Categories

Most Viewed

27 डिसेंबर 1927 भाषण 1

अस्पृश्योन्नती व स्त्रियांची जबाबदारी.

तारीख 27 डिसेंबर 1927 रोजी दुपारी परिषद संपवून प्रतिनिधी जेवणाच्या मंडपाकडे गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिषदेच्या ऑफिसात, जेथे त्यांची उतरण्याची सोय केलेली होती तेथे गेले. तेथे जाऊन बसतात न बसतात तोच त्यांना पाहण्याकरिता स्त्रियांची गर्दी जमली. या स्त्रिया दूर दूरच्या गावावरून नऊ नऊ, दहा दहा मैलांच्या अंतरावरून मुद्दाम डॉ. आंबेडकरांना पाहण्यास आलेल्या होत्या. डॉ. आंबेडकरांना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहावयाची त्यांना इतकी उत्कट इच्छा झाली होती की, त्यापैकी पुष्कळशा स्त्रिया, आपली तान्ही मुले सोडून आल्या होत्या. संध्याकाळच्या सुमारास तर स्त्रियांची अतीच गर्दी जमली. त्यापैकी एक वृद्ध स्त्री आली. ती डॉ. आंबेडकरांना पाहून मोठमोठ्याने रडू लागली. हे पाहून जमलेल्या सर्व मंडळींची अशी खात्री झाली की. हिला कोणी तरी स्पृश्य गुंडाने मारले असावे. त्याप्रमाणे तू रडतेस का ? तुला कोणी मारिले ते सांग, असे लोक विचारू लागले. तेव्हा ती म्हणाली की, मला कोणी मारिले नाही. परंतु मी इकडे येत असताना वाटेत “तुमच्या राजाचा खय्यो झाला असे काही दुष्टांनी मला सांगितले” असे ती म्हणाली. तेव्हा या बाईचे रडण्याचे कारण व इतक्या स्त्रियांचे येण्याचे कारण काय हे लोकांच्या ध्यानी आले. निस्सीम प्रेमाच्या रज्जूने बद्ध झालेला स्त्रीवर्ग आपणास पाहावयास आयताच आला आहे याचा फायदा घेऊन जमलेल्या सर्व स्त्रियांस डॉ. आंबेडकरांनी ठेवून घेतले व सांगितले की, मला तुम्हास काही समाज हिताच्या दोन गोष्टी सांगावयाच्या आहेत. त्यासाठी तुम्ही संध्याकाळी परिषदेस हजर राहावे अशी माझी तुम्हास विनंती आहे. त्याप्रमाणे सर्व स्त्रिया राहत्या झाल्या.

चांभार वाड्यातील सभा आटोपल्यानंतर बाबासाहेबांनी स्त्री वर्गाला उद्देशून भाषण केले. त्यानंतर जातीचे पंच, म्हेत्रे वगैरे अधिकारी लोकांना त्यांनी मार्गदर्शन केले. ठरल्याप्रमाणे शेवटच्या व महत्त्वाच्या कार्यक्रमास अध्यक्षांनी सुरुवात केली. हा शेवटचा कार्यक्रम इतका महत्त्वाचा होता की, परिषदेच्या सगळ्या कार्यक्रमात त्यालाच अग्रस्थान देणे प्राप्त आहे. शिवाय तो कार्यक्रम इतक्या गांभीर्यप्रचुर पद्धतीने पार पाडण्यात आला. त्यामुळे सर्व सभाजनास आपल्या कर्तव्याची जाणीव धगधगीतपणे डोळयापुढे उभी राहिली. या कार्यक्रमापैकी पहिला कार्यक्रम म्हणजे स्त्रीवर्गास व्याख्यान हा होय. दुपारी ठरल्याप्रमाणे सर्व स्त्रिया भाडभीड सोडून सभामंडपात येऊन बसल्या होत्या. त्यांच्यासाठी बसण्याकरिता मध्येच जागा राखून ठेवण्यात आली होती.

त्यांना उद्देशून डॉ. आंबेडकर म्हणाले,
आपण या सभेत आल्याबद्दल मला अत्यंत आनंद होत आहे. घरप्रपंचाच्या अडचणी ज्याप्रमाणे स्त्री व पुरुष मिळून सोडवितात त्याप्रमाणे समाजाच्या संसारातील अडचणी स्त्रीपुरुषांनी मिळून सोडवावयास पाहिजे आहेत. पुरुषांनीच हे काम अंगावर घेतले तर ते पार पाडण्यास त्यांना पुष्कळ अवधी लागेल याबद्दल शंका नाही. तेच काम स्त्रियांनी जर अंगावर घेतले तर त्या त्या कामात लवकर यशप्राप्ती करून घेतील असे माझे मत आहे. परंतु त्यांना एकट्याने जरी हे काम अंगावरती घेता आले नाही तरी जो पुरुषवर्ग हे काम करीत आहे त्याच्याशी सहकार्य केल्याशिवाय राहू नये. यासाठी तुम्ही यापुढे नेहमी परिषदेस हजर राहिले पाहिजे, असे माझे तुम्हास सांगणे आहे. खरे म्हटले असता, अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न पुरुषांचा नसून तुम्हा स्त्रियांचाच आहे. तुम्ही आम्हा पुरुषांना जन्म दिलेला आहे. आम्हाला इतर लोक कसे जनावरांपेक्षाही कमी लेखतात, हे तुम्हास ठाऊक आहे. काही ठिकाणी आमची सावलीसुद्धा घेत नाहीत. इतर लोकास कोर्ट कचे-यांमध्ये मानासन्मानाच्या जागा मिळतात. परंतु तुमच्या पोटी जन्मलेल्या आम्हा मुलांना पोलीस खात्यातील शिपुरड्याचीही नोकरी मिळत नाही इतका आमचा हीन दर्जा आहे. हे सर्व तुम्हास ठाऊक असताना तुम्ही आम्हास जन्मास का घातले असा प्रश्न तुम्हास कोणी केला तर त्याचे उत्तर तुम्ही काय देऊ शकाल ? या सभेत बसलेल्या कायस्थ व इतर स्पृश्य बायांच्या पोटी जन्मलेल्या मुलात व तुमच्या पोटी जन्मलेल्या आम्हा मुलात काय अंतर आहे ? तुम्ही विचार करावयास पाहिजे की ब्राह्मणांच्या स्त्रियात जेवढे शील आहे तेवढे शील तुमच्यातही आहे. ब्राह्मण स्त्रियात जितके पातिव्रत्य आहे तितके पातिव्रत्य तुमच्यातही आहे. तुमच्यात जितके मनोधैर्य, करारीपणा व धमक आहे. तितकी ब्राह्मण स्त्रियातदेखील नाही. असे असताना ब्राह्मण स्त्रीच्या पोटी जन्मलेले बालक का सर्वमान्य व्हावे व तुमच्या पोटी जन्मलेले बालक सर्व ठिकाणी का अवमानिले जावे, त्याला साध्या माणुसकीचा हक्क का असू नये, याचा कधी तुम्ही विचार केला आहे काय ? मला वाटते तुम्ही त्याचा मुळीच विचार केला नाही. तुम्ही जर विचार केला असता तर पुरुषाच्या आधी तुम्ही स्त्रियांनी सत्याग्रह केला असता. कारण तुमच्या पोटी जन्म घेतला येवढेच पातक आमच्या हातून घडले आहे. त्याच पातकामुळे आम्हास अस्पृश्यतेची शिक्षा भोगावी लागत आहे. तेव्हा तुम्ही विचार करावयास पाहिजे की, तुमच्या पोटी जन्म घेणे हे पाप का ठरले जावे. इतर स्त्रियांच्या पोटी जन्म घेणे पुण्यप्रद का व्हावे. या प्रश्नाचा जर तुम्ही विचार केला, तर तुम्हास एक तर प्रजा उत्पत्ती करणे बंद करावे लागेल किंवा तुमच्यामुळे त्यांना लागत असलेला कलंक तरी तुम्हास धुवून टाकावा लागेल. या दोहोपैकी कोणती तरी एक गोष्ट तुम्ही करावयास लागले पाहिजे. तुम्ही प्रतिज्ञा करा की. अशा कलंकित स्थितीत आम्ही यापुढे जगणार नाही. समाजोन्नती करण्याचा जसा पुरुषांनी निश्चय केला आहे तसा तुम्हीही करा. दुसरी गोष्ट आपणास जी सांगावयाची आहे ती ही की, तुम्ही सर्वांनी जुन्या व गलिच्छ चालीरिती सोडून दिल्या पाहिजेत. खरे म्हटले असता अस्पृश्य माणसास तो अस्पृश्य आहे अशी ओळख पटविणारा शिक्का त्याच्या कपाळावर मारलेला नाही. परंतु अस्पृश्य लोकांच्या ज्या काही चालीरिती आहेत त्या चालीरितीवरुन लोक अमूक एक माणूस अस्पृश्य जातीपैकी आहे असे चटकन ओळखतात. ह्या चालीरिती एकेकाळी आपल्यावर सक्तीने लादण्यात आल्या होत्या असे माझे मत आहे. परंतु इंग्रज सरकारच्या राज्यात तशा प्रकारची सक्ती होऊ शकत नाही. म्हणून ज्या गोष्टीमुळे लोक आपण अस्पृश्य आहोत असे ओळखतात त्या साऱ्या गोष्टी आता तुम्ही बंद केल्या पाहिजेत. तुमची लुगडी नेसण्याची पद्धत ही तुमच्या अस्पृश्यतेची साक्ष आहे. ती साक्ष तुम्ही बुजवली पाहिजे. वरिष्ठ वर्गाच्या बाया ज्या पद्धतीने लुगड़ी नेसतात त्या पद्धतीने तुम्ही लुगडी नेसण्याचा प्रघात पाडला पाहिजे. तसे करण्यात तुमचे काही खर्चत नाही. त्याचप्रमाणे गळ्यामध्ये भाराभर गळसया व हातात कोपरभर कथलाचे किंवा चांदीचे गोठ-पाटल्या ही देखील तुम्हास ओळखण्याची खूण आहे. एका गळसरीपेक्षा अधिकांची जरूरी नाही. त्याने नवऱ्याचे आयुष्य वाढते किंवा आपल्या शरीराला शोभा येते अशातला काही भाग नाही. दागिन्यापेक्षा कपड्यालाच जास्त शोभा आहे. तेव्हा कथलाच्या किंवा चांदीच्या दागिन्यात पैसे खर्च करण्याऐवजी चांगल्या कपड्यात पैसे खर्च करा. दागिना घालावयाचाच झाला तर तो सोन्याचा करून घालावा नाहीतर घालू नये. त्याचप्रमाणे स्वच्छतेने वागण्याची खबरदारी घ्या. तुम्ही घरच्या गृहलक्ष्मी आहात: घरात कोणतीही अमंगल गोष्ट होऊ न देणे याबद्दल तुम्ही काळजी वाहिली पाहिजे. गेल्या मार्च महिन्यापासून सर्व लोकांनी मेलेल्या जनावरांचे मांस खाणे बंद केले आहे ही गोष्ट आनंदाची आहे. परंतु एखाद्या घरी तसे झाले नसल्यास ते घडवून आणण्याची जबाबदारी तुम्ही आपल्या अंगावर घेतली पाहिजे. जो नवरा मेलेल्या जनावरांचे मांस घरात आणील त्यास तुम्ही स्पष्ट सांगा की, असला प्रकार माझ्या घरी चालणार नाही. माझी खात्री आहे की, ही गोष्ट जर तुम्ही मनावर घ्याल तर हा अमंगल प्रकार अजिबात बंद होणार आहे. तसेच तुम्ही आपल्या मुलींनाही शिक्षण दिले पाहिजे, ज्ञान आणि विद्या या गोष्टी काही पुरुषासाठीच नाहीत. त्या स्त्रियांनाही आवश्यक आहेत. ही गोष्ट आपल्या पूर्वजांनीही ओळखली होती. नाहीतर जे जे लोक पलटणीत राहिले त्या त्या लोकांनी आपल्या मुलींना जे शिक्षण दिले ते दिले नसते. खाण तशी माती, ही गोष्ट ध्यानात ठेवून, आपली पुढील पिढी जर तुम्हास सुधारावयाची असेल तर तुम्ही मुलींना शिक्षण दिल्याशिवाय राहू नका. हा जो उपदेश मी तुम्हाला केला आहे तो तुम्ही वा-यावर सोडणार नाही अशी मला आशा आहे. तो अंमलात आणण्यास दिरंगाई करता कामा नये. म्हणून तुम्ही सकाळी आपल्या घरी जाण्यापूर्वी तुमच्या नेसण्याच्या पद्धतीत बदल करून मला दाखवा आणि मग जा. तरच मी सांगितल्याचे चीज झाले असे मी समजेन.

नंतर जमलेल्या स्त्रियांतर्फे श्रीमती विठाबाई हिने सांगितल्याप्रमाणे आम्ही वागू असे आश्वासन दिले.

डॉ. आंबेडकरांच्या भाषणाचा सभेस जमलेल्या स्त्रीवर्गावर तात्कालिक परिणाम झाल्याचे दिसून आले. सकाळी आपापल्या गावी परत जाण्यापूर्वी नखशिखांत, आपल्या पेहरावात बदल केल्याचे दिसून आले. या त्यांच्या निश्चयाबद्दल दरेकीस चोळीबांगडी करिता आठ-आठ आण्याचे पैसे देण्यात आले. त्याचप्रमाणे पुरुषवर्गावरही परिणाम झाल्याचे दिसून आले. त्यांनीही हाताकानातील रानटीपणा दर्शविणाऱ्या दागदागिन्यांना फटक्यासस्थी रजा दिली. इतकेच नव्हे तर, महाङ म्युनिसीपालिटीच्या कचरापट्टीत झाडूवाल्याची नोकरी करणा-या महारांनी आपल्या जागेचा राजीनामा दिला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password