अस्पृश्य समाजात एकी नाही ह्याचे कारण जातीभेद हेच आहे.
गुरूवार तारीख 30 डिसेंबर 1937 रोजी रात्रौ मद्रास मेलने 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोरीबंदर स्टेशनवरून सोलापूर जिल्ह्यातील दौ-याकरिता निघाले. त्यांचेबरोबर नाशिकचे आमदार भाऊराव गायकवाड व श्री. कमलाकांत चित्रे हे होते. वाटेत दादर स्टेशनवर परिषदेस हजर राहाण्याकरिता नाशिकहून आलेली रामा पाला (भंगी समाजाचे एक पुढारी) वगैरे मंडळी येऊन मिळाली. दादर स्टेशनवर डॉक्टर साहेबास पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर पुण्याच्या स्टेशनवर साताऱ्याचे आमदार श्री. खंडेराव सावंत गाडीत चढले. दौंड स्टेशनवर आमदार श्री. प्रभाकर रोहम व नगरची इतर मंडळी दौऱ्यात सामील झाली.
सोलापूर जिल्हा परिषद पंढरपूर मुक्कामी भरावयाची होती. त्याकरिता डॉ. बाबासाहेब व त्यांच्या बरोबरीची इतर मंडळी कुर्डुवाडी स्टेशनवर शुक्रवार तारीख 31-12-1937 रोजी पहाटेस साडेपाच चे सुमारास दाखल झाली. स्टेशनवर परिषदेचे स्वागताध्यक्ष आमदार श्री. जीवाप्पा ऐदाळे डॉ. बाबासाहेबांचे स्वागत करण्याकरिता सामोरे आले होते. त्यांनी व इतर जमलेल्या मंडळीनी त्यांचे प्रेमाने स्वागत केले व डॉ. बाबासाहेबांस पुष्पहार अर्पण केले.
कुर्डुवाडी स्टेशनचा प्लॅटफार्म माणसांनी अगदी भरून गेला होता. या स्टेशनवरील रेल्वे अधिकाऱ्यांचे वर्तन मात्र संतापजनक होते. त्यांना गरीब जनतेचा उत्साह व डॉ. बाबासाहेबांच्या लोकप्रियतेचा उत्कर्ष मुळीच सहन होत नव्हता असे कष्टाने म्हणावे लागते. उत्साहाच्या भरात डॉक्टर साहेबांच्या दर्शनास उत्सुक झालेले काही थोडे लोक बिगर तिकीट प्लॅटफार्मवर गेले होते. त्या सर्वांजवळून त्यांनी दौंड स्टेशनपासूनच्या तिकिटाच्या डबल पैशाची मागणी केली. येथे जमलेले निर्धन लोक एवढे द्रव्य आणणार कोठून ? परंतु शेवटी स्टेशन मास्तरांच्या मध्यस्तीने हा प्रसंग कसाबसा टळला व अडकून राहिलेल्या मंडळीची सुटका झाली.
हा कटू प्रसंग येथे मुद्दाम नमूद करण्याचे कारण आपल्या लोकांनीही ध्यानात ठेवले पाहिजे की, अस्पृश्यांची चळवळ साधारणतः बहुजन समाजाच्या डोळ्यात नेहमी सलत असते. आपल्याला कोणाकडून लहानसहान प्रमाणात देखील सहाय्य मिळेल अशी अपेक्षा न करता त्यांनी वागले पाहिजे, नाही तर अपमानकारक प्रसंग आल्याशिवाय राहणार नाहीत.
कुर्डुवाडीस डॉ. साहेबांकरिता एका स्पेशल मोटारीची व्यवस्था करण्यात आली होती. इतर पाहुणे व स्वयंसेवकांकरिता एक स्पेशल बस ठेवण्यात आली होती. या दोन गाड्या दिवस उजाडण्याच्या सुमारास पंढरपूरच्या मार्गास लागल्या. वाटेत माढे तालुक्यातील वावळे गावी गावातर्फे डॉ. बाबासाहेबास व इतर आमदारांस हार अर्पण करण्यात आले. पुढे कर्कम गावाजवळ गाडी येताच गावातील अस्पृश्य समाज व स्वयंसेवक दल डॉ. साहेबांच्या स्वागतार्थ वाजंत्र्यांसह सामोरे आले. जमलेल्या मंडळीचे मिरवणुकीत रूपांतर झाले. गावात महार समाज व मातंग समाज यांनी मंडप उभारून बाबासाहेबांच्या स्वागताची तयारी केली होती. कर्कम गावातून मिरवणूक निघाल्यानंतर डॉ. साहेबांची मोटार व दुसरी स्वयंसेवकांची बस कर्कम गावाजवळील बादलकोट फॉरेस्ट मधील चंद्रभागेच्या काठावरील पडित जमिनी पहावयास निघाली. मोटारमध्ये आमदार गायकवाड, ऐदाळे, रोहम, सावंत व श्री. चित्रे इतकी मंडळी होती. ही पडित जमीन अस्पृश्य समाजातील लोकांना सवलतीने मिळावी म्हणून आमदार ऐदाळे यांनी सरकारजवळ प्रयत्न चालविला आहे. ती जमीन बाबासाहेबांच्या प्रत्यक्ष अवलोकनात यावी म्हणून श्री. ऐदाळे यांनी हा कार्यक्रम आखला होता. पडित जागेजवळ पोचण्याकरिता तीन मैलाचा पायी प्रवास करून ती बाबासाहेबानी प्रत्यक्ष पाहिली. नदीच्या काठावर गावकऱ्यांनी आणलेला अल्पाहार ग्रहण करून डॉक्टरसाहेब परत कर्कम गावी आले. त्याठिकाणी गावातील महार समाजाने खास उभारलेल्या मंडपात त्यांचे प्रेमाने स्वागत केले व त्यांना दोन शब्द बोलण्यास विनंती केली. आपल्याला जे काही बोलावयाचे ते मातंग समाजाने स्वागताचा कार्यक्रम आखला आहे त्या ठिकाणी आपण बोलू असे सांगून बाबासाहेबांनी आमदार गायकवाड यास दोन शब्द बोलण्यास आज्ञा केली. नंतर भाऊराव गायकवाड यांनी थोडक्यात समयोचित भाषण केल्यावर डॉक्टर साहेबांनी सर्वांनी स्वतंत्र मजूर पक्षाचे सभासद व्हावे असे सांगून तो कार्यक्रम आटोपला. नंतर मातंग समाजाने उभारलेल्या मंडपात मंडळी दाखल झाली. येथे महार व मातंग समाजाचा मोठा लोकसमुदाय जमलेला होता.
त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेबांनी लहानसे भाषण करताना सांगितले,
उद्या म्हणजे तारीख 1 जानेवारी 1938 रोजी सोलापूर मुक्कामी मातंग समाजाची एक परिषद भरणार आहे. त्यावेळी मला आमंत्रणाने बोलावण्यात आले असल्यामुळे मी त्या प्रसंगी सविस्तर रीतीने बोलणार असल्याकारणाने मी या वेळेस दोनच शब्द बोलणार आहे. ते बोलण्याचा उद्देश हा की, आपल्यापैकी काही इसम परिषदेस हजर राहणार असले तरी काही मंडळी तेथे न जाणारीही असणार. तेव्हा या लोकांना माझे म्हणणे ऐकावयास मिळावे. प्रथमतः अस्पृश्य समाजात मोडणाऱ्या महार, चांभार, भंगी वगैरे ज्या जाती आहेत त्यात एकी नाही हे आपणा सर्वाचे दुर्दैव होय. ही एकी नसण्याचे खरे कारण म्हणजे हिंदू समाजातील जातीभेद हेच आहे. या जातीभेदाला महार, मांग, चांभार किंवा भंगी हे जबाबदार नाहीत. जातीभेद ही वरून वहात आलेली गटारगंगा आहे. हा आपलेकडे वहात येणारा नरक आहे. त्यामुळे जातीभेदाची कटू फळे व त्याचा दुष्परिणाम आपल्याला सोसावा लागत आहे. खेदाची गोष्ट ही की, हे हिंदू लोक आपल्यातील जातीभेद तर दूर करीत नाहीतच. उलट अस्पृश्यांतील अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांचा जातीभेद दृढ करावयास झटतात. मातंगांना हाती धरून महारांविरूद्ध उठवावयाचे. चांभारांना हाती धरून त्यांना महार-मांगांच्या विरुद्ध उठवावयाचे. आपली भेदनीती आमच्यात पसरवायची व आपली एकी होऊ द्यावयाची नाही. मात्र या जातीभेदाची मूळ जबाबदारी जरी हिंदू समाजावर असली तरी आपण आपली जबाबदारी विसरणे आत्मघातकी ठरेल. आपल्यातील जातीभेद नाहीसे करणे व आपल्यात भेदनीतीचा फैलाव न होऊ देणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. आपण हे साधल्याशिवाय आपला भाग्योदय कधीच होणार नाही. महार-मांगातील रोटी बंदी, बेटी बंदी अजिबात नष्ट झाली पाहिजे. प्रत्येक जात जर आपली शेखी मिरवण्याकरिता आपल्या जातीसच चिकटून राहील आणि महार महारच राहील व मांग मांगच राहील. तर आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार आपण करू शकणार नाही. महार किंवा मांग या नावात असे काय आहे की त्यात तुम्हाला अभिमान वाटावा ? या नावाने असा कोणता उज्ज्वल इतिहास तुमच्या डोळ्यांसमोर उभा राहतो की जुनी परंपरा चालू ठेवण्यास तुम्ही झटावे ? सर्व समाज या नावांना तुच्छ लेखीत आहे. तुम्हाला आज उकिरड्यावरील कचऱ्याची देखील किंमत नाही. तेव्हा या नावाचा अभिमान न बाळगता आपले दोन्ही समाज एका वरवंट्याखाली चिरडले जात आहेत हे जाणले पाहिजे. दोघांनी एकजुटीने राहिले पाहिजे. या बाबतीत महार समाजापुरते जर सांगावयाचे असेल तर ते कोणताच जातीभेद मानावयास तयार नाहीत. मांग, चांभार किंवा भंगी यांच्याशी रोटी व्यवहार किंवा बेटी व्यवहार करावयास त्यांची तयारी आहे. जर महार लोक या गोष्टी करण्यास कचरत असतील तर त्यांना त्या करण्यास भाग पाडण्याची मी हमी घेतो.
दुसरी गोष्ट तुम्हास सांगावयाची म्हणजे, तुम्ही सध्या काँग्रेस या संस्थेपासून दूर राहिले पाहिजे. याचे कारण एकच आहे ते म्हणजे काँग्रेस ही मायावी सृष्टी आहे. मला तुम्ही असे सांगा की गावातील मारवाडी किंवा सावकार याने चार आण्याची काँग्रेसची वर्गणी भरली किंवा गांधी टोपी डोकीवर चढविली म्हणजे देहस्वभाव कसा विसरू शकेल ? तो आपल्या गरीब कुळांकडून व्याज उकळल्याशिवाय कसा राहील ? तुमच्या माना मुरगळणे तो कसा सोडून देईल ? आज काँग्रेस सांगत आहे की, आम्ही सावकारांचे हित साधणार आहोत व गरिबांचेही हित साधणार आहो. मांजर व उंदीर या दोघांनाही ती एके ठिकाणी कशी वागवणार ? मांजराच्या पुढ्यात उंदीर ठेवून उंदराचा जीव कसा बचावणार ? हे तुम्हीच पाहिले पाहिजे. आपल्याला मांजराशी काही कर्तव्य नाही. आपल्याला उंदराचा जीव वाचवायचा आहे. आपल्याला गरीब जनतेचे म्हणजे आपले स्वतःचे जिणे बचावाचे करावयाचे आहे. म्हणून आपण आपलीच शक्ती वाढविली पाहिजे. ती शक्ती वाढविणे म्हणजे तुमच्याच हिताकरिता अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाचे सभासद होणे हे होय. तुम्हाला या पक्षात सामील होण्याकरिता वर्षाचे काठी फक्त चार आणे द्यावे लागतील. तरी तुम्ही सर्वांनी स्वतंत्र मजूर पक्षाचे सभासद झाले पाहिजे. एवढेच तुम्हाला मला आज सांगावयाचे आहे. नंतर डॉक्टर साहेबांस व इतर मंडळींना हारतुरे अर्पण करण्यात आले. चहापानानंतर दौ-यातील मंडळी पंढरपूरच्या मार्गास लागली.