भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात होते ह्यासंबंधी विद्यार्थ्यांनी सजग राहिले पाहिजे.
एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये सोमवार, दिनांक 15 डिसेंबर 1952 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण आयोजित करण्यात आले होते. ते आपल्या भाषणात म्हणाले.
या कॉलेजात मी जी चार वर्षे अध्ययन केले तो काळ मोठा गोड स्मृतींचा नाही. मी या कॉलेजातील पहिलाच अस्पृश्य विद्यार्थी होतो. माझे मन सवर्ण विद्यार्थ्यात मिसळायला धजत नव्हते. म्हणजे भीतीमुळे नव्हे, मलाच ते मिसळणे आवडत नव्हते. कारण माझा पोषाख इतरांसारखा झकपक नव्हता. त्यामुळे त्याच्यापासून दूर राहाणेच मला आवडत असे. आजकालच्या विद्यार्थ्यांसारखे माझे कॉलेज जीवन तेवढे उत्साही नव्हते याबद्दल मी कुणालाच दोष देत नाही. माझ्या शिक्षकांनी व विद्यालय चालकांनी मला ठीक वागवले. त्यावेळच्या विद्यार्थ्यात आणि आजच्या विद्यार्थ्यात जमीन अस्मानाचा फरक आहे.
आजचे विद्यार्थी ज्या विद्यापीठाचे शिक्षण घेतात त्याच्या कारभाराकडे मुळीच लक्ष घालीत नाहीत. विद्यार्थ्यांनी काय शिकावं हे विद्यापीठ ठरवित असले तरी आपल्या बौद्धिक विकासाला आपण शिकतो ते खरोखरच पोषक व आवश्यक आहे की नाही, हेही प्रत्येक विद्यार्थ्याने पाहिले पाहिजे. त्यांच्या भावी जीवनाची उभारणी याच ठिकाणी होत असते. तो राष्ट्राचा आदर्श नागरिक होणार की, त्याचे जीवित विफल होणार हेही शिक्षणक्रमच ठरविणार असल्यामुळे विद्यापीठाच्या प्रत्येक हालचालीवर विद्यार्थ्याचे कटाक्षाने लक्ष पाहिजे. पण आजचे विद्यार्थी त्यादृष्टीन अगदी बेपर्वा असतात.
उच्च विद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांची कॉलेजची चार वर्षे संपून जातात आणि विद्यापीठाच्या पदव्या घेऊन ते बाहेर पडतात. पण त्यांना प्लेटो, बेकन, नित्से, स्पिनोझा यासारख्या महाश्रेष्ठ तत्त्वज्ञानांच्या तत्त्वज्ञानासंबंधी अवाक्षरही माहिती नसते. ज्या तत्त्वज्ञानाने नव्या जगाची उभारणी केली किंबहुना आजचा नवमानव आपल्या प्रत्येक दैनंदिन जीवनात ज्या तत्त्वज्ञानावर जगत आहे त्या थोर तत्त्वज्ञानाची उपेक्षा आजच्या पदवीधरांकडून व्हावी यापेक्षा अति लाजिरवाणी गोष्ट कोणती ? याउलट आजची विद्यापीठे जेम्स आणि चार्लस यांचे तत्त्वज्ञान विद्यार्थ्याच्या माथी जबरीने लादत आहे. विद्यार्थ्यांनी या गोष्टी स्वतःच ओळखायला पाहिजेत. आपल्याला योग्य शिक्षण पाहिजे याची हाकाटी त्यांनी केली पाहिजे.
मानवी जीवनातील वैचारिक आणि नैतिक मूल्ये कधीच स्थिर राहिली नाहीत. ती कालमानाप्रमाणे प्रत्यही बदलत राहतात. नुसती बदलतातच नव्हे तर ती प्रगत होत जातात. भारतीय विद्यार्थ्यांनीही या नव्या नव्या निर्माण होणाऱ्या जीवनमूल्याची दखल घेतली पाहिजे. आपणही ती आचरणात आणण्यास सिद्ध राहिले पाहिजे. हे नवे तत्त्वज्ञान आपल्या विद्यादायी संस्था आपल्या शिक्षणक्रमात घालतात की नाही याकडेही पाहिले पाहिजे.
पण खेदाची गोष्ट ही की, आधुनिक विद्यार्थ्यांची बौद्धिक आणि वैचारिक पातळी रोडावत खाली चाललेली आहे. भूतकालातील मानवी प्रज्ञेशी तुलनाच होऊ शकत नाही. ही बौद्धिक पातळी का खाली घसरली ह्याचा विद्यार्थ्यांनी विचार करणे आवश्यक आहे. या परागतीचे कारण अगदी स्पष्ट आहे. आजचा विद्यार्थीवर्ग भूतकालीन प्रज्ञावंत आणि प्रतिभावंत यांच्या तत्त्वज्ञान व वाङ्मयकृतींचा अभ्यास मन लावून करीत नाही.
उलटपक्षी, आजचा विद्यार्थीवर्ग फुटबॉल, क्रिकेट आणि पोकळ राजकारणात दंग असतो. विद्यार्जन याला एक मोठा अर्थ असतो. आपली प्राचीन गुरुकुले एकांतात विद्या शिकवीत असत. रानावनातून ही विद्यापीठे प्रस्थापित झाली होती त्याचे मुख्य कारण असे की, त्यांना विद्येच्या अभ्यासाने नवी दृष्टी यावी, या दृष्टीतून त्यांनी खऱ्या जीवनमूल्यांचा शोध व बोध घ्यावा. पण आजचे विद्यार्थी क्रीडेच्या आणि राजकारणाच्या फंदात ती दिव्य दृष्टी प्राप्त करून घेतच नाही.
हिंदी विद्यालयातील शिक्षक मोठ्या कष्टाने, केवळ अंगिकारले आहे म्हणून विद्यादान करीत असतो. स्वयंप्रेरणेने हे विद्यादान होत नाही. शिक्षकाला लागणारी अंतःस्फूर्ती, विद्यादानाची हौस आणि त्यासाठी करावा लागणारा अव्याहत व्यासंग या सर्वांचीच त्यांच्याकडे वानवा असते. किंबहुना अध्यापक पेशाला जे नोकरीचे हिडीस स्वरूप आले आहे आणि तास भरून काढण्यासाठीच त्याला शिकवावे लागत असल्यामुळेच अध्यापक वर्गामध्ये हे शैथिल्य निर्माण झाले असावे ! त्यामुळे अध्यापकही विद्यार्थ्यांना विचारप्रवर्तक ज्ञान पाजण्यास असमर्थ झाले आहेत.
विद्यालयांनी आपल्या फी भरमसाठ वाढविल्या आहेत. या फी अशाच वाढू लागल्या तर विद्यार्थ्याच्या भावी जीवनावर त्यांचा निश्चितपणे अनिष्ट परिणाम होईल. त्यांचे भवितव्य भयाण होईल. केबन म्हणतो, knowledge is Power ज्ञान ही महान शक्ती आहे. विद्यार्थी वर्गाला जर या ज्ञानाची कास धरून आपल्या देशाचा विकास आणि उद्धार करून घ्यायचा असेल तर त्यांनी विद्यापीठाच्या कारभारात जरूर लक्ष घालून आपल्या हक्कांसाठी सतत झगडत राहिले पाहिजे.
विद्यापीठाचा कारभार हाकणारी सिनेटमध्ये बसलेली ही क्रियाशून्य जुनी धेंडे गेल्याशिवाय विद्यापीठाचा कारभार सुधारणार नाही. उलट या जुन्या धेंडांकडूनच विद्यापीठात उघड लाचलुचपतीचे प्रकार सुरू आहेत. सिनेटमधल्या सभासदाकडील शिक्षणसाहित्य किंवा शास्त्रीय उपकरणे खरेदी करणाच्या अटीवरच एखाद्या नव्या शाळेला किंवा कॉलेजला मान्यता मिळते. म्हणून विद्यार्थ्यांनीच विद्यापीठाचा कारभार जातीने पाहिला पाहिजे व आपले हित साधले पाहिजे.