Categories

Most Viewed

08 डिसेंबर 1935 भाषण

जो धर्म माणसांना माणुसकीने वागवित नाही त्याला धर्म कसे म्हणावे ?

निर्भीडकारांच्या आयुष्यातील तो अत्यंत भाग्याचा दिवस म्हणजे रविवार तारीख 8 डिसेंबर 1935 हा होय. त्या दिवशी रात्री मुंबईच्या फोरस रोड जवळील जुनी ढोर चाळ, जयरामभाई स्ट्रीटवर एक अत्यंत महत्त्वाची सभा होणार असून त्या सभेत धर्मांतराच्या घोषणेचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे धर्मांतराच्या विषयावर मुंबईतील पहिलेच महत्त्वाचे भाषण होणार असे जाहीर झाले होते. या भाषणामुळे त्या सभेला एक प्रकारची अपूर्वता आली होती हे न सांगताही चाणाक्ष वाचकांना समजण्यासारखे आहे. त्या सभेला हजर राहून आमचे विचार दहा हजार श्रोतृ समाजासमोर मांडण्याची संधी आम्हास लाभली हे आम्ही आमचे परम भाग्यच समजतो. या निर्भीडकारांच्या आयुष्यात जे काही थोडे फार भाग्याचे दिवस उगवले त्यात आम्ही गेल्या रविवारला अग्रपूजेचा मान देत आहोत. कारण ही सभा जशी महत्त्वाची होती, तशीच सुधारक स्पृश्य समाजातर्फे अस्पृश्यांच्या धर्मांतराबाबत घोषणा करण्याची आम्हास लाभलेली सुसंधीही महद्भाग्याचीच होती.

गेल्या रविवारी रात्रीची सभा श्री. सोमवंशीय गुरूदत्त प्रासादिक भजन समाजाच्या विद्यमाने बत्तिसाव्या वार्षिक दत्तजयंती उत्सव निमित्त भरविण्यात आली होती. हा उत्सव गेली बत्तीस वर्षे अत्यंत थाटामाटाने साजरा होत असून त्या उत्सवास हजारों अस्पृश्य बंधु-भगिनींची चिकार गर्दी लोटत असते. या उत्सवाचे पुण्यात्मे संस्थापक कै. माधवनाथ मोरे हे असून त्यांच्या हल्लीच्या व्यवस्थापक मंडळात श्री. बाळाजी सुडकाजी मोरे, शंकरराव आडेजाधव माधवराव पारधे, गंगारामपंत मुकादम आणि रेवजीबुवा डोळस ही प्रमुख पुढारी मंडळी आहेत. या व्यवस्थापक मंडळाने यंदाचाही उत्सव अत्यंत थाटामाटाने साजरा केला हे त्यास अत्यंत भूषणावह होय. त्यांच्या उज्वल धर्मबुद्धि बद्दल त्यास व त्यांच्या शेकडो सहकाऱ्यांस आम्ही स्पृश्य हिंदू समाजातर्फे मनःपूर्वक धन्यवाद देतो.

यंदाचा दत्तजयंती उत्सव एकंदर चार दिवस साजरा झाला. पहिल्या दिवशी म्हणजे शनिवार तारीख 7 रोजी श्रीयुत किसन देवीदास बोवा (कामाठीपुरा 13 वी गल्ली), रामजी रावजी बोरकर (ताडवाडी), रामजी धोंडूजी भालेराव (औचित्यवाडा) रामचंद्र सदूजी रणदिवे (बटाट्याची चाळ) या सुप्रसिद्ध धर्मभक्तांच्या व्यवस्थेखाली भजनकारांची संगीत भजने झाली.

दुसऱ्या दिवशी आम्ही ज्या सभेचे वर्णन करण्यासाठी हा लेख लिहित आहोत ती जंगी जाहीर सभा झाली. तिसऱ्या दिवशी पालखीची मिरवणूक व भोजन समारंभ हे कार्यक्रम जाहीर झालेले होते. या उत्सवाप्रित्यर्थ हजारो रुपये खर्च होत असून अस्पृश्य समाज आनंदाची मौज लुटीत असतो. अशा उत्सवातील एका अत्यंत महत्त्वाच्या सभेस हजर राहून भाषण करण्याचा योग आम्हास लाभला हे आमचे भाग्यच नव्हे काय ? हा यंदाचा उत्सव अखेरचाच ठरल्यास आम्हास लाभलेला योग अधिकच भाग्याचा ठरतो यात शंका नाही..

आम्ही सदर सभेस हजर राहाण्यासाठी गेल्या रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सभास्थानी दाखल झालो. एका लहानशा देवीच्या देवळापुढे समास्थान श्रृंगारण्यात आले असून समोरील जंगीच्या जंगी रस्ता सभेसाठी नियोजित करण्यात आला होता. देवीच्या घुमटावर कापडाचा एक बोर्ड लावण्यात आला असून त्यावर बत्तीसावा दत्तजयंती उत्सव मॅनेजर रेवजीबोवा डोळस असे मोठ्या अक्षरात लिहिले होते. देवळाच्या समोरील रस्ता ध्वजा, पताका, बावटे आणि कागदाच्या फुलांची छते वगैरेंनी श्रृंगारण्यात आला होता. रस्त्यावर श्रोतृ समाजाची बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून डाव्या हाताला स्त्री समाज बसलेला दिसत होता. देवळापुढे एक जंगी व्यासपीठ मांडण्यात आले असून त्यावर सतरंजी व गालीचे पसरण्यात आले होतेच. व्यासपीठाच्या मध्यभागी एक चौरस मेज ठेवण्यात आले असून दोन मखमलीच्या दरबारी खुर्च्या ठेवलेल्या होत्या. व्यासपीठावर इतर पाहुणे मंडळींसाठी हिरव्या मखमलीची कोचे मांडण्यात आली होती. व्यासपीठाच्या आजूबाजूस आणखीही कोचे, खुर्च्या व बाके भरपूर मांडलेली होती.

आम्ही गेलो त्यावेळी सभास्थानी पाच हजारावर श्रोतृ समाज जमलेला दिसला, श्रोतृ समाजात अस्पृश्यांचाच भरणा विशेष असला तरी पन्नास पाऊणशे मुसलमान दहा पाच ख्रिस्ती व एक वयोवृद्ध पारशी गृहस्थ असे परधर्मीय लोक मधून मधून तुरळक बसलेले दृष्टीस पडत होते. आम्हाला मोठ्या प्रेमाने एका सदगृहस्थाने व्यासपीठावरील कोचावर नेऊन बसविले. आमच्या शेजारी श्री. अडांगळे व वडवलकर बसले असल्यामुळे एकंदर गप्पागोष्टीस विशेष मजा आली. हे अस्पृश्य बंधु हल्ली आमचे परममित्र झालेले आहेत. डॉ. आंबेडकरास व त्यांच्या सहकारी मित्रमंडळीस आणण्यासाठी श्री. रेवजी बुवा गेले होते, म्हणून मध्यंतरीच्या रिकाम्या वेळेत काही मनोरंजक कार्यक्रम करण्यात आले. आम्ही गेलो त्यावेळी एका गोड आवाजाच्या मुलाचे सुस्वर गायन चालू होते. त्या गायनानंतर श्री. फाळके यांनी पोवाड़ा गाऊन दाखविला. त्यानंतर जलशाचाही लहानसा कार्यक्रम झाला. अशा प्रकारे जरी निरनिराळे कार्यक्रम चालू होते तरी सर्व श्रोतृ समाजाचे लक्ष डॉ. आंबेडकरांच्या वाटेकडे लागले होते. श्रोत्यांची संख्या वाढता वाढता दहा वाजण्याच्या सुमारास ती दहा हजारांवर गेली.

शेवटी सव्वा दहाच्या सुमारास सभास्थानाजवळ दोन भव्य मोटारी पों पों करीत येऊन थडकल्या. या मोटारीतून आपल्या मित्रमंडळी समवेत डॉ. आंबेडकर आले. आंबेडकर आले असे समजताच टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटाने वातावरण दुमदुमून गेले. श्रोतृ समाजाने डॉ. आंबेडकरांचे जे प्रचंड स्वागत केले ते एखाद्या किरीटकुंडलधारी सार्वभौमालाही हेवा वाटण्याजोगे होते. त्यांच्या नावाचा जयघोष चालू असतानाच डॉ. आंबेडकर व्यासपीठावर मांडलेल्या दरबारी खुर्चीवर जाऊन बसले. त्यांच्या शेजारी सभेचे नियोजित श्री. नाईक तसल्याच एका जाड खुर्चीवर जाऊन बसले. त्यांच्याबरोबर आलेली प्रि. दोंदे, श्री. सुरबा टिपणीस, बापूसाहेब सहस्त्रबुद्धे इत्यादी त्यांच्या आजुबाजूच्या कोचावर अधिष्ठित झाली. अस्पृश्य समाजाचे दुसरे एक थोर आणि सन्मान्य पुढारी डॉ. सोळंकी यांस आणण्यासाठी मोटार गेली असल्याने ते येऊन दाखल होईपर्यंत सभास्थानी जलशाचा कार्यक्रम पुढे चालू ठेवण्यात आला. थोड्या वेळाने डॉ. सोळंकीची स्वारी सभास्थानी दाखल झाली. व्यवस्थापक मंडळाने त्यांचेही थाटाने स्वागत केले. लोकांनीही टाळ्यांचा गजर करून आपली संमती दिली. डॉ. सोळंकी, डॉ. आंबेडकर शेजारील खुर्चीवर विराजमान झाल्यावर श्री. रेवजी बुवांनी सभेच्या कामास सुरवात केली. अध्यक्षांच्या सूचनेला अनुमोदन दिल्यानंतर श्री. देवराव नाईक यांनी प्रारंभीचे लहानसे भाषण केले. त्यानंतर श्री. सुरबा टिपणीस यांचे भाषण झाले.

यानंतर अध्यक्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांस भाषण करण्याविषयी नम्रतापूर्वक विनंती केली. डॉ. आंबेडकर हातात एक लहानशी काठी घेऊन टेबलाच्या पुढे येऊन उभे राहिले. टाळ्यांचा प्रचंड गजर दुमदुमला ! बाबासाहेबांनी डोक्याला काही एक घातलेले नव्हते व पोषाख अगदी साधा केला होता. पायात लॉग क्लॉथचा लेंगा व अंगात सोलापुरी चेकचा कोट असा त्यांचा साधासुधा थाट होता. अत्यंत गंभीर वाणीने डॉ. आंबेडकर म्हणाले,

सभापती महाशय आणि बंधु भगिनींनो,
मला प्रारंभी एक दोन गोष्टींचा खुलासा केला पाहिजे. गेल्या सालच्या उत्सवाला मी आलो नव्हतो. या सालीही असल्या दत्तजयंती सारख्या उत्सवात भाषण करणे योग्य नव्हे, पण रेवजी बुवांनी हा शेवटचाच उत्सव होईल असे आश्वासन दिले असल्यामुळे मी आलो आहे. या ठिकाणी धर्मातरासारख्या विषयावर बोलणेही बरे नव्हे. पण मला काही तरी दोन शब्द बोलणे आता भागच आहे. मी धर्मातरांविषयी माझी मते निश्चित केलेली आहेत. मी धर्मातर करणारच आहे; पण थोडा थांबलो आहे तो तुमचा बेत कळावा म्हणून! तुम्ही सर्वच्या सर्व सात कोटी लोक धर्मांतर कराल तरच मला हवे आहे. एकाही माणसाने मागे राहाता कामा नये. थोडे थोडे फुटून परधर्मात जाल तर तुमचे नुकसान होईल. सात कोटींनी गटाने धर्मांतर केले पाहिजे. दहा हजार मुसलमान झाले. चार हजार खिस्ती झाले तर असल्या फाटाफुटीने अकल्याण होईल. तुम्ही काही थोडे लोक माझ्याबरोबर परधर्मात आलात तर मला तुमचे हित करता येणार नाही. तुम्ही सर्व आलात तर मला तुमचे काही हित करता येईल, सर्वांचा एकच निश्चय व्हावयाचा म्हणजे त्याला वेळ हा लागणारच ! तेवढा वेळ मी थांबायला तयार आहे. पण ही वेळ मी तुम्हा अस्पृश्यांना दिलेली आहे. स्पृश्यांना नाही! सारे मला विचारायला येतात. तुम्हाला विचारायला कोणी येत नसेल. मला बोलावे लागते. पण त्याचा अर्थ माझा धर्मांतराचा निश्चय बदलणार आहे असा नव्हे. माझा निश्चय पक्का झाला आहे. पण मला तुमचा बेत काय तो कळला पाहिजे. हिंदू धर्म हा धर्म नाही. हा रोग आहे. महारोग आहे! (आम्ही बसलो होतो त्या बाजूला वळून) हा रोग हिंदूंना झाला आहे. आम्हाला नव्हे ! त्याचा संसर्ग आम्हाला बाधतो आहे. एखाद्यास जर सांसर्गिक रोग झाला तर ज्याप्रमाणे त्याला क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येते त्याप्रमाणे हिंदुंपासून आम्हाला अलिप्त राहिले पाहिजे, रोग हिंदुंना झाला आहे. आम्हाला नाही. आम्ही अस्पृश्यांनी काय पाप केले आहे ? काही नाही. पापे केली आहेत ती स्पृश्यांनी त्यांची फळे मात्र आम्हाला भोगावी लागतात म्हणून आम्हाला दूर गेले पाहिजे. हिंदुना जर रोगापासून आपला बचाव करून घ्यावयाचा असेल तर त्यांनीही आमच्या मागून यावे. अस्पृश्यता नष्ट करण्याकरिता खटपट करा असे म्हणतात, पण ते शक्य नाही. हिंदू धर्म हा मुळी धर्मच राहिलेला नाही. तो धर्म आहे असे कोणीही मला सिद्ध करून द्यावे. हिंदू धर्म हे एक विष आहे. विषाचे अमृत होणे शक्य नाही. ज्या धर्मातील लोक अस्पृश्य समाजातील माणसांना माणुसकीने वागवीत नाहीत त्याला धर्म कसे म्हणावे ? विषाचे अमृत करण्याची काही युक्ती कोणाला माहीत असेल तर ती मला त्याने सांगावी. विषाचे अमृत होणेच शक्य नाही. पदार्थ खारट झाला तर तो अळणी करता येईल. आंबट झाला तर तो गोड करता येईल, पण विषाचे अमृत करणे अशक्य आहे. मी स्वतः स्वयंपाक करण्यास शिकलो आहे. मला कोणाही भगिनीइतका चांगला स्वयंपाक करता येतो. तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण काही धंदा न मिळाल्यास बावर्ची तरी होता यावे, म्हणून मी स्वयंपाक करण्याचे काम शिकलो आहे. एखादा पदार्थ खारट झाला तर त्यातले मीठ कसे काढावे हे ज्या भगिनींना माहीत नसेल त्यांना मी त्याची युक्ती सांगून ठेवतो. खारट पदार्थ शिजत असताना त्यात एक कागदाचा तुकडा टाकून ठेवावा म्हणजे तो पदार्थ अळणी होतो (टाळ्या). सांगण्याचे तात्पर्य इतकेच की सर्व काही बदलता येईल पण विषाचे अमृत होणार नाही.

मला परवाच गुजरातीतून एक पत्र आले आहे. त्यातील हकीगत सांगितली तर हिंदू धर्म हे विष आहे याविषयीची तुमच्या मनाला खात्री पटेल. गुजरातेत एका गावाला एक जैन विद्यार्थ्यांचे बोर्डिंग आहे. तेथे वीस-एक मुले शिकत असून त्यांच्यावर एक वृद्ध जैन सुपरिटेंडेंट नेमण्यात आलेला आहे. त्या बोर्डिगाच्या आवारात एक अस्पृश्य जातीचे जोडपे काम करीत असे. त्यांना तीन चार वर्षाचे एक मूल होते. ते पाठीवर बांधून कामाच्या वेळी बोर्डिगाकडे घेऊन जात. एके दिवशी त्या मुलाला आवारात खेळत ठेवून त्याचे आई-बाप कोठे तरी बाहेर कामावर गेले. इकडे मूल खेळता खेळता बोर्डिगाच्या दारासमोरील पाण्याच्या लहानशा हौदाजवळ गेले. हा हौद चार पाच फूट खोल आणि दोन अडीच फूट रुंद एवढाच होता. दुर्दैवाने ते मूल हौदावर चढले आणि त्याची झेप जाऊन ते पाण्यात पडले. ही गोष्ट बोर्डिगातल्या वीस मुलांनी व त्यांच्या वृद्ध शिक्षकाने पाहिली पण त्यांनी काही त्या मुलाला हौदाबाहेर काढले नाही. त्या मुलांनी ही बातमी मुलाच्या आई-बापास कळविली. बऱ्याच वेळाने आई-बाप आले व त्या मुलाला त्यांनी बाहेर काढले. नंतर आई-बापाने त्याला इस्पितळात नेले. डॉक्टरने मुलाला तपासले व सांगितले की हे मूल दोन तासापूर्वीच मेलेले आहे. आता प्रश्न असा आहे की, त्या वीस जैन मुलांनी आणि त्यांच्या वृद्ध शिक्षकाने त्या मुलाला हौदाबाहेर का काढले नाही? त्याचे उत्तर हेच आहे की, ते मूल अस्पृश्य जातीत जन्माला आलेले होते म्हणून. असा हा हिंदू धर्म आहे त्याच्यापासून माणुसकीच्या अपेक्षा करणे व्यर्थ आहे. अस्पृश्यांना हिंदू समाजाकडून कधीही न्याय मिळणार नाही. हिंदू धर्म हा रक्तपीतीचा रोग आहे. त्याच्यापासून अस्पृश्यांना आपला बचाव करून घ्यावयाचा असेल तर त्यांना धर्मांतर एवढाच उपाय आहे.

नुकतीच नाशिक जिल्ह्यातील नांदूर या गावी घडलेली हकीगत तुम्ही वाचलीच असेल. दोघा महारणी बायाजवळ दोन गवताच्या पेंढ्या आढळल्या. धर्मातराच्या घोषणेमुळे चिडलेल्या मराठ्यांनी त्या बायांवर मराठ्यांच्या शेतातून गवत कापून आणल्याचा आरोप ठेवला. त्या बायांनी पुष्कळ प्रकारे विनवून सांगितले, पण मराठ्यांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही. शेवटी त्यांचा छळ करण्यात आला. पण एवढ्यानेही त्या मराठ्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी महारांच्या शेतात आपली गुरे-ढोरे सोडून दिली. महारांच्या उभ्या पिकाचो नासाडी केली. अस्पृश्यांना स्पृश्य समाजाकडून अशीच वागणूक मिळत असते. म्हणून म्हणतो की हिंदू धर्म हा नरक आहे. तुम्ही धर्मांतराबाबत कोणता निश्चय ठरविता हे पाहण्यासाठी मी थांबलो आहे. मला तुमच्या पुढारीपणाची जरूरी येथे एक नाही. कसलीही इतर अपेक्षा नाही. माझी उन्नती करून घेणे माझ्या हातात आहे. माझ्याबरोबर धर्मातर करावयाचे असेल तर सर्व मिळून या. दोन महिन्यात प्रथम मुंबई इलाख्यातील महार लोकांची परिषद भरणार आहे. त्यांचा निश्चय ठरला म्हणजे इतर जातींच्या परिषदा भरविण्यात येतील. शेवटी हिंदुस्थानातील सर्व अस्पृश्यांची परिषद भरुन निर्णय करून घ्यावा लागेल, याला वेळ लागणारच.. योग्य तितका वेळ मी तुम्हाला देत आहे. तेवढ्यात काय तो आपला निश्चय करा. धर्मांतर करावयाचे म्हणजे काय करावयाचे ते आजच सांगण्यात अर्थ नाही. राज्यात तुम्ही राहाता ते मकान कायमचेच सोडावयाचे असा एकदा तुमच्या सर्वांच्या मनाचा निश्चय झाला म्हणजे मग कोणत्या मार्गाने जावयाचे ते सांगू. तुम्ही हिंदू धर्मात राहता कारण तुम्ही निर्बुद्ध आहात. तुम्हाला लाज नाही, शरम नाही, म्हणूनच तुम्हाला माणुसकीची जाणीव झालेली नाही. याचमुळे तुम्ही या धर्मात राहिला आहात. इतके बोलून मी भाषण संपवितो.

असे म्हणून डॉ. आंबेडकरांनी आपले भाषण एकाएकी संपविले आणि ते गंभीरपणे आपल्या जागेवर जाऊन बसले. भाषण संपविण्याच्या वेळी त्यांचा चेहरा अत्यंत गंभीर व संतापाने लाल झालेला दिसत होता. ते इतके भावनावश झाले होते की, त्यांच्या तोंडून पुढील शब्द निघणेच शक्य नव्हते. त्यानी एकाएकी भाषण संपविले खरे, पण श्रोत्यांच्या मनावर त्याचा परिणाम मात्र भयंकर झाला. त्यांची बोलण्याची पद्धत सरळ, साधी व सडेतोड होती. ते तिखट भाषेत श्रोत्यांची अंतःकरणे कापीत पुढे गेले. एका विशिष्ट पण मध्यम आवाजात त्यांनी सर्व भाषण केले. आवाजात चढउतार नाही की अलंकारिक भाषेचा नटवेपणा नाही, त्यांची वाक्येही लहान व सुटसुटीत होती. हे भाषण झाल्यानंतर जास्त काही एक न बोलता सभा बरखास्त केली. अध्यक्षांनी समारोप न करण्यात एकप्रकारे डॉ. आंबेडकर विषयीचा अत्यादर व्यक्त केला. इतकेच नव्हे तर त्यांनी विशेष प्रकारचा मुत्सद्दीपणाही दाखविला. अध्यक्षांनी समारोप न केल्याने श्रोत्यांच्या मनावर झालेला परिणाम टिकण्यास अत्यंत मदत झाली. शेवटी फक्त हारतुरे समर्पणाचा समारंभ झाला. डॉ. आंबेडकर, डॉ. सोळंकी, श्री. देवराव नाईक यास व सर्व पुढारी मंडळीस पन्नासावर पुष्पहार अर्पण करण्यात आले. समारंभ हा आटोपल्यावर लोकांनी डॉ. आंबेडकरांच्या नावाचा जयजयकार केला व सभेचे काम संपले. इकडे डॉ. आंबेडकर वगैरे पुढारी मंडळी गर्दीतून मार्ग काढीत मोटारीकडे रवाना झाली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password