Categories

Most Viewed

27 डिसेंबर 1939 भाषण

अस्पृश्य असूनही अस्पृश्यांच्या चळवळीत सहभागी न होणे लांछनास्पद.

महाड येथील तारीख 25 ते 27 डिसेंबर 1927 च्या सत्याग्रह परिषदेच्या कार्यक्रमाने तेथील चांभार समाजदेखील खडबडून जागा झाला. व दिनांक 27 डिसेंबर 1927 ला संध्याकाळी चांभारवाड्यात सभा करण्याचे ठरवून, डॉ. आंबेडकरांना तेथे येण्यास विनंती करण्यात आली. त्यांच्या विनंतीस मान देऊन डॉ. आंबेडकर त्यांच्या मित्रमंडळीसह रात्री साडेसात वाजता चांभार वाड्यात गेले. महाड येथे चांभारांची वस्ती बरीच मोठी आहे. त्या मानाने सभेस चांभार वर्गातील स्त्रीपुरुषांचा घोळका बराच जमा झाला होता. प्रथमतः श्रीयुत रा. ना. वनमाळी, रा. गिरजाशंकर शिवदास, एल. आर. चांदोरकर, श्रीयुत गोविंद झिपरू जाधव यांची सामाजिक विषयांवर स्फुर्तीदायक भाषणे झाल्यानंतर डॉ. आंबेडकर साहेब बोलावयास उभे राहिले. ते म्हणाले.

दोन चार चांभार लोक सोडून बाकीचे कोणीच चांभार लोक सत्याग्रहासारख्या महत्त्वाच्या कार्यात भाग घेत नाहीत ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. याचे काही कारण मला समजत नाही. महार समाजाशी सहकार्य करण्यास तुम्ही का कचरता, हे मला कळत नाही. तुम्ही स्वतः होऊन सत्याग्रहासारखे मोठे कार्य करू म्हटले तर ते तुम्हास झेपणार नाही असे मला वाटते. कारण तुमची लोकसंख्या अगदी अल्प आहे. तेव्हा महार लोकांसारख्या बहुसंख्यांक लोकांशी कार्यक्षमतेच्या दृष्टीने सहकार्य केल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. तसेच महार लोकांशी सहकार्य केल्याने आपली जात बाटेल अशी भीती बाळगण्याचे तुम्हास काही कारण नाही. खरे म्हटले असता सत्याग्रहीचा कंपू हा वीरांचा कंपू आहे. वीरांच्या कंपूत जातीपातीला थारा नाही ही गोष्ट पेशव्यासारख्या ब्राह्मणी राज्यातही मान्य होती. तसे जर नसते तर सिदनाक महाराचा तंबू मराठे सरदारांच्या छावणीत राहू दिला नसता. तरी पण तुम्ही आपली जात मोडा असा कोणीही आग्रह धरीत नाही. खरे म्हटले असता तुम्ही सुखवस्तु, व्यापारी, सधन आहा. तुम्ही उलटी आम्हास मदत केली पाहिजे, तुम्हास जोडे न देण्याचा सत्याग्रह करता येईल. असे सामर्थ्य तुमच्या समाजात असून तुम्ही त्याचा उपयोग करीत नाही. ह्याला तुमची बेफिकीरी म्हणावे की विलक्षण आळस म्हणावा तेच मला कळत नाही. तुम्हास सुख पाहिजे की माणुसकी पाहिजे ते ठरवा. माणुसकीशिवाय तुमचे वैभव व्यर्थ होय. तुमच्यासारख्या स्वतंत्र व सुखी लोकांनी अस्पृश्यांना माणुसकी परत आणून देण्याचे कामात आतुरतेने भाग घेतला पाहिजे. हे पुण्य थोडे तरी पदरात घ्या. ह्यात जर तुम्ही भाग घ्याल तर इतिहासात महाराबरोबर तुमचेही नाव अजरामर होईल नाही तर तुमची पुढची पिढी तुम्ही नामर्द होतात म्हणून दोष देईल.

त्यानंतर श्री. एस. एन. शिवतरकर म्हणाले, अस्पृश्योद्धाराचे कामात तुम्ही भाग घेत नाही म्हणून तुम्ही भ्याड गणले जात आहा. तुम्ही आपले कर्तव्यकर्म बजावीत नाही. हे कार्य केवळ अस्पृश्यांचे नसून मानव जातीचे आहे. पुण तुम्ही अस्पृश्य असूनही ह्या कामात भाग घेत नाही हे तुम्हास लांछनास्पद आहे. तुम्ही भटाळलेले होऊ नका. ह्या कार्यात सहकार्य करून मदत करा. त्यानंतर श्री. पां. ना. राजभोज म्हणाले, चांभार भटाळलेले होऊ लागले आहेत हे पाहून मला फार वाईट वाटते. मातंग समाजातील काही लोकांबद्दल त्याहूनही अधिक वाईट वाटते. चांभार लोक इतर अस्पृश्यांपेक्षा सुखी आहेत. पण त्यांना शिक्षण नाही म्हणून ते असे कर्तव्यच्युत होऊन राहिले आहेत. आज अस्पृश्य पुढाऱ्यावर अरिष्ट कोसळले आहे. या वेळेस तुम्ही मत्सर व द्वेषभावना सोडली पाहिजे. जातीभेद फार भयंकर आहे. तो विसरुन महार समाजाशी तुम्ही सहकार्य करा, सत्याग्रही बना त्यात सर्वांचाच फायदा आहे. नंतर श्री. सहस्त्रबुद्धे म्हणाले, “बॅरिस्टर साहेब तुमच्या कुळात जन्मले आणि आज विलायतेला जाऊन, विद्वान ब्राह्मणांपेक्षाही अधिक विद्वान होऊन आले. म्हणूनच मी ब्राह्मण असून आज त्यांचे शिष्यत्व पत्करिले आहे. तुम्ही तसेच शिक्षण घ्या, जातीभेद मोडा व अस्पृश्योद्धाराचे कार्यात सहाय्य करा. बॅरिस्टर साहेबाबरोबर मी नेहमी जेवणखाण करीत असतो. त्यामुळे माझे काही बिघडले नाही. खाण्यापिण्याच्या भेदास तुम्ही उगीच महत्त्व देऊ नका”. नंतर श्री वनमाळी म्हणाले, “तुम्ही सत्याग्रहात भाग घेतला नाही याबद्दल मला फार वाईट वाटते. आपले कर्तव्य बजावण्याची ही संधी उगीच दवडू नका. कर्तव्य बजावाल तर इतिहासात तुमचे नाव अजरामर होईल” याप्रमाणे भाषणे झाल्यानंतर चहापान झाले. अध्यक्षांचे आभार मानल्यानंतर सुमारे 9 वाजता सभा बरखास्त झाली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या मित्रासह चांभारवाड्यातून आल्यानंतर रात्री 10 वाजता पुन्हा सत्याग्रह परिषदेस सुरुवात झाली. धुळ्याचे खादीप्रसार मंडळाचे आद्य प्रवर्तक रा. देव यांचे व्याख्यान ठरले होते. ते येण्यास थोडा अवकाश लागल्यामुळे श्रीयुत गणपतबुवा जाधव यांचे व श्रीयुत कांबळे यांचे विनोदयुक्त असे देव व भक्त या विषयांवर पाव, पावतास कीर्तने झाली. यांचा लोकांवर फार मोठा परिणाम झाला. रा. देव व्याख्यान देऊन गेल्यानंतर परिषदेच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रथमतः श्रीयुत वामनराव पत्की व कमलाकर टिपणीस या दोन कायस्थ ज्ञातीतील तरुणांचे आभार मानण्याचा व त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल सत्याग्रह कमिटीतर्फे पारितोषिक म्हणून दोघास दोन सोन्याच्या अंगठ्या अर्पण करण्याचा ठराव मांडण्यात आला. ठरावावर श्रीयुत संभाजी गायकवाड, गोविंद रामजी आडेरकर हवालदार व श्रीयुत मोरे यांची भाषणे झाली.

त्याच ठरावावर बोलताना डॉ. आंबेडकर म्हणाले,
वरील दोन तरुणांची कामगिरी त्यांच्या जातीस व कुळास शोभण्यासारखी आहे. ब्राह्मण वर्गांनी कायस्थ लोकांवर कमीपणाचा शिक्का मारुन त्यांना हीन ठरविण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. परंतु त्यांनी वेळोवेळी प्रसंगास तोड देऊन ब्राह्मण जातीच्या या कृष्ण कारस्थानास आळा घातला. समतेचा लढा लढलेल्या कायस्थ ज्ञातीस समतेसाठी झगडणाऱ्या अस्पृश्य वर्गाबद्दल सहानुभूती वाटून त्या कार्याप्रित्यर्थ त्यांनी झटावे हे अगदी साहजिक आहे. त्यानंतर श्रीयुत कमलाकर टिपणीस व श्रीयुत पत्की यांनी प्रत्युतरादाखल भाषणे केली. मग महाड म्युनिसीपालिटीचे अध्यक्ष रा. सुरेंद्रनाथ टिपणीस हे बोलावयास उठले व हिंदुधर्म संरक्षणास अस्पृश्य लोकांची किती जरुरी आहे हे त्यांनी विषद करून सांगितले. त्यांच्या पाठी रा. शांताराम पोतनीस म्हणाले. सर्व गुजर व ब्राह्मण समाज उलटला तरी आम्ही तुम्हास तन, मन, धनाने मदत करीत राहू. आमच्या कायस्थातील जुने लोकही तुम्हास विरुद्ध आहेत. आम्ही त्यांना काडीचीही किंमत देत नाही. पण चवदार तळ्यावर जाण्यास जोपर्यंत अस्पृश्यांना परवानगी मिळणार नाही तोपर्यंत मीही त्या तळ्यावर पाणी पिणार नाही.

त्याच्या पुढील ठराव डॉ. आंबेडकर यांनी स्वतः मांडला तो असा. सत्याग्रह परिषदेकरिता नेमलेले प्रचारक रा. शिवराम गोपाळ जाधव, संभाजी तुकाराम गायकवाड, भाऊ बाळू वारंगकर, पंढरीनाथ रामचंद्र आसूडकर, भाविकनाथ बुवा फलानकर व पांडुरंग महादेव वोउरकर यांनी आपली कामगिरी उत्तम प्रकारे बजाविल्याबद्दल ही परिषद त्यांचे आभार मानते. रा. बोउरकर, सखाराम, गोपाळ आचलोलकर, महादेव आचलोलकर यांनी आपणास परिषदेच्या कार्याकरिता स्वखुषीने अर्पिले हे ध्यानात घेऊन त्यांना एक एक चांदीचा बिल्ला पारितोषक म्हणून देते”.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password