Categories

Most Viewed

04 डिसेंबर 1954 भाषण 1

ब्रह्मदेशात अस्पृश्यता नाही म्हणूनच तुम्हाला व्यापार व उद्योगधंद्यात प्रगती करता आली.

रंगून येथे वास्तव्य करीत असलेल्या आंध्र प्रदेशातील शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनच्या मंडळींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सत्काराची जंगी जाहीर सभा दिनांक 4 डिसेंबर 1954 रोजी घेतली होती. यापूर्वीच सदर मंडळींनी बाबासाहेबांच्या दर्शनाचा लाभ तेथील जनतेला व्हावा म्हणून प्रयत्न केला होता. परंतु बाबासाहेबांच्या आजारपणामुळे त्यांच्या प्रयत्नास यश आले नाही. परंतु दी वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धीस्ट कॉन्फरन्सच्या वेळी येथील जनतेची विनंती मान्य करून जाहीर सभेच्या कार्यक्रमास हजर राहाण्याची डॉ. बाबासाहेबांनी संमती दिली. सदर दिवशी येथील प्रशस्त अशा भव्य हॉटेलात तेथील मंडळींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना टी पार्टी (चहापान) दिली. तत्प्रसंगी रंगून येथे व्यापारानिमित्त अगर इतर उद्योगधंद्यानिमित्त कायमचेच राहिलेले पाचशे प्रतिष्ठित हिंदी नागरिकही उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा या हॉटेलात प्रवेश होताच या सर्व नागरिकांनी उमे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.

चहापानानंतर सर्वांना उद्देशून डॉ. बाबासाहेबांनी फक्त 15 मिनिटेच भाषण केले. ते म्हणाले,

या ठिकाणी तुम्ही सर्व हिंदी लोक एकमेकांशी प्रेमाने व संघटनेने वागता है पाहून मला समाधान वाटते. आपल्या देशात हे दृश्य पाहावयास मिळत नाही. ब्रह्मदेशाचे उदाहरण आपल्यापुढे ठेवून तुम्ही वागलात तर तुमचा अभ्युदय झाल्याशिवाय राहाणार नाही. मला येथील शेड्यूल्ड कास्ट्सच्या लोकांनी या प्रशस्त हॉटेलात चहापान देऊन माझ्या विषयीचे प्रेम व्यक्त केले आहे. ही गोष्ट घडण्यास त्यांची सांपत्तिक परिस्थिती समाधानकारक असली पाहिजे. त्याशिवाय ही महान खर्चाची बाब घडून येणे शक्य नाही. तुम्ही सर्वांनी असेच बंधुभावाने वागावे एवढेच मी या ठिकाणी सांगू इच्छितो.

गेल्या वेळी मी आपणास भेट देऊ शकलो नाही. त्यावेळी मी आजारी होतो. आता देखील मला पाहिजे तसे बरे वाटत नाही, तरी पण आपली पुन्हा निराशा होऊ नये म्हणून आजच्या प्रसंगी मी या ठिकाणी उपस्थित राहिलो. या देशात राहाणाऱ्या आपल्या लोकांची सांपत्तिक परिस्थिती मला चांगली वाटते. मी असे ऐकतो की, आपल्यातील साधा मजूरदेखील रोज दहा कॅटस-रुपये मिळवितो. • तुमच्यापैकी काही लोक तांदळाचे व्यापारी आहेत. कोणी टिम्बर मर्चंटस् लाकडाचे व्यापारी आहेत. आपापल्या धंद्यात तुम्ही प्रगतिमान आहात, हे ऐकून मला समाधान वाटले. माझे सबंध आयुष्य मुंबईत गेले आहे. मुंबईतील आपल्या जनतेचेही माझ्यावर फार प्रेम आहे. ते सभा वगैरे भरवतात. पण तुमच्यासारखी टी पार्टी (चहापान) त्यांनी मला अजून तेथील ताजमहाल हॉटेलमध्ये दिलेली नाही. यावरून तुमच्या व त्यांच्या आर्थिक परिस्थितीत बरीच तफावत आहे असे दिसते. त्यांना असे का करता येत नाही. याचे कारण उघड आहे. तेथे अस्पृश्यता आहे. या देशात तिचे नावही नाही.

या ठिकाणी मला तुम्हाला एक गोष्ट सांगाविशी वाटते की, ज्या या ब्रह्मदेशात “अस्पृश्यता’ हा शब्द देखील माहीत नाही त्या देशात तुम्ही स्वतःला शेड्यूल्ड कास्ट्स म्हणवून का घेता ? शेड्यूल्ड कास्ट्स म्हणजे पददलित. आम्ही नीच हलक्या जातीचे लोक आहोत, असे या ब्रह्मी लोकांना तुम्ही स्वतः होऊन का सांगता ? तेव्हा पहिल्यांदा ही गोष्ट करा की शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन ही तुमची संस्थाच या देशातून नाहिशी करा. तुम्हास तुमची संघटनाच हवी असेल तर त्या संघटनेस मी तुम्हाला नवीन नाव सुचवीन पण स्वतःला शेड्यूल्ड कास्ट्स् म्हणवून घेऊ नका. तुमच्यासारखी वागणूक जर आम्हाला हिंदी सरकारने दिली तर मी देखील भारतात शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन ही संस्था अजिबात बंद करीन. परंतु अशी समानतेची वागणूक आम्हाला मिळत नाही. म्हणूनच आपल्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आम्हाला शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशन ही संस्था ठेवावी लागली.

दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगाविशी वाटते ती ही की, तुम्ही या देशात 20 ते 25 वर्षांहून अधिक काळ आहात, तर मग तुम्ही लोकांनी या देशाचे नागरिकत्व का पत्करले नाही. हिंदी नागरिकत्व चालू ठेवण्यात तुमचा काय फायदा आहे. ज्या देशातील लोकांच्या नसानसातून विषमता भरलेली आहे. अस्पृश्यतेचा मोठा कलंक ज्या देशाला लागलेला आहे. ज्या देशातील लोक अस्पृश्य लोकांची आर्थिक उन्नती होऊ देत नाहीत, त्या देशाचे नागरिकत्व चालू ठेवणे मुर्खपणाचे आहे. ब्रह्मी सरकारचे तुम्ही लोकांनी आभार मानावयास पाहिजे की, त्यांनी आपल्या घटनेत या देशात (ब्रह्मदेशात) आठ वर्षे राहात असलेल्या प्रत्येक इसमास या देशाचे कायद्याने नागरिकत्व पत्करता येईल, ही तरतूद करून ठेवली आहे. ती अभिनंदनीय आहे.

आमचे हिंदी सरकार व सिलोनी सरकार यांचा या नागरिकत्वाच्या बाबतीत केवढा मोठा झगडा चालू आहे. सिलोनी सरकार हिंदी लोकांचे नागरिकत्व मान्य करण्यास बिलकूल तयार नाही. या मानाने पाहाता ब्रह्मी सरकार किती तरी चांगले म्हणायचे. याकरिता तुम्ही लोकांनी विलंब न लावता या देशाचे नागरिकत्व अगोदर मान्य करा. या देशात अस्पृश्यता नाही म्हणूनच तुम्हाला व्यापारात व इतर उद्योगधंद्यात स्वतःची प्रगती करता आली. तुम्ही आपला नैतिक दर्जा वाढविला पाहिजे.

नंतर श्री राव, शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन प्रमुख यांनी तेथील जनतेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना चांदीच्या करंडीतून मानपत्र अर्पण करून त्यांचा गौरव केला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password