केवळ शिक्षणाने योग्यता येते असे नाही.
धारवाड जिल्ह्यातील बहिष्कृतांची पहिली परिषद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली धारवाड येथे तारीख 28 डिसेंबर 1929 रोजी सायंकाळी किल्ल्याच्या अद्याप उभ्या असलेल्या भव्य वेशीनजीकच्या विस्तीर्ण पटांगणात मोठ्या विलक्षण उत्साहाने भरली होती. सभेला जिल्ह्यातून अस्पृश्य प्रतिनिधी महार, मांग, चांभार, भंगी, ढोर इत्यादि हजारावर आले होते. सभास्थानी अस्पृश्यांखेरीज इतर स्पृश्य नागरिकही अनेक आले होते. व्यासपीठावर म्हैसूरच्या सौ. कनकलक्ष्मी आम्मा. श्री. मुदवेडू कृष्णारायपा हे बसले होते. स्पृश्यांमध्ये डॉ. किर्लोस्कर, डॉ. कमलापूर वगैरे बरीच ठळक ठळक मंडळी दिसत होती. रीतीप्रमाणे स्वागतपर पद्ये झाल्यावर स्वागताध्यक्ष वाय. बी. सांबाणी यांचे लहानसेच भाषण झाले.
नंतर येथील कर्नाटक कॉलेजमधील अस्पृश्य विद्यार्थी मि. एस. एन. माने यांनी डॉ. आंबेडकर यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावे म्हणून मराठीत सूचना आणली. तीत सेक्रेटरी मि. सबाणी यांनी कानडीत अनुमोदन दिले. रा. सा. पापाण्णा जालिहाल, बेळगाव यांनी दुजोरा दिल्यावर अध्यक्ष टाळ्यांच्या गजरात स्थानापन्न झाले. अध्यक्षांच्या भाषणाच्या आरंभी सेक्रेटरीनी परिषदेला परगावाहून आलेले संदेश वाचून दाखविले. मि. राजभोज पुणे, मि. स्टार्ट, नाशिक, दे. भ. गंगाधरराव देशपांडे, हुबळी (बेळगाव). ना. जाधव, सुभेदार, घाडगे, डी. सी. मिशन, पुणे वगैरे संदेश वाचल्यानंतर अध्यक्षांचे भाषण झाले. ते अर्थात मराठीतच झाले.
डॉ. आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,
झालेल्या स्तुतीला आपण स्वतः पात्र आहो की नाही हे ठरविणे आपण स्वतःला केवळ अशक्य आहे. तरी स्तुतीला पात्र ठरविणे श्रोत्यांच्याचकडे आहे. आपण विलायतेहून आलो तेव्हा मानपत्र देण्याविषयी मंडळींनी फारच खटपट केली. पण मी कोणत्या मोहाला न जुमानता मानपत्र स्वीकारले नाही. कारण माझ्या मते उघड आहे. याचे मानपत्र घेण्याला लायकी पाहिजे. केवळ शिक्षण घेतले म्हणजे ती योग्यता आपणास येते असे मला वाटत नाही. मनुष्य विद्वान झाला की, तो समाजाला उपयुक्त होतोच असे नाही. विद्वान मनुष्य लुच्चा, लबाड, उसण्या, लटपट्या आणखी वाटेल त्या दुर्गुणांचा असतो. आजच्या परिस्थितीत विद्वान, शिकलेले, पुढारलेले हे अस्पृश्यांशी कसे वागतात ते पाहातच आहोत. पण हे असे चालायचेच कारण, स्पृश्यास्पृश ही घडी कालातीत आहे. कोणीही व्यक्ती ही घडी केव्हा निघेल हे आज छातीठोकपणे सांगू शकणार नाही, अस्पृश्यता निवारणाचे अनेक मार्ग आहेत. त्यात महत्त्वाचा म्हणजे, राजकीय सत्ता आपल्या ताब्यात घेणे हाच होय. तुमच्या सुधारणेसाठी तुमच्यात अलिकडे अनेक स्पृश्य लोक वावरू लागले आहेत. साहेब लोकही आपल्याविषयी कळकळ दाखवितात. पण हळूच म्हणतात की, राहणी सुधारा, स्वच्छ राहा. नवीन दृष्टी ठेवा. या गोष्टी योग्य आहेत. नाहीत असे नाही. पण लक्षात ठेवा की, या सर्व गोष्टी राजकीय सत्तेच्या आधीन आहेत.
राजकीय सत्ता आली की सर्व काही होईल. राजकीय सत्तेच्या अभावी जी काय होत आहे ती केवळ सुधारणा आहे. राजकीय सत्ता मिळेपर्यंत ही सुधारणा काही बंद होत नाही. नुकताच आपणाला स्टार्ट कमिटीवर जाण्याचा योग आला. त्यामुळे रानटी लोक ज्यांना मानण्यात येते त्यांच्याशी आपला परिचय झाला. त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे. केवळ वस्त्रप्रावरण हाच बाह्यात्कारी फरक, कोणी कितीही सांगितले तरीही हे लोक आपला पेहराव कधीही सोडणार नाहीत. आज ह्या पेहरावामुळेच ते अगदी निराळेच दिसतात. या लोकांची सुधारणा काही पोशाखाने होणे नाही. सुधारणेच्या कामी पेहराव वगैरे कुचकामाचे आहे.
रानटी लोक आणि हिंदू समाज व अस्पृश्य समाज यामध्ये बराच फरक दिसतो. एकमेकातील चाली वगैरे भिन्न भिन्न आहेत. सरकारला अस्पृश्योद्धाराच्या बाबतीत कायदा करण्याचे धारिष्ट्य नाही. इतर जातीचा रोष आपणावर ओढून घेण्याला सरकार धजत नाही. राजकीय सत्तेचा काही अंश हाती आल्याखेरीज आपल्या सुधारणेला खरा जोर बसत नाही. राजकीय सत्ता हाती घेण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे, तसा वरिष्ठ दर्जाच्याही जुलुमाला दूर करण्याला झटले पाहिजे, झटापट सर्व बाजूनेच करायची आहे. कोकणात अस्पृश्यांची स्थिती केवळ गाववाल्यांच्या मर्जीवरच अवलंबून आहे. अस्पृश्यांना गावाचे पाटील अनुकूल पाहिजेत. पाटील बिथरले की, तो व गुंड अस्पृश्यांना अगदी भंडावून सोडतात. त्यांच्यावर कडकडीत सामाजिक बहिष्कार घालतात तसा तो त्यांना तेथे घालता येतो. अशा बहिष्काराला अर्थातच अस्पृश्य घाबरतात आणि साहजिकच ते प्रस्तुतच्या चळवळीपासून दूर राहू इच्छितात आणि राहतातही. अस्पृश्यांची स्थिती आजही विचित्र आहे.
या इंग्रजी राज्यात अस्पृश्यावरील सामाजिक बहिष्कार दूर करणारा कायदा काही खास होत नाही. आपले आता स्पष्ट मत झाले आहे की आपण सर्वांनी स्वराज्यवादीच झाले पाहिजे. या देशात निदान महार, मांगांना स्वराज्य पाहिजे. सद्याच्या स्वराज्याच्या भानगडीत देणेही दुसऱ्याचे पदरात पडेल. आता स्वराज्याची घटना होत आहे. त्यात आम्हा गरजू लोकांना मात्र वाटा आला पाहिजे, पण या स्वराज्याच्या वाटाघाटीत काही तथ्य आहे असे मला वाटत नाही. माझा इंग्रज सरकारवर विश्वास नाही मी स्पष्ट सांगतो. आमच्या उद्धारार्थ हे सरकार काही करणार नाही. आमचा उद्धार आम्हीच करून घेतला पाहिजे. स्वागताध्यक्ष म्हणतात की. अस्पृश्यता आहे तोपर्यंत स्वराज्य मिळत नाही. पण ही केवळ भूल आहे. इंग्रज सरकार काही तत्त्वज्ञानानुवर्ती नाही. ते पक्के व्यवहारी आहे. ते काही मागतील त्याला स्वराज्य द्यायला आलेले नाही. इंग्रज सरकार चावणाऱ्या ओरबडणाऱ्याला खूष करणार, ते आपले साम्राज्य सुरक्षित आहे की नाही हे पाहाणार. त्याला तुमच्या भानगडीशी काहीच कर्तव्य नाही. या देशातील सुखाकरिता स्वराज्य कोणी देणार नाही. सांप्रत स्वराज्याच्या बाबतीत वाटाघाटी चाललेली आहे. त्यात तुम्हा आम्हाला विचारताहेत काय ? महात्मा गांधी, सप्रू, नेहरू, जिना यांच्याशी विचारविनिमय करीत आहेत. या लोकांचा आपल्याशी किती संबंध येत असेल ते दिसतेच आहे. यासाठी आता आपण स्वराज्यवादी झाले पाहिजे पण नुसते ते स्वराज्य मिळवून तरी काय होणार आहे ? स्वराज्याची आपणास लायकी पाहिजे. आपण आरडा ओरड केली तर आपणाला पाहिजे ती सत्ता मिळेल पण ज्ञानाशिवाय ती व्यर्थ आहे. अस्पृश्यांच्या नुसत्या बहुसंख्येप्रमाणे काही होणे नाही. स्वराज्याच्या उपभोगार्थ लायकीच पाहिजे. आपली सामाजिक स्थिती इतर समाजाच्याहून अगदी भिन्न आहे. आपला हा जातिभेद इतर समाजातही आहेच; पण आपल्यात एक अगदी विशेष नमूनादाखल असा दुसरा गुणभेद आहे.
जातीभेद व गुणभेद समांतरगामी आहेत. आजही पैरलल आहेत. असा प्रकार इतर कोणत्याही देशात आढळणार नाही. आम्ही अनादी काळापासून आनुवंशिक गुण मान्य केले. त्याचे दुष्परिणाम भोगतो आहो. कितीही विद्वान अस्पृश्य दूरच राहतो. पण अडाणी ब्राह्मण वरच्या जागी वावरतो. हे आजवर केवळ अज्ञानानेच चालू देण्यात आले. अज्ञान नसते तर समतेचा लढा केव्हाच सुरू झाला असता. ब्राह्मण गुणाने कनिष्ठ असला तरी जन्माने श्रेष्ठ असतो.
गुणभेदाचे अंतर नाहीसे झाले पाहिजे. त्यासाठी शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे. आपण फार जागृत झाले पाहिजे. संधी प्राप्त होणे आणि ती पदरात पाडून घेणे हे आपल्याकडे आहे. शिक्षणाच्या अभावी हे सुसाध्य होत नाही. आपण स्वतः आपले हक्क बळकावण्याचा मी बळकावण्याचाच म्हणतो – प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
आपला हा माणुसकीचा झगडा आहे. यासाठी शेवटी सत्याग्रह करावा लागेल. तो शेवटचा उपाय होय. स्वकीय आणि परकीय या उभयतांशीही सत्याग्रह करावा लागेल. उभयताही अन्याय जसे करतील तसेच त्यांच्या विरोधात उपाय योजले पाहिजेत. पुराणकालीन कौरव पांडवांचा एवढा मोठा लढा का झाला ? तर केवळ राज्य. अस्पृश्यता सर्व समाजाचे कल्याण होऊ देणार नाही. मात्र आपला आपण दर्जा वाढविला पाहिजे. लक्षात ठेवा की, आपल्या उद्धाराचा लढा आपणाला केव्हा तरी करावा लागणारच. स्पृश्य जनतेतील दुराभिमान कसा जाणार. पुराणमताभिमानी हे असणारच. मला अखेरीस इतकेच सांगावयाचे आहे की, स्वावलंबनाचा मार्ग चोखाळा. तुम्हाला या स्थितीत ठेवण्याची कारवाई फारच बध्दमूल आहे. तुमचे ते महारकी वतन, त्या वतनाच्या अभिमानाने तुम्ही किती परावलंबी झाला आहात याची तुम्हाला कोठे कल्पना आहे. या महारकी वतनाने महार हा खेडेगावात कायमचाच डांबून टाकला आहे.
महार म्हणजे सरकारी भिकारी. प्रत्येक खेड्यात असे सरकारी भिकारी या वतनामुळे लाभले आहेत. महाराने या भिकारी करणाऱ्या वतनाच्या नादी लागता मनगटाचे जोरावर संघर्ष केला पाहिजे. स्वतःच्या न शिक्षणार्थ त्याने स्वतःच मदत केली पाहिजे. त्याला दुसरे कोणीही मदत करणार नाहीत. काही उदारमनस्क मदत करतील.
उंदरांची मदत केवळ उसनवारी होय. महार लोक गरीब पण संख्येने काय कमी आहेत ? त्यांनी स्वतःचीच मदत एकवटावी म्हणजे त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आपोआपच सुटेल. धारवाड जिल्ह्यातून एक लाख महार असतील. प्रत्येकाने एक एकच रूपया दिला असता एक लाख रूपयांचा फंड जमेल. त्यावर शंभर मुलाचे बोर्डिंग चालेल. सांप्रत येथे एक बोडिंग स्थापन झाले आहे. सरकारी आश्रम आहे. ग्रँट पुरेशी आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामागे दहा रूपये मिळतात. इतरत्र इतर मदत दिली जात नाही. तूर्त पंधराच मुलांची सोय झालेली आहे. भांडले असता ही संख्या दुपटीपर्यंत नेता येईल. पण यापेक्षा तुमची सोय तुम्ही करा. सध्या ह्या बोडिंगची व्यवस्था आपल्याकडे आहे. आपण मुंबईस आणि बोर्डिंग येथे. अंतर फार दूर. व्यवस्था व्हावी तशी होत नाही यासाठी एक कमिटी स्थापन करा. आपली आपण व्यवस्था पहा. धारवाड जिल्ह्याच्या अस्पृश्य विद्यार्थ्याची सोय आहे. यापेक्षा विशेष झाली पाहिजे ती तुमची तुम्हाला करून घेता येईल.
याप्रमाणे डॉ. आंबेडकरांनी आपल्या बांधवांस कळकळीने सांगून आपणास अध्यक्षस्थान दिल्याबद्दल आभार मानून टाळ्यांच्या गजरात आपले भाषण संपविले.