Categories

Most Viewed

25 डिसेंबर 1952 भाषण

भारतात प्रत्येक खेड्यात दक्षिण आफ्रिका आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक 25 डिसेंबर 1952 रोजी निपाणी (जिल्हा बेळगाव) येथे दक्षिण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना भेट दिली.

तेथील सभेला संबोधित करताना ते म्हणाले,
भगिनींनो आणि बंधुनो,
दक्षिण महाराष्ट्रात दौ-यावर येण्याचे बऱ्याच दिवसात घाटता घाटता आज तो योग आला. मी तुमच्या भागात आलो किंवा न आलो याबद्दल तुम्ही दिलगीर असता कामा नये. मी कुठेही असलो तरी आपल्या भोवतीचा आपल्या प्रश्नाचा आपणच कळकळीने विचार केला पाहिजे. कारण आपले प्रश्न स्वतःलाच अधिक तातडीने सोडवता येतात.

1885 साली काँग्रेस स्थापन झाली. पण आम्ही काँग्रेसच्या चळवळीपासून चार पावले दूरच राहिलो. कारण ही चळवळ आमच्यावर सामाजिक गुलामगिरी लादणाऱ्या ब्राह्मण वर्गाची होती. काँग्रेसची ही संघटना ब्राह्मणांचीच संघटना होती हे आम्हाला कळून चुकले होते. पेशवाईतील ब्राह्मणांची नीती आम्हाला चांगलीच ज्ञात आहे. पगड्या पाहून निवाडा करणाऱ्या या समाजसुधारकात आम्ही शिरलो असतो तर आम्हाला यांनी ओसरीच दिली असती. दिवाणखान्यात शिरता आले नसते. काँग्रेसला स्वराज्य हवे होते ते ब्रिटिश आमदानीत हरवलेले आपले स्वत्व टिकविण्यासाठी! पण मराठेसुद्धा त्यावेळी काँग्रेसच्या चळवळीत नव्हते. काँग्रेस ब्राह्मणांची होती तेव्हा त्याकाळचे मराठा पुढारी घाबरले होते. आमचे कसे होईल अशी त्यांना भीती होती. त्यांनी एक परिषद बोलावून आपल्या मराठा वर्गाला राखीव जागा द्याव्यात अशी मागणी केली. त्याप्रमाणे त्यांना सात जागा राखीव मिळाल्या. त्यांनी सर्व ब्राह्मणेतरांची एक संघटना केली. पुढे हे सर्व ब्राह्मणेतर आपणाला सोडून काँग्रेसमध्ये शिरले. कारण गांधीजीनी ही मूस फोडून टाकिली व मराठा पुढाऱ्यांना आमिषे दाखविली. त्या आमिषांना भाळून ते काँग्रेसमध्ये शिरले.

त्याचप्रमाणे आमच्यातले चांभार बंधु आपला फायदा करण्याकरिता काँग्रेसमध्ये शिरले. स्वराज्यामध्ये आपल्याला एकंदर 27 राखीव जागा मुंबई राज्याकरिता मिळालेल्या आहेत. त्यात 25 काँग्रेसी चांभार निवडून आले. त्यांनी आतापर्यंत एक प्रश्नसुद्धा अस्पृश्यांविषयी लोकसभेमध्ये किंवा असेंब्लीमध्ये विचारला नाही.

एका सिंहीणीला दोन पिल्ले झाली. त्यांना सोडून ती सिंहीण रानात भटकण्याकरिता गेली. तिला जवळ दोन कोल्ह्यांची पिल्ले दिसली. तिने ती पिल्ले उचलून आपल्या पिल्लात आणली. त्या पिल्लांना ती आपल्या पिल्लाबरोबर दूध पाजीत असे. ती सर्व पिल्ले मोठी झाल्यावर एकदा कडेला उभी होती. तिकडून एक हत्ती मान डोलवीत चालला होता. तो जवळ येताच कोल्याची पिल्ले घाबरून पळून गेली. तेव्हा सिंहीणीच्या पिल्लांना संशय आला. त्यांनी हा प्रश्न आईला विचारला. संशयास बाध येऊ नये म्हणून त्या कोल्हयाच्या पिल्लांना तिने नेऊन सोडून दिले.

ही गोष्ट सांगण्याचा मतलब एवढाच की, आपण गेल्या निवडणुकीत पराभूत झालो नाही. आपल्या लोकांनी स्वतः पायी येऊन मतदान केले. मी असे आव्हान देतो की, ज्यांना असे वाटते की आमच्या लोकांनी आम्हाला मते दिली नाहीत त्यांनी हे खरे करून दिले. ते खरे ठरले तर मी राजकारणातून बाहेर निघून जाईन.

आता आपण एकटे राहिलो. आपण अल्पसंख्यांक लोक आहोत. आपण ताकदीप्रमाणे पराक्रम करीत आलोत. दुसऱ्याशी हात मिळवणी झाली तर आपण राज्य मिळवू. पण निराश होण्याचे कारण नाही. आजचे कॉंग्रेस सरकार, ब्राह्मण व मराठे एक तोबरा, दोन माना ह्याप्रमाणे चालले आहे. चणा कोण खातो हे पाहावयाचे आहे. मराठ्यांचा घोडा नवीन आहे. पण दुसऱ्या वेळेस मराठे सर्वच चणे खातील पुढे ब्राह्मणांना काहीच उरणार नाही व ते परत आपणाकडे फिरतील. मराठ्यांना नळी मिळाली. आमचा घुडसा आहेच; ही काही आपुलकीची भावना नाही. ह्याच्यामुळे पेशवाई येईल. आमचे सरकार घटनेप्रमाणे दिलेल्या सवलती काढून घेणार आहे. पं. नेहरूने नागपूरच्या ‘हरिजन परिषदेमध्ये भाषण केले. त्यात अस्पृश्याना आता सवलतीची काही गरज नाही, त्यांची सुधारणा झाली आहे, असे म्हटले. मला वाटते ह्या नेहरूला ठाण्याच्या वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ठेवण्यासारखे आहे. ज्यांना आपल्या देशातील लोकांची परिस्थिती माहीत नाही त्याला पंतप्रधान निवडावे हे देशाचे दुदैव होय. याप्रमाणे आपल्याला मिळालेल्या सवलती काढून घेण्यात येत आहेत.

ह्या आमच्या पंतप्रधानांना दक्षिण आफ्रिकेचा प्रश्न डोळ्यासमोर दिसतो. भारतात प्रत्येक खेड्यात दक्षिण आफ्रिका आहे. दक्षिण आफ्रिकेचा प्रश्न वर्णभेदाचा आहे. त्यांच्याकरिता तेथील ब्रिटिश लोक हिरीरीने भाग घेत आहेत. पण हे आमच्या प्रश्नाला मात्र कलाटणी देण्यास तयार होतात. तेव्हा ह्या पंतप्रधानांना शहाणा म्हणावे की वेडा म्हणावे हा आमच्यापुढे प्रश्न आहे. पेशव्यांचे सरदार बापू गोखले यांनी मुसलमानांवर स्वारी केली. त्यात सिदनाक महार सरदार होता. त्याचा तंबू पेशव्यांच्या जवळ असे. त्याचा तंबू ठोकीत असताना पेशव्यांच्या लोकानी अडथळा केला. बातमी त्यांना कळली. त्यावेळेस दरबार भरला होता. सिदनाक महाराने आपली तलवार खाली ठेवली व जाण्यास निघाला. तेव्हा हंबीरराव मोहिते ताडकन उठला आणि म्हणाला, “ही लग्नाची पंगत नाही, वीरांची पंगत आहे. येथे कोणताच भेदभाव नाही”. यामुळे आम्हाला राजकारणात वरचा वाटा पाहिजे. मी जर आजपर्यंत काँग्रेसमध्ये असतो तर नेहरू पंतप्रधान झाला असता काय ? मुळीच नाही. मी झालो असतो.

आमच्या फेडरेशनमध्ये बरेच बाजारबुणगे जमा झाले आहेत. ज्यांना फेडरेशन सोडावयाची असेल त्यांनी आताच तिथून चालते व्हावे. त्यांना तीत जागा नाही. दोन दगडावर पाय ठेवू नये. फेडरशेनचे झाड लवकर फळ देणार नाही. त्याला फळे उशिरा येणार आहेत, पण ती चिरकाल टिकणारी आहेत. जे झाड लवकर येते व फळ लवकर लागतात ते झाड लवकर लयास जाते. असले झाड आमच्या उपयोगाचे नाही. तेव्हा ज्यांना लवकर फळ पाहिजेत त्यांनी तिकडे जावे.

आमच्या लोकांनी आजपर्यंत हालअपेष्टा सहन केल्या. त्यांच्याकरिता मला काहीतरी करावयाचे आहे. त्यांना मला वाऱ्यावर सोडून द्यावयाचे नाही. आमच्या कार्यकर्त्यांना आरामखुर्चीचे राजकारण करावयाचे नाही. पुढे पुढे लोखंडाचे चणे खावे लागतील. तेव्हा ज्यांना हे पचणार नाही त्यांनी निमूट निघून जावे. मला फेडरेशनमध्ये थोडे लोक असलेले चालतील. ज्यावेळेस मी चळवळ सुरू केली त्यावेळेस मी, अध्यक्ष आणि टेबल एवढेच होतो त्याच्यावरून मी हताश झालो नाही. जरी या निवडणुकीमध्ये आपला पराजय झाला. तरी आपण निराश होता कामा नये. आपली चळवळ जिवंत ठेवा. वेळ आल्यास मी तुम्हाला हाक मारीन आणि तुम्ही हाकेला ओ द्या.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password