मराठवाड्याच्या प्रगतीसाठी स्वतंत्र मराठवाडा हेच उचित.
मिलिंद महाविद्यालय औरंगाबादच्या वार्षिकोत्सव प्रसंगी अध्यक्ष या नात्याने दिनांक 21 डिसेंबर 1955 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषण दिले. ते आपल्या भाषणात म्हणाले,
भगिनींनो आणि बंधुनो,
मुंबई शहराच्या औद्योगिक क्षेत्रातील बहुसंख्य कामगार व बहुतेक सर्व कचेऱ्यातील नोकरवर्ग हा महाराष्ट्रीय आहे. तो शहराच्या वाढीसाठी सतत मेहनत करीत आहे.
गिरण्यात कामगार म्हणून काम करणाऱ्यात व कचेऱ्यात काम करणाऱ्यात पारशी लोकांची संख्या अतिशय थोडी आहे. महाराष्ट्रीयन शिवाय मुंबई शहराची वाढ होणार नाही असे माझे ठाम मत आहे.
पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र व पूर्व महाराष्ट्र अशी माझी त्रिगट राज्याची कल्पना असून या राज्यांची राजधानी अनुक्रमे मुंबई, औरंगाबाद व नागपूर अशी राहील. पूर्व महाराष्ट्र हा राज्य पुनर्रचना मंडळाने सुचविलेला विदर्भाचा भाग राहाणार आहे. त्यात नागपूर, भंडारा, वर्धा, यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलढाणा, चांदा जिल्हा यांचा समावेश होईल. मध्य महाराष्ट्रात मराठवाड्यातील पाच जिल्हे औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, उस्मानाबाद व नाशिक, डांग, अहमदनगर, पूर्व व पश्चिम खानदेश व सोलापूर जिल्ह्यातील कर्नाटकाला जोडलेला मराठी विभाग यांचा समावेश होईल. बाकीचा भाग पश्चिम महाराष्ट्रात जाईल. त्यात ठाणे, कुलाबा, रत्नागिरी, पुणे, उत्तर भाग आणि दक्षिण सातारा, कोल्हापूर, बेळगाव आणि कारवार या जिल्ह्यांना अंतर्भूत करण्यात यावे.
आर्थिक व सांस्कृतिक दृष्ट्या हे तीन भाग कार्यक्षम राहातील. या योजनेमुळे त्या त्या भागातील लोकांच्या आकांक्षाही पूर्ण केल्या जातील.
माझ्या दृष्टीने अखंड संयुक्त महाराष्ट्राची मागणी अयोग्य आहे. कारण संयुक्त महाराष्ट्रात मराठवाड्यासारख्या जिल्ह्यातील मागासलेल्या लोकांची प्रगती होऊ शकणार नाही. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्रामध्ये गोंधळ निर्माण होण्याचा संभव आहे. तेव्हा या मागासलेल्या मराठवाड्याची प्रगती व्हावी अशी जर इच्छा असेल तर त्यांना स्वतंत्र मराठवाडा करून देणे हेच उचित होय. माझ्या त्रिगट योजनेप्रमाणे महाराष्ट्राची तीन राज्ये करण्यात आली तर राज्यकारभाराच्या दृष्टीने ती कार्यक्षम ठरतील आणि जनतेला आपली उन्नती करून घेण्यास संधी मिळेल.
शैक्षणिक दृष्ट्या मराठवाडा मागासलेला असल्यामुळे मराठवाड्यासाठी स्वतंत्र विद्यापीठाची अत्यंत आवश्यकता आहे.