Categories

Most Viewed

11 जानेवारी 1950 भाषण 1

परकियांच्या गुलामगिरीचा प्रसंग पुन्हा आला तर तो आत्मनाश ठरेल.

लवकरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबईस येणार आहेत. जानेवारीच्या पहिल्या अगर दुसऱ्या आठवड्यात बहुधा ते येतील. त्यावेळी घटनेची महान कामगिरी यशस्वीरित्या बजावल्याच्या गौरवार्थ त्यांचे मुंबईस बादशाही थाटाचे स्वागत करण्याचे मुंबई शहर दलित फेडरेशनने निश्चित केले आहे. स्वागताच्या जंगी तयारीसाठी मुंबई शहर दलित फेडरेशनच्या मध्यवर्ती कार्यकारी मंडळाची तातडीची बैठक तारीख 1 जानेवारी 1950 रोजी बोलाविण्यात आली होती.

प्रसंगानुसार स्वागत :

कॉंग्रेस पुढाऱ्यांचे अगर मंत्र्यांचे हरघडी स्वागत होते, तसे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाही आणि तसले स्वागत खुद्द डॉ. बाबासाहेबांना आवडत नाही. त्यांचे स्वागत प्रसंगास उचित आणि भव्य असते. स्वतंत्र भारताची घटना तयार करण्याचे महान कार्य यशस्वीरित्या त्यांनी पार पाडल्यामुळे कोणा अस्पृश्य बांधवाची छाती अभिमानाने पुढे येणार नाही ? म्हणूनच मुंबईतील त्यांच्या येत्या आगमनप्रसंगी त्यांचे भव्य स्वागत मुंबई येथे होणार आहे.

स्वागत अभूतपूर्व होणार :

दिनांक 25 जून 1946 ला त्यांचे असेच जाहीर स्वागत, बॉम्बे सेंट्रल स्टेशनवर करण्यात आले होते. परंतु त्यापेक्षा येथे स्वागत भव्य होईल, नव्हे अभूतपूर्व ठरेल यात शंका नाही. सुमारे 1,50,000 समुदाय स्वागतासाठी जमेल असा विश्वास मुंबई शाखेच्या दलित फेडरेशनला वाटत आहे.

नक्की तारीख, वेळ व स्थळ स्वतंत्र हँडबिलद्वारे जाहीर करण्यात येईल.

स्वयंसेवक पथक :

स्वागताच्या बंदोबस्तासाठी स्वयंसेवक दल उभारण्यात येईल. पांढरा हाफ शर्ट व पांढरी पेंट असा गणवेश स्वयंसेवकाचा राहील. त्याचप्रमाणे त्यांना खास बेंजेसही देण्यात येतील. दरेक वॉर्डामधून 25 ते 30 स्वयंसेवक घेण्यात येतील.

व्यक्तिने व संस्थांनी नावे नोंदवावी :

ज्या कोणा व्यक्तिना अगर संस्थांना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हार अर्पण करावयाचे असतील त्यांनी प्रथमतः आपली नावे मुंबई दलित फेडरेशनच्या ऑफिसमध्ये नोंदविली पाहिजेत. आयत्यावेळी गोंधळ टाळण्याच्या दृष्टीने अशी पद्धती अवलंबिली पाहिजे. स्वागतासाठी भव्य मंडप उभारण्यात येईल. त्यात लाऊडस्पीकरची व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. असे पत्रक मुंबई दलित फेडरेशनच्या जनरल सेक्रेटरीने काढले.

भारत सरकारचे कायदेमंत्री ना. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या पत्नी सौ. सवितादेवी यांच्या समवेत तारीख 2 जानेवारी 1950 रोजी सोमवारी संध्याकाळी 6.30 वाजता विमानमार्गे दिल्लीहून मुंबईस आले. डॉ. बाबासाहेब व सौ. माईसाहेब सांताक्रूझ विमानतळावर उतरले तेव्हा आनंदी दिसत होते. त्यांच्या स्वागतासाठी मुंबई शहर व उपनगर दलित फेडरेशनचे कार्यकर्ते हजर होते. याशिवाय इतर अस्पृश्य बंधु भगिनींचीही अलोट गर्दी सांताक्रूझ विमानतळावर त्यांचे दर्शनार्थ लोटली होती.

मनोहर दृश्य व हारतुरे :

डॉक्टर साहेबांनी येतेवेळी गॅबर्डिनचा सूट परिधान केला होता आणि सौ. माईसाहेबांनीही तशाच प्रकारच्या रंगाचे जरीचे पातळ पेहरले होते. ज्यावेळी, डॉक्टरसाहेब व माईसाहेब विमानातून उतरले व त्यांना नेण्यासाठी वाट पाहणाऱ्या ट्यूरिंगकडे आले तेव्हा आंबेडकर झिंदाबाद, थोडे दिनमें भिमराज’ अशा घोषणा स्वागतास जमलेल्या अस्पृश्य बंधु भगिनींनी दिल्या. नंतर डॉक्टर बाबासाहेब यांना हार अर्पण करण्यात आले आणि त्यांची मोटार निघून गेली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मुंबईतील मुक्काम तारीख 13 जानेवारी 1950 पर्यंत राहील असे समजते.

डॉ. बाबासाहेबांच्या येत्या आगमनप्रसंगी मुंबईमध्ये त्यांचे प्रचंड जाहीर स्वागत करण्यात येणार आहे. हे गेल्या ‘जनते’ च्या अंकात प्रसिद्ध झाले आहे. त्यासंबंधी, दलित फेडरेशन मुंबई शहर व उपनगर शाखेच्या स्वागत समितीने खालील पत्रक प्रसिद्धीसाठी दिले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सौ. डॉ. माईसाहेब आंबेडकर हे उभयता सोमवार तारीख 2 जानेवारी 1950 रोजी सायंकाळी 6.30 वाजता मुंबईस आले आहेत हे वृत्त कळविण्यात आम्हास अत्यानंद होत आहे. डॉ. बाबासाहेबांच्या आगमनास आपण नेहमीच उत्सुक असतो. त्यातून भारतीय घटनेची महान कामगिरी बजावून ते प्रथमतः मुंबईस येत असल्याकारणाने आपला उत्साह द्विगुणित झाला असल्यास नवल नाही. तेव्हा अशा प्रसंगी डॉ. बाबासाहेबांचे जाहीर प्रचंड स्वागत व्हावे अशी तुम्हा सर्वांची उत्कट इच्छा असणे अगदी स्वाभाविक आहे. ही गोष्ट जाणूनच दलित फेडरेशन मुंबई शहर व उपनगर शाखेने तारीख 1 जानेवारी 1950 रोजी तातडीची बैठक बोलावून खालील ठराव सम्मत केला.

भारतीय घटना बनविण्यात प्रशंसनीय यश संपादून डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय अस्पृश्य चळवळीच्या माहेरघरी आपल्या मुंबईला पहिल्यांदाच येत आहेत. तेव्हा त्यांचे जाहीर स्वागत करण्यात येऊन त्यांच्या कर्तबगारीबद्दल अस्पृश्य जनतेस वाटणाऱ्या अपरिमित आनंदाचे ‘प्रतीक’ म्हणून भारतीय घटनेची प्रत त्या आकाराच्या सुवर्ण वेष्टनामधून त्यांना अर्पण करण्यात यावी.”

वरील ठरावानुसार तारीख 2 जानेवारी 1950 रोजी स्वागत समितीने डॉ. बाबासाहेबांची भेट घेतली. डॉ. बाबासाहेब व सौ. माईसाहेब यांनी कृपावंत होऊन जाहीर स्वागत समारंभास हजर राहाण्याचे अभिवचन दिले आहे.

सदर सत्कार समारंभासंबंधी खालील गोष्टी जनतेच्या माहितीसाठी जाहीर करण्यात येत आहेत.

(१) स्वागत समारंभाची जागा, तारीख व वेळ या संबंधीचा तपशील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सोयीप्रमाणे लवकरच पत्रक नं. 2 मधून व ‘जनता’ साप्ताहिकातून जाहीर करण्यात येईल.

(२) सुवर्ण प्रतिकासाठी, दलित फेडरेशन, मुंबई शहर व उपनगर शाखेच्या सर्व वॉर्डसमधील जुन्या सभासदांनी व ज्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत अशा नव्या सभासदांनीही प्रत्येकी 3 रुपये तारीख 5 जानेवारी 1950 च्या आत दिले पाहिजेत.

शिवाय, मुंबईतील दरेक अस्पृश्य बंधु-भगिनींनी कमीत कमी चार आणे तरी द्यावेत अशी आमची आग्रहाची विनंती आहे.

स्वागत समितीतर्फे चार आणे किंमतीची तिकीटे छापण्यात आली आहेत. या तिकिटावर अनुक्रमे नंबर व दलित फेडरेशन मुंबई शहर आणि उपनगर शाखेच्या जनरल सेक्रेटरींच्या सहीचा शिक्का राहील. तिकिटे घेतल्याशिवाय कोणीही पैसे देऊ नयेत. वरील प्रकारची तिकिटे ज्यांचेकडे असतील ते निधी गोळा करणारे अधिकृत लोक आहेत असे समजावयास हरकत नाही. चार आण्यापेक्षा कोणी अधिक रक्कम दिल्यास तिचा साभार स्वीकार केला जाईल. मात्र त्या रकमेच्या प्रमाणात पावत्या जरूर घ्याव्यात.

(३) स्वयंसेवक पथक व डॉक्टरसाहेबांना अर्पण करावयाचे हारतुरे यासंबंधीची माहिती फेडरेशनच्या मध्यवर्ती ऑफिसमध्ये मिळेल.

जाहीर झाल्याप्रमाणे बुधवार तारीख 11 जानेवारी 1950 रोजी दलिताचे सर्वश्रेष्ठ नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सौ. डॉ. माईसाहेब आंबेडकर यांचा जाहीर सत्कार मुंबई शहर उपनगर दलित फेडरेशनच्या विद्यमाने मुंबईतील नरेपार्क मैदानावर साजरा करण्यात आला. या प्रसंगी दोन लाखाच्या वर दलित बंधु-भगिनींचा समुदाय हजर होता. यामध्ये भगिनीवर्गाची उपस्थिती अफाट होती. आपल्या भक्तिभावाची खूण म्हणून दलित बांधवांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घटनेच्या प्रतीच्या आकाराचा सुवर्ण करंडक व 2,000 रुपये जाहीरपणे अर्पण केले आणि त्यांचेवरील आपली निष्ठा अढळ आहे हे सर्व जगास पटवून दिले.

खरोखरीच अभूतपूर्व समारंभ :

सदर सत्कार समारंभाच्या तयारीसाठी जो अगदी तोकडा वेळ मिळाला त्याकडे पहाता हा समारंभ अक्षरशः अभूतपूर्वच म्हटला पाहिजे. तारीख 11 रोजी असलेल्या समारंभाची माहिती आदल्या दिवशी म्हणजे तारीख 10 रोजी दलित बांधवांना देण्यात आली. तेव्हापासून मुंबई दलित फेडरेशनच्या कार्यकर्त्यांची एकच धमाल उडाली होती. रातोरात, हँडबिल वाटून, थाळ्या पिटून आणि मोटारमधून मोहल्ल्या मोहल्ल्यात प्रत्यक्ष जाऊन डॉ. बाबासाहेबांच्या सत्कार समारंभाची माहिती देण्यात आली. एवढ्या अत्यंत अल्प अवधीत नाही म्हटले तरी दोन लाख समुदाय जमला, ही गोष्ट अभूतपूर्व नव्हे असे कोण म्हणेल? एवढा विराट समुदाय कोणत्याही पुढा-याच्या सत्कारास गेल्या 50 वर्षात मुंबईत जमला असेल, असे मुळीच वाटत नाही.

एकंदर व्यवस्था शिस्तबद्ध :

सुमारे चार वर्षाच्या कालांतराने दलित फेडरेशनचा नीलवर्णी ध्वज नरेपार्कच्या भव्य मैदानावर डौलाने फडकत होता. नरेपार्कच्या चोहोबाजूने एखाद्या महायात्रेप्रमाणे दलित जनतेची नुसती रीघ लागली होती. त्यांच्या व्यवस्थेसाठी व शिस्तीसाठी स्वयंसेवक रस्त्याच्या दुतर्फी व मैदानाच्या सभोवार बंदोबस्ताने उभे होते. समारंभाकरता लहानसा पण दुमदार मंडप उभारण्यात आला होता. त्याचप्रमाणे लाऊडस्पीकरची व्यवस्थाही करण्यात आली होती. सामान्य पाहुणे मंडळीकरता सुमारे 500 खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. स्त्रियांकरता खास जागा ठेवली होती. एकूण समारंभाची व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आगमन :

सायंकाळी 6.30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आगमन झाले तेव्हा, ‘आंबेडकर झिंदाबाद’ च्या गगनभेदी घोषणा जनसमुदायाने केल्या. नरेपार्कचे गच्च भरून गेलेले मैदान या घोषणेमुळे हादरून गेले. डॉ. बाबासाहेब व्यासपीठावर येताच फोटोग्राफरची एक पलटणच उभी राहिली. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निरनिराळ्या ‘पोजेस’ चे फोटो घेण्याचा एकच सपाटा चालविला. कोणी खाली बसून, कोणी गुडघे टेकून तर कोणी तीर कमट्याच्या पवित्र्यात उभे राहून व फ्लॅश लाईट टाकून डॉक्टरसाहेबांचे फोटो घेत असल्याचे ते दृश्य खरोखरीच मनोहर होते.

जनरल सेक्रेटरींचे भाषण :

मुंबई शहर व उपनगर दलित फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी श्री. जे. जी. भातनकर यांच्या छोट्या भाषणाने समारंभास सुरवात झाली. ते म्हणाले,

“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आम्ही सर्व दलित बंधु-भगिनींना दर्शन व्हावे अशी आमची फार दिवसापासूनची इच्छा होती. परंतु डॉक्टरसाहेबांच्या मागे जी निकडीची कामे आहेत त्यामुळे तसा योग घडवून आणता आला नाही. त्यांनी केलेली घटनेची कामगिरी अभिमानास्पद असल्याने त्यांच्या स्वागताच्या निमित्ताने त्यांचे दर्शन होत आहे आणि त्याबद्दल आम्ही त्यांचे सदैव ऋणी आहोत.”

नंतर समारंभाचे अध्यक्ष श्री. डी. पी. गंब्रे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रथम हार अर्पण करून नंतर सुवर्णाचा करंडक व 2,000 रुपये अर्पण केले. यावेळी अर्पण-प्रसंगीची छायाचित्रे घेण्यासाठी पुन्हा एकदा फोटोग्राफर धावले. करंडक अर्पणाचा समारंभ झाल्यावर, डॉ. बाबासाहेब, सौ. माईसाहेब यांना अनेक संस्थांकडून व व्यक्तिकडून पुष्पहार अर्पण करण्यात आले. व्यासपीठावर हारतु-यांचा एक मोठा ढीगच साचला होता.

शेवटी, टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषण करावयास उभे राहिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले.

प्रिय भगिनींनो आणि बंधुनो,
आजच्या समारंभाला हजर राहाण्याची माझी काही तयारी नव्हती. कारण मुंबईत आल्या दिवसापासून जी कामे उरकावयाची होती ती महत्त्वाची होती. त्यामुळे या कार्यामध्ये आजच्या कार्यक्रमाला स्थान देण्याकरता अवसर मिळाला नव्हता. परंतु आज या ठिकाणी एवढी मंडळी जमलेली आहेत की ती पाहून आणि मला देण्यासाठी आपण जो करंडक तयार केला आहे तो पाहून मला असे वाटू लागले आहे की मी आज या ठिकाणी उपस्थित झालो नसतो तर एवढ्या मोठ्या प्रचंड जनसमुदायाची मोठी निराशा झाली असती. इतकेच नव्हे तर आपण खर्च केलेला पैसा व्यर्थ गेल्यासारखे झाले असते. त्यामुळे आज आपल्याला तर आनंद झालाच असेल. एका प्रकारे माझ्या दृष्टीनेही ही गोष्ट समाधानकारक व आनंदकारक आणि समायोचित अशीच झाली आहे असे मला वाटते (टाळ्या).

आज आपण सर्व मंडळींनी या ठिकाणी सभा घडवून आणली आणि मला हा करंडक दिला हे सर्व करण्याची विशेष आवश्यकता नव्हती. माझ्या अध्यक्षतेखाली व नेतृत्वाखाली बरेच दिवस सभा झालेली नाही! मलाही आपल्याला दोन शब्द सांगण्याची जरूरी पडली नाही. काही लोक असे म्हणत असत की, मी दिल्लीला रहात असल्यामुळे इतर प्रांतात, या प्रांतातही व एकंदर राजकीय क्षेत्रात माझ्या पायाखालची वाळू घसरत चाललेली आहे. असे म्हणणारे व मानणारे लोक आज येथे हजर असतील तर माझ्या पायाखालची वाळू घसरलेली नसून अधिकच घट्ट झाली असल्याचे त्यांना दिसून येईल. (प्रचंड टाळ्या) एखाद्या राजकीय पक्षाने बोलावलेली एवढी मोठी सभा दुसऱ्या कोणत्याही राजकीय पुढा-याच्या अध्यक्षतेखाली भरू शकत असेल, असे मला वाटत नाही. सिनेमा पाहण्यास जसे काही लोक जातात त्याचप्रमाणे काही एक दोन लोकप्रिय पुढाऱ्यांना बघण्यासाठी अर्थातच गर्दी जमत असेल. परंतु आपल्या राजकीय पक्षाच्या नेतृत्वाखाली आजही अशा प्रचंड सभा भरतात. त्यावरून आपल्या संघटनेची विघटना झालेली नाही, असे मला वाटते. म्हणून माझ्या अभिनंदनासाठी येथे जमलेल्या सर्व स्त्री-पुरुषांचे व सभा चालकांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. (टाळ्यांचा पुन्हा कडकडाट).

आपल्या राष्ट्राची घटना तयार करण्याची कामगिरी माझ्या शिरावर आली हा एक अनोन्य प्रकार होय. भारताची घटना तयार करण्यासाठी घटनासमिती भरली त्यावेळी माझी दशा काय होती, हे आपल्याला माहीत असेलच. 1946-47 साली झालेल्या निवडणुकीत शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनचा पराजय झालेला होता. अर्थात या पराभवाबद्दल लाज वाटण्याचे काहीच कारण नाही. कारण निवडणुकीच्या वेळी सारे हिंदुस्थान राष्ट्र एका बाजूला होते व आपला पक्ष दुसऱ्या बाजूला होता. एका बाजूला प्रबल अशी राजकीय संघटना होती व दुसऱ्या बाजूला अल्पसंख्य अस्पृश्यांना या संघटनेशी सामना द्यावयाचा होता. अर्थात पराजय होणे हेच आपले भवितव्य होते.

परंतु पराजय झाल्यानंतर थांबून चालणार नव्हते. आपल्या लोकांना कोठून तरी घटनासमितीत शिरकाव करून घ्यावयाचा होता. अस्पृश्यांचे राजकीय हक्क घटनासमितीसमोर मांडण्याची संधी आपल्या प्रतिनिधींना सापडावयास पाहिजे होती. हा अत्यंत मोठा बिकट प्रसंग होता. काँग्रेस व शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन यांच्यात करडा विरोध असल्यामुळे या पक्षाचा प्रवेश घटनासमितीत होऊ देता कामा नये असा काँग्रेसने निश्चय केला होता ! (शेम, शेम) काय वाटेल ते करून मला घटनासमितीत जाणे काँग्रेस पक्षाने अशक्य केले होते. अखेरीस बंगाल प्रांतातून आत जाण्याचा मार्ग मी शोधून काढला आणि तेथे गेलो. अस्पृश्य वर्गाचे हक्क तेथे मांडता यावेत. त्यांना हिंदुंच्या राज्यात काही सवलती प्राप्त व्हाव्यात. एवढा माझा मर्यादित उद्देश होता.

राष्ट्राची घटना आपण तयार करावी, अशी माझी महत्त्वाकांक्षा नव्हती. जेथे मला समितीचे सभासद होणेही दुरापास्त होते तेथे काही मला अधिकार गाजविता येईल, काही उत्तम कामगिरी करता येईल अशी कल्पना करणेही शक्य नव्हते. कोणाही माणसाला आत येऊ देऊ पण डॉ. आंबेडकरांना आत घेणार नाही, असे ठरविण्यात आले होते. घटनासमितीचे दरवाजे मला बंद होतेच, परंतु त्याबरोबर खिडक्याही बंद करून घेण्यात आल्या होत्या. आजूबाजूची भोकेही बुजवण्यात आली होती. परंतु आपल्या सौभाग्यामुळे व परमेश्वराच्या कृपेमुळे मला आत पाऊल टाकता आले. विधिघटना अशी की ज्याला आत येऊ न देण्याचा निश्चय केला होता त्याच्याच शिरावर ही मोठी जबाबदारी टाकण्यात आली. (हियर हियर च्या गर्जना) झाली ही गोष्ट अत्यंत सुदैवाची झाली. कारण अशा प्रकारची महान कामगिरी करण्याची संधी मनुष्यमात्राला क्वचितच प्राप्त होते. ही गोष्ट मला भूषणास्पद आहे. तशीच आपल्यालाही ती भूषणास्पद आहे. (टाळ्यांचा कडकडाट)

तसे पाहिले तर मी यात विशेष असे काही केले नाही. परंतु या कार्यामुळे एक गोष्ट मात्र संबंध हिंदू जनतेला पूर्णपणे पटली आहे. गेली 20 वर्षेपर्यंत माझ्यावर नाना प्रकारचे आरोप करण्यात येत होते. मी व माझा पक्ष अराष्ट्रीय आहे. इंग्रजांचा साथीदार आहे. मुसलमानांचा बगलबच्चा आहे अशा प्रकारचे धादांत खोटे आरोप माझ्यावर करण्यात येत होते. त्या लोकांची आता आम्ही तसे काही करीत नाही ही खात्री पटली, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट झाली. 20 वर्षे आमच्या पक्षास जो कलंक लागला होता तो आता साफ धुतला गेला आहे. शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन हा एक सुसंघटित मजबूत राजकीय रूप धारण करणारा, पण राष्ट्रद्रोही कृत्यात कधीही सामील न होणारा पक्ष आहे. ही सर्वांची पूर्ण खात्री झाली.

आजच्या राजकारणात मी आता विशेष जाऊ इच्छित नाही. परंतु काही गोष्टी अवश्य सांगाव्याशा वाटतात.

पूर्वी आपले राजकारण शत्रुत्वाच्या पायावर चाललेले होते. काँग्रेसवाले आपल्याला व आपण काँग्रेसवाल्यांना शत्रुप्रमाणे मानत होतो. माझ्या दृष्टीने, पूर्वीचे अस्पृश्य वर्गाचे सर्व पुढारी थोडाशा संकुचित दृष्टिकोनाने पाहात होते व तसेच वागत होते. मीही या दोषाला थोडाबहुत पात्र होतोच. आमचे काय होईल, हिंदुच्या हाती राजसत्ता आली तर काय होईल, असे आम्हाला वाटत होते. पण हा राजकारणाचा रोख आता बदललाच पाहिजे.

आता आपण एक गोष्ट पक्की ध्यानात ठेवली पाहिजे की, आपण आपल्या लोकांचे, आपल्या समाजाचे हित पाहात होतो ते तर पुढे चालू ठेवलेच पाहिजे. परंतु त्याचबरोबर आपल्या देशाला मिळालेले स्वातंत्र्य कसे राखून ठेवता येईल त्याचाही विचार केला पाहिजे. या देशाला पूर्वी स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही पारतंत्र्यात पिचत पडावे लागले आहे. अगोदर मुसलमानांनी व नंतर इंग्रजांनी आपले स्वातंत्र्य आपल्यापासून हिरावून घेतले होते. स्वातंत्र्याची वरच्या वर्गाला जितकी जरूरी आहे तितकीच खालच्या वर्गालाही आहे. इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपण मुक्त झालो आहोत. पण आता पुन्हा परकियांच्या गुलामगिरीत पडण्याचा प्रसंग आपल्यावर आला तर ती गोष्ट अत्यंत दुर्दैवाची ठरेल. या देशाच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करणे हेही प्रत्येकाने आपले परम कर्तव्य मानले पाहिजे.

या देशात इंग्रज लोक राज्य करीत होते त्यावेळी कोणाला काय हक्क द्यावयाचे. कोणत्या पक्षाला केव्हा अधिकार द्यावयाचा हे त्यांच्या हातात होते. त्यावेळी आपण इतर पक्षांशी फटकून वागलो. पण आता इंग्रज नाहीसे झाले आहेत. तेव्हा आपण इतर पक्षांशी सहानुभूतीने वागण्याचे धोरण ठेवले पाहिजे. त्यांच्याबरोबर तहनामा वाटाघाटी वगैरे प्रकारांनी संबंध राखले पाहिजे. आपण अल्पसंख्य आहोत आणि राज्यघटनेत आपल्याला काही जागा मिळाल्या, काही नोकऱ्या मिळाल्या तरी आपण अल्पसंख्यांकच राहाणार आहोत. तेव्हा सनदशीर मार्गांनी आपणास जर उन्नती करून घ्यावयाची असेल तर कुणा ना कुणा पक्षाशी, अथवा वर्गाशी संगनमत करूनच आपणाला वागले पाहिजे. अर्थात पूर्वीचे शत्रुत्व व वैर आता विसरले पाहिजे. आपला शत्रू कोण, मित्र कोण हे ओळखले पाहिजे. आपली शक्ती वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पूर्वीसारखा एकलकोंडेपणा आता उपयोगी पडण्यासारखा नाही.

कोणत्याही पक्षाशी सहमत होताना, मग तो पक्ष काँग्रेस असो, सोशालिस्ट असो अथवा शेतकरी कामगार पक्ष असो आपण आपली संघटना मोडता कामा नये. व्यक्तिगतदृष्ट्या माणसाला किंमत नसते. आज मला काँग्रेस गटात व राजकारणात जो मान आहे त्याचे एकमेव कारण म्हणजे माझ्या मागे शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनची संघटना आहे हेच होय. ज्या दिवशी या संस्थेचा आधार नाहिसा होईल त्या दिवशी राजकारणात मला किंमत उरणार नाही. म्हणून देशरक्षणाची भावना मनात बाळगून भावी राजकारणातील शत्रुमित्रांचे नाते ओळखून, स्वत्व राखून आपण सावधतेने शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनच्या नेतृत्वाखाली पावले टाकली पाहिजेत.

देशातील राजकीय पक्षाचे भवितव्य काय आहे हे आज कोणीच सांगू शकत नाही. निवडणुका होईपर्यंत राजकारणाला काय स्वरूप येईल हे निश्चित सांगता येत नाही. निवडणुकी या पैशाच्या जोरावर लढविल्या जातात. आतापर्यंत शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनने जे राजकारण केले त्यात पैशाचा संबंध आला नव्हता. या पक्षातील लोक मुळातच दरिद्री असल्याने मोठा निधी जमण्याची आशाही नव्हती. परंतु आता या पक्षातील व आपल्या जमातीतील प्रत्येक स्त्री-पुरुषाने कमीत कमी चार आणे देऊन एक निवडणूक निधी उभारला पाहिजे, दलित फेडरेशनने निधी जमविण्याची चळवळ आता हाती घेतली पाहिजे. ऑल इंडिया दलित फेडरेशनच्या वर्किंग कमिटीत तसा ठरावही पास झाला आहे. तेव्हा स्वयंसेवकांनी त्यासाठी घराघरातून फिरले पाहिजे. बंधु-भगिनींनो, आपण माझा गौरव केलात त्याबद्दल पुन्हा एकवार आपले आभार मानून रजा घेतो.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password