हक्क बजावण्यासाठी सर्वांनी सिद्ध झाले पाहिजे.
बारा पाखाडी, पाली, दांडा रोड, वांद्रे येथील मंडळीच्या विद्यमाने रविवार तारीख 11 डिसेंबर 1927 रोजी संध्याकाळी 4 वाजता वांद्रे मुक्कामी डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली महाड सत्याग्रहाच्या मदतीकरिता जाहीर सभा भरली होती. सभेकरिता मंडळीनी शोभिवंत मंडप उभारला होता. वांद्रे व आसपासच्या खेड्यातील मिळून एक हजारावर लोकसमुदाय जमला होता. मुंबईहून डॉ. आंबेडकर यांच्याबरोबर मेसर्स शिवतरकर, प्रधान, गुप्ते, जाधव, गंगावणे, गायकवाड, खोलवडीकर वगैरे मंडळी गेली होती. शिवाय बहिष्कृत हितकारिणी सभेने नवीन उभारलेले आंबेडकर पथक सभेच्या व्यवस्थेकरिता मुद्दाम सभाचालकांनी बोलाविले होते. मुंबईची मंडळी स्टेशनवर उतरल्यावर चांद्रेकरांनी त्यांच्याकरिता खास रिझर्व करून ठेवलेल्या मोटारीने मंडळी सभामंडपाकडे गेली. तेथे गेल्यावर लागलीच सभेच्या कामास सुरवात करण्यात आली व पुढे लिहिलेला ठराव सभेपुढे मांडण्यात आला. “आम्ही बारा पाखाडी, मुक्काम वांद्रे येथे राहणारी मंडळी तारीख 25 डिसेंबरपासून डॉ. आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली महाड येथे सुरू होणाऱ्या सत्याग्रहाला 175 रूपये देणगी देत आहो. तसेच येथे आलेल्या इतर मंडळीस विनंती करितो की, त्यांनी शक्य तितकी जास्त मदत सत्याग्रहाकरिता करावी.” या ठरावावर स्थानिक मंडळी पैकी मेसर्स जयगुरु देवगावकर, सखाराम भिकू काशिराम हवालदार, गोविंद तुळसकर यांची भाषणे झाल्यावर तेथील स्थानिक पुढारी सोनू सजन संदीरकर यांनी भाषण करून 175 रूपये देणगी डॉ. आंबेडकर यांच्या स्वाधीन केली. डॉ. साहेबांनी आभारपूर्वक देणगीचा स्वीकार करून पुढीलप्रमाणे भाषण केले. ते म्हणाले.
सद्गृहस्थहो!
आपण दिलेल्या देणगीबद्दल मी आपला आभारी आहे. आज येथे जमलेल्या लोकांनी आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचे सिंहावलोकन केले तर आपणाला मान खाली घालावी लागेल. कोकणात दापोली मुक्कामी पूर्वी सुभेदार, जमादार, हवालदार वगैरेंचे टोलेजंग वाडे होते. पण त्या वाड्यावर आज मुसलमान लोकांनी नांगर फिरवला आहे. त्या वाड्यांचा तुम्हाला मागमूसही लागणार नाही. ही आपली दशा का झाली ह्याचा विचार करा. ईस्ट इंडिया कंपनी येथे आली त्या कंपनीला राज्यस्थापना करण्याकरिता आपल्या लोकांनी मदत केली. जोपर्यंत आपले लोक पलटणीत होते तोपर्यंतच आपली भरभराट होती. पलटणीचा दरवाजा बंद होताच आपली स्थिती खालावत चालली. आज आपल्या लोकांना पोलिसात घेत नाहीत. इतर ठिकाणी नोकरी मिळण्याची मारामार पडत आहे. पुण्यात आपल्या वर्गापैकी एक ग्रॅज्युएट झालेला मुलगा आहे त्याला नोकरी मिळण्याकरिता मी आज दोन वर्ष सरकारबरोबर झगडत आहे. याच्या आड सरकारातीलच काही वरिष्ठ अधिकारी आहेत हे मी जाणून आहे. महाडला जो आम्ही सत्याग्रह करणार आहोत आणि ज्याकरिता तुम्ही आम्हास आर्थिक मदत केली त्याबद्दल तुम्ही असे समजू नका की, आम्ही तुमच्या गाडीचे घोडे आहोत व त्याकरिता तुम्ही ही चंदी देता, हे काम सर्वांचे आहे. महाडच्या चवदार तळ्यावर जो सत्याग्रह करावयाचा तो स्पृश्य हिंदू आपणास अपवित्र मानतात म्हणून. महाडला अस्पृश्यांना पाण्याचा दुष्काळ आहे म्हणून नव्हे. तर स्पृश्य हिंदू व आपण हे बरोबरीचे आहो. आपला तो हक्क आहे आणि हा हक्क बजावण्याकरिता सर्वांनी सिद्ध झाले पाहिजे. तेथे कोणताही अनिष्ट प्रकार होणार नाही अशी माझी खात्री आहे. म्हणून तुम्ही अगदी निर्भय मनाने या सत्याग्रहात भाग घ्यावा, अशी माझी विनंती आहे.