स्वतंत्र मजूर पक्षाचा प्रभाव.
रविवार तारीख 4 डिसेंबर 1938 रोजी रात्री 10 वाजता मुंबई फोरास रोड म्युनिसीपल सिमेंट चाळ नं. 18 येथील मंडळीच्या विद्यमाने लोकाग्रणी आणि मजूरांचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अध्यक्षतेखाली इमारत फंडाला मदत देण्याकरिता जंगी जाहीर सभा घेण्यात आलेली होती. सदर प्रसंगी मेसर्स प्रि. दोंदे. के. व्ही. चित्रे भाई प्रधान, आमदार डी. जी. जाधव, सी. एन. मोहिते, दादासाहेब गायकवाड, टी. एम. गुडेकर. मडके बुवा, रेवजी डोळस, एस. पी. धोत्रे, वडवलकर आणि केशवराव आडेकर वगैरे सद्गृहस्थ उपस्थित होते. लोक समुदाय तीन ते चार हजारावर होता. बरोबर 10 वाजता नियोजित अध्यक्ष बाबासाहेब आणि इतर युरोपियन पाहुणे मंडळी यांचे सभास्थानी आगमन होताच लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे हार्दिक स्वागत केले. नंतर सी. एन. मोहिते मास्तर नियोजित अध्यक्षाची सूचना आणण्यास उभे राहिले. त्यांनी इमारतीची किती आवश्यकता आहे हे लोकांस समजाऊन सांगितले. फोरास रोड म्युनिसीपल चाळ नं. 18 येथील हेल्थ डिपार्टमेन्ट मधील काम करणाऱ्या लोकांकडून आज 235 रूपये रोकड जमा करण्यात आलेले आहेत हे विशेष होय. तद्नंतर के. डी. शिर्के यांनी अनुमोदन दिल्यावर बाबासाहेब अध्यक्षस्थानी स्थानापन्न झाले. प्रथम मडके बुवा, रेवजी डोळस आणि प्रि. दोंदे साहेब यांची समयोचित भाषणे झाली.
मग डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बोलावयास उभे राहिले. त्यांनी बायबल मधील जुन्या करारातील ज्यू लोकाची हृदयविदारक व गुलामगिरीची कहाणी सांगितली. तीत ज्यू लोकाची गुलामगिरी व अस्पृश्यांची परिस्थिती यांच्यात किती फरक आहे हे समजाऊन सांगितले. नंतर महाडच्या सत्याग्रहापासून आजतागायतच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीचे सिंहावलोकन केले. इमारत फंडासंबंधी बोलताना ते म्हणाले, प्रत्येक चाळीतील लोकांनी आपल्यातर्फे पाच माणसांची कमिटी नेमून चाळीतील अठरा वर्षावरील स्त्री, पुरुषांची खानेसुमारी करावी. म्हणजे त्या चाळीतील लोकांकडून किती रुपये मिळाले पाहिजेत हे मला समजेल. प्रत्येक मनुष्याने व्यक्तीशः एक रुपया पेक्षा अधिक आपल्या ऐपती प्रमाणे पैसे द्यावेत. मुंबई स्कूल कमिटी खात्यातील प्रत्येक शिक्षकाकडून अर्धा पगार घेणार आहे. आज आपल्या कार्याचा व्याप जास्त प्रमाणात वाढल्यामुळे समाज व राजकारण यांची सूत्रे हलविण्याकरता स्वतःची इमारत असणे अत्यंत आवश्यक होय. आता दुसरी गोष्ट म्हणजे येती म्युनिसीपल निवडणूक होय. मी स्वतंत्र मजूर पक्षातर्फे सध्या नऊ उमेदवार उभे केलेले आहेत. त्यांना आपली सर्व मते देऊन निवडून आणले पाहिजे. सर्व राजकीय पक्ष काँग्रेसपुढे अगदी फिके पडलेले आहेत. काही नामशेष झालेले आहेत. पण आज एकटा स्वतंत्र मजूर पक्ष काँग्रेस विरोधी म्हणून उभा राहिलेला आहे. हा पक्ष गोरगरीब मजूरांचा आहे. तेव्हा तो पक्ष या म्युनिसीपल इलेक्शनमध्ये पूर्ण यशस्वी झाला पाहिजे. बरे असो. ज्या लोकांनी इमारत फंडाला 235 रुपये दिले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. इमारत फंडाला वर्गणी देणाऱ्यांची नावे जनता पत्रातून प्रसिद्ध करण्यात येतील. याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुमारे दोन तास अस्खलित, कळकळीने आणि अधिकार वाणीने भाषण केले. नंतर मोहिते मास्तर यांनी अध्यक्षांचे, जमलेल्या मंडळींचे आभार मानल्यानंतर पुष्पहार अर्पण करण्यात आले. साडेबारा वाजता सभेचे काम बरखास्त करण्यात आले. श्री. करडकर यांच्या जलशाचा कार्यक्रम करण्यात आला. नंतर हा इमारत फंडाचा समारंभ घडवून आणण्यात श्री. राजाराम हिराजी माटवणकर आणि कृष्णा काळू कुंभवडेकर यांनी अतिशय मेहेनत घेतली. तसेच गंगाबाई सातारकर यांनी सुद्धा कार्य पार पाडण्यात मदत केली.