाची असेल, तर एकाच डोंबा-याने हा खेळ खेळून भागणार नाही. त्यास अनेक सवंगड्यांची जरूरी आहे. हा खेळ खेळता खेळता एक गारुडी मरून पडला. तर त्याच्या जागी त्याचे ढोलके घेऊन बडवण्यास उभा राहाणारा दुसरा गारुडी तयार असला पाहिजे. आतापर्यंत या बाबतीत मी जरा साशंक होतो. परंतु आजची ही सभा पाहून माझ्या मनातील त्यासंबंधीची शंका दूर झाली आहे (टाळ्या). माझ्यानंतर माझे कार्य चालविण्यास अनेक कार्यकर्ते या पुण्याच्या अस्पृश्य तरुणांतूनच बाहेर येतील. याबद्दल मी त्यांना धन्यवाद देत आहे (टाळ्या).

आता यापेक्षा याप्रसंगी विशेष काही भाषण करावे असे मला वाटत नव्हते. तथापि, ज्या मुख्य विषयाची चर्चा या ठिकाणी झाली, त्यासंबंधी मो जर काहीच बोललो नाही तर आपली फार निराशा होईल हे मी जाणतो. म्हणून मी जाहीर केलेल्या धर्मातराच्या प्रश्नावर थोडे बोलतो.

मी धर्मांतर करण्याचे जाहीर केल्यापासून माझ्याकडे अनेक लोक येऊन त्याविषयी ऊहापोह करतात. त्या टीकाकार मंडळीत दोन प्रकारचे वर्ग आहेत. एका प्रकारच्या लोकांचे म्हणणे असे की. मी अस्पृश्यांच्या हिताच्या दृष्टीने ज्या काही अटी असतील त्या स्पृश्य हिंदुंच्यापुढे मांडाव्या. त्या अटी जर स्पृश्य हिंदुकडून पूर्ण झाल्या नाहीत तर मग धर्मातरास सिद्ध व्हावे. दुसऱ्या एका प्रकारच्या लोकांचे म्हणणे असे की. अस्पृश्यांच्या धर्मातराने विशेष फायदा होणार नाही. तेव्हा त्यानी धर्मांतर करु नये.

धर्मांतराने फायदा होईल किंवा नाही, फायदा झाल्यास तो किती प्रमाणात होईल याविषयी वादविवाद किंवा चर्चा करण्याचे हे ठिकाण नाही व तितका आता वेळही नाही. तेव्हा येशू ख्रिस्ताने ज्यू लोकांना आपल्या नव्या धर्माबद्दल सांगताना ज्याप्रमाणे म्हटले की, ‘Be unto me, Little children and I will save you from Sin’ (” लहान लेकरे आपल्या आईबापांवर विश्वास टाकतात त्याप्रमाणे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा व मी सांगतो तो धर्म पाळा). याच येशू ख्रिस्ताप्रमाणे मी आज तुम्हास एवढे सांगू शकतो की, मजवर तुमचा विश्वास असेल तर या धर्मांतरामुळे तुमचा फायदाच होईल (प्रचंड टाळ्या). एवढेच सांगून मी येथून जावे असे नाही. तर याबाबत मी बरोबर संशयनिवृत्ती करून देईल, पण आज तेवढा वेळ नसल्यामुळे येशू खिस्ताने ज्यू लोकांना त्या काळी दिलेले उत्तर मी आज तुम्हास देऊन थांबत आहे.

जे लोक मला असे सांगतात की, तुम्ही हिंदू धर्मात राहून स्वाभिमानाने जीवन कंठण्यास अवश्य अशा आपल्या अटी स्पृश्य हिंदुपुढे मांडा. त्या अटी स्पृश्य हिंदू पाळतात किंवा नाही ते पहा. त्या लोकांना मला एवढेच सांगावयाचे आहे की, मी ज्या अटी मांडीन त्या स्पृश्य हिंदूंना केव्हाही पूर्ण करता येणार नाहीत अशी माझी बालंबाल खात्री झाली आहे. माझी अट रुपयाची नाही, अगर भाकरीचीही नाही तर माझी अट त्यापेक्षाही फार मोठी आहे. ती अट कोणती आहे हे ज्यांना ऐकावयाचे असेल किंवा पार पाडण्याची ज्यांची तयारी असेल त्यांनी माझ्याकडे यावे. पण माझी याबाबत पक्की खात्री आहे की, ती अट पाळणे स्पृश्य हिंदुना कदापी शक्य नाही (टाळ्या).

जगातील प्रत्येक समाजाचे भवितव्य त्या त्या समाजातील सुशिक्षित लोकांवर अवलंबून असते. आजपर्यंत तुमच्यात चळवळ झाली नाही याचे कारण तुमच्यात कोणी शिकलेले लोकच नव्हते. शिक्षणामुळे माणसाला व समाजाला डोळसपणा प्राप्त होतो. त्यादृष्टीने पाहता सबंध हिंदुमध्ये जर कोणी खरा डोळस समाज असेल तर तो ब्राह्मण समाज हा एकटाच डोळस आहे. हे नाकबूल करता येणार नाही. ब्राह्मणेतर मराठा व तत्सम समाज हे तितके डोळस नाहीत. या बाबतीत ब्राह्मणांची जबाबदारी फार मोठी आहे. परंतु ब्राह्मण जातीची वृत्ती कशी आहे याची तुम्हास बरोबर ओळख झालेली नाही. ब्राह्मणापुढे तुम्ही कोणताही प्रश्न टाका व त्यावर सर्व समाजाच्या कल्याणाच्या दृष्टीने काही तोड सुचवा. ही तोड़ जर ब्राह्मणाच्या वर्चस्वास धक्का देणारी नसेल तर ते झटकन मान्य करतील. पण तुम्ही सुचविलेल्या तोडीमुळे जरा का त्यांच्या ब्राह्मणी वर्चस्वाला थोडातरी धक्का लागण्याचा संभव असेल तर राष्ट्राचा कितीही मोठा फायदा होत असेल तरी ती तोड ब्राह्मण समाज कधी हाती घेणार नाही. तेव्हा तो समाज आपल्या अटी पार पाडण्याची जबाबदारी घेईल, अशी आशा करण्यात काहीच अर्थ नाही.

कोणतीही गोष्ट काही तरी दिल्याखेरीज मिळत नसते. त्याप्रमाणे स्पृश्य अगर ब्राह्मण समाजाने तुमच्याकरिता काही तरी करण्यापूर्वी त्यांना तुम्ही काही तरी दिले पाहिजे. पण ते काय द्यावे लागणार आहे हे तुमच्या लक्षात आले काय ? ते लक्षात येण्यासाठी निवापसुत्तात भगवान बुद्धानी सांगितलेली गोष्ट मी सांगतो. श्रावस्तीमध्ये अनाथ पिंडिकाच्या आश्रमात राहत असता भिक्षुना उद्देशून भगवान बुद्ध म्हणाला की, भिक्खुहो, राजा आपल्या राखीव जंगलात हरिण, गवे, ससे वगैरे प्राणी पाळून ठेवतो. त्यांची योग्यप्रकारे जोपासना करतो. त्यांना ममतेने वाढवितो. पण हे सर्व कशाकरिता ? त्या प्राण्यांना ठार करण्याकरिता आपली मृगयेची भूक भागविण्यासाठी राजा त्या गरीब दुबळ्या प्राण्यांची जोपासना करीत असतो. त्याचप्रमाणे आज स्पृश्य हिंदू अगर ब्राह्मण तुम्हास काही जादा सवलती देऊ करून आपल्याच धर्मात ठेवू पाहात आहेत ते तुमच्या कल्याणासाठी नसून तुम्हास कायमचे त्यांच्या गुलामगिरीत जखडून ठेवण्याकरिताच आहे. (शेम शेम).

म. गांधींनी नऊ लाखांचा फंड गोळा केला, तो काही तुमच्या खऱ्या हितासाठी नसून तुम्ही त्यांच्या काँग्रेसला सोडून जाऊ नये. काँग्रेसचे वजन कायम राहावे म्हणून त्यांनी टाकलेले दयेचे तुकडे चघळून स्पृश्यांच्या दारात कायमचे गुलाम म्हणून आपण पडून राहावे म्हणून स्पृश्य हिंदुचे हे सर्व उद्योग आहेत. माझे त्या सर्वांना असे सांगणे आहे की, आता स्पृश्य हिंदुनी माझ्यापुढे प्रत्यक्ष परमेश्वर आणून उभा केला तरी मी हिंदु धर्मातून जाणार! (प्रचंड टाळ्या जयजयकार व शिंग तुताऱ्यांचे आवाज) आता यापुढे स्पृश्य हिंदुनी अस्पृश्य समाजाकरिता काहीही कार्य केले नाही तरी मी जाणार व काहीही केले तरीही मी जाणार ! (टाळ्या)

आता हे धर्मांतर आपणापैकी कोणीही एकट्या दुकट्याने करावयाचे नसून संबंध अस्पृश्य समाजाने एकदम सर्वांनी मिळून करावयाचे आहे. आम्ही धर्मांतर केल्याने आमच्यापुढे स्वर्गच अवतरणार आहे किंवा अमृताचा पाऊस पडणार आहे, असे मी मुळीच म्हणणार नाही. आम्ही मुसलमान, खिस्ती किंवा शीख झालो तरी तेथेही आमच्या भवितव्याकरिता झगडा करावा लागणार आहे, हे आम्ही ओळखतो. उद्या आपण मुसलमान झाल्याबरोबर सर्वच नबाब होणार नाही, शीख झाल्याबरोबर सरदार होणार नाही किंवा ख्रिस्ती झाल्याबरोबर पोप होणार नाही. (हंशा) कोठेही आपण गेलो तरी आपणास लढा हा करावा लागणारच आहे. तेव्हा तो लढा लढविण्यासाठी आपण आपली संघशक्ती वाढविली पाहिजे. वैयक्तिक फायद्याकरिता आपणास चोरट्या व्यवहाराने धर्मांतर करावयाचे नसून हातावर शिरकमले घेऊन जेथे जाऊ तेथे लढावयाचे, या निश्चयाने धर्मांतर करावयाचे आहे. उद्या मुसलमान अगर ख्रिस्ती झाल्यावर ते लोक जर आम्हास महार खिस्ती म्हणून निराळ्या चर्चमध्ये जाण्यास सांगू लागले, तर आम्ही तसल्या चर्चला आग लावू. मी काही साधाभोळा नाही. जेथे जाईल तेथे काट्यासारखा बोचत राहीन ! (हंशा व प्रचंड टाळ्या) म्हणून माझे तुम्हास पुन्हा पुन्हा सांगणे आहे की, धर्मातर करावयाचे हे नक्की असेल, तर एकटे दुकटे कोठे जाऊन फसू नका. आजच कोणीही खिस्ती किंवा मुसलमान होऊ नका. मी ओळखून आहे की, आमच्या या घोषणेमुळे पुष्कळांना मोठमोठ्या आशा लागल्या आहेत. आता मला माझ्या महार बंधुना एवढेच सांगावयाचे आहे की, बाबांनो, तुम्ही अस्पृश्यातील जातिभेद यापुढे तरी शिल्लक ठेवू नका (टाळ्या). महारास ब्राह्मण समाजाचे वर्चस्व सहन होत नाही, त्याचप्रमाणे अस्पृश्यांमधील अल्पसंख्याक मांग, मंगी वगैरे समाजाला महारांचे वर्चस्व नको आहे. त्यांची ही मागणी अगदी रास्त आहे. मला स्वतःला महार जातीचा विशेष अभिमान वाटत नाही. मी केवळ त्या जातीत जन्मलो आणि माझ्या शिक्षणाचा व ज्ञानाचा फायदा आपल्या अज्ञ बांधवांना द्यावा म्हणून त्या जातीत प्रथम कार्याला सुरवात केली.

महाराष्ट्रात तरी अस्पृश्य समाजात महारांची संख्या अधिक आहे. तेव्हा अल्पसंख्यांकांची जशी नेहमीच कुचंबणा होते, तशी आपल्या मांग व भंगी बंधुंची होत आहे, हे त्यांनी ध्यानी आणून अस्पृश्यांतील हा उच्च-नीच भाव एकदम नष्ट करावा. मांग व भंगी या समाजाला माझे असे आश्वासन आहे की, ज्यावेळी महार तुम्हास समानतेने वागविणार नाहीत त्यावेळी मी तुमचा आहे. तुमच्या वतीने तुमचे भांडण मी महारांशी भांडेन (टाळ्या).

धर्मातराची जी अनेक कारणे आहेत त्यात हिंदू धर्मातील जातीभेद हे एक मुख्य आहे. स्पृश्य हिंदू आम्हाला नेहमी हिणवतात की प्रथम अस्पृश्यात जातीभेद आहेत ते मोडा व मग आम्हाला जातीभेद मोडावयास सांगा. पण त्यांना मला एवढेच सांगावयाचे आहे की, जोपर्यंत आम्ही तुमच्या धर्मात आहोत. तोपर्यंत आम्हास आमच्यातील जातीभेद मोडता येणार नाही. तुमच्या हिंदू धर्माच्या व जातिभेदाच्या पोलादी चौकटीत राहून आम्हास ती सुधारणा करता येणार नाही. म्हणूनच धर्मातरानंतर जात्युच्छेदनाचा प्रश्न सोपा होईल अशी माझी समजूत आहे. आता जर एखाद्या महारास मांगाची मुलगी कर म्हटले तर तो लगेच स्पृश्य तसे करीत नाहीत म्हणून तिकडे बोट दाखवील. पण आपण सर्वच अस्पृश्य स्पृश्यांच्या या भेदभावाच्या भोवऱ्यातून बाहेर पडून गेल्यावर त्यास तसे करता येणार नाही.

धर्मांतराने खुद्द महारापेक्षा अल्पसंख्यांक अशा भंगी व मांग समाजाचे जास्त कल्याण होईल. ते सर्व महारांच्या एकाच पातळीवर येतील आणि म्हणून मांग अगर भंगी जातींनी या धर्मांतराच्या प्रश्नास जास्त जोराचा पाठिंबा देणे त्यांच्याच फायद्याचे आहे. जातीभेद नष्ट करणे हे स्वराज्य संपादनापेक्षाही जास्त पवित्र कर्तव्य आहे. संबंध हिंदुस्थानातील जातीभेद जेव्हा कधी नष्ट व्हायचा असेल तो होवो. पण अस्पृश्य समाजातील जातिभेद मला नष्ट करता आल्यास मी स्वतःला भाग्यवान पुरुष समजेन (प्रचंड टाळ्या).

तुम्ही आजपर्यंत मजविषयी जो विश्वास प्रगट केलात, त्याबद्दल मी मानव असल्यामुळे मला आनंद होत आहे, पण त्याबरोबरच माझ्या शिरावरील जबाबदारीचा बोजा वाढत चालल्याची जाणीवही मला होत आहे. तुम्हा सात कोटी लोकांची जबाबदारी माझ्यावर आहे. त्या माझ्या हातून जर का थोडीही चूक झाली, तर केवढ्या मोठ्या समाजाच्या नुकसानीस मी कारणीभूत होईल याचा मला रात्रंदिवस विचार करावा लागत आहे. माझ्या या धर्मातराच्या घोषणेला कोणी खूळ किंवा भूत असेही म्हणतात. परंतु यात माझा वैयक्तिक असा काडीचाही स्वार्थ नसून उलट नुकसानच आहे. आज मी अशा स्थितीत आहे की, कोणतीही व्यावहारिक अगर लौकिकाची गोष्ट मला सहज साध्य करून घेता येणार आहे. माझी ही गर्वोक्ती नसून तो आत्मविश्वासाचा पडसाद आहे (टाळ्या). व्यक्तिच्या हिताच्या दृष्टीने माझा या धर्मांतरात तोटाच आहे. महारात मी शिकलेला बॅरिस्टर म्हणून आज मला जो मान आहे, तो मी खिस्ती किंवा मुसलमान झाल्याने शिल्लक राहणार नाही, कारण त्या समाजात माझ्यासारखे शिकलेले कित्येक पडले आहेत. त्यातच मी एक जसा होईल. तेव्हा माझा त्यात वैयक्तिक फायदा नाही. उलट तो तोटाच आहे. पण ज्यानी विश्वासाने जबाबदारी टाकली आहे. त्यांना नरकात पिचत ठेवून मला माझा मोठेपणा कायम ठेवावयाचा नाही. तर त्यांच्या उद्घाराकरिता मी माझ्या स्वार्थावर पाणी सोडण्यास तयार आहे (टाळ्या).

आपल्या चळवळीच्या मुळाशी काही तरी खात्रीने आधार आहे यात शंका नाही. नाही तर परस्परविरुद्ध अशा दोन्ही पक्षांकडून एक कोट रुपिया देंगे अशी भाषा आली नसती. आपल्या या चळवळीच्या मुळाशी अधिष्ठान खात्रीने आहे.

आजची वेळ मोठी आणीबाणीची आहे. इंग्रजीत ज्याला Now or Never म्हणतात तशी ही वेळ आली आहे. तेव्हा गाफील राहू नका, आणि वेळ यांची गाठ पडली, तरच कार्यभाग होत असतो. तशी ही वेळ आहे. तेव्हा या घडीला आपला निर्धार कायम करा.

आजच्या आज चुटकीसरसे धर्मातर होऊन सर्व अस्पृश्य समाज दुस-या धर्मात जाईल असे समजण्याइतका मी काही खुळा नाही. तेव्हा मला जे थांबा, कळ काढा असे म्हणतात, त्यांना एवढेच सांगणे आहे की, दहा वीस वर्षांनी जे होणार आहे त्याचीच सुरवात आजच आम्हास केली पाहिजे. कालांतराने आपोआप होईल असे म्हणून स्वस्थ बसण्यात अर्थ नाही. आपोआप काहीच होत नसते. दहा वीस वर्षांनी जी फळे दृष्टीस पडणार आहेत, त्यांचे बी तरी आज लावलेच पाहिजे. ते न लावले तर झाड नाही, आणि फळ तर नाहीच नाही. तेव्हा आपणास जे ‘ ठैरो !’ म्हणून सांगतील ते आपले दोस्त नसून दुष्मन आहेत असे समजा व आपल्या निर्धाराप्रमाणे संघटनेच्या कार्याला लागा. (प्रचंड टाळ्या)

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password