Categories

Most Viewed

21 डिसेंबर 1951 भाषण

अल्पसंख्य जमातींचे मूलभूत हक्क शाबीत राहिले पाहिजे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शुक्रवार तारीख 21 डिसेंबर 1951 रोजी मुंबईतील महमद अली रोडवर बेग महमद बाग येथे मुसलमान बंधुच्या प्रचंड प्रचार सभेत भाषण केले. ते म्हणाले,

माझ्याकडे साथी हॅरीस आणि इतर काही मुसलमान बंधु आले आणि म्हणाले की, आपण मुसलमान बंधूना चार उपदेशाच्या गोष्टी सांगा. ते काँग्रेसकडे झुकले आहेत. काँग्रेसने आपणावर उपकार केले असे त्यांना वाटत आहे.

मला या गोष्टीचे आश्चर्य वाटले नव्हे तर चीड आली. म्हणूनच देशातील खरी परिस्थिती मुसलमान बंधुंना सांगावी म्हणून येथे मी आलो आहे.

काँग्रेसने मुसलमानांसाठी काय केले आहे ? तुम्हाला वाटेल की 1947 च्या दंगलीमध्ये काँग्रेसने तुमचे प्राण वाचविले. पण ही तुमची समजूत साफ चुकीची आहे. उलट ह्या काँग्रेसवाल्यांनी तुम्हाला आश्रय न देता गुंडांना प्रोत्साहन देऊनच ही दंगल वाढविली. तुम्हाला भयमीत केले. ते इतके की काँग्रेसशिवाय दुसरा कोणी या देशात तुमचा आता वाली राहिला नाही!

यावरून तुम्ही जी कृतज्ञता काँग्रेसला दाखवित आहात तिला कॉंग्रेसची पात्रता आहे काय ? पंडित नेहरूबद्दल तुम्ही भलतीच अपेक्षा करून गोडवे गात आहात. पस्तावाल या पंडितजीचे धोरण घरसोडीचे आहे. त्यामुळे तुम्ही अखेर लोकशाहीच्या राज्यात नेहरू घराण्याची प्रधानकी परंपरा आपणास सुरू ठेवायची नाही. एवढेच नव्हे तर आपणासारख्या अंधश्रद्धाळू लोकांचा फायदा घेऊन ती टिकविण्याचा प्रयत्न कुणी केला तरी जागृत समाज अशी परंपरा चालू देणार नाही.

काँग्रेस ही पुढच्या निवडणुकीत हमखास निवडून येत नाही. ती आता शेवटचा श्वास घेत आहे. आपल्या देशातील इतर जमाती जशा राजकीय हक्कांसाठी जागृत झाल्या आहेत. तसेच तुम्हीपण पूर्वीचा जोम कायम ठेवून राजकीय हक्क मिळविण्यासाठी झगडले पाहिजे.

घटना तयार करताना काँग्रेसने अल्पसंख्यांकांच्या राजकीय भवितव्याचा विचार करण्यासाठी नेमलेल्या समितीची सभा ज्या दिवशी होती त्याच्या आदल्या दिवशी मी काँग्रेसचे प्यादे मौलाना आझाद यांना भेटलो. त्यांना अल्पसंख्यांकांच्या सर्व प्रश्नांची व भवितव्याची इत्थंभूत कल्पना करून दिली. पण हे मौलाना दुसऱ्या दिवशी सभेत हजर न राहता निघून गेले. मुसलमान बंधु तद्वत इतर अल्पसंख्यांकांचा प्रश्न माझ्याशिवाय तिथे कुणी मांडू शकला नाही. मी आपल्या वतीने एकटाच असल्यामुळे पंडित नेहरूंनी मुसलमानांना राखीव जागा देण्याच्या सूचनेला काँग्रेसच्या वतीने विरोध केला. त्यामुळे आपण राजकीय हक्कांना मुकले आहोत.

सर्वधर्मीय समानतेचे सरकार आहे. असे जे काँग्रेस म्हणते ती एक निव्वळ त्याची थाप आहे. कारण आपल्या घटनेमध्ये अशी तरतूद मी करून ठेवली आहे की, कोणत्याही जातीवर धर्मावर व रूढीवर कुणाचेही वर्चस्व असता कामा नये. त्यांचे मूलभूत हक्क शाबीत राहिले पाहिजेत. असे असता काँग्रेसने मुसलमानांची संख्या लखनौ सारख्या ठिकाणी जास्त असतानाही आणि तेथे पन्नास मुसलमान उमेदवार सहज निवडून येणे शक्य असतानाही फक्त दहा बारा मुसलमान उमेदवारच उभे केले हे ध्यानात ठेवा.

यावरून या निवडणुकीत कोणाला मत द्यावयाचे ते ठरवा. मी तर म्हणतो की आपण सोशालिस्ट व दलित फेडरेशनला सहाय्य करावे व देशाचे भवितव्य सुधारावे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password