Categories

Most Viewed

12 डिसेंबर 1955 भाषण

विद्या, प्रज्ञा, करुणा, शील व मैत्री या पंचतत्त्वानुसार प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चारित्र्य बनविले पाहिजे.

औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयातील बोधि मंडळाच्या विद्यमाने दिनांक 12 डिसेंबर 1955 रोजी सभा भरविण्यात आली होती. या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या भाषणात प्रथम श्री. शंकरराव देव यांच्या दिनांक 7 डिसेंबर रोजी महाविद्यालयात झालेल्या व्याख्यानातील एका विधानाचा परामर्श घेतला. श्री शंकरराव देव यांनी आपल्या भाषणात म्हटले होते की, “महाविद्यालयाला केवळ ‘ मिलिंद हे नाव देऊन भागणार नाही, तर अक्रोधाने क्रोध जिंकणाऱ्या बौद्ध शिकवणुकीचाच पुरस्कार तिथे झाला तर मिलिंद हे नाव सार्थ होणार आहे. “

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे श्री. देवांच्या टीकेसंबंधी बोलताना म्हणाले,
मिलिंद हा एक ग्रीक होता. त्याला आपल्या विद्वतेबद्दल घमेंड होती की, ग्रीकासारखे विद्वान लोक जगाच्या पाठीवर कोठेही सापडावयाचे नाहीत, त्याने जगाला आव्हानही दिले होते. त्याला एकदा वाटले की आपण एखाद्या बौद्ध भिक्खुबरोबर वाद करावा. पण त्याच्याबरोबर वाद करण्यास कोणीही तयार झाला नाही. मिलिंद हा एक क्षुल्लकसा मनुष्य होता. तो काही तत्त्वज्ञानी नव्हता किंवा जाडा विद्वानही नव्हता. त्याला राज्यकारभार कसा चालवावा हेच माहीत होते. पण अशा मिलिंदाबरोबर वादविवाद करण्यास कोणीही तयार झाला नाही. महाप्रयासाने नागसेन भिक्खुला तयार केलं गेलं. मिलिंदाचं चॅलेंज आपण स्वीकारलं पाहिजे, असा त्याने निश्चय केला. मग त्यात यश येवो किंवा अपयश येवो.

नागसेन हा ब्राह्मण होता. घर सोडलं होतं. वयाच्या सातव्या वर्षी त्यानं आपल्या आईबापाचं अशा या नागसेनाने भिक्खु लोकांचा आग्रह मान्य केला. नंतर मिलिंद व नागसेन यांचा वादविवाद होऊन मिलिंदाचा पराजय झाला. त्या वादविवादाचं एक पुस्तक प्रसिद्ध झालं आहे. पाली भाषेत मिलिंद पन्ह असं नाव आहे. त्या पुस्तकाला या पुस्तकाचं मराठीत भाषांतर ‘मिलिंद प्रश्न’ असं आहे. या पुस्तकाचं शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी अवश्य वाचन करावं अशी माझी इच्छा आहे. त्यात शिक्षकांच्या अंगी कोणते गुण असावेत हे दिलेले आहे. म्हणून मी व माझ्या सोसायटीने ह्या कॉलेजला मिलिंद महाविद्यालय हे नाव दिलं व जागेला ‘नागसेन वन’ असे नाव दिलं. मिलिंद हरला व बौद्ध झाला, म्हणून मी हे नाव दिलेलं नाही. मी जे ह्या कॉलेजला नाव दिलेले आहे ते आदर्शभूत असंच आहे. असं माझं मत आहे.

शिक्षणसंस्थेला एखाद्या श्रीमंत व्यापाऱ्याने केवळ पैशाची देणगी दिली म्हणून त्याचे नाव देणे हे अत्यंत अनुचित आहे.

बौद्ध धर्माशी संलग्न झालेले मिलिंद हे नाव महाविद्यालयास देण्याचे दुसरे कारण असे की, विद्या ही अन्नासारखी सर्व मनुष्यास आवश्यक आहे. प्रत्येकाला तिचा लाभ झाला पाहिजे. हा उदार विचार पहिल्यांदा उद्घोषित केला असेल तर तो भगवान बुद्धानीच. तेव्हा ज्या असंख्य लोकांना कैक शतके अज्ञानात दडपून ठेवण्यात आले त्यांना सुविद्य बनविण्याचा प्रारंभ करताना बुद्धाचे अथवा त्याच्या शिष्याचे नाव आठवावे हे स्वाभाविकच आहे.

मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजात 2900 व या कॉलेजात 600 विद्यार्थी आहेत. मी या कॉलेजचा खूप भार सहन केला आहे.

श्री. शंकरराव देवांनी या कॉलेजला मिलिंद हे नाव दिल्याबद्दल आमच्या धम्मपदातील श्लोक तुम्हाला सांगितला आहे. तो असा: अक्रोधेन जेयत् क्रोधं !” मनुष्याने क्रोध हा अक्रोधाने जिंकावा, असं ते म्हणाले. कारण मी अतिशय क्रोधी आहे. हे जगाला चांगले परिचित आहे. श्री देव म्हणतात, माणसाने क्रोध गिळला पाहिजे. मला यावरून वाटते की देवांचं वाचन अपुरे आहे. त्यांनी चांगल वाचन केलेले दिसत नाही (टाळ्या). भगवान बुद्धानी राग (Anger) यावर व्याख्यान दिले आहे. ते जर देवांनी वाचलं असत तर त्यांनी असले उदगार काढले नसते. मनुष्य रागीट असला तर त्याच्यावर टीका करू नये. राग दोन प्रकारचे असतात. (1) द्वेषमूलक (2) प्रेममूलक.

जो कसाई असतो तो कु-हाड घेऊन जातो. त्यांचा राग हा द्वेषमूलक असतो. आईने आपल्या मुलाला चापट मारली तर तिला कोण काय म्हणेल ? तिचा राग असतो तो प्रेममूलक असतो. मुलाने सदाचारी व्हावे म्हणून आई मुलाला मारीत असते. माझा रागही प्रेममूलक आहे. तुम्ही समतेन वागावे म्हणून मी राजकारणात शिव्या देतो. माझ्यावर टीका करणाऱ्या लोकांची मी मुळीच पर्वा करणार नाही. (टाळ्या) मी सगळं केलं ते झगडा करून केले आहे.

पूर्वी फक्त ब्राह्मण जात विद्या घेत होती. आम्हाला विद्या शिकता आली नाही. आम्हाला विद्या शिकण्याची इच्छा होती पण ती आम्हाला ब्राह्मणांनी घेऊ दिली नाही. परंतु भगवान बुद्धाने हा दंडक मोडला.

एकदा भगवंतास लोहित नावाच्या ब्राह्मणाने प्रश्न विचारला की तू सगळ्यांना विद्या का शिकवितोस ? यावर भगवंताने त्याला सांगितले की, ज्याप्रमाणे मनुष्य प्राण्याला अन्नाची जरूरी आहे. त्याचप्रमाणे सर्वांना विद्येची जरूरी आहे. ही विचारसरणी प्रथम बुद्धानेच या भूतलावर सुरू केली. (टाळ्या) विद्या ही एक प्रकारची तलवार आहे. ही दुधारी असते. तिने दुष्टांचा संहारही करता येतो व दुष्टापासून आपले रक्षणही करता येते. म्हटलेच आहे की

स्वदेशे पूज्यते राजा ।
विद्वान सर्वत्र पूज्यते ॥

तुम्ही सर्वजण विद्या शिकण्यासाठी आला आहात: पण माझ्या मते केवळ विद्या पवित्र असू शकत नाही. विद्येबरोबर भगवान बुद्धानी सांगितलेली प्रज्ञा म्हणजे शहाणपणा, शील म्हणजे सदाचरणानं संपन्न असं आचरण, करुणा म्हणजे सर्व मानव जातीसंबंधी प्रेमभाव आणि मैत्री म्हणजे सर्व प्राणिमात्रांविषयीची आत्मियता, या चार पारमिता असल्या पाहिजेत. तरच विद्वत्तेचा काही उपयोग आहे. विद्येबरोबरच मानवाजवळ जर करूणा नसली तर तो कसाई आहे, असं मी समजतो. करूणा म्हणजे माणसामाणसावरचं प्रेम. ह्याच्यापुढेही मनुष्य गेला पाहिजे व त्याने मैत्री संपादन केली पाहिजे. ही विचारसरणी जर कोणी मांडली असेल तर ती भगवान बुद्धानीच होय, मी माझ्यासारखा विद्वान भारत वर्षात पाहू इच्छितो.

सर्व धर्मात श्रेष्ठ धर्म जर कोणता असेल तर तो भगवान बुद्धाचा बौद्ध धर्म होय. इतर धर्म निरर्थक आहेत. माझ्या धर्मात ईश्वराला मुळीच वाव नाही. कारण लोक सांगतात की, ईश्वराने सृष्टी निर्माण केली व त्याने नकारापासून साकार व साकारापासून नकार उत्पन्न केले. पण या जगात साकार वस्तु अगोदर होत्या व आहेत. ईश्वर असता तर त्याने इकडे डोळेझाक केलीच नसती. म्हणून ईश्वर आहे. ही कल्पनाच मुळी खोटी आहे. जर देव (परमेश्वर) असलाच तर आर्डिनरी जीवनात त्याचा उगीच खुंटा कशाला ? आत्म्यालाही स्थान नाही. बौद्धधर्माचा मूळ पाया दुःख दूर करणे हा माझ्या धर्मात आहे. तोच धर्म माझ्या मते सर्वश्रेष्ठ होय. इतर धर्म मनुष्य व ईश्वर यांच्या काल्पनिक संबंधावर भर देऊन आधारलेले आहेत.

जगात काही माणसे भित्री असतात. माणसाने एकटे जाण्याचे धैर्य केलं पाहिजे. एकटे जाण्याचे धैर्य मी करतो. (टाळ्या) हजारो लोक जरी माझ्या मागे नसले तरी मी त्याची पर्वा करीत नाही किंवा त्याची खंतही बाळगीत नाही.

एक डॉ. पिक्विक व त्याचे दोन चार भिडू होते. तो आपल्या भिडूंना म्हणाला की, मी तुम्हाला जत्रा दाखवितो. तो आपल्या भिडूसह एका गावात गेला. तेथे त्यांनी दोन तीन खोल्या राहाण्यासाठी घेतल्या. त्या गावात इलेक्शन होतं.
डॉ. पिक्विकच्या कंपनीतला सॅम वेलर नावाचा पोऱ्या त्याच्याजवळ त्याची सेवा करण्यासाठी ठेवण्यात आला होता. निवडणुकीची धामधूम ऐकल्यावर तो त्या खोलीतून बाहेर बघण्याचा प्रयत्न करू लागला. त्याने दरवाजा उघडण्यास व लावण्यास सुरवात केली. भित्र्या डॉ. पिक्विकने विचारले की, “What are you doing there ? (तू तिथे काय करतो आहेस ?) त्याने उत्तर दिले की There is a big crowd, Sir.” (सर, तिथे मोठा जमाव आहे.) सॅम वेलर बाहेर जाण्याची धडपड करू लागला. तेव्हा डॉक्टरने त्याला बजावलं की Go with bigger crowd and not with little one (मोठ्या जमावा सोबत जा, लहानासोबत जाऊ नकोस.) आणि पुनः असं सांगितलं की ” हा मोठा जमाव जिकडे जाईल तिकडे जा. अथवा त्याच्या मागे जा.” माझे मात्र तुम्हाला असे सांगणे आहे की, केवळ अशा प्रकारच्या जमावामागे तुम्ही जाऊ नका.

विद्या, प्रज्ञा, करुणा, शील व मैत्री या पंचतत्त्वानुसार मिलिंद महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चारित्र्य बनविले पाहिजे. या मार्गाने एकट्यानेच जावे लागले तरी मनोधैर्य व निष्ठा राखून गेले पाहिजे. महाजनो येन गतः सपन्थः ही पर प्रत्ययनेय बुद्धी सोडून विवेकाने, जो मार्ग आपणास योग्य वाटेल त्याच मार्गाने यापुढे गेले पाहिजे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password