Categories

Most Viewed

12 डिसेंबर 1945 भाषण

कम्युनिस्टांपासून सावध रहा.

डी. एल. पाटील, अध्यक्ष, एच. डी. आवळे, जनरल सेक्रेटरी आर. व्ही. कवाडे, सेक्रेटरी, सिताराम हाडके, कोषाध्यक्ष, ऑफीस मध्यप्रांत व-हाड शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन, अभ्यंकर रोड, सिताबर्डी, नागपूर यांनी पुढील पत्रक काढले होते.

नागपूरला तारीख 12 डिसेंबर 1945 रोजी सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जाहीर व्याख्यान होईल. आगामी निवडणुकीच्या संबंधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य जनतेला उद्देशून जाहीर दिव्य संदेश देणार आहेत.

हा दिव्य संदेश ऐकण्याकरिता अस्पृश्य बंधु-भगिनींनो ! हजारोनी लाखाच्या जमावात या सभेला हजर व्हा !

फेडरेशनच्या निवडणुकी लढविण्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना थैली अर्पण करण्यात येईल. या कार्याला सर्व बंधू-भगिनींनी व जिल्ह्या जिल्ह्यातील फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण सहाय्य द्यावे अशी विनंती आहे. त्याबरोबरच त्यांना सर्व लहान मोठ्या खेड्यापाड्यातून सभेला फार मोठ्या जमावात लोकांनी हजर राहाण्याकरिता प्रचार करावा.

सभेच्या कार्यक्रमाला तिकीटे ठेवली आहेत. जे फेडरेशनचे 1945-46 चे चार आण्याचे प्राथमिक सभासद होतील, त्यांनाच सभेच्या कार्यक्रमाची तिकीटे मिळतील. खुर्ची 1 ला वर्ग 3 रुपये, खुर्ची 2 रा वर्ग 2 रुपये प्रेक्षक 8 आणे, महिला 4 आणे तिकीटे फेडरेशनच्या ऑफिसमध्ये मिळतील.

याप्रमाणे नागपूर येथे तारीख 12 डिसेंबर 1945 रोजी भरलेल्या प्रचंड सभेत जवळ जवळ एक लाख लोक होते. त्यामध्ये स्त्रियाही बहुसंख्येने उपस्थित होत्या. आतापर्यंतच्या निवडणूक प्रचारार्थ झालेल्या सर्व सभांमध्ये ही सभा प्रचंड होती.

संध्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायपूरहून येथे आले. त्यावेळी त्यांचे स्वागतासाठी स्टेशनवर फार मोठा जनसमुदाय जमला होता. स्टेशनपासून कस्तुरचंद पार्कपर्यंत हजारो लोकांची दुतर्फा रांग लागली होती. त्याची व्यवस्थाही समता सैनिक दलाने चांगली राखली होती.

त्यांच्या ह्या दौ-यातील ही शेवटची सभा होती. येथे येण्यापूर्वी ते वऱ्हाड मध्ये अकोला व महाकौशल मध्ये रायपूर शहरी जाऊन आले.

भाषणाच्या सुरुवातीलाच डॉ. बाबासाहेबांनी सर्व पक्षांनाच स्वराज्य पाहिजे आहे असे सांगितले. ते म्हणाले,

मतभेद फक्त एकाच मुद्यावर आहे आणि तो म्हणजे ब्रिटिशांनी हिंदुस्थान सोडल्यावर येथे कोणी राज्य करावयाचे. या मुद्यावर काँग्रेसचे पुढारी सांगतात की, काँग्रेसखेरीज इतर पक्षांना स्वराज्य नको आहे. पण ही गोष्ट धादांत खोटी आहे.

मी आपणा सर्व दलित वर्गीयांच्या वतीने सर्वांना असे बजावित आहे की, यापुढे होणाऱ्या हिंदुस्थान सरकारमध्ये अस्पृश्यांना दुय्यम स्थान दिल्यास ते कधीही सहन केले जाणार नाही. आम्हाला आमचे राजकीय हक्क मिळालेच पाहिजेत आणि ते मिळविण्यासाठी लढण्याचा आम्ही निश्चय केला आहे.

गेल्या वीस वर्षात आमच्यासारखा अल्पसंख्यांकाचा विश्वास पैदा करण्यासाठी काँग्रेसने कोणताही प्रयत्न केलेला नाही. काँग्रेस ही स्वतःला देशाची प्रतिनिधी म्हणविते, परंतु हे खरे नसून लोकांचा पाठिंबा मिळविण्यासाठी काँग्रेस पुढारी असे सांगून मुद्दाम लोकांची दिशाभूल करीत आहेत.

उदाहरणार्थ, सर्व अस्पृश्य समाज हा कॉंग्रेसच्या पाठीमागे नसून ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनच्याच पाठीमागे आहे. ब्रिटिशांनी हिंदुस्थान देश सोडल्यानंतर मध्यवर्ती सरकारात कोणाला कोणते व किती स्थान असावे यासंबंधीचे मतभेद मिटविण्यासाठी काँग्रेसने सर्व अल्पसंख्य पक्षांच्या पुढाऱ्यांची एक परिषद भरवून सर्वांच्या मनातील अविश्वास दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावयाला हवा होता. पण त्याऐवजी काँग्रेसने देशातील इतर पक्ष जणू अस्तित्वात नाहीत अशा आविर्भावाने सर्व सत्ता आपल्या ताब्यात दिली जावी असे सांगितले.

मी सर्वांना माझ्या अस्पृश्य समाजाच्या वतीने असे सांगतो की, काँग्रेसला आमचे प्रतिनिधीत्व करण्याचा कोणताही हक्क नाही. माझे तुम्हा सर्व ज्ञातिबांधवांना असे कळकळीचे सांगणे आहे की, आपण आपला पक्ष स्वतंत्र राजकीय पक्ष म्हणून संघटित करून आपल्या रास्त राजकीय हक्कासाठी झगडत राहिल्यानेच आपले कल्याण होणार आहे.

येत्या निवडणुकी त्यादृष्टीने फार महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी येत्या निवडणुकीमध्ये आपणासाठी राखून ठेवलेल्या चौदाही जागांवर शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनचे उमेदवार निवडून येतील अशी काळजी घ्या. आपल्या हाती सत्ता आल्याशिवाय राज्यकारभारात आपल्या म्हणण्याला महत्व राहणार नाही. सर्व कष्ट सहन करा, निर्भय बना, हीनगंड झाडून टाका. आपल्या देशाच्या राज्यकारभारात आपल्याला योग्य वाटा मिळालाच पाहिजे, असा आग्रह धरा.

येत्या निवडणुकी ह्या आपल्या समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आपल्याला जर आपली प्रगती करावयाची असेल तर आपल्याला राजकीय सत्ता मिळविलीच पाहिजे. आपल्या राजकीय हक्कासंबंधी आपण कोणती आकांक्षा बाळगावी हे आम्हाला कोणताही राजकीय पक्ष सांगू शकत नाही किंवा कोणतीही राजकीय सत्ता आम्हाला त्या बाबतीत माघार घेण्यास भाग पाडू शकणार नाही. मला खात्री आहे की, यापुढे कोणी पुढारी अस्पृश्यांना दुय्यम स्थान देऊ पाहील तर ती गोष्ट आम्ही कधीही सहन करणार नाही.

ज्याप्रमाणे अल्पसंख्यांकांचा विश्वास काँग्रेसला संपादन करता आलेला नाही. त्याचप्रमाणे सवर्ण हिंदुवरही काँग्रेसचा विशेष प्रभाव आहे असे नाही. गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने चालविलेल्या अस्पृश्यता नष्ट करण्याच्या व मंदीर प्रवेशाच्या चळवळीमध्ये काँग्रेसला संपूर्ण अपयश आलेले आहे. त्यांच्या चळवळीचा. काहीही परिणाम झालेला दिसत नाही. मी नुकताच जगन्नाथपुरी येथे गेलो होतो. तेथील जगन्नाथाचे देवालय मला बाहेरूनच बघावे लागले. देवालयाच्या आत जाऊन मला जगन्नाथाची मूर्ती पाहता आली नाही. त्यावरून लक्षात येईल की. आपले हक्क मिळविण्यासाठी आपल्याला आपल्याच संघटनेवर भिस्त ठेवली पाहिजे. शेकडो वर्षे हिंदुकडून सोसलेल्या कष्टातून आपली मुक्तता करून घेतली पाहिजे.

कम्युनिस्ट पक्षापासून सावध रहा असे माझे तुम्हाला सांगणे आहे. कारण गेल्या काही वर्षातील त्यांच्या कृत्यावरून ते कामगारांचे अहित करीत आहेत, किंबहुना ते त्यांचे शत्रु आहेत अशी माझी खात्री झाली आहे. काँग्रेस भांडवलवाल्यांची संस्था आहे असे कम्युनिस्ट सांगतात आणि त्याच वेळी कामगारांना तीत प्रविष्ठ होण्याचा उपदेश करतात ! हिंदुस्थानातील कम्युनिस्टांना त्यांचे असे काही धोरणच नाही, त्यांना सर्व स्फूर्ति रशियातून मिळते.

भारतीय कामगारांसाठी कम्युनिस्टांना, ते सांगतात त्याप्रमाणे खरोखरीच जिव्हाळा वाटतो काय? तसे असते तर त्यांनी भारतीय कामगारांचा एक स्वतंत्र राजकीय पक्ष संघटीत केला असता. आतापर्यंत करीत आले तसे काँग्रेसला मिळा असा कामगारांना उपदेश करीत बसले नसते.

त्यांना आता काँग्रेसने हाकलले असल्यामुळे ते आता आपल्यात शिरून आपले उपद्व्याप सुरू करू लागले आहेत. म्हणून माझे तुम्हाला असे सांगणे आहे की, कम्युनिस्टांपासून अलिप्त राहा. त्यांना आपल्या शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनचा उपयोग त्यांच्या प्रचारासाठी करू देऊ नका.

शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशन हीच भारतीय अस्पृश्यांची खरी प्रतिनिधी आहे. तिचा जोर आपल्या प्रांतात वाढतो आहे. हे या ठिकाणी भरलेल्या प्रचंड जमावाने सिद्ध झाले आहे. आपण माझे भाषण इतक्या शांततेने ऐकत आहात त्याबद्दल मला आनंद होत असून ज्या शेकडो स्वयंसेवकांनी येथील व्यवस्था राखली आहे, त्यांना माझे धन्यवाद आहेत. सर्व तरुणांना त्यांनी फेडरेशनला मिळावे व येत्या निवडणुकीत निर्वेतन काम करण्यासाठी बहुसंख्येने पुढे यावे अशी माझी विनंती आहे.
आपण अशीच साथ द्याल तर भारताच्या कारभारात आपल्याला आपला रास्त वाटा मिळालेला पाहण्याचे दिवस फार लांब नाहीत.

डॉ. बाबासाहेबांच्या भाषणानंतर त्या अफाट जनसमुदायाने हर्षोत्फुल्ल अंतःकरणाने जयभीम जयघोषाचा जयजयकार केला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password