राजकारणाचा गाडा ओढताना चाक अंगावर येणार नाही ह्याची खबरदारी घ्या.
नव्या वर्षाच्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी 1938 रोजी रा. बळवंतराव गायकवाड, रा. रामभाऊ पाटोळे व.र. बी. शिंदे यांनी रे. गंगाधरराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली रा. ऐदाळे एम. एल. ए. यांच्या साहाय्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक फार मननीय व्याख्यान सोलापूर येथील ख्रिस्ती लाभू देण्याची व्यवस्था केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम आपल्या चरित्रास शून्यापासून नव्हे परंतु उणे चिन्हापासून सुरवात होऊन हल्ली आहे त्या स्थितीप्रद कसे ते येऊन ठेपले आहेत ते दाखविले. यात त्यांचा हेतू इतकाच की, आपला समाज दुबळा म्हणून रे रे करीत काळ घालवू नये. तर नवीन वर्षाच्या नवीन निश्चयाने त्याची प्रगती करण्यास झटावे. डॉ. बाबासाहेब पुढे म्हणाले,
आपल्या धर्मातराची विटंबना चहूकडे चालली आहे. याचा मासला प्रि. अत्र्यांच्या वंदे मातरम् या नाटकातील एका प्रसंगावरून दर्शविता येईल. तथापि धर्मातराच्या ध्येयापासून रेसमात्रही ढळण्यास तयार नाही. बाकी धर्मांतर करणाऱ्याचे कोणी गोडवे गाईलेले आहेत असे निदान आपल्या हिंदुस्थानात तरी दृष्टोत्पत्तीस आलेले नाही.
जगात उपलब्ध असलेल्या प्रमुख धर्माचे चांगले अध्ययन आध्यात्मिक दृष्टीने मी केले आहे. त्या सर्व धर्मात केवळ दोनच धर्म व त्यातील दोनच व्यक्ती माझ्या धर्मांतराचे दृष्टीसमोर आहेत. त्यापैकी पहिली व्यक्ती बुद्ध व दुसरा ख्रिस्त. मनुष्याचे मनुष्याशी कर्तव्य काय आहे व मनुष्याचे देवाशी कर्तव्य काय आहे. मुलाने बापाशी कसे वागावे ? सर्व माणसास समता, स्वतंत्रता ज्या धर्मात अनुभवावयास सापडेल असाच धर्म मला व माझ्या अनुयायांस हवा आहे.
मिशनरींना वाटते की आपण मनुष्याला ख्रिस्ती केले की, आपले काम झाले. पण त्याच्या राजकीय हक्कांची काही सोय ते पाहात नाहीत. मला ख्रिस्ती लोकात हा एक फार मोठा दोष दिसतो. कारण त्यांनी आजपर्यंत राजकारणात घालावा तसा हात घातला नाही. कोणत्याही संस्थेला राजकीय आधार असल्याशिवाय ती टिकणे फार कठीण आहे. आम्ही अस्पृश्य, अडाणी व अशिक्षित जरी आहोत तरी आम्ही चळवळ करीत आहोत. त्यामुळेच आमच्या 15 जागा लेजिस्लेटिव्ह असेंब्लीत आहेत. अस्पृश्य मुलांना सरकारी स्कॉलरशिपा मिळू लागल्या आहेत. आमच्या मुलामुलींकरिता सरकारने बोडिंग काढलेल्या आहेत. लोकांच्या बाबतीत तसे काही नाही. एखादा अस्पृश्य मुलगा तो अस्पृश्य आहे. पण ख्रिस्ती तोपर्यंत त्याला सरकारी स्कॉलरशिप मिळते. पण तोच उद्या ख्रिस्ती झाल्यास ती पण तेच तुमचा बंद होते. म्हणजे धर्मांतर केल्याबरोबर त्याचे दारिद्र्य जात नाही. धर्मांतरामुळे त्याला ही आर्थिक हानी मात्र सोसावी लागते. राजकारणात हात असता तर ह्याच्या उलट परिस्थिती झाली असती.
तुमचा समाज शिकलेला आहे. शेकडो मुलगे व मुली मॅट्रिक झालेले आहेत. त्यांनी ह्या सार्वजनिक अन्यायाविरूद्ध अशिक्षित अस्पृश्यांसारखी कधीही चळवळ केलेली नाही. एखादी मुलगी नर्स झाली की ती आपल्याच धंद्यात डोके घालते व आपल्यापुरतेच पहाते. कोणी मास्तर झाला की तो आपल्या मास्तरकीत दंग होतो व सार्वजनिक कामात पडत नाही. कोणी कारकून किंवा कोणत्याही हुद्यावर असला तरी तो आपल्याच व्यापात असतो व सामाजिक अन्यायाकडे दुर्लक्ष करतो. तुमचा समाज इतका जरी सुशिक्षित आहे तरी तुमच्यातील कितीसे डिस्ट्रिक्ट जज्ज किंवा मॅजिस्ट्रेट आहेत? ह्याचे कारण तुमचे राजकारणाकडे असलेले दुर्लक्ष हे मी सांगतो. कारण तुमच्या हितासाठी बोलायला व भांडायला सरकारात कोणीच नाही. राजकारणाचा गाडा ओढायला तुमच्यातील कोणी असल्यास जरी आपल्या इच्छेप्रमाणे तो चालत नसला तरी निदान त्याचे चाक आपल्या अंगावर न येऊ देण्याची तरी तुम्हास खबरदारी घेता येईल.
तुम्ही मुक्कामावर आहात व आम्ही मार्ग चालत आहोत. तुमच्या मुक्कामाच्या बऱ्यावाईटपणावरच आमचा त्या ठिकाणी मुक्काम येणार.