Categories

Most Viewed

03 जानेवारी 1940 भाषण

महार वतन आणि महारवाडा ह्या गुलामगिरीच्याच द्योतक.

तारीख 3 जानेवारी 1940 रोजी दुपारी सातारा जिल्ह्यातील मेंढे या गावी स्वतंत्र मजूर पक्षाची दुसरी परिषद भरली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना या समेचे अध्यक्षस्थान देण्याचे ठरले होते.

सभेपूर्वी मोठ्या थाटाने मिरवणूक काढून अध्यक्षांना सभास्थानी आणण्यात आले. इशस्तवन व स्वागतपर पद्ये झाल्यावर सभेच्या कामास सुरवात झाली. स्वागताध्यक्ष रा. सावंत यांच्या भाषणानंतर श्री. जावळे यांनी डॉ. बाबासाहेबानी अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी सूचना केली व सुचनेस रा. उबाळे व रा. रोकडे यांनी पाठिंबा दिल्यावर डॉ. आंबेडकर यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले. अध्यक्षांची प्रकृती नादुरुस्त असल्याने त्यांनी नाशिकचे स्वतंत्र मजूर पक्षाचे रा. भाऊराव गायकवाड यांना प्रथम भाषण करावयास सांगितले. ते म्हणाले,

कालच्या अपघातात आपले परमपूज्य पुढारी डॉ. बाबासाहेब यांना मुका मार फार आहे. अशा स्थितीत त्यांना इतर पुढाऱ्यांप्रमाणे अपरिहार्य कारणे सांगून परिषदेस हजर राहणे टाळता आले असते. पण आपणा सर्वांची निराशा होऊ नये म्हणून इष्ट मित्रांचे न ऐकता ते आज परिषदेस हजर आहेत. आपणासारख्या गरिबांचे पुढारीपण सुखाचे खास नाही. आपल्या पुढाऱ्याला तळहातावर शीर घेऊन लढावे लागते याची जाणीव आपणास आहेच. गेल्या आठवड्यात एकामागून एक दोन अपघात झाले असूनही बाबासाहेबांनी आपल्या कार्यक्रमात खंड पडू दिला नाही. आपल्या मार्गात कितीही संकटे आली तरी आपण पुढे जाण्याचे सोडून माघार घेता कामा नये असा धडा बाबासाहेबांच्या वर्तनावरून आपण घ्यावयास नको काय?

यानंतर स्वतंत्र मजूर पक्षाचे श्री. अनंतराव चित्रे यांना भाषण करावयास सागितले. रा. चित्रे यांच्या भाषणानंतर डॉ. आंबेडकर यांनी भाषण केले. ते म्हणाले,

भगिनी, पाहूणे मंडळी, बंधुजनहो,
आजच्या परिस्थितीत मनाजोगे भाषण करणे मला शक्य नाही. आजच्या सभेचा बेरंग होण्याचा समय आला होता. पण देवाच्या दयेने तो टळला आहे. हा प्रसंग टळला असला तरी मला फार वेळ बोलता येणार नाही. अशा प्रसंगी रा. भाऊराव गायकवाड व श्री चित्रे हे दोन देवदूतच मला भेटले. त्यांनी आयत्या वेळी धावत येऊन भाषण करण्याची माझी जबाबदारी हलकी केली. या कामगिरीबद्दल मी या देवदूतांचा आभारी आहे. मी आता महार वतन व सातारा येथील अस्पृश्य विद्यार्थ्याचे वसतिगृह याबाबत दोन शब्द सांगणार आहे. असे करण्यापूर्वी रा. उबाळे यांनी या परिषदेत केलेल्या भाषणाचा मी प्रथमतः विचार करणार आहे. रा उबाळे यांनी रा. सावंत आजच्या परिषदेचे स्वागताध्यक्ष याजवर थोडीशी आडून टीका केली आहे. श्री. सावंत यांची कामगिरी मला माहीत आहे व ती बहुमोलाची आहे. असे माझे मत आहे. वर्तमानपत्रातून रा. सावंताचे नाव झळकत नाही म्हणून त्यांची कामगिरी कमी प्रतीची ठरते, असे भर सभेत सांगण्यात आले.

च्या बाबतीत माझे स्वतःचेच उदाहरण मी आपणास देणार आहे.

मी गेल्या सव्वादोन वर्षात विधिमंडळात फक्त चारच भाषणे केली आहेत. मी प्रश्नही कधी विचारलेले नाहीत. गैरहजर असणाऱ्या सभासदातही माझा नंबर वर लागणारच. मग उबाळ्यांच्या दृष्टीने रा. सावंतापेक्षाही मी जास्तच नालायक ठरणार नाही का ?

कायदेमंडळात 175 सभासद आहेत. ते निरनिराळ्या पक्षांचे आहेत. सर्व पक्षाचे सर्व सभासद काही तेथे भाषणे करीत नाहीत. तेथे मोजके लोक मोजकी भाषणे करीत असतात. विधिमंडळात काँग्रेसचे 92 सभासद आहेत. त्यापैकी किती भाषणे करतात याची रा. उबाळ्यांना माहिती असती तर त्यांनी रा. सावंतांवर टीका केली नसती. श्री. सावंत यांनी गेल्या दोन सव्वा दोन वर्षात एक कारकून, सहा तलाठी, अकरा पट्टेवाले, एकवीस शाळा मास्तर, सदुसष्ट पोलीस, सहा शिक्षकिणी व एकोणवीस पोस्टमन यांना नोकऱ्या मिळवून दिल्या ही काय कमी महत्त्वाची कामगिरी आहे. महारावर स्पृश्यांचा दात आहे. महार तक्रारखोर आहेत असे सांगण्यात येते. अशा स्थितीत 131 महारास चाकऱ्या लावून देणे ही काही सोपी गोष्ट नाही. तरी अशी रा. उबाळे तक्रार करतात. पण त्यांनी सातारा येथील अस्पृश्य वसतिगृहास मदत करण्याचे जे वचन दिले होते ते पाळले काय ? असा माझा त्यांना सवाल आहे. मंदिराला कळस चढविण्याची इच्छा असणाऱ्यांनी तरी त्याचा पाया उखडून टाकता कामा नये. विघातक टीका करून निव्वळ उणेपणा काढण्यात काय हशील ?

आता महार वतनाच्या प्रश्नाकडे आपण वळू या. आपल्या पायातील वतनाची बेडी तोडून टाकल्याशिवाय आपला तरणोपाय नाही. वतन आहे तोपर्यंत आपण गुलामच राहणार. वतन नाहीसे करून आपण स्वातंत्र्य मिळविलेच पाहिजे. गावोगावचे महारवाडे आपण नष्ट करून टाकले पाहिजेत.

प्रत्येक महारवाडा हा माणसांचा कोंडवाडा व गुलामवाडाच होय. महार वतन व महारवाडा या दोन गोष्टी सनातन गुलामगिरीच्या द्योतक आहेत. त्या नष्ट झाल्याच पाहिजेत. स्पृश्यांनी या गोष्टी नष्ट करण्यास कितीही आडकाठी केली तरी त्या गोष्टी नवीन स्वराज्यात मी नष्ट केल्याशिवाय राहाणार नाही, हे खास. पण वतन नष्ट होईपर्यंत वतनाची बेडी ढिली करण्याचे प्रयत्न आपण केले पाहिजेत, हे विसरू नका. चळवळ करून जुडीवाढ आपण बंद पाडली पाहिजे. गावकामगारास पगारी नोकऱ्या दिल्या पाहिजेत. गावाबाहेरच्या कामासाठी त्यांना आठ आणे रोज मिळाला पाहिजे. गावकामगारांची ही गा-हाणी सहा महिन्यात नष्ट करण्यात आली नाहीत तर गावकामगारांनी इलाखाभर संप पुकारला पाहिजे. काही झाले तरी तुम्ही मात्र आपल्या जमीनी सोडू नका.

आता रा. सावंत यांनी सातारा येथे चालविलेल्या अस्पृश्य विद्यार्थी वसतिगृहाकडे आपण वळू या. चळवळ करताना आम्हा अस्पृश्य पुढा-यांची मोठी केविलवाणी स्थिती होत असते. इतर वर्गाच्या राजकीय पुढाऱ्यांची अशी दैना कधीच होत नाही. मि. जिना वसतिगृहे चालविण्याच्या फंदात कधीही पडणार नाहीत. आम्हा अस्पृश्यांना चळवळ करताना बहुरूपी बनावे लागते. आम्हाला वसतिगृहे काढावी लागतात, पत्रे चालवावी लागतात, गावोगाव वणवण भटकावे लागते. थोटा नवरा केला की त्याच्या पत्नीस त्याला आंघोळ घालावी लागते तशीच आमची गत आहे. याबाबतीत आपल्यातील शिक्षक वर्गावर माझा फार कटाक्ष आहे. ते सुशिक्षित असतात. आमच्या चळवळीमुळे त्यांना चाकऱ्या मिळतात. तरी ते बेफिकिर राहतात, असा त्यांवर माझा आरोप आहे.

साता-यास रा. भाऊराव पाटलांचे एक वसतिगृह असता सावंतांचे वसतिगृह कशाला ? अशी शंका कोणास येईल. पण त्याचे उत्तर फार सोपे आहे. रा. पाटलांच्या वसतिगृहातून बाहेर पडणारे अस्पृश्य विद्यार्थी एकतर भीष्म-द्रोणाप्रमाणे अर्थस्य पुरुषोदासः या न्यायाने गुलामीवृत्तीचे निपजणार नाही तर ते कचाप्रमाणे तरी होणार हे उघड आहे. आपल्या विद्यार्थ्यांना संपत्तीचे गुलाम होणे भाग पडू नये म्हणून रा. सावंत यांच्या वसतिगृहासारख्या संस्थांची अत्यंत जरूरी आहे हे सांगणे नकोच.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password