Categories

Most Viewed

30 नोव्हेंबर 1945 भाषण 1

निवडणुकीच्या माध्यमातूनच राजकीय सत्ता हस्तगत करता येईल.

गुजरातेतील इतिहास प्रसिद्ध अहमदाबाद शहरी गांधी-वल्लभांच्या राज्यात साबरमतीच्या विस्तीर्ण तिरावर लाल दरवाजानजिक उभारलेल्या भव्य बुद्धनगरात दिनांक 29 व 30 नोव्हेंबर 1945 रोजी मुंबई प्रांतिक शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनचे प्रथम अधिवेशन अत्यंत उत्साहाने यशस्वीरित्या पार पडले. भारतीय अस्पृश्यांचे महान नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिनांक 30 रोजी या इतिहास प्रसिद्ध अधिवेशनास खास उपस्थित होते. त्याच्या आगमन प्रित्यर्थ अहमदाबादेच्या सर्व कामगारांनी गिरण्या बंद पाडूंन त्यांचे प्रचंड प्रमाणात स्वागत केले, ही गोष्ट अत्यंत अभिमानास्पद व भूषणावह म्हणून उल्लेखनीय होय. पहाटे पाच वाजेपासून अहमदाबाद स्टेशनवर हजारो लोकांचा समुदाय त्यांच्या स्वागतासाठी जमला होता. समता सैनिक दलाचे लढाऊ सैनिक या प्रचंड समुदायात शांतता व व्यवस्था राखण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते. अनेक संस्थांच्या व व्यक्तिच्यातर्फे पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. डॉ. आंबेडकर जिंदाबाद आंबेडकर कौन है दलितोंका देव है, दलित फेडरेशनचा विजय असो, अलग मताधिकार हासील करो या गगनभेदी घोषणांनी अहमदाबादचे सारे वातावरण दुमदुमून गेले होते. स्टेशनवर त्यांच्या खास सलूनमध्ये कम्युनिस्ट पार्टी, रॉयीस्ट पार्टी, हिंदू महासभा आदि पक्षांच्या पुढाऱ्यांनी आणि अनेक प्रमुख व्यक्तिनी त्यांच्या मुलाखती घेतल्यावर सत्कार केला. अहमदाबाद शहराचे वातावरण त्यांच्या आगमनाने अत्यंत उत्साहपूर्ण झालेले दिसत होते. आश्चर्याची नव्हे अभिमानाची गोष्ट ही की, याच दिवशी अहमदाबादेला मुंबईच्या गव्हर्नर साहेबांचे आगमन झाले. लोकांच्या प्रचंड समुदायात एक खादीधारी देशभक्त मान उंचावून डोकावत होता. गर्दीतून मोठ्या मुष्कीलीने धडपडत आलेला एक किसान चौकशी करू लागला, गांधी टोपीवाल्याने जबाब दिला. गव्हर्नर साब आवे छे ! माझ्या शेजारी उभा असलेला दूरच्या खेड्यातील एक अस्पृश्य तरुण गांधी भक्ताचा धिक्कार करून उत्तरला. बापडा कोई अंधाने गूंगा पण जाणे छे के बाबा आंबेडकर आवेला छे. त्याच्या या तिखट उत्तराने शरमिंदा होऊन त्या बनियाने हळूच तेथून पाय काढला. प्रांताध्यक्ष श्री. गायकवाड आणि ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी श्री. राजभोज यांनी दर्शनोत्सुक जनसमुदायास शांततेने परिषदेच्या स्थळी हजर राहण्याची व आपल्या पुढाऱ्याचा संदेश ऐकण्यासाठी प्रचंड संख्येत जमा होण्याची विनंती केल्यावर सर्व लोक शांततेने घरोघर निघून गेले. रात्री जागरण झाले असताही अनेक कार्यक्रम विश्रांती न घेता बाबासाहेबांनी पार पाडले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत भरगच्च कार्यक्रम आखण्यात आले होते. परंतु वेळेच्या अभावी काही कार्यक्रम साहजिकच रद्द करावे लागले. दुपारी रखिया रोडवरील कामगारांच्या चाळीत भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. जेवणाचा बेत डॉ. बाबासाहेबांच्या आग्रहावरून डाळ-भात-भाजी असा अगदी साधा होता. त्यांच्या समवेत फेडरेशनचे कार्यकर्ते आणि प्रतिनिधीही उपस्थित होते. भोजनोत्तर गुजरातमधील प्रचलित परिस्थितीसंबंधी अनेक कार्यकर्त्यांनी आपापले विचार मांडले. शेवटी अत्यंत साध्या सोप्या गुजराती भाषेत बाबासाहेबांनी फेडरेशनच्या कार्यासंबंधी व आगामी निवडणुकीसंबंधी बहुमोल अशा विधायक सूचना केल्यानंतर तेथून लगेच ते अहमदाबाद म्युनिसीपालिटीच्या मानपत्र समारंभास गेले. हा समारंभ आटोपून लगेच ते परिषदेसाठी खास उभारलेल्या बुद्ध नगरात प्रविष्ट झाले. त्यांच्या आगमनापूर्वी अनेक गुजराती कवींनी व शाहिरांनी समाज क्रांतीपर गाणी गाऊन श्रोत्यात उत्साह निर्माण केला. डॉ. बाबासाहेबांच्या आगमनाबरोबर जयघोष करून लोकांनी सारे वातावरण दणाणून सोडले. स्वागताध्यक्ष श्री. पी. एम. पटनी यांच्या भाषणानंतर टाळ्यांच्या प्रचंड गजरात व जयघोषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषण करण्यास उभे राहिले. ध्वनीक्षेपकांची व्यवस्था केलेली असल्यामुळे बुद्ध नगराच्या विस्तीर्ण जनसमुदायाने त्यांचे ओजस्वी भाषण अत्यंत शांतपणे आणि भक्तिभावाने श्रवण केले.

डॉ. बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले,
बंधुनो आणि भगिनींनो,
अध्यक्षांनी मला गुजरातीत बोलण्याची विनंती केली आहे. हिंदीत बोलणे मला चांगले जमले असते. गुजरातीत मी बोलू शकतो पण हल्ली तिचा थोडासा विसर पडला आहे. तरीपण मी गुजरातीत बोलण्याचा प्रयत्न करीत आहे. आजचा हा प्रचंड जनसमुदाय पाहून मला 1926 सालची आठवण होते. त्यावेळी मी या शहरात अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या बोडिंगच्या कामकाजासाठी आलो होतो. मला जाणणाऱ्या येथील काही सद्गृहस्थांनी माझी भेट घेऊन, मला इथे एखादी सभा करून जा अशी विनंती केली. त्यावेळी मी त्यांना सांगितले की, हे शहर तर काँग्रेसचे माहेरघर आहे. येथील लोक काँग्रेसवादी तर मी काँग्रेसविरोधी म्हणून प्रसिद्ध !’ परंतु मंडळींचा अतिशय आग्रह पाहून मी सभेला हजर राहून बोलण्याची संमती दिली. ही सभा येथील एका प्रशस्त हॉलमध्ये भरली होती व सभेच्या अध्यक्षस्थानी आपल्यातीलच एका जुन्या कार्यकर्त्याची योजना करण्यात आली होती. या सभेत मी माझ्या अनुभवाप्रमाणे बोललो. अध्यक्षांनी आपल्या भाषणात मला समज दिली की, “आम्ही लोक सर्व गांधींचे प्रजाजन आहोत. आम्ही गांधीला सोडू शकत नाही. तुम्ही तसा प्रयत्न केला तर त्याचा परिणाम वाईट होईल.” हे उद्गार मला चांगले आठवतात. त्या सभेला हजर असलेल्या आपल्यापैकी कुणीही सद्गृहस्थ हे सत्य असल्याचे सांगू शकेल. वीस वर्षापूर्वीचा हा अनुभव आणि आज येथे जमलेला प्रचंड समुदाय पाहून मला वाटते की, सत्य कधीही लोपत नाही. ते कधीतरी प्रगट होतेच होते. आज 1945 साली काँग्रेसचे केंद्र असलेल्या या अहमदाबाद शहरात अस्पृश्य लोक काँग्रेसविरोधी सामना करण्यास सिद्ध झाले आहेत. हेच ते सत्य होय (टाळ्या). आज मी येत्या निवडणुकासंबंधी बोलणार आहे. कोणावर टीका करण्याचा माझा उद्देश नाही. परंतु गेल्या वीस वर्षातील गांधींचे कुटील राजकारण आणि अस्पृश्य विरोधी कारस्थानांचा इतिहास सांगितल्याखेरीज गत्यंतर नाही. त्याशिवाय माझ्या म्हणण्याचा मतितार्थ आपल्या ध्यानात येणार नाही. म्हणून मला जे काही सांगायचे आहे ते कडवट असले तरी कटु सत्य असल्याचे आपल्या ध्यानात येईल.

गांधी अस्पृश्यांचे उद्धारकर्ते आहेत असे बोलले जाते, मी गेली वीस वर्षे याच गोष्टीचा विचार करीत आहे की, गांधी अस्पृश्यांचा उद्धार कसा करणार ? त्यांची खरोखरच तशी इच्छा आहे काय ? ह्याचा आपण विचार केला पाहिजे. राऊन्ड टेबल परिषदेला आम्ही गेलो, तेव्हा गांधींनी अस्पृश्योद्धार होईल तो राजकीय प्रगतीने नव्हे तर सामाजिक सुधारणाद्वाराच होईल, अशी घोषणा केली होती. गांधींच्या दृष्टीने ते कितपत खरे आहे हे त्यांचे तेच जाणोत. परंतु राजकीय हक्काखेरीज उन्नती अशक्य आहे असे माझे ठाम मत आहे. (टाळ्या). 1919 साली गांधींनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 1920 साली असहकारितेची चळवळ केली. बार्डोलीच्या सत्याग्रहात लाखो रुपये जमवून इंग्रजांना या देशातून हाकलून देण्याची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्याशिवाय आणि अस्पृश्यता व जातीभेद नष्ट झाल्याशिवाय स्वराज्य मिळणार नाही, असे जाहीर केले होते. पण जातीभेद व अस्पृश्यता नाहीशी करण्यासाठी त्यांनी काय केले? अस्पृश्यता निवारण्यासाठी एक मामुली कमिटी नेमून अस्पृश्यांचा उद्धार करण्याचे गांधी व काँग्रेसने ठरविले. पण त्यासाठी काही न करिता या कमिटीने अपुरे काम सोडून दिले आणि ते हिंदुमहासभेकडे सोपविले. इतर कामी लाखो रुपयांचा खर्च केला. पण अस्पृश्यासाठी 30 हजार रुपयेच खर्च केले इतके हे कार्य त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे वाटले! माझ्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या व्हॉट कॉंग्रेस अँड गांधी हॅव डन टू दी अनटचेबल्स (What Congress and Gandhi have done to the untouchables) ग्रंथात मी हे सर्व साधार स्पष्ट केले आहे. 1920 ते 1932 पर्यंत अस्पृश्यता निवारणाच्या वल्गना करण्यापलिकडे त्यांनी काहीच केले नाही. 1932 साली पुना करार झाला. त्यावेळी अस्पृश्यांच्या स्वतंत्र राजकीय हक्कांविरूद्ध गांधी आणि काँग्रेसने माझ्याशी झगडा केला. हिंदूंपासून अस्पृश्य वर्ग वेगळा झाल्याने हिंदू निर्बल होवू नयेत म्हणून गांधींनी येरवड्याच्या तुरुंगात प्राणांतिक उपोषण केले. या प्रसंगी घडून आलेल्या करारातूनच हरिजन सेवक संघ जन्माला आला. तेव्हापासून आज तेरा वर्षात या संघाने अस्पृश्यांसाठी काय केले ? हा माझा जाहीर सवाल आहे. तुमच्या शिक्षणासाठी त्याने कोणते मोठे कार्य केले ! आमच्या हाती सत्ता असेल तर आम्ही काय करू शकतो याचे उदाहरण म्हणून गेल्या तीन वर्षातील माझी कामगिरी तुम्हा पुढे आहेच! या तीन वर्षात मी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी दरवर्षी तीन लाख रुपये मिळविले. आता पाच लाख रुपये मिळतील. पाचशे विद्यार्थी आज कॉलेज शिक्षण घेत असून तीस विद्यार्थी विलायतेत उच्च शिक्षणासाठी गेले आहेत. तुलना करा आणि ध्यानी आणा, हे कार्य गांधीने वा काँग्रेसने केले नाही. हरिजन सेवक संघाच्या कार्याने आमचा कसा काय उद्धार होईल हेच मला काही कळत नाही ! तीन-चार रुपड्याच्या शिष्यवृत्त्या आणि मंदीरे खुली करणे या तुटपुंज्या गोष्टींचा काय गाजावाजा ! आम्ही अस्पृश्यांना मंदीरे खुली केली असे दाखविले जाते. पण त्याचा परिणाम काय झाला. स्वाभिमानी अस्पृश्य तर या मंदिराकडे ढुंकूनही पाहात नाहीत! त्रावणकोर सोडून इतर ठिकाणी कोणती मंदीरे खुली केली ? ज्यात कुत्रो अने गधेडो जातात अशीच मंदिरे खुली केली ? (हंशा) ज्या सामाजिक सुधारणेचा हे लोक डांगोरा पिटतात त्याची ही त-हा. आता राजकारण पहा, 1932 साली राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये मुसलमान खिश्चन वगैरे अल्पसंख्यांकांप्रमाणेच अस्पृश्यांना देखील राजकीय हक्क मिळालेच पाहिजेत म्हणून मी जोरदार लढा केला. आज काही मूर्ख आणि बदमाष लोक जनतेत असा खोटा प्रचार करतात की, हे राजकीय हक्क गांधींनी मिळविलेत. पण ते साफ खोटे आहे. अस्पृश्यांना सुईच्या अग्राइतकेही राजकीय हक्क मिळू नयेत म्हणून मुसलमानांशी गुप्त संधान बांधणाऱ्या गांधींनी ते मिळविले नसून मी मिळविले आहेत. (टाळ्या) जातीय निर्णयाने आपणाला स्वतंत्र मतदार संघ मिळाला होता. त्यामुळे आपण आपला योग्य प्रतिनिधी निवडून देवू शकलो असतोच, पण आपणास त्याखेरीज मिळालेला सार्वत्रिक मताधिकारही गाजवू शकलो असतो. पण गांधींनी प्रायोपवेषनाची धमकी दिली. त्यापूर्वी आंबेडकर कोण झाडाचा पाला आहे असे म्हणणारे काँग्रेसजन घाबरले व म्हणू लागले ‘आंबेडकर कृपा करा आणि गांधी मरतो आहे त्याला वाचवा’ पण माझ्यापुढे गांधींच्या जिवापेक्षाही दहा कोटी अस्पृश्यांच्या कल्याणाचा श्रेष्ठ प्रश्न होता. गांधी काकूळतीस आला आणि म्हणाला ‘आंबेडकर माझा जीव तुमच्या हाती आहे.’ त्यासाठी मी पुना करार केला. पण गांधीने काय केले. उपकार जाणणे राहिले. कृतघ्नपणा केला. अस्पृश्यांचा गळा कापला. तुमच्या राजकीय हक्काला पण गांधीने विरोध करणार नाही या वचनाला हरताळ फासून काँग्रेसने आमच्या उमेदवारांना विरोधक म्हणून स्वार्थी व नालायक लोक उभे केले. विचार करा. हे काय झाले. हे मी कशासाठी मिळविले ?

दरेक गावात एकही दिवस असा जात नाही की आपल्यावर अत्याचार होत नाहीत! येथील एका नजीकच्या गावची हकीकत ऐकून तुम्हाला भयंकर संताप वाटेल. तेथल्या अस्पृश्य लोकांवर सामाजिक बहिष्कार पुकारला. सतत एकवीस दिवस त्यांना नाही नाही त्या प्रकारे छळल्यानंतर स्पृश्य हिंदुनी त्यांना धमकी दिली की, तुम्ही ‘मेलेला पार्डा उचललाच पाहिजे नाहीतर त्याबद्दल तुम्ही 50 रुपये दंड द्या. वेठ करून रस्ता दुरुस्त करा. नाहीतर तुम्हाला येथे राहणे मुष्कील करू. दुसरे कविठा गावचे उदाहरण, त्यांच्या झोपड्या उठविल्या. पाण्यात घासलेट टाकले. असे अनेक प्रकारे तेथल्या अस्पृश्य लोकांना छळले. तेथल्या लोकांनी गांधींकडे आपली गा-हाणी पाठविली. पण गांधीने काय केले. त्यांना गाव सोडून जाण्याचा सल्ला दिला. (शेम-शेम) जुलूम करणारांना शिक्षा करा किंवा त्याच्यावर कायदेशीर इलाज करा. असा सल्ला गांधीने दिला नाही. ही गांधींची नीती. कायदे मंडळाच्या जागांवर आमचे उमेदवार पाठविण्याचा हेतू आम्हावर होणारा जोरजुलूम नाहिसा करणे होय. आमचा उमेदवार तेथे जावून आमची गा-हाणी मांडील. आम्हावरच्या जुलूमाची दाद मांगेल. आमच्या हितासाठी सतत झगडेल. कायदे मंडळाच्या निवडणुका लढविणे हाच आमचा अंतिम हेतू आहे. काँग्रेसला विचारा. काय केले ? तिकीटावर निवडून आलेल्या हरीजन उमेदवारांना दोन वर्षे सात महिन्याच्या तुमच्या कारकिर्दीत तुम्ही अस्पृश्यांसाठी त्यांनी एकतरी सवाल विचारला आहे काय ? तुमच्या हिताचा एकतरी ठराव केला आहे काय ? तर मग ते तिथे कशाला गेले ? व्हॉइसरॉयच्या नव्या घोषणेप्रमाणे मध्यवर्ती सरकारात अस्पृश्यांचा प्रतिनिधी घेण्याचे जाहीर केले गेले. पण गांधीने तुमच्याविरुद्ध तक्रार केली. प्रतिनिधी म्हणजे मला तेथून काढण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न आजही चालू आहे.

तुमचा काँग्रेसच्या मागे लागलेल्या हरिजनांनी गांधीकडे शिष्टाई केली. गांधीने त्यांना सांगितले की, तुम्हाला काही एक मिळणार नाही. या सर्व परिस्थितीचा तुम्ही शांत चित्ताने विचार करा. ही वेळ मोठी आणीबाणीची आहे. हजारो वर्षापासून आपणांस गुलामगिरीत डांबून ठेवण्यात आले आहे. आजही त्या गुलामगिरीचे चटके आपण सोशीत आहोत. यापुढे या गुलामगिरीचा समूळ उच्छेद करायला तुम्ही तयार व्हा. त्यासाठी आपण राजकीय सामर्थ्य (सत्ता) मिळविले पाहिजे. गांधींच्या ढोंगी हृदय पटलावर विश्वास ठेवू नका. यापुढे आणखी दोन हजार वर्षे गेली तरी परिवर्तन होणार नाही. दुसऱ्यावर विसंबून राहू नका. आपला उद्धार आपणच केला पाहिजे, राजकीय सत्ता मिळाल्याशिवाय आपला उद्धार होणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. (टाळ्या) या दृष्टीने आगामी निवडणुकांचे अतिशय महत्त्व आहे. आमचा लढा हा कौरव पांडवांच्या संग्रामासारखा आहे. हिंदू आणि अस्पृश्यातील हा संग्राम अखेरचाच आहे. या निवडणूकातून या देशाचे भवितव्य ठरविणारी घटना समिती निर्माण होणार आहे. तीमध्ये बहूसंख्यांक आणि अल्पसंख्यांक जमाती यांचे संबंध याचा निर्णय लागेल. आपले योग्य आणि लायक उमेदवार गेले पाहिजेत. त्यासाठी प्रचंड प्रयत्न झाला पाहिजे. कायदेमंडळातील आपल्या सर्व जागा आपण मिळवल्या पाहिजेत. नवी राजकीय घटना येवू घातली आहे. काँग्रेस आणि हिंदू महासभा त्यावेळेस तहनामा करील आणि हे हिंदू लोक हजार वर्षांपूर्वीची परिस्थिती परत आणतील हे लक्षात ठेवा. काँग्रेसचे लोक स्वराज्याचा टाहो फोडतात पण माझा त्यांना सवाल आहे. आमच्यावर कोणाचे राज्य होणार ? पाटीदार-धनिक, तालुकदार भांडवलदार की वरिष्ठ हिंदुंचे राज्य ? गेली वीस वर्षे मी हेच विचारतो आहे. इतर कुणाहीपेक्षा स्वराज्याची निकड आम्हाला जास्त आहे. आम्हाला आमचे राज्य पाहिजे आहे. तेच आपले स्वराज्य खरे आहे. गेली लढाई सुरु झाली तेव्हा काँग्रेसने सरकार बरोबर असहकार पुकारला. लढाई संपल्यावर स्वराज्य देण्याचे वचन द्याल तरच आम्ही मदत करू असे सरकारला काँग्रेसने सांगितले. काँग्रेसने सरकारला जो सवाल केला तोच माझा काँग्रेसला सवाल आहे. न्याय- नीती-सचोटी प्रामाणिकपणा असेल तर त्यांनी स्वराज्यात अस्पृश्यांना योग्य प्रतिनिधीत्व देऊन शिक्षण, नोकऱ्या आणि सामाजिक प्रगतीचे बाबतीत स्वराज्यात अस्पृश्यांना योग्य सवलती आणि संरक्षण देवू अशी हमी द्यावी. पण ते तसे आश्वासन देत नाहीत. त्याबाबत काही बोलत नाहीत. जो बोलत नाही त्याच्या पोटात काही काळेबेरे असते. विष असते. हे लक्षात घ्या. माझ्या गुजराती बांधव हो! मला महाराष्ट्राची काही एक चिंता वाटत नाही. कारण ते संघटीत आहेत. ते कोणाला फसू शकत नाहीत. संघटनेच्या प्रचंड सामर्थ्यामुळे ते विरोधकांचा धुव्वा उडवितील याची मला खात्री आहे. महाराष्ट्राप्रमाणे गुजरातेत अस्पृश्यांसाठी चार जागा आहेत. या चारीही जागा फेडरेशन लढविणार, लढविल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. आमच्या विरोधकांजवळ प्रचार-पैसा-माणूसबळ विपूल आहे. हे आम्ही जाणतो. पण त्यांच्या जोरावर विजय मिळविणे हा काही खरा विजय नव्हे. आम्ही मारून मरू पण या संग्रामातून पळणार नाही. हा आमचा निश्चय आहे. तो सफल होणार करणे आपल्या हाती आहे. काँग्रेसच्या खोट्या प्रचाराला व लाचलुचपतीला ठोकरीने उडवा. तीर्थयात्रा पायी केल्याने पुण्य लाभते असे म्हणतात. त्याचप्रमाणे तुम्ही येत्या निवडणुकीत आपल्या समाजाच्या उद्धाराचे पुण्य संपादण्यासाठी स्वतः पायी जावून, फेडरेशनच्याच उमेदवारांना मते द्या आणि त्यांना निवडून आणा. अखिल भारतीय दलित फेडरेशन हीच आपली एकमेव अशी राजकीय संस्था आहे तिच्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही एकत्रित व्हा. शेवटी मला तुम्हाला एकच गोष्ट सांगावयाची आहे. या अहमदाबाद शहरात मील मजदूरांची प्रचंड संख्या आहे. हे मजूर बहुसंख्यांक अस्पृश्य आहेत. कायदे मंडळात या शहरातील कामगारांच्या प्रतिनिधींसाठी दोन जागा आहेत. गेल्यावेळी येथील मजूर महाजन या काँग्रेसवादी संस्थेने अस्पृश्य कामगारांच्या मतावर गुलजारीलाल नंदा व खंडूभाई देसाई यांना कायदेमंडळात निवडून पाठविले. हे आपले प्रतिनिधी होवू शकतात काय ? यावेळी या दोनही जागा आपण लढवून आपलेच उमेदवार निवडून आणू. भांडवलदार व काँग्रेस यांच्या तंत्राने चालणाऱ्या मजूर महाजन या संस्थावर विश्वास ठेवू नका, शेवटी तुम्हा सर्वांस असा इशारा देतो. भविष्य ओळखा, आपली गुलामगिरी नष्ट करावयासाठी आगामी निवडणूका जिंका आणि विजय मिळवा. ( प्रचंड टाळ्या व जयघोष ).

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password