Categories

Most Viewed

07 डिसेंबर 1940 भाषण

असा भेदभाव कराल तर अधोगतीला जाल.

इमारत फंडाची जंगी जाहीर सभा चंदनवाडी, मुंबई येथे अस्पृश्यांचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार, तारीख 7 डिसेंबर 1940 रोजी रात्री साडे आठ वाजता भरली होती. सभास्थानी तीन ते चार हजारांवर जनसमुदाय जमला होता. या उपस्थित झालेल्या जनसमुहाने डॉ. बाबासाहेबांचे स्वागत टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात केले. आंबेडकर कौन है दलितोंका राजा है, ‘आंबेडकर, झिंदाबाद, थोडे दिनमें भीमराज, वगैरे सुभाषितांनी केले. सदर प्रसंगी श्री मोहिते मास्तर, वि. का. उपशाम मास्तर, वडवलकर, मिंढे पाटील, लोखंडे, गायकवाड, आमदार भाई चित्रे आणि वराळेसाहेब वगैरे मंडळी हजर होती. सभेची व्यवस्था उत्तमप्रकारे ठेवलेली होती.

सभेस सुरवात श्री. उ. तु. जाधव मास्तर यांनी केली, त्यांनी सभेचे नियोजित अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली. नंतर श्री. खैरे यांनी अनुमोदन दिल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले.

प्रथमतः श्री. सी. एन. मोहिते मास्तर यांनी डॉ. बाबासाहेबांनी प्रस्थापित केलेल्या इमारत फंडाविषयी आणि वयात आलेल्या प्रत्येक स्त्री-पुरुषाने इमारत फंडास द्यावयाच्या देणगी विषयी खुलासेवार भाषण केले. श्री. वडवलकर आणि उपशाम मास्तर यांनीही समयोचित भाषणे केली.

नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बोलावयास उभे राहिले. ते आपल्या भाषणात म्हणाले.
आज आपण या ठिकाणी सभा करून मला निमंत्रण दिले. याबद्दल मी आपले आभार मानतो. वास्तविक मी कोणाचेही आभार मानले नाही. तुमचेच आभार का मानतो ? कारण तुम्ही आज दहा-बारा वर्षेपावेतो सार्वजनिक कार्यात भाग घेतला नाही. मला शंका होती की, येथील लोक झोपी गेले की काय ? किंवा ते करतात तरी काय ? वगैरे गोष्टींचा थांगपत्ताही नव्हता. आता आपण ही सभा घेऊन समाजकार्याविषयी आपली जिज्ञासा दाखवित आहात आणि म्हणून मी आपले आभार मानणे योग्य आहे. महाडच्या सत्याग्रहापासून काही मंडळीनी कोकणी लोकांचा बूट काढला. ज्या लोकांनी तो काढला त्यांची नावे येथे सांगण्याची जरुरी नाही. माझ्याप्रमाणे तुम्हालाही त्यांची नावे माहीत असतील. अशा लोकांपैकी एखाद्या माणसाने सार्वजनिक चळवळीत भाग घेतला आहे. अशी माझी मनोदेवता मला साक्ष देत नाही. अशा लोकांपैकी काही मंडळीनी उघडपणे कोकणस्थ व देशस्थ भेद माजविला आहे. या भेदभावाने समाजाचे कल्याण होणे तर दूरच राहिले पण नुकसान मात्र ताबडतोड झाल्याशिवाय राहणार नाही. हा भेदभाव उत्पन्न करणाऱ्या लोकांनी या दहा-बारा वर्षात काही समाजहिताची कार्ये केली असती तर मला आनंद झाला असता. त्यांनी काही बोर्डिगे काढली असती. काही गरीब मुलांना स्कॉलरशिपा दिल्या असत्या तरीही मला आनंद झाला असता. पण तसे काही एक नसून उलट समाजात भेदनीती निर्माण करण्यात येत आहे. कटू शब्द सांगणे मला प्राप्त होत आहे. येथे जमलेल्या मंडळीना मला एक शुभसंदेश सांगावासा वाटतो. तो हा की, तुम्ही देशस्थ, कोकणस्थ, कर्नाटकी वा वायदेशी असा भेदभाव कराल तर तुम्ही अधोगतीला गेल्यावाचून राहणार नाही. इतके दिवस आपली अधोगती झाली, ती आता होऊ देता कामा नये. समाजात भेदभाव करणाऱ्यांना आपण बिलकूल थारा देऊ नका. त्याच्याकरता मला कडक उपाय योजावे लागतील. तुम्ही हे ओळखूनच की काय, आपसातील भेदभाव विसरून ही अपूर्व सभा घडवून आणली म्हणून मी आपले आभार मानणे योग्य आहे. बरे असो.

बंधुजनहो इमारतीच्या बाबतीत माझ्या अगोदरच्या दोन वक्त्यांनी आपणास सांगितले आहे. यापूर्वीही मी इमारतीच्या बाबतीत दोन तीन ठिकाणी भाषणे केली आहेत. आपण जनता वाचत असाल तर आपणालाही ते समजले असेल. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी जे सांगितले त्यावरून त्यांना माझे मनोगत समजले नाही, असे वाटते.

इमारतीची कल्पना येणे आवश्यक आहे. ही इमारत देशावर जशी चावडी असते तशी करावयाची नाही. देशावरच्या चावडीत कामधंदा न करणारे रिकामटेकडे महार लोक लोळत असतात. अशा प्रकारची इमारत करण्याचा माझा इरादा नाही. मुंबईत दगड चाळीमध्ये एक शंकराचे देऊळ होते. तेथे बरेचसे साधुलोक गांजा, चरस वगैरे ओढून मठात गप्पागोष्टी सांगत बसत. होते. याठिकाणी हिंदू-मुसलमान राहात असत. ते एकमेकांच्या विश्वासातले. एके दिवशी देवळातील शंकराची पिंडी कोणीतरी फोडली. तेव्हा ही शंकराची पिंडी मुसलमानांनी फोडली असावी असे वाटणे साहाजिकच होते. पण चौकशीअंती असे समजले की, ती देवळातील साधुनी फोडली. मुसलमानांनी फोडली नाही बंधुनो! मला जी इमारत करावयाची आहे ती बेकार महारांना दिवसारात्री झोपण्यासाठी नव्हे, इमारती विषयीचा हेतू निराळा आहे.

तो जाणणे म्हणजे दुसऱ्या एका विषयाकडे वळण घेणे भाग आहे. आपण अस्पृश्य दारिद्र्याच्या गर्तेत सापडलो आहोत. आपल्याजवळ पैसा नाही, कोपर मोडल्याखेरीज भाकर मिळत नाही पण आपणाजवळ संघटनेचे सामर्थ्य फार दांडगे आहे. त्याच्यावरच आपल्याला प्रतिपक्षाशी दोन हात खेळावे लागणार आहेत.

आपल्याला जे काही राजकीय हक्क मिळालेले आहेत ते आपल्यापासून हिरावून घेण्यासाठी काँग्रेसही तयार आहे. काँग्रेसने मोठमोठ्या लोकांना हतबल करून टाकलेले आहे. एकेकाळी ब्राह्मणेतर पक्ष अगदी बलाढ्य असा होता. त्याचा सत्यशोधक समाज मोठ्या जोराने काम करीत होता. गणपतीच्या उत्सवाचे वेळेस ब्राह्मणाचा गणपती निराळा तर मराठ्यांचा गणपती निराळा. त्यावेळेस ह्या मराठे लोकांनी ब्राह्मणांना चिडवण्यासाठी एक पालुपद तयार केले होते. ते ब्राह्मणांना ‘हर्रर्र बॅ’ असे म्हणत असत. परंतु जे ब्राह्मणेतर ब्राह्मणांना शिव्या देत असत त्यांची काय धडगत आहे ? रा. ब. बोले यांनी आपले आयुष्य ब्राह्मणांना शिव्या देण्यात घालविले. परंतु तेच बोले आता बॅ. सावरकरांच्या ताटाखालचे मांजर झाले आहे. तीच गोष्ट पुण्याच्या जेधेची. ते आता पुण्यातील एका ब्राह्मणाच्या हातातील बाहुले झालेले आहेत.

हा ब्राह्मणेतर पक्ष एवढा बलाढ्य होता पण तोच काँग्रेसपुढे लोटांगण घालीत का गेला ? त्याचे कारण एकच आणि ते म्हणजे हे की त्यांच्यामध्ये विस्कळीतपणा आहे. आमची गत तशी नाही. आम्हाला जे काही मिळालेले आहे त्याचा फायदा आम्ही आमच्या जातीकरिता करीत आहोत आणि तेही कोणाचे गुलाम न होता.

हल्लीचे राजकारण फुकटचे नसते. गांधींनी काँग्रेसचे राजकारण लढविण्यास एक कोटी रुपये खर्च केले आहेत. मागच्या इलेक्शनमध्ये मला हाणून पाडण्यासाठी काँग्रेसने अगदी पराकाष्ठा केली. इतर लोक जरी निवडून आले तरी ते काँग्रेसला चालले असते पण मला निवडून येऊ द्यावयाचे नाही, अशी काँग्रेसची महत्त्वाकांक्षा होती आणि म्हणून वल्लभभाई पटेल यांनी त्याकरिता 35,000 रुपये खर्च केले. परंतु आपल्या समाजाच्या एकीमुळे मी दुसऱ्या नंबराने निवडून आलो. पारशांच्या बायांनी डॉ. गिल्डर यांनाच सॉलीड मते दिली नसती तर मी पहिल्या नंबराने पण निवडून आलो असतो. म्हणून वेळोवेळी होणाऱ्या निवडणुकी लढविण्यासाठी पैसा नसल्यामुळे आपली कुचंबणा होण्याचा संभव आहे. तसे होऊ नये म्हणून या इमारतीपासून आपल्याला प्रत्येक वर्षाला 56 हजार रुपये भाडे येऊ शकेल. त्यामुळे आपण आपल्या निवडणुकी स्वतंत्रपणे लढवू शकू. त्याचप्रमाणे आपल्याला समाजातील लोकांना स्पृश्य लोकांपासून गावोगावी त्रास होत असतो. मला अशा गोष्टी बऱ्याच सांगण्यात येत असतात. परंतु मी काय करणार? त्याच्याकरिता पैशाची आवश्यकता असते. वकील लोक पैशाशिवाय कसे काम करू शकतील? म्हणून मला लोकांना मोठ्या पराकाष्ठेने सांगावे लागते की, बाबांनो, तुमच्यासाठी मी जास्त काही करू शकत नाही. ही गोष्ट खरोखरच नामुष्कीची आहे. म्हणून या इमारतीच्या उत्पन्नातून आपल्याला आपल्या लोकांची थोडीफार तरी दुःखे निवारण करता येतील.

या इमारत फंडाला पैसा देण्यासाठी आपणाजवळ श्रीमंत माणसे नाहीत म्हणून थेंब थेंब रांजणामध्ये टाकीत राहिल्याने ज्याप्रमाणे रांजण भरतो त्याचप्रमाणे आपण सर्वांनी थोडे थोडे पैसे देऊन हा इमारत फंड पुरा केला पाहिजे.

हा प्रश्न माझ्या अगर दुसऱ्या कोणाच्याही स्वार्थाचा नाही. ही इमारत म्हणजे सर्व लोकांची पुंजी आहे, अशी आस्था मनात बाळगून आपण सर्वांनी मदत केली पाहिजे. ज्या लोकांना 25 रुपयांपर्यंत पगार आहे त्यांच्यासाठी मी दोन रुपये वर्गणी ठेवलेली आहे. परंतु ज्या लोकांना जास्त पगार आहे त्यांनी मात्र शिंगे मोडून वासरात शिरण्याचा प्रयत्न करू नये. त्या सर्वांनी एक महिन्याचा पगार या कार्यासाठी हप्त्या हप्त्याने दिला पाहिजे. तुम्ही जन्मभर पैसे कमवून आपल्या नातलगांना पोसाल, सावकारांचे पैसे भराल, दागिनेही कराल तरीपण हे सामाजिक ॠण आपण द्यावयास पाहिजे. या कामामध्ये तुम्ही हलगर्जी करता कामा नये. मी आपणास सरळपणे विनंती करतो. तिचा जर काही उपयोग झाला नाही तर कडक उपायांचा देखील उपयोग करण्यास मी मागे पुढे पाहाणार नाही. तो उपाय कोणता तर जाती बहिष्कार वाईट काम करणाऱ्या माणसास ज्याप्रमाणे आपण वाळीत टाकतो त्याप्रमाणे या कार्याला मदत न करणा-यास वाळीत टाकले तर वावगे होईल, असे मला वाटत नाही. इतके सांगून आपण या कार्यास मदत करा, असे परत एकदा सांगून माझे भाषण संपवितो.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password