Categories

Most Viewed

10 जानेवारी 1938 भाषण

साप-मुंगूस, उंदीर-मांजर यांची कधी मैत्री जमेल का ?

सोमवार, तारीख 10 जानेवारी 1938 रोजी मुंबई प्रांतिक असेंब्लीच्या बैठकीस मुंबई कौन्सिल हॉलमध्ये सुरवात झाली. या बैठकीच्यावेळी असेंब्ली हॉलवर कोकण, सातारा, नाशिक वगैरे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी आपला मोर्चा नेण्याचे आगाऊ जाहीर केले होते. त्याप्रमाणे हा शेतकऱ्यांचा मोर्चा संघटित व योग्यरीतीने यशस्वी करण्याकरिता स्वतंत्र मजूर पक्ष व इतर शेतकरी संस्थांनी सहकार्य करून एक “मोर्चा कमिटी निवडून तिच्या नेतृत्वाखाली हा शेतकऱ्यांचा अपूर्व मोर्चा कौन्सिलवर नेण्याचे ठरविले होते. त्याप्रमाणे तारीख 10 रोजी वरील ठिकाणचे सर्व शेतकरी आपल्या मिरवणुकी घेऊन दुपारी दीड वाजता आझाद मैदानावर जमले. कोकणातून आलेले शेतकरी बांधव व्हिक्टोरिया डॉकमधून थेट बोरीबंदर पुढील मैदानावर आले. इतर शेतकऱ्यांचे गट परळ येथील कामगार मैदानावर जमून ते प्रचंड मिरवणुकीने आझाद मैदानावर आले. या मिरवणुकीबरोबर “खोती पद्धती नष्ट करा. सावकारशाहीला मूठमाती द्या. शेतकऱ्यांचा विजय असो” वगैरे आशयाच्या मोठमोठ्या पताका फडकत होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयजयकारही करण्यात येत होता. अशा थाटामाटात ही मिरवणूक काळबादेवी मार्गाने येत असता येथील व्यापारी लोकांचे धाबे दणाणले. काँग्रेससारख्या अधिकारारूढ सत्तेविरुद्ध हे शेतकऱ्यांनी संघटित उभारलेले बंड पाहून त्यांना भीती व आश्चर्य वाटल्यास नवल नाही. ही मिरवणूक आझाद मैदानावर आली तोच चौपाटी मार्गाने मुंबईतील “बालू” लोकांची तिसरी मिरवणूक या शेतकऱ्यांच्या मिरवणुकीत सामील झाली. त्याशिवाय ठाणे-कल्याण वगैरे ठिकाणचे शेतकरी निरनिराळ्या मार्गाने आझाद मैदानावर येत होते. डॉ. भोईर यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यातील शेतकरी बांधव अगदी सकाळीच दादरवरून कामगार मैदानावर हजर झाले होतेच. अशा रीतीने हा जमाव वाढत वाढत वीस ते पंचविस हजारापर्यंत शेतकरी बांधव आझाद मैदानावर मिरवणुकीला तयार झाले. या प्रचंड मिरवणुकीची शिस्त राखण्यासाठी भाई चित्रे, याज्ञिक, परुळेकर, पोतनीस, प्रधान, मिरजकर, लालजी पेंडसे, सुरबा टिपणीस, मडकेबुवा जाधव, राजाराम भोळे, डॉ. भोईर वगैरे मंडळी हजर होती. त्यांनी जमलेल्या शेतकऱ्यांना आजच्या इतिहास प्रसिद्ध शेतकऱ्यांच्या मोर्च्याविषयी सविस्तर माहिती निवेदन केली. इतक्यात ही मिरवणूक कोणत्या मार्गाने व कशी न्यावी या विषयाचा पोलिस कमिश्नरचा हुकूम घेऊन ए. डिव्हीजन पोलिस इन्स्पेक्टर आले. पोलिसांनी ही मिरवणूक कौन्सिल हॉलवरून नेण्यास व ती मध्ये कुठेही न थांबविता आझाद मैदानावर आणण्यास मिरवणुकीच्या कार्यकर्त्या मंडळींना कळविले. याविषयी शेतकऱ्यांच्या पुढाऱ्यांमध्ये बराच विचारविनिमय होऊन पोलिसांचे म्हणणे मान्य करणे भाग पडले. मात्र या मिरवणुकीपैकी निदान वीस प्रतिनिधींना ना. मुख्य प्रधानांना भेटून शेतकऱ्यांचे म्हणणे कळविण्याची परवानगी मागितली. ही परवानगी पोलिस कमिशनराने तात्काळ दिली. अशा रीतीने मेयो रोडच्या मार्गाने, कूपरेज जवळून कौन्सिल हॉलला वळसा देऊन म्युझिअमवरून ही 20-25 हजार शेतकऱ्यांची प्रचंड मिरवणूक गगनभेदी जयघोष करीत पुन्हा संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आझाद मैदानावर आली. या एवढ्या मिरवणुकीची शिस्त व संघटना पाहून कुणालाही कौतुक वाटल्यावाचून राहाणार नाही. आम्हाला वाटते की, सुव्यवस्था व कायदा खात्याच्या सर्वाधिकाऱ्यांनी मुंबईचे सारे पोलिस या मिरवणुकीच्या कडेकोट बंदोबस्तास ठेविले होते. अशाच प्रकारचा बंदोबस्त 1931 साली काँग्रेसने पुकारलेल्या कायदेभंगाच्या चळवळीत नोकरशाही सरकारने ठेवला असताना काँग्रेसच्या नारिंगी वेषधारी देशसेविका हा पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहून “हे जुलमी सरकार नय रखना म्हणून गीत गात असत. आता त्याच गीताचे सूत्रधार गोरगरिबाच्या शांततेच्या योग्य व न्याय्य मागणीच्या मोर्चासाठी पोलिसाचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यास कारणीभूत झालेले पाहून कुणाही विचारी माणसांना आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. तसेच ही किसानांची प्रचंड मिरवणूक कौन्सिल हॉलवरून जात असताही या गोरगरिबांच्या कनवाळू म्हणविणाऱ्या काँग्रेस सरकारला त्यांच्याकडे सहानुभूतीने पाहण्याची देखील पर्वा वाटली नाही. ही कॉंग्रेसच्या मंडळीची वागणूक त्यांना वाटणाऱ्या शेतकऱ्यांच्या आस्थेविषयीची खात्रीने साक्ष पटवील.

शेवटी ही मिरवणूक पुन्हा आझाद मैदानावर आल्यावर स्वतंत्र मजूर पक्षाचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा भरविण्यात आली. यापूर्वी ना. खेर यांनी शेतकऱ्यांच्या वीस प्रतिनिधींना सायंकाळी 7 वाजता मुलाखत देण्याचे आश्वासन दिले होते. आझाद मैदानावर शेतकऱ्यांच्या सभेत भाई चित्रे यांचे भाषण झाले. भाई चित्रेप्रमाणे कॉ. याज्ञिक, द. वि प्रधान, लालजी पेंडसे, मिरजकर, टिपणीस वगैरे पुढारी मंडळींची जोरदार भाषणे झाली. त्यांच्या भाषणानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भाषण करावयास उभे राहाताच त्यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. त्यांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे सांगितले, कष्टाळू लोकांची संघटना करावयाची झाल्यास त्यात जातिभेद, धर्मभेद यांना मुळीच थारा मिळता कामा नये. हा कष्टाळू वर्ग अगोदरच बिकट आर्थिक दडपणाने दडपला गेलेला आहे. अशा परिस्थितीत जी संघटना झाली आहे तीत मी म्हणत आहे त्याप्रमाणे विषमता दिसता कामा नये. आज मी म्हणत आहे अशा तऱ्हेचे सर्व जातींच्या कष्टाळू वर्गाचे हे संघटन पाहून मला आनंद होत आहे. म्हणूनच आजचा दिवस मी मोठ्या भाग्याचा समजतो. कारण की आजची आपली ही संघटना केवळ स्वार्थत्यागाच्या बळावर उभारलेली आहे. श्रमजिवी वर्गाने यासाठीच श्रीमंत वर्गाच्या म्हणजेच काँग्रेस सारख्या पक्षाशी सहकार्य करून किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवून उपयोगी नाही. आपणास माहितच आहे की या जगात ज्याचे घर पेटते, ज्याच्या घराला आग लावली जाते ? त्याचे व जो आग लावतो त्याचे कधी तरी संगनमत होईल काय ? आपण साधारणपणे प्राणीमात्राकडेही दृष्टी फेकली तरी साप व मुंगूस कधीतरी एकत्र होऊ शकतील का ? तसेच उंदीर-मांजराची मैत्री जमेल का ? अशारितीने निसर्गाविरुद्ध सृष्टी निर्माण करणाऱ्याविषयी आपण कधी तरी विश्वास बाळगाल का ? आणि आपण त्याच दृष्टीने श्रीमंतांची पाठीराखी काँग्रेस हिच्याकडे पाहिले पाहिजे.

आपण मुंबई असेंब्लीमधील काँग्रेसच्या सभासदांकडे पहा. बहुतेक सारे निवडून आलेले सभासद सावकार, जमीनदार, खोत आणि श्रीमंत असे लोक आहेत. ते आपल्या हिताविरुद्ध काँग्रेसला काहीच करू देणार नाहीत. त्यांच्यापैकी कित्येकांची सावकारी 50 हजारांच्या वर आहे. हे व्याजबट्टयाने आपले धन वाढविणारे लोक आपणासारख्या श्रमजिवी वर्गाच्या कल्याणाची गोष्ट कशी करू शकणार ? तुम्ही आपल्या मनात पक्की खात्री ठेवा की हे असेंब्लीमध्ये काँग्रेसच्या कृपाप्रसादाने निवडून आलेले सभासद तुमच्या हितसंबंधाच्या कोणत्याही गोष्टी करणार नाहीत. आपण 1937 साली या काँग्रेसच्या प्रतिनिधींना निवडून दिलेत त्यावेळी हे लोक आपली कशातऱ्हेने पायधरणी करीत होते, ही गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या हिताचा प्रश्न आम्ही प्रथम हाती घेऊ. तुमच्या सुखासाठी काँग्रेसने फकिरी पत्करली आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन आपण काँग्रेसलाच मते द्या, असे म्हणणारे हे निवडून आलेले प्रतिनिधी तुमच्याकडे आता ढुंकूनही पाहावयास तयार नाहीत. म्हणून मी म्हणतो आपण या तोंडपुजे लोकांची यापुढे मुळीच पर्वा करू नका.

असल्या फसव्या लोकांची यापुढे खरी पूजा पायाच्या ठोकरीने केली पाहिजे. आपला खरा हितकर्ता कोण हे निवडताना यापुढे फार सावधगिरी बाळगा. तुम्हाला बुद्धी प्राप्त झाली आहे. त्या बुद्धीच्या बळावर तुम्ही सारासार विचारसरणीने तुमचे खरे हितकर्ते कोण, कोणता पक्ष तुमच्यासाठी प्राणाचीही पर्वा न करता झगडण्यास समर्थ आहे, याची तुम्हीच निवड करा.

खरे पाहिले असता जगात फक्त दोनच जाती आहेत. पहिली श्रीमंतांची व दुसरी गरिबांची. याशिवाय तिसरा वर्ग म्हटला म्हणजे मध्यम वर्ग होय. जगातल्या कोणत्याही उज्ज्वल चळवळीच्या नाशास हाच वर्ग कारणीभूत होत असतो. आपण कल्पना करा की आपल्या देशात कष्टाने आपले पोट भरणारे बांधव शेकडा 80 आहेत. या संख्येच्या मानाने इतर वर्ग किती अल्प आहेत याची कल्पना करा. परंतु केवळ अज्ञानामुळे आणि या वरिष्ठ म्हणणारांच्या हाती सत्ता असल्यामुळे आपणासारख्या बहुसंख्यांक जनतेला ते शह देऊ शकतात. परंतु आपण सर्व लोक जागृत झालात तुम्हाला तुमचे हित कशात आहे हे संघशक्तीने आणि स्वावलंबनाने कळावयास लागले तर आपण एका चुटकीसरशी सर्व अधिकार आपल्या हाती घेऊ शकाल. आपण राष्ट्रीय काँग्रेसच्या मागील कायदेभंगाच्या चळवळीचे बारकाईने निरीक्षण केल्यास आपणास स्पष्ट कळून येईल की, कष्ट करणाऱ्या लोकांच्या साहाय्यावरच काँग्रेसला आपला लढा इतक्या प्रभावाने लढविता आला. या कष्ट करणाऱ्या लोकांना या काँग्रेसच्या सत्ताधारी लोकांनी त्यावेळी पुष्कळ आशायुक्त वचने दिली होती. काँग्रेसच्या हाती राजकीय सत्ता आल्यावर काँग्रेस पहिल्या प्रथम गोरगरीब श्रमजिवी वर्गाच्या हितरक्षणाचा प्रश्न हाती घेईल, असे ती म्हणे. परंतु आज तुम्हास काय दिसत आहे ? आज काँग्रेसच्या हाती सत्ता आहे पण त्यांनी अजून कोणत्याही प्रकारची कामगिरी मोठ्या आस्थेने किंवा तातडीने केलेली नाही. आज त्यांचे प्रतिनिधी मुंबई असेंब्लीमध्ये बहुसंख्यांक असे आहेत. बहुमताच्या बळावर त्यांना तुमच्या हितसंबंधासाठी वाटेल ते कायदे करणे अशक्य नाही. आमच्या स्वतंत्र मजूर पक्षाचे अवघे 14-15 सभासद आहेत. इतक्या थोड्या सभासदांच्या बळावर आम्हाला तुमच्या हितसंबंधाचे कायदे पास करून घेणे अशक्य आहे. म्हणून यापुढे लक्षात ठेवा की या काँग्रेसच्या भांडवलदार लोकांना आपली मते देऊन निवडून देऊ नका, आज जसे आपण संघटितपणे येथे आला आहात तसेच जातिभेद-धर्मभेद विसरून आपली संघटना जोरदार करा.

आपण कोकण प्रांतातली स्थिती पाहिली तर खोतादी सावकार लोक अवघे हजार किंवा दोन हजार असतील. तुम्ही काबाडकष्ट करणारे लोक 13 लक्षावर आहात. अशा परिस्थितीत आपण इतके दुबळे का, याचे मला मोठे आश्चर्य वाटते. आज हजार दोन हजार लोक आपणासारख्या 13 लक्ष लोकांवर हुकुमत चालवीत आहेत, याचे मूळ कारण आपली दारुण गरिबी होय. तुम्ही या मूठभर श्रीमंतांकडून पिळले गेला आहात. तुमच्यामध्ये या पिळलेल्या अवस्थेत प्रतिकार करण्याची शक्तीच राहिली नाही. यासाठी ज्यांनी तुमची अशी असह्य अवस्था केली त्या खोतादी श्रीमंतांना यापुढे कोणत्याही प्रकारचे सहाय्य करू नका. ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा की कॉंग्रेस या सर्व धनिकांना दुखवून तुमचे हित करणार नाही. तसेच तुम्ही येथे जमलेले निरनिराळ्या जातीचे लोक आजपर्यंत आपापल्या जातीच्या निरनिराळ्या संघटना करून कार्य करीत होता. त्यामुळे श्रमजिवी म्हणून एका वर्गाची एकत्रित अशी संघटना झाली नव्हती. परंतु ती संघटना यापुढे होण्याचे भाग्य दिसू लागले आहे, ही मोठी आनंदाची गोष्ट होय.

श्रीमंत वर्गाला सहाय्य करणाऱ्या काँग्रेसला कोणत्याही प्रकारे सहाय्य करून आपले हित होणार नाही, हे आजची प्रत्यक्ष परिस्थितीच सांगत आहे. गेल्या असेंब्लीच्या निवडणुकीत आम्ही स्वतंत्र मजूर पक्षातर्फे काँग्रेसशी दोन हात करून जशा निवडणुकी लढविल्या व जे थोडेफार यश मिळविले तसेच जर कम्युनिस्टादी जहाल पक्षातील पुढाऱ्यांनी आचरण केले असते तर त्यांनाही निवडणुकीत थोडेफार यश मिळून त्यांचे सहाय्य आम्हाला आज असेंब्लीमध्ये झाले असते. परंतु त्यांनी यापुढे तरी आपले कर्तव्यकर्म बजावण्यास मुळीच कुचराई करता कामा नये. तसेच माझ्या कम्युनिस्ट मित्रांना दोन हिताचे शब्द सांगणे अयोग्य होणार नाही, असे मला वाटते. मी या कम्युनिस्टांच्या तत्त्वज्ञानाची येथील सर्व पुढाऱ्यांपेक्षा खात्रीने अधिक पुस्तके अगदी अभ्यासपूर्वक वाचली आहेत. त्या पुस्तकांवरून पाहता कम्युनिस्टांचे तत्त्वज्ञान कितीही सुंदर असले तरी त्याचा कितपत उपयोग करता येईल, हे पाहिले पाहिजे. त्या दृष्टीने कार्य केल्यास रशियन लोकांना जे यश मिळवावयास बरेच श्रम व कालावधी लागला तितका हिंदुस्थानातील परिस्थितीमुळे लागणार नाही, असे मला वाटते. म्हणून मला श्रमजिवी वर्गाच्या चळवळीच्या लढ्याबाबत कम्युनिस्ट तत्त्वज्ञान अधिक जवळचे वाटते. आपली परिस्थिती अशी आहे की आपणाजवळ आज धन नाही. आपल्या चळवळीचा सर्वत्र ठिकाणी प्रचार करण्याकरिता एखादे प्रभावी दैनिक वर्तमानपत्र नाही. सरकारचे सहाय्य मिळण्याची आशा नाही. म्हणून आपण आपली स्वतंत्र आणि संघटित अशी संघटना करा. आपला लढा सर्व प्रकारचे भेद विसरून लढविण्यास धैर्याने तयार व्हा हीच विनंती.

मुंबई सरकारपुढे सादर केलेल्या मागण्या

मूलभूत मागण्या :

(1) शेतकरी वर्गाला स्वतंत्रपणे व सुखासमाधानाने राहाता यावे म्हणून जमिनीची प्रत्यक्ष मशागत करणाऱ्यालाच त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले पाहिजे.

(2) जमिनीची मशागत करून तीवरच जगणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल व त्यांच्या आर्थिक हिताची व्यवस्था व्हायची असेल तर खोत इनामदारासारखे मध्यस्थ नसले पाहिजेत.

(3) जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांवर कर अगर पट्टी बसविण्यापूर्वी त्याला चरितार्थापुरती योग्य ती सोय करून देणे हे सरकारने आपले कर्तव्य मानले पाहिजे.

(4) त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना किमान मजूरी देण्याची कायद्याने सोय करून त्यांच्या हिताला जपणे हेही लोकमतवादी सरकारचे कर्तव्य आहे.

तातडीच्या मागण्या :

(1) ज्याप्रमाणे थकलेल्या शेतसारा बाक्या माफ करण्यात आल्या त्याचप्रमाणे आजपर्यंत थकलेल्या खंडाच्या बाक्याही ताबडतोब माफ करण्यात याव्यात.

(2) जमिनीचे किमान उत्पन्न ठरवून त्यापेक्षा कमी उत्पन्नावर सारा अजिबात माफ करावा. किमान उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या जमिनीवर वाढत्या मानाने सा-याची आकारणी करण्याच्या दृष्टीने जमीन महसूल कायद्यात दुरुस्ती झाली पाहिजे. त्याचप्रमाणे बाजारभाव उतरले असल्यामुळे ही दुरुस्ती होईपर्यंतच्या मुदतीत ज्यांना सालिना 75 रु. अगर त्यापेक्षा कमी शेतसारा द्यावा लागतो त्यांचा सारा ताबडतोब 50 टक्क्यांनी कमी केला पाहिजे.

(3) खोती पद्धती व इनामदार पद्धती या आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक व सामाजिकदृष्ट्या जुलमी असल्यामुळे या पद्धती भरपाईसह अगर भरपाईशिवाय नष्ट करण्यासाठी कायदा करण्याची व्यवस्था ताबडतोब झाली पाहिजे. त्याचप्रमाणे कुळांकडून खंड वसूल करण्यासाठी व त्यांना छळण्यासाठी जमीनदार जे-जे मुदती दाव्यासारखे जुलमी उपाय योजतील अगर योजण्याचा बेत करतील ते-ते सर्व ताबडतोब बंद पडले पाहिजेत व सरकारने यासाठी योग्य ती व्यवस्था करावयास पाहिजे..

(4) (1) तीन वर्षे जमीन कसणाऱ्या कुळाला कायम कूळ समजले जावे, असा कायदा सर्व जमीनदारांच्या कुळांना लागू केला पाहिजे. या कायद्याला बगल देण्याची कारवाई जमीनदारांना करता येऊ नये म्हणून एक लँड कमिशन नेमण्यात यावे. या कमिशनच्या परवानगीखेरीज कुळाच्या अंगाखालील जमीन काढून घेतली जाता कामा नये. कूळ जोपर्यंत खंड देत आहे तोपर्यंत त्याजकडे तीन वर्षे असलेली जमीन कोणत्याही सबबीवर काढून घेतली जाता कामा नये.

(2) साऱ्याच्या मानाने फक्त तिसरा हिस्सा अधिक खंड घ्यावा. जास्त खंड कुळाकडून घेता येऊ नये.

(5) लहान शेतकऱ्यांची पाणीपट्टी 50 टक्क्यांनी कमी केली पाहिजे. बहुसंख्य लहानलहान शेतकरी व कुळे यांना फायदेशीर होईल असे धोरण इरिगेशन खात्याने चालविण्याच्या दृष्टीने इरिगेशन कायद्यात दुरुस्ती केली पाहिजे.

(6) सर्व खेड्यांना मोफत चराई राने असावीत.

(7) कर्ज निवारणाचा योग्य तो कायदा सर्वत्र लागू होईपर्यंत कर्ज तहकूबी जाहीर करावी.

(8) शेतकऱ्यांच्या हातून सावकारांच्या हाती जमीन जाऊ नये या दृष्टीने सावकारीवर बंधने घालावी.

(9) शेतकऱ्यांच्या निर्वाहासाठी लागणारी किमान जमीन व त्याच्या चरितार्थाला लागणाऱ्या वस्तूंवर सावकारी जप्ती आणण्यास बंदी झाली पाहिजे.

(10) वयात आलेल्या सर्व स्त्री-पुरुषास मताधिकार.

(11) वेठ-बिगार करून घेणे व बेकायदेशीर रीतीने पैसे उकळणे, हे फौजदारी गुन्हे ठरविले पाहिजेत.

(12) जमीन महसूल खात्यातील सर्व मॅजिस्ट्रेटी अधिकार काढून घ्यावेत.

(13) कसता येण्याजोगी सर्व पडित जमीन उपरी शेतमजूरांना मोफत वाटून द्यावी.

 • Rajendra
  January 10, 2022 at 9:41 am

  जयभीम साहेब

  • Suresh Hire
   January 22, 2022 at 4:19 pm

   जयभीम साहेब.

Leave Your Comment

Your email address will not be published.*

Forgot Password