Categories

Most Viewed

09 डिसेंबर 1945 भाषण

शिक्षणाशिवाय माऱ्याच्या जागा काबीज करता येणार नाहीत.

मुंबई इलाखा शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनचे अध्यक्ष श्री. भा. कृ. गायकवाड यांनी तारीख 1 व 8 डिसेंबर 1945 च्या ‘जनते’ त प्रसिद्ध केले की, आपल्या समाजाचे एकमेव पुढारी नेक नामदार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एम. ए., पीएच.डी., डी. एससी., बार-ॲट-लॉ. हिंदुस्थान सरकारचे लेबर मेंबर (मजूर मंत्री) यांना कामाच्या व्यापामुळे नाशिक, अहमदनगर, पश्चिम खानदेश व पूर्व खानदेश या दरेक जिल्ह्यास भेट देणे अशक्य झाल्याने या चार जिल्ह्यांच्या विद्यमाने रविवार तारीख 9 डिसेंबर 1945 रोजी सायंकाळी 4 वाजता मनमाड सारख्या मध्यवर्ती ठिकाणी सभा घेण्यात येत आहे. ते ‘अस्पृश्य मानलेल्या समाजाचे आजचे कर्तव्य’ या विषयावर जाहीर व्याख्यान देणार आहेत. अशा या सुवर्ण संधीचा फायदा सर्व बंधु-भगिनींनी हजर राहून अवश्य घ्यावा. असे आगाऊ जाहीर झाल्याप्रमाणे मनमाड येथे नाशिक, अहमदनगर, पश्चिम खानदेश व पूर्व खानदेश या जिल्ह्यांच्या विद्यमाने रविवार तारीख 9 डिसेंबर 1945 रोजी मनमाड येथे प्रचंड सभा झाली.

या सभेसाठी मुंबईहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रविवारी सकाळच्या गाडीने निघाले होते.

महाराष्ट्रातील अस्पृश्यांच्या या बालेकिल्ल्याला जवळ जवळ सहा-सात वर्षांच्या कालावधीनंतर डॉ. बाबासाहेब भेट देणार होते. अस्पृश्य जनता आपल्या या वंदनीय पुढाऱ्याच्या दर्शनासाठी आतूर झालेली होती. बऱ्याच लांबलांबच्या भागातून लोकांच्या झुंडीच्या झुंडी मनमाडकडे कूच करीत असताना दिसत होत्या. उन्हा-तान्हातून काटे-कणेऱ्यातून लोक मार्ग काढीत होते. पाठीशी शिदोऱ्या बांधून, विजय मार्गावरील अस्पृश्यांच्या चळवळीचा जयघोष करीत फार दिवसातून आज आमचा मोहरा पुन्हा आम्हाला आमच्या भागात दिसणार, ही जाणीव उराशी बाळगून या चार जिल्ह्यातून अस्पृश्य जनता आनंदोत्सुक्याने मनमाड येथे गोळा झाली होती. अगदी प्रचंड संख्येत जवळ जवळ पाऊण लाखांचा अस्पृश्यांचा जमाव जमला होता.

दुपारी बरोबर सव्वा दोन वाजता डॉ. बाबासाहेबांची गाड़ी स्टेशनात आली. निनाद, जयघोष, गगनभेदी घोषणांनी सारे स्टेशन हादरत असल्याचा भास होत होता. डॉ. बाबासाहेबांचे कंपार्टमेंट पुष्पहारांनी भरगच्च दिसत होते. चौकशीअंती कळले की, मनमाडला येईपर्यंत ज्या ज्या स्टेशनवर गाडी थांबली त्या त्या प्रत्येक ठिकाणी त्यांचे हार्दिक स्वागत होऊन पुष्पांचा वर्षाव करण्यात आला होता.

साडेतीन वाजताच्या सुमाराला स्टेशनहून टोलेजंग मिरवणूक निघाली. शहरातील मुख्य विभागातून फिरून सुमारे दोन मैलावर असलेल्या अस्पृश्य वस्तीत आल्यावर मनमाड येथील अस्पृश्य विद्यार्थी बोर्डिंगच्या इभारतीच्या कोनशिला समारंभासाठी डॉ. बाबासाहेब गेले. सदर कोनशिला समारंभ प्रसंगी डॉ. बाबासाहेबांनी खालील भाषण केले, ते म्हणाले.

आपण राजकीय चळवळीला जितके महत्त्व देतो तितकेच महत्त्व शिक्षण प्रसाराला दिले पाहिजे. कारण शिक्षणाशिवाय आपल्याला मा-याच्या जागा काबीज करता येणार नाहीत. जोपर्यंत माऱ्याच्या जागा आपण काबीज करीत नाही तोपर्यंत खरीखुरी सत्ता आपल्या हाती आली असे म्हणता येणार नाही. वास्तविक शिक्षणाची तरतूद प्रांतिक सरकारांनी केली पाहिजे पण तसे झालेले विशेष काही दिसत नाही. मी यापूर्वी सांगितलेच आहे पण आता क्रमप्राप्त आहे म्हणून सांगतो की, मी मात्र हिंदुस्थान सरकार कडून अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी तीन लाख रुपयांची मंजूरी मिळविली आहे. त्यामुळे आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या मिळत आहेत. पण दुर्दैवाची गोष्ट ही की, आपलेच विद्यार्थी जास्त नापास होतात. याचे कारण मला तरी काही समजत नाही. मी विद्यार्थी असताना या लहानशा मंडपा एवढीच आमची खोली होती. तीत आम्ही सर्व कुटुंब राहत होतो. त्यात बहिणीची दोन मुले, एक बकरी, जाते, पाटा वगैरे आणि मिणमिण जळणारा तेलाचा दिवा. इतकी हलाखीची परिस्थिती असताना मी अभ्यास केला. आमच्या विद्यार्थ्यांना बोर्डिगांमधून आमच्यापेक्षा किती तरी पटीने चांगली सोय असताना त्यांनी रात्रंदिवस का अभ्यास करू नये. तुम्हाला माहिती आहे की, जो कोणी पैसा देत असतो तो त्याचा जाब विचारीत असतो. तद्वतच हिंदुस्थान सरकार विचारील की. आम्ही अस्पृश्यांच्यासाठी जो इतका पैसा खर्च करतो त्याचे त्यांनी काय चीज केले ? म्हणूनच आपल्या विद्यार्थ्यांनी झटून अभ्यास केला पाहिजे आणि पास झाले पाहिजे. न जाणो उद्या जर काँग्रेस मिनिस्ट्री, प्रधान मंडळ आली तर हे काय करतील याचा भरवसा नाही. म्हणूनच मी आताच त्या तीन लाखांचे पाच लाख व्हावेत म्हणून खटपट करीत आहे.

भाषण झाल्यावर डॉ. बाबासाहेबांच्या हस्ते अस्पृश्य विद्यार्थी बोडिंगच्या इमारतीची कोनशिला बसविण्यात आली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password