Categories

Most Viewed

25 डिसेंबर 1952 भाषण 2

लोकात तेज व जागृती उत्पन्न होईल असे राजकारण हवे.

दिनांक 25 डिसेंबर 1952 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोल्हापूर येथील नगरपालिकेला भेट दिली. सुरवातीस नगराध्यक्ष श्री. भाऊसाहेब पाटील यांनी प्रास्ताविक भाषण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याविषयी धन्योद्गार काढले आणि नगरपालिकेची माहिती दिली.

त्याप्रसंगी बोलताना डॉ. आंबेडकर म्हणाले,
भयभीताचे राजकारण आज चालणार नाही. आपल्याला जे पटते, ते उघडपणे मांडले पाहिजे, त्यात सोंग वा ढोंग किंवा लपवाछपवी नको. ज्या राजकारणामुळे लोकात तेज व जागृती उत्पन्न होईल असे राजकारण हवे. कोल्हापूरच्या जनतेत अग्नी आहे पण तो वारंवार फुलवला पाहिजे. नाहीतर अग्नी आहे त्याच स्थितीत राहिल्यास राख होऊन तो खलास होईल. तसेच तुम्हाला ज्या मार्गानी जायचे त्या मार्गाने निधडेपणाने जावे. सरकारच्या कायद्याची वा तुरुंगाची भीती बाळगू नका. तुरूंगात घातले तर त्यात वाईटही वाटून घेण्याचे कारण नाही. जो प्रतिबंधक स्थानबद्धतेचा कायदा मी केला आहे, त्याखाली हे सरकार उद्या मलादेखील अडकवून ठेवील. पण त्याची खंत बाळगण्याचे कारण नाही. कारण राजकारण हा क्रिकेटचा खेळ आहे. त्यात पराभूत झालेला जिंकणारच नाही कशावरून ? पण पराभूत झालेल्याने निराश होऊन सामना गुंडाळून बसता कामा नये.

आज वरच्या वर्गातील लोकांच्या हाती सत्ता आलेली असून ते अशा भ्रमात आहेत की, इंग्रज गेले. आता राज्यकर्ते आम्हीच. पण ते ज्या खुर्चीवर डौलाने बसू इच्छितात त्या खुर्चीचे पाय कापल्याशिवाय खालचा समाज केव्हाही राहाणार नाही. वरच्या वर्गीयांना खालच्या वर्गीयांचे राज्य यायला नको आहे पण ते आल्याशिवाय राहाणार नाही. त्यासाठी रशिया, फ्रान्स देशाप्रमाणे क्रांतीही होईल.

सदर कार्यक्रमाच्या आधी कोल्हापूर जिल्हा शेड्युल्ड कास्टस फेडरेशनतर्फे म्यु. च्या सभागृहात डॉ. आंबेडकरांना थाटाचा अल्पोपहार देण्यात आला. त्यावेळी शहरातील अनेक प्रमुख नागरिक, स्त्री-पुरुष हजर होते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password