Categories

Most Viewed

12 डिसेंबर 1938 भाषण

माझ्या पुस्तकाला बेलिफाने हात लावला तर त्याला गोळी घालून ठार करीन.

मुंबई येथे अस्पृश्य विद्यार्थ्यातर्फे भरविण्यात येणारे मुंबई अस्पृश्य विद्यार्थी संमेलन तारीख 10, 11 व 12 डिसेंबर 1938 या तीन दिवशी अगदी यशस्वी रीतीने पार पडले. संमेलनाच्या अध्यक्षपदावरून सोमवार तारीख 12 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांना उपदेश केला. टाळ्यांच्या कडकडाटात आणि स्त्रियांच्या गॅलरीतून विद्यार्थिनींकडून होणाऱ्या पुष्पवृष्टीमध्ये डॉ. बाबासाहेब भाषण करावयास उठले. ते म्हणाले,

आज तुम्ही मुंबईमध्ये अस्पृश्य विद्यार्थ्यांचे संमेलन घडवून आणले आहे आणि ते सर्व परीने यशस्वी झाले आहे. या कार्यक्रमाबद्दल तुमचे व ज्या विद्यार्थ्यांनी हे संमेलन पार पाडण्यात भाग घेतला आहे त्यांचे मी अभिनंदन करतो. मी शनिवारी व रविवारी नाशिकला होतो. प्रवासातील दगदगीमुळे माझी प्रकृती बिघडली आहे. माझ्यात काही त्राण नाही व भाषण करण्याची ताकद नाही. मी इतके सांगू इच्छितो की आजच्या प्रसंगी हजर राहता आले याबद्दल मला आनंद व धन्यता वाटते.

अशा प्रकारची संमेलने फार होतात. त्याप्रसंगी कोणी अध्यक्ष आला की, मी नेहमी पाहतो त्याने भाषण केले की, त्यात विद्यार्थ्यांना एक टोमणा मारलेला असतो. तुम्ही शिकून काय करणार ? सरकारी नोकरी ? त्यांना देशसेवा करण्याचाही उपदेश करण्यात येतो. पण यात काही हशील नाही. विद्यार्थ्यांसंबंधी मी जो काही विचार केला आहे त्यावरून मी असे सांगू इच्छितो की, हा उपदेश खोटा आहे. मी तसाच उपदेश करणार नाही. विद्यार्थ्याने शिकून नोकरी केली तर त्यात काय पाप ? त्याला आयुष्य आहे. त्याला भावना आहेत. प्रत्येक मनुष्याचे अंतिम ध्येय काय आहे ? आपल्या अंगी वसत असलेल्या गुणांचा परिपोष होऊन त्यास गोड फळे यावीत, हेच ध्येय आहे. म्हणून मी तुम्हाला तो उपदेश करीत नाही. तुम्ही सरकारी नोकऱ्या मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न करा. मला असा अनुभव आला आहे की, सरकारी नोकरी हल्ली एका जातीचा मक्ताच होऊन बसली आहे. कलेक्टर ऑफिसात किंवा इतर प्रत्येक ऑफिसात एकाच जातीची माणसे आहेत. पुष्कळ माणसे सांगतात, तुम्ही नोकरीसाठी का भांडता ? लायकी असली की नोकरी मिळते. त्यात जातीचा कशाला प्रश्न ? परंतु आपल्या सामाजिक परिस्थितीचा विचार केल्यास नोकरी केल्यावर काय फायदा आहे असे विचारणे मूर्खपणाचे आहे. देशात जातिभेदाचे प्रस्थ फार आहे. आज ज्याच्याजवळ पैसा आहे त्याच्याच हाती खरी सत्ता आहे. तो तिचा सद्भावनेने उपयोग न करता आपल्याच पोळीवर तूप ओढून घेतो. नोकरीमुळे पगार हातात येतो. ज्या समाजाला सरकारी नोकऱ्या नाहीत, जो समाज अधिकाराच्या जागेवर नाही. त्याची ऊर्जितावस्था होणार नाही. ब्राह्मण समाज सरकारी नोकरीत गुंतलेला आहे. त्यामुळे त्यात सामर्थ्य आहे व तो आपले वर्चस्व गाजवू शकतो. म्हणून तुम्ही सरकारी नोकऱ्या मिळविण्याचा पिच्छा पुरविल्यामुळे समाजाची उन्नती होईल, याचा तुम्ही कसोशीने प्रयत्न करा.

शिकलेल्या माणसात काही दोष असतात. शिकल्यावर नोकरीच्या पाठीमागे लागणे हा दोष नव्हे. ते दोष व ते अवगुण तुमच्या अंगात शिरणार नाहीत याची खबरदारी घ्या. पहिली गोष्ट शिक्षण पुरे झाल्यावर मनुष्य स्वार्थी बनतो. मनुष्य स्वार्थी असणे हे स्वाभाविकच आहे. परंतु शिकलेला मनुष्य स्वतःचे हित पाहतो. समाजाचे पहात नाही. तो आपल्या बायको-पोरांची व स्वतःच्या हिताचीच काळजी घेतो. मॅझिनी म्हणतो की “लोकात पारतंत्र्य पसरले. माणसे शिकली तरी त्यांच्यात कर्तव्यापेक्षा हक्कांची जाणीव जास्त उत्पन्न होते” आपले कर्तव्य कोणते, याची भावना जागृत होत नाही हा एक शिकलेल्या माणसाचा दोष आहे.

मला खेद वाटतो की, शिकलेल्या मनुष्यास पदवी मिळाली आणि त्याला नोकरी लागली की त्याचा विद्यार्जनाचा मार्ग साफ तुटतो. विद्येचे महत्त्व खुंटले जाते. मी प्रवास करीत असता मजजवळ नेहमी चार पुस्तके व वर्तमानपत्रे असतात. परंतु प्रवासात जी शिकलेली माणसे दिसतात त्यांच्या हातात पुस्तके. वर्तमानपत्रे यांच्याऐवजी सिगारेटच्या पेट्या मात्र दिसतात. मनुष्य बी. ए. झाला म्हणजे त्याला अधिक शिक्षणाची गरज नाही काय ? बी. ए. किंवा एम्. ए. झाला म्हणजे त्याने सर्व ज्ञान संपादन केले ही भावना चुकीची आहे. अगस्ती मुनीने ज्याप्रमाणे समुद्र प्राशन केला त्याप्रमाणे शिकून एखादी पदवी मिळाली म्हणजे आपण सर्व विद्या हस्तगत केली असे शिकलेल्या लोकांना वाटते !

बडोदे संस्थानात एक गृहस्थ होता. तो बी. ए. झाला होता. महाराजांनी त्याची नेमणूक एका खेडेगावात केली होती. त्यावेळी बडोदे संस्थानचे दप्तर गुजरातीतून चालत असे. इंग्रजीतून चालत नसे. मनुष्य फार आळशी ! कधी चूकून टाईम्सदेखील वाचीत नसे. याचा परिणाम असा झाला की, काही वर्षानंतर त्यास ए. बी. सी. ची देखील ओळख राहिली नाही. हे अगदी सत्य आहे. माझासुद्धा असाच अनुभव आहे. पीएच. डी. ही पदवी मिळविण्याकरिता फ्रेंच व जर्मन भाषा अवगत करण्याचा निर्बंध असे. त्यावेळी त्या भाषा मला अवगत होत्या. परंतु आता त्या भाषांचा व्यासंग नसल्यामुळे त्या भाषातून बोलणे मला कठीण जाते. अलिकडे मी फ्रान्स व जर्मनीत जेव्हा गेलो तेव्हा त्या भाषेतून बोलण्याचा मला त्रास पडू लागला. म्हणून विद्येचा व्यासंग नेहमी केला पाहिजे. ज्याप्रमाणे माणूस एकदा दारू प्यावयास लागल्यावर तो ती जन्मभर पीत राहतो. त्याचप्रमाणे विद्यार्जनाच्या बाबतीत झाले पाहिजे. विद्येची खरी गोड़ी कोणाला लागली ? परिक्षेनंतर जो आपली पुस्तके नळबाजारात विकतो त्याला ? बायकोपेक्षा, पोरापेक्षा ज्याचे विद्येवर जास्त प्रेम आहे त्यालाच विद्येची गोडी लागली, असे मी म्हणेन. माझ्या घरावर सावकारीबद्दल जर जप्ती आली व बेलिफाने जर माझ्या पुस्तकाला हात लावला तर त्याला मी गोळी घालून जागच्या जागीच ठार करीन.

मी तरी पाहतो तुम्हा शिकलेल्या मुलात सौंदर्याची गोडी दिसते. लग्नात मुलगी सुंदर आहे काय ? ती आपणास पसंत आहे काय ? वगैरे गोष्टी तुम्ही पाहता. पण तोच हक्क मुलींना द्या. बऱ्याच सुंदर स्त्रिया कुरुप माणसाच्या स्वाधीन झालेल्या मी पाहिल्या आहेत. या देशाचा मला कंटाळा आलेला आहे. परंतु मला माझ्या कर्तव्याची जाणीव आहे म्हणून मला येथे राहणे भाग पडले. यातील धर्म, सामाजिक रचना सुधारणा व संस्कृती यांचा मला फारच कंटाळा आलेला आहे. I am at war with civilization येथील कोट्याधीश मारवाड्यांच्या घरात काय दिसेल ? त्यांच्या घरात स्टॅच्यू, फर्निचर, पेंटिंग व पुस्तके यापैकी एकही वस्तू दिसणार नाही. हीच गोष्ट ब्राह्मणांची. एखाद्या ब्राह्मण कारकुनास पगार झाल्यावर तो आपल्या बायकोस एखादी सोन्याची पुतळी करण्याच्या गडबडीत असतो. कारण सोने संकटसमयी उपयोगी पडते ना ! जगात फक्त जगणे हेच जर ध्येय असेल तर पशु आणि माणूस यात फरक काय? मनुष्य सौंदर्याची साठवण करू शकतो, पशुला ते करता येत नाही. नुसती कॉलर ताठ करून आणि नेकटाय बांधून सौंदर्य वाढत नाही. मी आतापर्यंत दहा अठरावेळा विलायतेस गेलो. माझ्याबरोबर बरेच लोक विलायतेस आले होते. त्यांना आता मी पाहतो तो काय, त्यांना वर्णाश्रम धर्म मान्य ! त्यांच्यावर काहीएक परिणाम झालेला आढळत नाही. काय त्यांचा जन्म ! हिंदू धर्मातील सर्व घाण त्यांना मान्य ! तुम्ही घाणीत पडलेली रत्ने आहात. अत्यंत घाणेरड्या पाण्यात अत्तराचा थेंब पडावा त्याप्रमाणे तुमची स्थिती आहे. तुमच्या आईबापांना शिक्षण नाही. अठराविश्वे दारिद्र्य. तेव्हा हा मैल साफ करणे हे तुमचे कर्तव्य आहे. बायबलात मी वाचले आहे की, मीठच जर अळणी झाले तर बाकी पदार्थांना चव कशी येणार! कोणतेही कार्य करण्याकरिता आपल्या अंगचे गुण स्थिरावले पाहिजेत. ते स्थिरावण्याकरिता निदान एक पिढी तरी लोटली पाहिजे. स्वतः सुधारल्याशिवाय इतरांना तुम्ही काय शिकविणार ? सुधारणेचे मूळ वंशपरंपरा रुतले गेले पाहिजे. तुमच्यात या गुणांचा जर अभाव असेल तर आटोकाट प्रयत्नाने ते मिळवा.

तुमच्यापैकी बहुतेक अविवाहित असतील. कित्येकांची लग्नेही झालेली असतील. पण लग्नानंतर तुम्ही काय करणार आहात ? या बाबतीत तुम्हावर फार मोठी जबाबदारी आहे. मी तुमच्या वडिलांचे उदाहरण न घेता माझ्याच वडिलांचे उदाहरण घेतो. त्यांना एकंदर चौदा मुले झाली आणि त्यातले मी चौदावे रत्न. परंतु मी एलफिन्स्टन कॉलेजमध्ये असताना माझी काय दशा होती ? माझ्या पायात वहाणा नव्हत्या ! अंगात मांजरपाटाचे शर्ट आणि वडिलांचे फाटके कोट ! तुम्ही एलफिन्स्टन कॉलेजात गेलात म्हणजे तुम्हाला तेथे मुल्लर साहेबाची तसबीर दिसेल त्यांनी मला शेवटच्या दोन वर्षात शर्ट्स पुरविली. मी विचार करीत असे, माझ्या वडिलांना चौदा ऐवजी चारच मुले असती तर माझी किती चंगळ झाली असती. माझ्या या दुःखाला माझे वडिलच कारणीभूत होते.

एकदा मी कॉलेजमध्ये जात असता रेल्वेचा पास घरी विसरलो. त्याच दिवशी पासाची तपासणी होती. तिकीट घेणाऱ्या मास्तरने मला अडविले. जवळ तर दिडकी नव्हती. चार वाजेपर्यंत चर्चगेटच्या स्टेशनावर बसून राहिलो होतो. नंतर कैकिणी नावाचा माझ्या वर्गातील विद्यार्थी तेथे आला. त्याने विचारले “काय रे, येथे का बसलाय ?” मी त्याला सर्व हकीगत सांगितली. त्याने चार आणे भरून माझी सुटका केली व त्याच पैशाने तिकीट काढून त्याने मला घरी पाठवून दिले. तेव्हा या बाबतीत मी माझ्या वडिलांना दोष देतो. कारण त्यांनी आपली जबाबदारी ओळखली नाही. वडिलांचे चुकत असता त्यांना हे सांगणे गैर आहे, असे मला वाटत नाही. तुमच्यावर आता ही जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे स्त्रियांवर पण आहे. मी बोलतो ते केवळ पुरूषांकरिताच नव्हे. स्त्रियांनीसुद्धा याची जबाबदारी ओळखली पाहिजे, याचा तुम्ही विचार केला पाहिजे. तुम्ही नोकरीवर जाल, मला वाटते तुम्हापैकी बहुतेक कारकूनच होतील. तर काही तरी 50-60 रुपये पगार तुम्हास मिळेल आणि त्यात तुम्हाला चौदा पोरे झाली तर त्या पोरांचे काय होणार ? त्याची जबाबदारी समाजावर टाकणार ? याचा तुम्ही चांगला विचार करा. तुम्ही संन्यास घ्यावयास तयार नसाल पण त्यातूनही तो कोणी घेतला तर फार चांगले ! (हंशा) हसू नका. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. चार मेली. मला पाच मुले झाली. त्यापैकी याबद्दल आता मला वाईट वाटत नाही तर उलट आनंदच वाटतो. ही मुले जर जगली असती तर त्यांचे शिक्षण, खाणे, राहणे यांचा बोजा माझ्यावर पडला असता व ते मला फार त्रासाचे झाले असते. माझ्यावर त्याची फार जबाबदारी आहे. मला एकच मुलगा आहे. त्याच्या एकशतांश जरी जबाबदारी तुम्ही आपल्या मुलांबद्दल दाखविलीत तर फार उत्तम, ही समाजाच्या कल्याणाची गोष्ट आहे. तुम्हाला पाच सहा मुले झाली तर त्यांना शिक्षण कसे देणार, त्यांची इतर काळजी कशी घेणार ? ऐवजी उतरती भाजणी आहे. मला वाटते ही चढ़ती भाजणीच्या तेव्हा स्त्री-पुरुषांचे पशुप्रमाणे जीवन घालविणे माणुसकीला सोडून आहे. या गोष्टीचा तुम्ही अवश्य विचार करा.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password