Categories

Most Viewed

27 डिसेंबर 1927 भाषण 2

बदललेल्या परिस्थितीची जाणीव ठेवा.

तारीख 27 डिसेंबर 1927 रोजी महाड सत्याग्रह परिषदेत स्त्रियांना त्यांची जबाबदारी दाखवून दिल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीचे पंच, म्हेत्रे वगैरे अधिकारी लोकांना एकत्रित करून सांगितले की,

आपल्याला मी आता जे काही बोलणार आहे त्याबद्दल राग येऊ देऊ नका. मी पंचाचे लेकरू आहे. माझे चुकत असल्यास माफी करावी. आपल्या वडिलांनी पंचाची व्यवस्था केली ती फार चांगली गोष्ट केली असे माझे मत आहे. हरेक समाजाच्या चाली रुढी ठरून गेलेल्या असतात. त्या चालीरुढी प्रमाणे सर्वांनी वागावयाचे असते. एखादा कोणी जातीच्या रिवाजाप्रमाणे वागला नाही तर, त्यास ताळ्यावर आणण्यासाठी बहिष्कारा सारखी किंवा दंडासारखी शिक्षा जात करते. ही शिक्षा करण्याचा अधिकार जातीने तुम्हा म्हेत्रे लोकास दिला आहे. यावरून तुमची आपल्या समाजात केवढी मोठी योग्यता आहे हे तुम्हास दिसून येईल. तुम्ही समाजातील न्यायाधिकारी व धर्माधिकारी लोक आहा. तुम्ही जसा धर्म लोकांना घालून द्याल व जसा न्याय कराल त्याप्रमाणे समाजाला बरे वाईट वळण लागणार आहे. परंतु तुमच्यावर सर्व लोकांचा असा आरोप आहे की, तुम्ही बेली तिकडे बोली. अशा धोरणाने वागता व खऱ्याचे खोटे करून, खोट्याचे खरे करता. जेणेकरून समाजामध्ये अधर्म वाढत चालला आहे. या सर्वांस तुम्ही कारणीभूत आहात. तेव्हा मला आपल्याला जे सांगावयाचे आहे ते हे की, तुम्ही आपले कर्तव्य ओळखा. काळ कोणता आला आहे हे ध्यानात घ्या. बदललेल्या परिस्थितीत आपल्याला काय केले पाहिजे याची जाणीव ठेवा. जुन्या चालीरिती टाकून देऊन, नव्या चालीरिती तुम्ही घालून द्यावयास पाहिजे आहेत. इतकेच नव्हे तर जेथे जेथे म्हणून या नव्या पद्धतीस लोक अनुकूल होणार नाहीत तेथे तेथे बहिष्काराची मात्रा लागू करून, त्यांना ताळ्यावर आणले पाहिजे. हे जर तुम्ही करण्यास तयार असाल तर तुमची वंशपरंपरेची गादी आम्ही मान्य करू. तसे जर तुम्ही करणार नाही तर नवीन वळणाचे व नव्या धोरणाचे पंच नेमून तुमचा अधिकार काढून घ्यावा लागेल. बदललेल्या परिस्थितीत आपल्या जातीला कोणते नियम लागू करणे योग्य आहेत याचा विचार करण्याकरिता मी सर्व म्हेत्रे लोकांची सभा बोलावणार आहे. त्या सभेत जे नियम सर्वानुमते पास होतील ते अंमलात आणण्याची दक्षता तुम्ही घ्याल अशी मला आशा आहे.

त्यानंतर रा. शिवतरकर यांनी सभेपुढे शेवटचा ठराव मांडला. त्या ठरावात सत्याग्रह कमिटीच्या वतीने मुंबई इलाख्यातील मराठी भाषा बोलणाऱ्या सर्व जिल्ह्यांतून महाडच्या सत्याग्रहा करिता जे प्रतिनिधी आले होते त्यांचे आभार मानण्यात आले होते. महाडच्या परिषद संबंधाने ज्या काही अपूर्व गोष्टी सांगण्यासारख्या आहेत त्यापैकी सांगण्यासारखी गोष्ट म्हटली म्हणजे महाडच्या चवदार तळ्याचा प्रश्न केवळ कुलाबा जिल्हयातील लोकांपुरता आहे असे न मानता तो सर्व अस्पृश्य वर्गाचा आहे असे मानण्यात आले ही होय. मराठी बोलणाऱ्या जिल्ह्यापैकी असा एकही जिल्हा नव्हता की, ज्या जिल्ह्यातून महाडच्या सत्याग्रहाकरिता लोक आले नव्हते. अशी जुट व एकी हरेक वेळी अस्पृष्य लोकानी दाखविली तर, अस्पृश्यता निवारण्याचे काम फारच सुलभ होणार आहे. वरीलप्रकारचे रा. शिवतरकर यांचे भाषण झाल्यानंतर व रा. संभाजी गायकवाड यांनी दुजोरा दिल्यानंतर ठराव टाळ्यांच्या गजरात पास झाला व रात्री दीड वाजता सभेचे काम संपले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password