Categories

Most Viewed

22 डिसेंबर 1948 भाषण

ज्यांना काम करण्याची आवड आहे त्यांना संधी द्या आपापसात भांडणे नकोत.

दिनांक 22 डिसेंबर 1948 रोजी मुंबईमधील आर. एम. भट हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सौ. माईसाहेब आंबेडकर यांना चहापान देण्याचा कार्यक्रम मुंबई प्रदेश शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनच्या वतीने घेण्यात आला. सदर प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले. ते म्हणाले,

सभाधिपती, बंधुनो आणि भगिनींनो,
मला वाटतं, मला नक्की आठवत नाही. 1946 मध्ये जे इलेक्शन झाले तेव्हा येथेच आपली एक सभा भरली होती. त्यावेळी मी हजर होतो. आज मी येथे तुमच्यापुढे हजर असल्याने त्यावेळच्या सभेची सहजगत्या आठवण होते. 1946 च्या इलेक्शनमध्ये आपण आणि आपल्या पक्षाने अपयशाचा बराच मोठा वाटा उचलला होता असे म्हटले पाहिजे. आपण इलेक्शनमध्ये हरलो म्हणून खंत वाटण्याचे काही कारण नाही. पराभवाबद्दल मला विशेष दुःख कधी होत नाही. क्रिकेटच्या सामन्यामध्ये कधी एका संघाचा पराभव होतो. कधी दुसऱ्या संघाचा पराभव होतो. अपयशी ठरणारा संघ पुढे यश मिळवू शकतो. तद्वत यश मिळविणारा संघ अपयशीही ठरण्याचा संभव असतो. इलेक्शनमधील यशापयशाचे असेच आहे. तेव्हा गेल्या इलेक्शनमध्ये काँग्रेसने आपला केवळ पराभवच केला असता तर त्याबद्दल विशेष काही मानण्यासारखे नव्हते. परंतु त्या प्रसंगी काँग्रेसच्या लोकांनी आपल्यावर जो जोर जुलूम व केला तसा अत्याचार हिंदुस्थानात इतरत्र क्वचितच झाला असेल. नायगावच्या 17 नंबरच्या चाळीतील लोकांवर केवढा प्रसंग ओढवला होता. बाया माणसांना बाहेर पडणे देखील अत्यंत कठीण होते. मुष्कीलीचे होते. नायगावात मसाला कुटण्याचे एक दुकान आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या एका अस्पृश्य बाईला स्पृश्य गुंडांनी पळवून नेली. तिच्यावर बलात्कार केला आणि तिचे वस्त्र फेडून घेऊन तिला नग्नावस्थेत सोडून दिले. असा हा अमानुष अत्याचार होता.

हिंदुच्या विरुद्ध झगडण्यात शहाणपणा आहे काय? अशी शंका पुष्कळांना त्यावेळी आली होती. तुमच्यापैकी पुष्कळांना तर वाटत होते. दरेकाला मोठी विवंचना पडली होती. डॉ. आंबेडकरांना पाठिंबा देणे कितपत योग्य आहे, असे म्हणण्यापर्यंत अनेकांची मजल गेली होती. तुमच्यापैकी बरेचजण हताश झाले होते. मी सुद्धा विवंचनेत पडलो होतो. माझे पण धैर्य खचल्यासारखे झाले होते. पण आपली आजची मनोभूमिका व धैर्य यांची तुलना त्यावेळच्या मनोभूमिकेशी व धैर्याशी केली तर काय दिसून येते ? 1946 च्या अत्यंत बिकट प्रसंगातून आपण निभावून निघालो ही काही लहान सहान गोष्ट नव्हे. आता आपणास धैर्य आलेले आहे. ‘तुम्ही काय करणार? असे विचारल्यास तुमच्यापैकी प्रत्येकजण खात्रीने म्हणेल, “आम्ही आपला पक्ष सोडणार नाही.” (टाळ्या) एवढे धैर्य आपल्यात आलेले आहे.

मला पुष्कळ लोक विचारतात तुम्ही भाषणे का करीत नाही ? संदेश का देत नाही ? मी भाषणे करीत नाही व संदेश देत नाही याचा अर्थ असा नव्हे की, मला तुमच्याबद्दल काही काळजी वाटत नाही. कळकळ नाही. अगर तुमचे भले व्हावे असे भी इच्छित नाही, प्रसंग ओळखून काम करणे भाग आहे. शत्रु कोण ? मित्र कोण ? अशा प्रसंगी काय केले पाहिजे ? या अशा सर्व गोष्टींची चाचपणी करणे भाग आहे. अशा परिस्थितीत स्तब्ध बसून विचार करणे याशिवाय गत्यंतर नव्हे.

गेल्या इलेक्शनमध्ये आपला पराभव झाला. पण लगेच एक वर्षाने झालेल्या म्युनिसीपल निवडणुकीत आपणास जय मिळाला आहे. आपण 8 ते 10 जागा मिळवू शकलो. आपल्या उमेदवारांनी मिळविलेली मते इतकी प्रचंड होती की, तेवढी मते होण्यासाठी काँग्रेसच्या तीन-तीन चार-चार उमेदवारांच्या मतांची बेरीज करावयास हवी. तेव्हा आपण कोणास भिण्याचे कारण नाही. आपले संख्याबल मोठे आहे. आपण संघटित झालो, आपली मते आपण विकली नाहीत, आपल्या मताचा दुरुपयोग केला नाही. जर ती योग्य कारणालाच वापरलीत तर आपणाला कोणाचेच डर बाळगण्याचे कारण नाही.

येत्या निवडणुकीमध्ये काय करावयाचे याचा विचार आज करण्याचे काही प्रयोजन नाही. निवडणुकीच्यावेळी कोणते पक्ष उभे राहातात हे पाहिले पाहिजे. आपण अल्पसंख्यांक आहोत. कोणा न कोणा पक्षाशी सहकार्य केल्याशिवाय आपले भागणार नाही. कोणाशी सहकार्य करावयाचे ते दरेक पक्षाचा कार्यक्रम पाहून ठरवावे लागेल. संगनमत करावयाचे जरी झाले तरी आपला पक्ष मोडून सामील होता कामा नये. आपला पक्ष कायम ठेऊनच इतर पक्षांशी संगनमत करण्याचे धोरण आपण ठेवले पाहिजे.

जशी ब्राह्मणेतर पक्षाची गत झाली तशी आपली गत होऊ नये म्हणून हा इषारा देणे अवश्य आहे. होती ती संघटना मोडून ब्राह्मणेतर पक्ष काँग्रेसमध्ये गेला. आता काँग्रेस सोडून बाहेर आले. बाहेर येऊन पुनः स्वतंत्र संघटन करू लागले. दुसऱ्याच्या घरात शिरावयाचे, आतून बाहेर पडावयाचे आणि पुनः मोडलेले घर बांधावयाचे अशा नागमोडी धोरणाचा अवलंब आपण करता कामा नये.

मी असे ऐकतो की, आपल्या फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका होणार आहेत. ठीक आहे. इलेक्शनचे मला कधीच वावडे नाही. एकाच माणसाने सतत, त्याच जागेवर रहाणं बरं नाही. इलेक्शन करा, पण गुण्यागोविंदाने करा. भेदभाव वाढवू नका. ज्यांना काम करण्याची आवड आहे त्यांना अवश्य संधी द्यावी या मताचा मी आहे. मात्र आपापसात भांडणे नकोत. भांडणे होणार असतील तर इलेक्शन नको असे मला वाटते.

दुसरी गोष्ट मी अशी ऐकतो की, म्युनिसीपालिटी मधील आपले कॉर्पोरेटर्स काही कामे करीत नाही. मला असही कुणीतरी सांगितले की, आपल्या पक्षाचा नेमलेला ( पार्टी) म्होरक्या हाही काम करीत नाही. म्होरक्या जर काम करीत नसेल तर त्याचे तुम्ही ऐका असे मी कधीच सांगणार नाही. तुम्ही स्वतंत्र आहात. जो काम करीत नाही असे तुम्हास वाटते त्यास झुगारून देण्याची तुम्हास मुभा आहे. तुम्ही कोणाची तरी गुलामगिरी पत्करावी असे मी कधीच सांगणार नाही.

मी असेही ऐकतो की, आपल्या कॉर्पोरेटर्सनी कोणकोणती कामे करावीत हे सांगण्यासाठी एक अँडव्हायझरी बोर्ड नेमण्यात आले आहे. ती कल्पना मला मुळीच पसंत नाही. सल्ला देणारे लोक काही मोठे विद्वान आहेत किंवा अनुभवी आहेत असे म्हणता येणार नाही. उगाच वाद वाढेल.

यावर उपाय म्हणून फेडरेशनच्या कार्यकर्त्यांची मिटींग आपल्या कॉर्पोरेटर्सनी दरेक पंधरवाड्यात अगर महिन्यास घ्यावी. कॉर्पोरेटर्सनी आपल्या कामाचा रिपोर्ट द्यावा. कॉर्पोरेशनमध्ये काय काम केले. तिच्या मिटींगांना हजर होतो की नाही, हजर होतो तर झोपलो होतो की ऐकत होतो वगैरे गोष्टींचा रिपोर्ट कॉर्पोरेटर्सनी फेडरेशनच्या मिटींगमध्ये द्यावा. फेडरेशनच्या कार्यकत्यांनी “हा ठराव मांडावा तो ठराव मांडावा” असे सांगावे.

आता मी जास्त बोलत नाही. इलेक्शन लवकरच येईल. पुढल्या वर्षात देशभर इलेक्शन्स होतील त्याची सिद्धता करा. एवढेच सांगून मी आपली रजा घेतो.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password