समता सैनिक दलाचा सैनिक निर्भय योद्धाच म्हटला पाहिजे.
स्वतंत्र मजूर पक्षाच्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्पृश्यांच्या सर्वांगीण उन्नतीच्या कार्याला ज्या सैनिकांनी आजन्म वाहून घेतले आहे. त्या मुंबईतील समता सैनिक दलाची वार्षिक परेड व पाहाणी डॉ. बाबासाहेब यांच्या नेतृत्वाखाली गेल्या रविवारी दिनांक 8 जानेवारी 1939 ला सकाळी परळ येथील कामगार मैदानावर झाली. मुंबईमधील निरनिराळ्या मोहल्ल्यातून, पहाड्यातून आणि वार्डातून समता सैनिक दलाची पथके आपल्या कॅप्टनसह सकाळी 6.30 वाजल्यापासून कामगार मैदानावर जमत होती. दलाचे कर्तृत्ववान जी. ओ. सी. श्री. रामजी धयाळकर यांनी सर्व दलांना शिस्तीने मैदानावर उभे करुन परेडची प्राथमिक तालीम घेतली. बँडच्या सुस्वर वाद्यात हा परेडचा कार्यक्रम उत्तम झाला.
बरोबर 10 वाजता डॉ. आंबेडकर आपल्या सहकाऱ्यांसह मैदानावर येताच सैनिकांशिवाय इतर मंडळींनी त्यांचे टाळ्यांच्या गजरात जंगी स्वागत केले. समता सैनिकांनी मिलीटरी थाटात त्यांना सलामी दिली. नंतर बँडच्या मधूर वादनाने त्यांचे स्वागत करण्यात आले. हा प्राथमिक स्वागत समारंभ संपल्यावर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वतंत्र मजूर पक्षाचे सेक्रेटरी डी. व्ही. प्रधान व दलाचे जी. ओ. सी. धयाळकर यांनी समता सैनिक दलाची पाहाणी केली. यावेळचा एकंदर देखावा लष्करी थाटाचा आणि अंगात एकप्रकारची वीरश्री उत्पन्न करणारा असा होता. प्रत्येक सैनिकाची टापटीप, नीटनेटके कपडे, शिस्त वगैरे वाखाणण्यासारखी होती.
दलाची पाहाणी झाल्यावर वीर फोटो आर्ट स्टुडिओच्या द्वारे दलाचे व डॉ. आंबेडकरांसह पुढारी मंडळीचे निरनिराळे फोटो घेण्यात आले. या जनरल परेडकरिता निदान 2,500 समता सैनिक व इतर जनता 20,000 पर्यंत जमली होती. हा सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्व सैनिकांना उद्देशून डॉ. आंबेडकरांना भाषण करण्याची विनंती स्वतंत्र मजूर पक्षाचे सेक्रेटरी श्री. डी. व्ही. प्रधान यांनी करताना सांगितले की, “आज दलामध्ये युनिफार्म घातलेले फक्त 2,500 सैनिक आहेत. युनिफार्मशिवाय तितकेच इतर सैनिक आहेत. आजच्या परिस्थितीत पाच हजार समता सैनिक दलांची संख्या मुंबईत आहे. माझी खात्री आहे की, ही संख्या दुप्पटीने वाढून ती 10,000 पर्यंत पुढील वर्षी झालीच पाहिजे. तसेच समता सैनिक दलाच्या शाखा फक्त मुंबईतच नसून त्यांचा प्रसार सी. पी. मध्यप्रांतादी निरनिराळ्या प्रांतात सुरु आहे. लवकरच अखिल हिंदुस्थानामध्ये स्वतंत्र मजूर पक्षाच्या झेंड्याखाली 50,000 सैनिक तयार झाल्याचे दृश्य दिसेल. प्रत्येक सैनिकानी स्वतंत्र मजूर पक्षाच्या कार्याकरिता विशेष जातीने झटले पाहिजे, श्री. प्रधान यांच्या प्रास्ताविक भाषणानंतर डॉक्टर साहेब भाषण करावयास उभे राहिले. ते आपल्या भाषणात म्हणाले.
समता सैनिक दलाच्या आजच्या वार्षिक जनरल परेडच्या निमित्ताने मुंबईतील सर्व सैनिक इतक्या जमावाने जमल्याबद्दल मला आनंद होत आहे. तसेच आज येथे त्यांनी एकत्र येऊन आपल्या संघटनेचे शिस्तीचे व स्वार्थत्यागाचे दाखविलेले प्रदर्शन बहुजन समाजाला आदर्श म्हणून गणले जाईल. स्वतःच्या पैशाने प्रत्येकाने आपला युनिफॉर्म करून आपल्या पक्षाच्या कार्याविषयी दाखविलेली कळकळ खरोखरच अभिनंदनीय आहे. हे दल मी व माझ्या सहकारी मित्रमंडळीच्या बडेजावाकरिता आहे. असा काहीचा समज आहे. परंतु या दलाची ज्याला पूर्वपिठीका ठाऊक आहे त्याला या दलाची स्थापना करण्यात किती उदात्त आणि उज्ज्वल ध्येय पुढे ठेविलेले आहे, याची खात्रीने कल्पना येईल.
1926-27 च्या सुमारास या दलाची स्थापना करण्याची मुहूर्तमेढ महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाने करण्यात आली. त्यावेळी महाडच्या सत्याग्रहाचे कार्य निर्विघ्नपणे आणि यशस्वीरीतीने पार पाडण्यासाठी अशा संघटित दलाची फारच आवश्यकता होती. आम्ही स्थापन केलेल्या या समता सैनिक दलाची पूर्वपिठीका पाहता व एकंदर परिस्थितीचा विचार करता दलाची स्थापना मी माझ्या नावाकरिता जयजयकाराकरिता किंवा बुवाबाजीच्या स्वरूपाच्या कार्याकरिता केलेली नाही. याला सरळ व रोखठोक उत्तर महाड तलावाच्या लढ्याने सहज मिळण्यासारखे आहे. हिंदुस्थानात जे अनेक धर्मीय समाज आहेत त्यात हिंदू समाजात अस्पृश्यांचा समावेश होत असल्यामुळे आणि या हिंदू समाजातील स्पृश्य बांधवांकडून अस्पृश्य मानलेल्या समाज बांधवावर, होणाऱ्या अन्याय, जोर-जुलूम, विषमतेची शिकवण व वागणूक वगैरे अनिष्ट आणि धातुक प्रकारांना आळा बसविण्याकरिता या दलाची प्रामुख्याने स्थापना करण्यात आली आहे. ज्या समाजात माणुसकीने जगता येत नाही. नैसर्गिक हक्कांचा जिथे समतेने उपभोग घेता येत नाही. ज्या धर्मावर विषमतेचा कीट चढला आहे. तो धर्म झुगारून देऊन खरी माणुसकी जाणणारा धर्म निर्माण करण्याकरिता जे कार्य करावे लागत आहे. त्या पवित्र आणि उज्ज्वल कार्यासाठी या दलाची स्थापना झालेली आहे. या कार्याची मुहूर्तमेढ महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाने करून हा सत्याग्रहाचा लढा विजयी केलेला आहे. अशाच तऱ्हेने ज्या ज्या ठिकाणी सार्वत्रिक विहिरी आहेत. तळी आहेत. नळ आहेत तेथे असेच समान हक्काचे लढे लढवून आपले कार्य करावयाचे आहे. महाड तळ्याचा सत्याग्रह आपणास पिण्यास पाणी मुळीच मिळत नव्हते या भावनेने केला नव्हता. या तळ्याच्या पाण्यावाचून आपले अडले नव्हते किंवा आपण तडफडून मरत नव्हतो. हा लढा पिण्याच्या पाण्यासाठी नव्हता, तर तेथील पाणी सर्व जातीच्या धर्माच्या आणि पंथाच्या लोकांना समानतेने पिण्यास मिळावे याच हक्कासाठी हा लढा लढविला गेला. तीच गोष्ट नाशिकच्या काळाराम मंदीर प्रवेशाच्या सत्याग्रहाची. केवळ देवाच्या दर्शनासाठी आम्ही भुकेलेले नव्हतो. गेल्या दोन हजार वर्षात हिंदूच्या देवांचे अस्पृश्य बांधवांना दर्शन झाले नव्हते. म्हणून अस्पृश्य समाजाचे अडले नव्हते. नाशिकच्या मंदिर प्रवेशाचा लढा हा केवळ आपल्या हिंदू समाजातील समानतेच्या हक्कांचे संरक्षण करण्याकरिता होता. त्या सत्याग्रहाच्या लढ्यात लोकांना ज्या पीडा झाल्या होत्या, जे अनेक दुखःमय त्रास सोसावे लागले ते केवळ आपण माणसे आहोत आणि इतर माणसाप्रमाणे आपणालाही मंदिरात प्रवेश करण्याचा हक्क आहे हे प्रस्थापित करण्याकरताच सोसले होते. आपण माणसासारखी माणसे असून आमच्या या मंदिरातील प्रवेशामुळे ती हिंदू देवालये अपवित्र कशी होतात हेच कळत नाही. हा स्पृश्य हिंदुंनी आपणावर लादलेला शिवाशिवीचा घाणेरडा कलंक धुवून टाकण्याकरिता आम्ही प्रत्यक्ष माणसे असून कोणत्याही दृष्टीने अपवित्र नाही हे दाखविण्याकरिताच हा काळाराम मंदीर प्रवेशाचा लढा लढविणे भाग पडले होते.
वरील प्रकारचे मोठे उज्ज्वल तत्त्वांचे लढे लढविण्याकरिताच आपल्या समता सैनिक दलाची स्थापना करण्यात आली आणि हीच खरी आपल्या दलाची पूर्वपिठीका आहे. यावरून दिसून येते की या दलाची उभारणी व्यक्तिवाचक नाही. या देशातील हिंदी समाजात खरी समता प्रस्थापित करण्याकरिताच हे समता सैनिक दल स्थापन झाले आहे.
समता सैनिक दलाचा सैनिक म्हणजे समाजसेवेसाठी तळहातावर शीर घेऊन लढण्यासाठी सज्ज झालेला निर्भय योद्धाच म्हटला पाहिजे, माणुसकीसाठी समतेचे उज्ज्वल तत्त्व अंतःकरणात तेवत ठेवून आपल्या कार्याची त्याने पूर्तता केली पाहिजे. यासाठी सर्वांनी शपथा घेऊन कोणत्याही प्रकारचा जातीभेद मानणार नाही, महार, मांग, भंगी वगैरे उच्चनीचतेचे भेद मानणार नाही, मी माणूस आहे. सर्वांना माणुसकीने वागवीन आणि विषमतेचे जहरी बीज समाजातून नाहीसे करीन वगैरे प्रकारचा बाणा शपथपूर्वक बाळगला पाहिजे, असा बाणा बाळगणारा हाच खरा समता सैनिक दलाचा सैनिक ठरला पाहिजे. या एकंदर परिस्थितीचा विचार करता आपले दल स्वातंत्र्याच्या युद्धात मागासलेल्या वर्गाच्या आघाडीची एक लढवय्यी तुकडी आहे, हे पूर्णपणे लक्षात ठेवा. तुम्ही आपल्या प्रत्येक कृतीने देशाचे आदर्श सैनिक बनले पाहिजे. तुमच्याकडे पाहताच सैनिक दलाचा एक उत्कृष्ट नमुना या दृष्टीने तुमची जगात कीर्ती गाजली पाहिजे. सद्गुण, शिस्त आणि संघटना यांच्यामुळे आपले दल पोलादी बनले पाहिजे. शुद्ध वर्तन आणि समतेचा भाव मनात धरल्यावर आपल्यात जी एक म्हण आहे की “तव्याचा जाय बुरसा मग तो दिसे आरसा” तशी परिस्थिती उत्पन्न झाली पाहिजे. अनेक प्रकारच्या परिस्थितीमुळे तव्यातील बुरसा वाढला आहे. त्यामुळे तवा काळाकुट्ट आणि घाणेरडा दिसत आहे. परंतु तोच योग्य रीतीने मेहनत घेऊन साफसूफ केला. त्याच्यावरील सर्व घाण कायमची घालविण्याचा प्रयत्न केला तर खात्रीने त्यात यश मिळून तो शेवटी आरशासारखा स्वच्छ होतो. तसेच परिस्थितीने आपल्या समाजात काही अनिष्ट चालीरिती रुढ झाल्या असल्यास, दारूचे व्यसन लागले असल्यास, पान तंबाखू खाण्यावारी आपण वेळेचा, शरीराचा दुरुपयोग करीत असल्यास, आपण योग्य वेळी सावध होऊन निर्व्यसनी बनले पाहिजे. अशाप्रकारे सर्व प्रकारच्या अनिष्ट प्रसंगांवर, चालीरीतीवर नियंत्रण ठेवल्यास आपल्यावर कोणीही कसल्याही प्रकारचे आरोप करणार नाही. कोणत्याही प्रकारची पीडा देण्याचे धैर्य कुणी करणार नाही. अशा उज्ज्वल ध्येयाने आपण कार्य केल्यावर कुणी आपणावर निष्कारण टीका केली तर “हाथी चलता है और कुत्ता भोंकता है” याप्रमाणे ठरेल. प्रामाणिकपणे कार्य करीत राहिल्यावर जाणूनबुजून खोडसाळपणाने टीका करणारांची पर्वा बाळगण्यात मुळीच हशील नाही.
अशा रीतीने समता सैनिक दलाचे कार्य दिवसेंदिवस यशस्वी होत असलेले पाहून मला धन्यता वाटते. परंतु आपल्या दलाचे हे लोकोपयुक्त कार्य पाहून आपल्या विरोधकांना व टीकाकारांना पोटदुखी उत्पन्न झाली आहे. हल्ली मुंबई येथे कॉंग्रेस सरकारकडून तारीख 7 नोव्हेंबर 1938 रोजी झालेल्या एक दिवसाच्या सार्वत्रिक संपात पोलीसांकडून झालेल्या गोळीबारामुळे झालेल्या अत्याचारासंबंधी चौकशीचे काम सुरू आहे. ती चौकशी सुरू असता तिच्या कामकाजावर टीका करण्याचा माझा मुळीच उद्देश नाही. परंतु ज्या सैनिकांनी आजपर्यंत समाजसेवेचे उज्ज्वल कार्य केले आहे त्याबद्दल प्रमुख पुढाऱ्यांपैकी मुंबईचे मुख्य प्रधान श्री. बाळासाहेब खेर व काँग्रेसचे एक बड़े पुढारी श्री. वल्लभभाई पटेल यांनी प्रसंशोद्गार काढलेले आहेत.
मुंबई प्रधान मंडळाच्या पगारासंबंधी मी जे भाषण केले होते. त्याला उत्तर देताना ना. खेर म्हणाले होते की, स्वतंत्र मजूर पक्षाच्या कार्याला मदत करणाऱ्या समता सैनिक दलाच्या स्वयंसेवकांनी स्वार्थत्यागाने, स्वाभिमानाने आणि शिस्तीच्या बळावर बिना मोबदला केलेले कार्य मला ठाऊक आहे. हे स्वयंसेवक इतक्या उज्ज्वल प्रकारचा स्वार्थत्याग जर करू शकतात तर आम्ही असेंब्लीच्या मंत्र्यांनी केवळ स्वार्थत्यागाने दरमहा 500 रुपये पगार पत्करण्यास मुळीच हरकत नाही. तीच गोष्ट श्री. वल्लभभाई पटेल यांच्या उद्गारांवरून सिद्ध होईल.
गेल्या प्रांतिक असेंब्लीच्या निवडणुकी झाल्यावर पुण्यात शनिवार वाड्यासमोर स्वयंसेवकांच्या कार्यासंबंधी भाषण करताना श्री. वल्लभभाई म्हणाले की, “संघटना, शिस्त, कार्याची कळकळ आणि ते यशस्वी करून दाखविण्याची धमक या दृष्टीने विचार करता स्वतंत्र मजूर पक्षाचेच स्वयंसेवक कॉंग्रेसच्या स्वयंसेवकांपेक्षा सरस ठरतील आणि हे त्यांच्या अंगी असलेले विशेष गुण इतर स्वयंसेवकांनी अवश्य आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे” वगैरे. आपल्या समता सैनिक दलाच्या सैनिकात शेकडा 90 प्रमाणात महार तरुणांचा भरणा आहे. या देशात ब्रिटिश सरकारचा अंमल सुरू झाल्यापासूनचा इतिहास अवलोकन केल्यास रयतेचा पैसा तालुक्याच्या तिजोरीत नेऊन भरणारे महार लोक आहेत. गेल्या 150 ते 200 वर्षात या बाबतीत एकाही महाराने अप्रामाणिकपणा दाखविल्याचा पुरावा नाही. हजारों रुपये रात्रीबेरात्री व उन्हातान्हातून प्रवास करून हा रयतेचा पैसा महारांनी सरकारी तिजोरीत भरून आपला प्रामाणिकपणा जगाच्या निदर्शनास आणला आहे. अशा एकंदर सर्व गोष्टींचा विचार केल्यावर मुंबई येथे कामगार संप गोळीबार चौकशी कमिटीपुढे महारांवर जे अप्रामाणिकपणाचे व गैरशिस्तीचे आरोप करण्यात येत आहेत ते कितपत खरे असतील याची शहानिशा करण्याची वेळ आल्याशिवाय राहाणार नाही. गरिबीने गांजलेल्या या समाजातील माणूस हाती हजारों रुपये असताना कोणत्याही प्रकारची अफरातफर करू शकत नाही, त्या या महार समाजाचे चारित्र्य किती उज्ज्वल असेल याची मीच स्तुती करायला पाहिजे असे नाही. जनता या सर्व गोष्टींचा विचार करण्यास समर्थ आहे. तशात समता सैनिक दलात काम करणारे काही स्वयंसेवक मिलीटरी खात्यात नोकरी केलेले आहेत. त्यांना कायदा, शिस्त चांगली कळते. अशावेळी दलाच्या स्वयंसेवकांवर आरोप करणे मोठ्या धाडसाचे किंवा खोडसाळपणाचे कृत्यच समजले पाहिजे.
शेवटी मला प्रत्येक सैनिकाला सांगायचे आहे की, सैनिक हा शब्द मोठा महत्त्वाचा आहे. आपण खात्रीने बाजारबुणगे नाहीत, हे सिद्ध करणारा हा शब्द आहे. आपले कार्य करीत असताना तुम्ही सर्वजण प्रत्यक्ष फलटणीतच आहात, ही भावना मनात बाळगली पाहिजे. सभेच्यावेळी जो अफाट जनसमुदाय जमतो त्याचा योग्य बंदोबस्त ठेवताना आपण सैनिक आहोत ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जनसमुदाय बाजारबुणग्याप्रमाणे वागेल, त्याच्या कृतीत आणि तुमच्या कार्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. यासाठी सैनिक म्हटला म्हणजे तो शिस्तीचा शिलेदार. एखाद्या अधिकाऱ्याचा हुकूम चुकीचा वाटून त्याच्याविरुद्ध कुरकुर किंवा प्रतिकार करून चालणार नाही. केवळ शिस्तीकरता वेळ प्रसंगी सर्व प्रकारच्या प्रसंगांना धैर्याने तोंड देण्याचा आपला संकल्प यापुढेही उज्ज्वल समाजसेवेने पुरा करा, एवढेच तुम्हाला सांगावयाचे आहे.