Categories

Most Viewed

11 जानेवारी 1942 भाषण

आपल्या संरक्षणासाठी संरक्षक दले उभारा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रस्थापित केलेल्या इमारत फंडास आर. आय. एन्. डॉकयार्ड फॅक्टरीतील मिल राईट शॉप मधील अस्पृश्य कामगारांतर्फे रविवार तारीख 11 जानेवारी 1942 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 101 रुपयाची थैली अर्पण करण्यात आली. सभेचे नियोजित अध्यक्ष महाशय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आगमनाप्रसंगी सभास्थानी जमलेल्या प्रचंड जनसमूहाने टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात व त्यांच्या जयघोषात त्यांचे अपूर्व स्वागत केले. सभेस सुरवात श्री. बी. एस. गायकवाड यांनी केली. ते म्हणाले. या सभेचा विशेष असा की, माझे मित्र एल. एस. रोकडे यांनी मिल राईट शॉप मधील आपल्या 20-25 कामगार बंधुंच्या साह्याने ही अल्पशी थैली डॉ. बाबासाहेबांच्या इमारत फंडास अर्पण करण्याचा घाट घडवून आणला याबद्दल ते व त्यांचे अस्पृश्य कामगार बंधू अभिनंदनास पात्र आहेत. नंतर इमारत फंडाचे जनरल सेक्रेटरी श्रीयुत उपशाम मास्तर यांचे भाषण झाले.

डॉ. बाबासाहेबांच्या भाषणापूर्वी श्री. एल. एस. रोकडे यांनी बाबासाहेबांच्या इमारत फंडास 101 रुपयांची थैली अर्पण केली.

नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात बोलावयास उभे राहिले. ते म्हणाले,

बंधुनों व भगिनींनो,
आज या ठिकाणी इमारत फंडाची सभा आहे म्हणून मी हजर राहिलो आहे. वास्तविक 100 रूपयेच्या थैलीकरिता प्रत्येक ठिकाणी हजर राहाण्याचे मी ठरविले तर मला माझे आयुष्यही पुरणार नाही. परंतु हे 100 रूपये फक्त मिल राईट शॉपमधील अवघ्या 22 मुलांनीच जमा केले आहेत ही गोष्ट आनंदाची आहे. दुसरे कारण असे की डॉकयार्डमध्ये वाडिया खात्यात आपले 40 व इतर कामगार आहेत. त्यांनी त्या कामास अद्याप हातभार लावलेला नाही. कदाचित मी सांगितले असता ही मंडळी इमारत फंडास मदत करतील असे मला सांगण्यात आल्यावरून मी या ठिकाणी हजर राहिलो आहे. या ठिकाणी ती माणसे हजर आहेत की नाही, हे मला माहीत नाही, परंतु जे हजर असतील त्या माणसांनी आपल्या इतर कामगारांना सांगून या मुलांनी घालून दिलेल्या उदाहरणाप्रमाणे इमारत फंडास मदत करावी, अशी मी त्यांना विनंती करतो.

इमारतीकरिता मी सांगितल्याप्रमाणे लाख सव्वालाख माणसांनी दोन रुपये प्रमाणे देणगी दिली असती तर आता ती इमारत कदाचित आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलीही असती. इमारत फंड जमा होण्यास इतका अवधी लागावा यात काहीतरी संकेत असावा आणि मजजवळही इतके पैसे जमा झाले असते. तरी कदाचित मी ही इमारत बांधली नसती. कारण हल्लीची युद्धजन्य परिस्थिती होय. लढाई युरोपच्या पश्चिमेच्या एका कोपऱ्यात सुरू झाली. ती आता पूर्वेस आपल्या दाराजवळ आली आहे. बॉबच्या मा-याने इमारती, शहरे बेचिराख होत आहेत. अशावेळी आपली इमारत जर बॉब हल्ल्यास बळी पडली तर असमर्थ अस्पृश्य समाजाला परत ती उभी करणे मुष्कील झाले असते. तथापि, स. उपशाम मास्तर यांनी सांगितल्याप्रमाणे जागा तरी आपल्या मालकीची करून घेणे जरूर आहे.

लढाईमुळे माणसे विवंचनेत आहेत. अशी जरी परिस्थिती असली तरी आपण सर्व लोक लढाईत मरणार नाहीत हे खास. काही मरतील तर काही जगतील. तेव्हा मेलेल्यांनी जगणाऱ्यासाठी काहीतरी विचार करणे अगत्याचे आहे. लढाईत काय होईल ? असा अदूरदर्शीपणा करणे योग्य नाही.

दुसरी महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगावयाची आहे. या सभेने मला ती सांगण्याची संधी दिली आहे. दुसरीकडे अशी संधी मला मिळाल्यास मी ती गोष्ट जरूर सांगेन. हल्ली चोहोकडे ब्लॅक आऊट आहे. जपानी विमाने घिरट्या घालीत आहेत. लढाई दाराजवळ आली आहे. अशा वेळी आपली बायकामुले तसेच निरूपयोगी माणसे आपापल्या गावी पाठवावे. हे बरे सरकारी हुकूम मिळेपर्यंत थांबणे धोक्याचे आहे. पेट्रोल नियंत्रणामुळे तुम्हाला मोटार मिळणार नाही. ट्रेन्स (आगगाड्या) अशा किती उपयोगात आणता येतील याचा विचार करा. दुसरे असे की या शहरात पुष्कळ गुंड व बदमाश लोक दबा धरून आहेत. त्यांच्यापासून संरक्षण करण्याकरिता तुम्ही चाळीचाळीतून, प्रत्येक मोहोल्ल्यातून संरक्षक दले तयार करा आणि संघटनेने रहा.

शेवटी या ठिकाणी आलेले मि. एफ. डब्ल्यू शॉर्टलंड या साहेबांचे सभेच्यातर्फे अभिनंदन करावयाचे आहे. या साहेबांनी आपल्या 20-22 माणसांना कामावर लावलेले आहे असे मी ऐकतो. वास्तविक 20-22 माणसांना कामाला लावणे म्हणजे मोठीच बाब आहे असे नाही. पण आपणाला नोकरीच्या बाबतीत अतिशय वाईट अनुभव येतो. येथेच धोबीतलाव जवळ सैन्यात भरती करण्याचे रिकुटिंग ऑफिसरचे ऑफिस आहे. आपली दररोज काहीतरी दहापंधरा मुले भरतीसाठी जात असतात. तेव्हा कोणाची छाती कमी, कोणाचे वजनच कमी, कोणाचे काहीना काही तरी कमी असे सांगून त्यांना परत पाठवतात. उलट स्पृश्य तरूण कसाही असला तरी तो भरती झाल्यावाचून रहात नाही, असे दररोज मला सांगण्यात येते. कारण हे की, भरती करणारे ऑफिसर स्पृश्य आहेत. या दृष्टीने पाहिले असता या साहेबांनी या कामावर लाविलेल्या माणसांवर उपकार केले हे उघड आहे. याबद्दल मी मि. शार्टलंड साहेबांचे अभिनंदन करतो.

सदर प्रसंगी रॉयल इंडियन नेव्ही येथील राईट खात्यातील फोरमन मि. शॉर्टलंड साहेब यांनी हिंदीत छोटेसे भाषण केले.

सदर सभेच्या शेवटी इमारत फंडाचे जनरल सेक्रेटरी श्री. शा. अ. उपशाम यांनी जाहीर केले की, सदर सभेत इमारत फंडास मिळालेल्या सर्व रकमा जमेस धरून आज इमारत फंड 10,129 रूपये 7 आणे 3 पैसा इतका जमा झाला आहे.

नंतर इमारत फंडाचे असि सेक्रेटरी श्री. बी. एस. गायकवाड यांनी बाबासाहेबांचे व इतर मंडळींचे समयोचित भाषणात आभार मानले व अध्यक्षांच्या परवानगीने सभा बरखास्त झाल्याचे जाहीर केले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password