Categories

Most Viewed

27 डिसेंबर 1945 भाषण

आपले ध्येय साकार करण्यासाठी फेडरेशनला अपूर्व विजय मिळवून द्या.

तारीख 27 डिसेंबर 1945 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वागताप्रित्यर्थ कोईम्बतूरमधील आबालवृद्ध अस्पृश्य समाज स्टेशनवर अवाढव्य संख्येत गोळा झालेला होता. डॉ. बाबासाहेब स्टेशनातून बाहेर पडताच “जयभीम” च्या गगनभेदी घोषणांनी दक्षिण हिन्दुस्थान देखील डॉ. बाबासाहेबांच्या दर्शनासाठी सदैव उत्सुक असतो याची अस्पृश्येतरांना साक्ष पटवून दिली. शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनच्या स्थानिक शाखेच्या विद्यमाने झालेल्या या सभेतील अस्पृश्यांच्या अफाट जनसमुदायासमोर भाषण करताना डॉ. बाबासाहेब म्हणाले,

आगामी निवडणुकीतून निवडून येणाऱ्यांच्या कडून हिंन्दुस्थानची घटना बनविली जाणार असल्यामुळे या निवडणुकीला अत्यंत महत्त्व आहे. यात मुख्यत्वेकरून दोनच पक्षांचा झगडा आहे. एक आपले शेडयूल्ड कास्ट्स् फेडरेशन आणि दुसरी काँग्रेस. तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की, येथे ब्राह्मणेतर पक्ष मोडकळीस आल्यामुळे काँग्रेसकडून आपल्याला जोराचा विरोध होईल. 1937 मध्ये ब्राह्मणांनी आपले वर्चस्व गाजवून मंत्रिमंडळ हस्तगत केले. “ब्राह्मण-ब्राह्मणेतर” पक्षासंबंधी बोलताना श्री. राजगोपालाचारी आणि श्री. कामराज नादर यांच्यात चालू असलेल्या वादाचा निर्देष केला. असेही म्हणाले की, काँग्रेसला निवडणुकीत बहुमत मिळून राजगोपालाचारीला मंत्रिमंडळ बनविण्याचा अधिकार प्राप्त झाला तर श्री. नादर याला ते जेलची हवा खायला लावतील. पुढे बोलताना बाबासाहेबांनी सांगितले की, “आम्हाला [अस्पृश्यांना] काय पाहिजे ? आम्हाला कायदेमंडळात व अधिकाऱ्यांच्या जागांबाबतीत ठराविक प्रमाणात प्रतिनिधीत्व पाहिजे. शिक्षणाकरिता पुरेसा पैसा पाहिजे. शेतीभातीसाठी गरजेपुरती जमीन पाहिजे. अस्पृश्यांच्या भवितव्याची काळजी दूर करण्यासाठी या गोष्टींची जास्त आवश्यकता आहे. या गोष्टी मिळविण्यासाठी राजकीय अधिकार काबीज करणे जरुर आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की, तुम्ही सर्वांनी या निवडणुकीत आपल्या फेडरेशनच्याच उमेदवारांना निवडून दिले पाहिजे. तुम्हा सर्व लोकांनी असा निर्धार केला पाहिजे की, याउपर आम्ही कोणाचेही वर्चस्व स्वतःवर लादून घेणार नाही. आमच्यावर कोणीही राज्य करता कामा नये, आम्ही शासनकर्ते होणार आहोत. याच निर्धारानुसार वागून आपल्या फेडरेशनला अपूर्व विजय मिळवून दिलात तर आपले ध्येय आपण लवकरच हस्तगत करू.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password