Categories

Most Viewed

31 डिसेंबर 1937 भाषण 1

जुलूम करणाऱ्यांसोबत दोन हात करण्याची तयारी ठेवा.

दिनांक 31 डिसेंबर 1937 रोजी कर्कमहून पंढरपूरचा मार्ग आक्रमण करीत असता मोटार गाडीत आमदार मंडळी निरनिराळे विषय काढून आपल्या अलौकिक पुढाऱ्याच्या मुखातून वाहणाऱ्या अमृतधारांचे मनसोक्त पान करीत होती. थोडक्याच वेळात म्हणजे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास चंद्रभागेच्या ऐलथडीवर गाड़ी थडकली. या ठिकाणी स्त्री-पुरुषांचा अलोट समुदाय, मृत समाजात संजीवनी उत्पन्न करणाऱ्या लोकोत्तर विभूतीचे दर्शन घेण्याकरिता जमला होता. मोटार दृष्टीपथात येताच जयजयकारांचे ध्वनी घुमू लागले. लोकांचे थवेच्या थवे दर्शनोत्सुक होत्साते मोटारीपुढे धावत येऊ लागले. चंद्रभागेवरील पुलाचे तोंडाजवळ ज्या वेळेस गाडी आली त्या वेळेस मोटारीस पुढे जाण्यास वाव मिळेना.

संपादक महाराज, तुमचा बातमीदार काही पंढरपूरचा वारकरी नाही. सा-या हयातीत पंढरपुरास, त्याची ही पहिलीच भेट होय. पण पंढरपूरचा महिमा मात्र त्याने कानानी ऐकला आहे. विठोबाचे दर्शन घेण्यास अगणित जनसंमर्द पंढरीत प्रवेश करतो असे त्याने ऐकले होते. पण एका विभूतीचे दर्शन घेण्यास पंढरपूरवासी जनता चंद्रभागा ओलांडून व विठ्ठलास विन्मुख होऊन पंढरीच्या बाहेर पडते असे त्याने ऐकले नव्हते. पण तुमच्या वार्ताहारास आज काय दृष्टीस पडत होते ? एक समाज विठ्ठल दर्शन घेण्यास पंढरीस प्रवेश करतो तर दुसरा समाज विठ्ठलाच्या महतीवर आघात करणाऱ्या विभूतीचे दर्शन घेण्याकरता पंढरीच्या बाहेर पडतो. या दृश्यामुळेच वेड्या धार्मिक भावनेने अंध झालेला बहुजन समाज आपल्या दृष्टीवरील कृष्णपटल दूर करून हिंदमातेचा भविष्यकाल उज्ज्वल करील अशा आशेचे किरण क्षणभर तुमच्या बातमीदाराच्या मनात चमकले. ते काही असो. या दृश्यावरून एवढे स्पष्ट दिसत होते की, स्पृश्य समाज जो मार्ग आक्रमित आहे त्याच्या अगदी उलट दिशेस अस्पृश्य गणल्या गेलेल्या समाजाचा आजचा मार्ग आहे.

मोटारीचा पुढला मार्ग गणवेष धारण केलेल्या समता सैनिक दलाच्या स्थानिक पथकांनी खुला करून दिला. गाडी पुलावरून जाऊ लागली. गाडीच्या दुतर्फा लोकांची गर्दी, पुढे स्वयंसेवक, मागे अलोट घोळका अशी मिरवणूक दिसू लागली. मोटारची अगदी मंदगती झाली व पुढील कार्यक्रम आखल्याप्रमाणे पार पाडणे मुश्कीलीचे झाले. मोटार जलद चालली तर लोक समुदायही धावू लागे. असा क्रम काही काळ चालल्यावर एका नाक्यावर मिरवणूक आली. मिरवणुकीतून बाहेर पडल्याशिवाय पुढे जाणे शक्य नसल्यामुळे मोटार दुसऱ्या रस्त्यावर काढण्यात आली. लोकांना सभेस हजर राहावयास सांगून बाबासाहेब त्वरित डाक बंगल्यावर आपल्या उतरण्याच्या ठिकाणी दाखल झाले. या ठिकाणी देखील काही लोक अगोदरच येऊन बसले होते. बाबासाहेबांच्या आगमनानंतर आणखी लोक येऊ लागले. अनेक लोक गावकऱ्यांकडून होणारा त्रास डॉक्टर साहेबांच्या कानावर घालीत होते. साहेबांचे दर्शन घेऊन व त्यांचे दोन शब्द ऐकून निरोप घेत होते. जेवणानंतर तीन वाजण्याचे सुमारास सोलापूर जिल्हा अस्पृश्य राजकीय परिषदेस हजर राहाण्याकरिता आपल्या बरोबरील मंडळीसह डॉक्टर साहेब निघाले. डॉक्टर साहेबांस भेटण्याकरिता पंढरपूर म्युनिसिपालिटीचे अध्यक्ष रा. ब. परिचारक आले होते. ते देखील परिषदेस हजर राहाण्यासाठी निघाले. परिषदेची जागा म्युनिसिपल धर्मशाळेत ठरविण्यात आली होती. त्या ठिकाणी बाबासाहेबांचे आगमन होताच जमलेल्या प्रचंड लोक समुदायाने त्यांचे टाळ्यांच्या कडकडाटात व जयघोषात स्वागत केले व ताबडतोब सभेच्या कामास सुरूवात झाली.

प्रथमतः मुलींचे स्वागतपर सुस्वर गायन झाले.

स्वागताध्यक्ष मे जीवाप्पा ऐदाळे. एम. एल. ए. यांचे भाषण झाल्यावर परिषदेचे अध्यक्षस्थान स्वीकारण्यास डॉ. बाबासाहेबांस विनंती करण्यात आली. त्या सूचनेस रीतसर अनुमोदन देण्यात आल्यावर त्यांचे खालीलप्रमाणे भाषण झाले.

ते म्हणाले,
वास्तविक या परिषदेचे अध्यक्षीय भाषण लिहून काढून ते आपल्यासमोर वाचावयास पाहिजे होते. परंतु वेळेच्या अभावी तसे मला करता आले नाही. याबद्दल दिलगीर आहे. तेव्हा उगाच पाल्हाळिक भाषण करण्याचे मला कारण नाही. आज मी प्रामुख्याने तीन प्रश्नासंबंधी बोलणार आहे. एक, आपल्याला हिंदू समाजात समतेचे स्थान मिळेल काय ? दोन, आपल्या आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत आपल्याला विचार करावयाचा म्हणजे आपल्याला संपत्तीचा योग्य वाटा मिळाला आहे काय ? तीन, आपण आत्मोन्नतीची चळवळ केली तर आमचेवर जुलूम होतो, याचा प्रतिकार करण्यास आपण कसे समर्थ व्हावयाचे ?

पहिल्या प्रश्नाचा विचार आपण पूर्ण केलेला आहे. या प्रश्नाशीच धर्मातराचा प्रश्न निगडित आहे. त्यासंबंधी मी आज या ठिकाणी जास्त बोलू इच्छित नाही. मात्र तुम्हास या पंढरपूर गावी मुद्दाम चोखोबाची स्मृती करून द्यावयाची आहे. मंगळवेढ्यास कूस बांधावयाचे होते आणि त्याकरता पंढरपुराहून महारास वेठीस धरले होते. त्यामध्ये चोखोबाही होता. काम चालू असता एक भिंत कोसळून पडली. त्यामध्ये चोखोबा देखील भिंतीखाली सापडून मृत्यू पावला. नंतर चोखोबाची समाधी बांधावयाची होती त्याकरता चोखोबाची हाडे लोकांना पाहिजे होती. बरेच महार त्याठिकाणी मरण पावले असल्यामुळे त्या सर्वांचीच हाडे त्याठिकाणी पुरली गेली होती. त्यापैकी चोखोबाची हाडे कोणती हे कळणे शक्य नव्हते. तेव्हा लोक नामदेवास भेटले व त्यांनी याबाबतीत मार्ग काढण्यास नामदेवास विनंती केली. नामदेवाने सांगितले की चोखोबाची हाडे अनेक हाडातून हुडकून काढणे अवघड नाही. कारण चोखोबाची हाडे विठ्ठल नामाचा गजर करीत असणार. तरी ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी निघेल ती हाडे चोखोबाची असे समजून ती उचलून आणावी व त्यावर समाधी चढवावी. आता हाडातून ध्वनी निघण्याचा प्रश्न जरी बाजूला ठेवला तरी चोखोबाच्या योग्यतेसंबंधी एवढे निर्विवाद की त्याच्या निर्जीव अस्थीतूनदेखील विठ्ठल नामाचा उच्चार व्हावा इतकी त्याची महती होती. ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताबाई इत्यादी संतांच्या मालिकेत चोखोबाला स्थान प्राप्त झाले होते. पण त्याला देखील विठ्ठलाच्या मंदिरात प्रवेश करता आला नाही. त्याची समाधीदेखील मंदिरापासून दूर अंतरावर ठेवण्यात आली आहे. चोखोबाच्या वेळेस जी परिस्थिती होती त्याच्याकाळी ज्या रीतीने त्याच्या जातीबांधवांना वागविल्या जात होते. त्याच रीतीने चोखोबाचा जन्म ज्या वर्गात झाला होता त्या वर्गास आज देखील त्याच हीन दर्जाने लेखले जात आहे. त्याच मापाने आज आपल्याला मोजले जात आहे. म्हणून ज्या धर्माची चोखोबाने कास धरली त्याच धर्माची आम्ही कास का धरावी ? त्या धर्मात आपल्याला नेहमी हीन लेखले जाणार ! याकरिता त्या धर्मापासून आपल्याला दूरच राहिले पाहिजे.

आज दुसरा प्रश्न म्हणजे आर्थिक प्रश्न. आपल्या पोटापाण्याचा प्रश्न. देशातील सर्व संपत्ती पांढरपेशा वर्ग बळकावून बसला आहे. त्याचा ऐषआराम चालू आहे. तर तुम्हाला पोटभर खायला नाही किंवा अंग झाकायला वस्त्र नाही. नुकतीच एक बाई मजजवळ तिच्या मुलाला आंगडे घेण्याकरिता दोन आणे मागत होती. ती जी बाईची स्थिती तीच आपल्या सर्व वर्गाची आहे. याचे कारण त्याच्या वाट्यास संपत्ती आली आहे तर तुमच्या वाट्यास दारिद्र्य आले आहे. म्हणजेच संपत्तीची विभागणी न्यायाची झाली नाही आणि ती कशी करावयाची हाच आपला आज जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. गावाजवळील रानातील पडित जमीन आपणास कसण्यास मिळावी म्हणून आपण सरकारकडे मागणी केल्यास ती जमीन आमच्या गुराढोरांच्या चा-याकरिता पाहिजे म्हणून ती आपल्याला देण्यात येऊ नये, असा प्रयत्न गावातील लोक करतात. ती जमीनदेखील आपल्याला लाभू देत नाहीत, ज्यावेळेस माझी व मुख्यमंत्री ना. खेर यांची भेट झाली होती त्यावेळेस याबाबतीत मी त्यांना विचारले की, गावातील लोकांच्या गाईम्हशी पेक्षाही आमचे जीव कमी किंमतीचे आहेत काय ? सरकारने आमच्या लोकांच्या जीवाकडे न पाहता गावच्या गुराढोरांच्या पोटापाण्याची व्यवस्था करावी का ? सरकारने प्रथम माणसांचा जीव वाचविला पाहिजे व नंतर जनावरांचे जीवित्व रक्षण केले पाहिजे. तुम्हाला सांगावयाचे म्हणजे एवढेच की, आज तुमची किंमत जनावरापेक्षाही कमी आहे. सावकारांचे सर्व वाली आहेत. गरिबांचे वाली कोणी नाही. गरिबांचे वाली आज शेठ गरीबच आहेत आणि गरिबांना जर आपली स्थिती सुधारून घ्यावयाची असेल तर त्यांनी कायदे करण्याची जी राजकीय सत्ता ती हस्तगत केली पाहिजे. ते जर कायदेमंडळात निस्वार्थी लोक पाठविणार नाहीत तर त्यांची फसगत झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्याला कायदे मंडळात आपल्या हिताचे कायदे करून घेणारे लोक पाठविता आले पाहिजेत. त्याकरिता नेहमी संघटित राहिले पाहिजे. त्या करिताच स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना झाली आहे. आज कायदे करणारे सरकार काँग्रेसचे आहे. ती काँग्रेस म्हणजे एक विश्वामित्राची मायावी सृष्टी आहे, तेथे मुक्तेश्वराने वर्णन केल्याप्रमाणे उंदीर मांजरीचे दूध पीत आहे. वाघ शेळी एका शय्येवर झोप घेत आहेत. मुंगूस सापाचे पटापट मुके घेत आहे. तेथे शेठ सावकार लोक कुळांचे हित साधू म्हणून सांगत आहेत. भांडवलदार मजुराचे कोटकल्याण करू म्हणून बरळत आहेत. ते बोलणे किती फोल आहे. ती जनतेची कशी फसवणूक आहे. हे गरीब लोकांना सांगण्याची आवश्यकता नाही. शेठ सावकार हे आपले हितशत्रू आहेत, याचे आपल्यास उपजत ज्ञान आहे. काँग्रेस लोकांची अशी फसवणूक करीत असल्यामुळे मी तिच्यात सामील झालो नाही. म्हणूनच तुम्हालाही सांगत आहे की तुम्ही काँग्रेसपासून अगदी दूर राहा.

तुमच्या हिताचे कायदे आणणे व त्याकरिता झगडणे हे माझे कर्तव्य आहे व ते मी करीन, असे मी तुम्हाला आश्वासन देतो. माझ्या कर्तव्यास जागेन पण त्याच वेळेस तुम्ही तुमच्या कर्तव्यास जागले पाहिजे. हे मला तुम्हास सांगावयाचे आहे. तुम्ही आपली चळवळ जोमदार केल्याशिवाय आपल्यास यश लाभणार नाही व आपले जीवित सुखाचे होणार नाही.

तिसरा प्रश्न आपण आपल्या उन्नतीचे कार्य करीत असता आपल्यावर जो जुलूम होतो त्याचे कसे निवारण करावयाचे ? तुम्हाला माहीत आहे की, आपल्या विरुद्ध सर्व जग आहे आणि त्याला तोंड द्यावयाचे म्हणजे ते दोन प्रकाराने द्यावयास हवे. प्रथमतः आपण प्रत्येकाने आपल्या मनातील भीती नाहीशी केली पाहिजे. ज्या ज्या वेळेस आपल्यावर कोणताही जुलूम होईल त्यावेळेस जुलूम करणाऱ्याशी दोन हात करावयास न डगमगता तयार झाले पाहिजे. असेल ते होईल, त्याला भिण्याचे कारण काय आहे ? तुमच्याजवळ आहे काय ? काय व्हायचे की ते हरपण्याची धास्ती वाटावी ? तुम्ही मरणास देखील भिता कामा नये इतके तुम्ही निर्भय झालात तरच तुमच्यावरील जुलूमांचा तुम्हास प्रतिकार करता येईल. आपल्यातील तरूण माणसानी आपल्या पेहेरावात देखील सुधारणा करावयास हवी. धोतराच्या ऐवजी आखूड तुमान व अंगात एक कुडते म्हणजे स्काउटचा ड्रेस केला पाहिजे. 18 वर्षापासून 40 वर्षापर्यंत प्रत्येकाने असा सुटसुटीत पोशाख केल्यास तुमच्या मनोवृत्तीत देखील बदल झाल्याशिवाय राहाणार नाही व तुमच्या मनातील भीती नाहीशी होईल. शिवाय अंतःशुद्धीस जोड म्हणून जुलूमापासून रक्षण करण्याकरिता आपल्याला एक फंड उभारला पाहिजे. त्या निधीतून कायदेशीर इलाज व पीडितांचे दुःख निवारण ह्या गोष्टी कराव्या लागतील.

मी सांगितलेल्या सर्व गोष्टी करण्यास तुम्ही आता सिद्ध झाले पाहिजे आणि तसे तुम्ही व्हाल अशी माझी खात्री आहे.

याप्रमाणे बाबासाहेबांचे एक तास पर्यंत अस्खलित भाषण झाल्यावर सभेपुढे तीन ठराव मांडण्यात आले. ते असे
(1) महारकी वतन बिलास पाठिंबा
(2) खोती पद्धत नष्ट करणाऱ्या बिलास पाठिंबा व
(3) जनतेचे वर्गणीदार व स्वतंत्र मजूर पक्षाचे सभासद होण्यास विनंती.

शेवटी आभार प्रदर्शन झाल्यावर सभा विसर्जन करण्यात आली. बाबासाहेब व त्यांचे बरोबर असलेली मंडळी पंढरपूर म्युनिसिपालिटीचे हॉलमध्ये गेली. याठिकाणी म्युनिसिपालिटीचे सभासद जमले होते. म्युनिसिपालिटीचे अध्यक्ष रा. ब. परिचारक यांनी समयोचित भाषण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत केले व त्यांना पुष्पहार अर्पण केला. नंतर इतर सभासदांची व बाबासाहेबांची ओळख करून देण्यात आली. डॉक्टर साहेबांनी उत्तरादाखल भाषण केले व पंढरपूर म्युनिसिपालिटीचे आभार मानले.

नंतर मंडळी स्थानिक वकील श्री. पटवर्धन यांचे येथे निमंत्रणावरून चहापानाकरिता गेली व त्या दिवसाचा कार्यक्रम आटोपला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password