Categories

Most Viewed

23 डिसेंबर 1951 भाषण

निवडणुका निःपक्षपाती होण्याची गरज.

रविवार दिनांक 23 डिसेंबर 1951 रोजी समाजवादी पक्ष व शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन यांच्या वतीने मुंबई येथील चौपाटीवर सभा आयोजित करण्यात आली. या सभेत पाच लाखापेक्षा जास्त स्त्री-पुरुषांचा विराट समुदाय हजर होता. या सभेस उद्देशून डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,

निवडणूक विषयीचा कायदा पास झाल्यावर शुद्ध स्वतंत्र व पद्धतशीर निवडणुका होण्यासाठी वर्ष दोन वर्षाचा अवधी हवा होता. निवडणुक बाबतचा कायदा मंजूर झाल्यावर एकदोन वर्षात निवडणुका केल्या असत्या तर काँग्रेसखेरीज इतर पक्षांना एक प्रबळ कांग्रेसविरोधी पक्ष संघटित करण्यास अवसर मिळाला असता.

1946 पासून काँग्रेसपाशी अनियंत्रित सत्ता असतानाही काँग्रेस सरकार लोकाचे कोणत्याही प्रकारचे कल्याण का करू शकले नाही या माझ्या सवालाचे नेहरूनी उत्तर द्यावे. येत्या पाच वर्षात काँग्रेस काय करणार याचेही उत्तर त्यांनी द्यावे. नेहरूच्या भाषणात याचे उत्तर मिळत नाही. त्यात नुसता शिवराळपणा असतो, विधायक दृष्टी नसते!

तुरुंगात जाऊन अगर लढा करून काँग्रेसने स्वातंत्र्य मिळवले हा भ्रमाचा भोपळा आहे. सुभाषचंद्र बोस हेच स्वातंत्र्य मिळविण्यास मुख्यतः कारणीभूत झाले. हिंदी सैन्याच्या निष्ठेवर ब्रिटिश सरकार आधारले होते. बोस यांनी त्या निष्ठेला पराकाष्ठेचा धक्का देऊन सैन्यात असंतोष फैलावला आणि आझाद हिंद सेना स्थापली, हे पाहून ब्रिटिशांनी काढता पाय घेतला.

कॉंग्रेसची 1942 ची चळवळ अयशस्वी ठरली. 1942 ची चळवळ मी कधी सुरु केलीच नव्हती असे गांधी म्हणाले होते याचा काँग्रेसवाल्यांना विसर पडला आहे. ही चळवळ फसली याचा एक पुरावा म्हणजे त्यानंतर गांधींनी वॅव्हेलची मुलाखत मागितली असता वॅव्हलने त्यांना स्पष्ट नकार दिला. 1921 पासून कोणत्याही व्हाइसरॉयने गांधींचा असा अपमान केला नसावा.

समाजवादी-शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन या समझोत्यावरील वृत्तपत्रांची टीका मी बारकाईने वाचली पण त्यात काही तथ्य सापडले नाही. या दोन पक्षांच्या जाहीरनाम्यात एकही दोष दाखवण्याची कोणाचीही छाती झाली नाही. काँग्रेसला यश मिळू नये म्हणून समाजवादी व शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन यांनी एकमेकांना सहाय्य करण्याचे ठरविले आहे. अर्थात काही प्रश्नाबाबत आमचे मतभेद आहेत. स्वतंत्र उमेदवार माझ्याकडे आले असते तर मी त्यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून पाठिंबा दिला असता. पण आता कोणीही स्वतंत्र उमेदवारांना मते देऊ नयेत.

समाजवादी-शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन येत्या फेब्रुवारीत मुंबई कार्पोरेशन काबीज करून मुंबई एक नवे शहर बनवतील असा विश्वास श्री. अशोक मेहता यांनी प्रथम बोलताना व्यक्त केला. नेहरू ही समाजवाद्यांच्या मार्गातील एक धोंड असल्याचे मत त्यांनी प्रगट केले. श्री. पुरुषोतम त्रिकमदास व कृष्णा हाथीसिंग यांचीही भाषणे झाली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password