Categories

Most Viewed

25 डिसेंबर 1945 भाषण

अस्पृश्य समाजाने निवडणुकीत फार जागरुक राहिले पाहिजे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रविवार दिनांक 23 डिसेंबर 1945 रोजी दुपारी 1.30 वाजता मुंबईहून मद्रास एक्स्प्रेस ने मद्रास प्रांताच्या दौऱ्यावर गेले. दुसरे दिवशी सायंकाळी मद्रास स्टेशनवर पोहचले. डॉ. बाबासाहेबांचे समवेत श्री. पी. एन. राजभोज, जनरल सेक्रेटरी, ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन, हेही होते. मद्रास स्टेशनात हजारो अस्पृश्य बंधुनी डॉ. बाबासाहेबांचे हर्षोत्फुल्ल अंतःकरणानी अपूर्व स्वागत केले. मद्रास कार्पोरेशनचे मेयर व ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनचे अध्यक्ष रा. ब. एन. शिवराज यांनी मद्रास प्रांतातर्फे डॉ. बाबासाहेबांचा सत्कार केला. समता सैनिक दलाच्या शेकडो सैनिकांनी डॉ. बाबासाहेबांस ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला. आंबेडकर जयघोषांनी, सर्व वातावरण दुमदुमून गेले. ‘पूना कराराचा धिक्कार असो’ अशा घोषणा पुकारण्यात आल्या. डॉ. बाबासाहेबांच्या आगमनाने मद्रास प्रांतात नवचैतन्य निर्माण झाले.

तारीख 25 डिसेंबर 1945 रोजी मद्रास येथे अस्पृश्य वर्गाच्या विराट सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे “येत्या निवडणुकी व अस्पृश्य समाजाचे कर्तव्य” या विषयी मननीय व उद्बोधक भाषण झाले. आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब म्हणाले,

लवकरच होणाऱ्या प्रांतीय निवडणुकी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण यावेळी जे निवडून येतील त्यांच्या हातात हिंदुस्थानची भावी राज्यघटना बनविण्याचा अधिकार जाणार आहे. त्यासाठी अस्पृश्य समाजाने या निवडणुकीत फार जागरूक राहिले पाहिजे. कुणाच्या व कसल्याही प्रचाराला व आमिषांना बळी न पडता आपले खरोखरीचे हित पाहतील असेच प्रतिनिधी निवडून देणे हे अस्पृश्यांचे आजचे कर्तव्य आहे. ब्रिटिश हिंदुस्थानात आपला समाज सहा कोटीवर असून गेली दोन हजार वर्षे इतरांनी आपणास सर्व प्रकारे वाईट अवस्थेत ठेवलेले आहे. शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन ही आपली एकमेव संस्थाच आपणास या गर्तेतून वर काढू शकेल. घोषणांनी भुलून जाऊ नका. काँग्रेस म्हणजे स्वराज्य या फसव्या स्वराज्य असले तरी त्यात आम्हा अस्पृश्यांना किती भाग मिळेल हाच मुख्य प्रश्न आहे.

काँग्रेसचा निवडणुकीचा जाहीरनामा म्हणजे शुद्ध थोतांड आहे, ढोंग आहे. या जाहीरनाम्यात काँग्रेसने कामगारांना व शेतकऱ्यांना कोणते फायदे मिळवून देण्याचा विचार केला आहे त्याची जंत्री दिली आहे. परंतु त्यामध्ये अस्पृश्यांचे हक्कांचा नामनिर्देश सुद्धा नाही.

काँग्रेसकडून एकच गोष्ट शिकण्यासारखी आहे व ती म्हणजे त्यांच्या पक्षाची शिस्त. आपण सर्व जण पोलादी शिस्तीत शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनच्या झेंड्याखाली उभे राहाल तर आपली उन्नती निश्चित होईल.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password