तारीख 27 नोव्हेंबर 1927 रोजी सकाळी विषयनियामक कमिटीची बैठक भरविण्यात आली. सदर बैठकीत खाली लिहिलेले ठराव परिषदेपुढे मांडण्याकरिता सर्वानुमते ठरविण्यात आले. परिषदेच्या कामास रविवारी 11.30 वाजता डॉ. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरवात झाली.
परिषदेत खालील ठराव पास झाले.
(1) गीतेत सांगितलेल्या गुणकर्म विभागशः तत्त्वांची पायमल्ली करून जन्मजाती विभागशः या तत्त्वावर समाजाची रचना करण्यात आल्यामुळे हिंदू समाजाचा सर्वस्वी घात झाला आहे असे या परिषदेचे ठाम मत आहे. यास्तव ही परिषद हिंदू धर्माधिकारी वर्गास असे सुचविते की, त्यांनी प्रचलित चातुर्वर्ण्याची कल्पना सोडून हिंदू समाजाचा एक वर्ण होईल अशा प्रकारची पुनर्घटना करण्याचे कार्य त्वरित हाती घ्यावे. या बाबतीत दिरंगाई अगर कसूर झाल्यास चातुर्वर्ण्याच्या चौकटीत सापडून चिरडून गेलेल्या अस्पृश्य वर्गास आपली सुटका करून घेण्यास धर्मांतर करावे की काय, याचा विचार करावा लागेल.
(2) या परिषदेचे असे मत आहे की. श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठोबाचे देवालयात प्रवेश होईल अशी व्यवस्था अस्पृश्य वर्गानी करावी व प्रसंग पडल्यास येथे सत्याग्रह सुध्दा करण्यात यावा.
(3) ही परिषद असे ठरविते की, वतनदार महारांच्या गा-हाण्याची दाद लावून घेण्याची कायमची व्यवस्था करण्याकरिता दरेक जिल्ह्यास एक महार वतनदार संघ स्थापन करण्यात यावा. त्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्याकरिता एक संघ स्थापन करण्यास व गावागणिक वार्षिक वर्गणी रूपये पाच घेण्यास आपली मंजुरी देत आहे व संघाचे चालकत्व खालील गृहस्थांकडे सोपवीत आहे.
सोलापूर तालुका – विश्वनाथ मेघाजी बंदसोडे
पंढरपूर तालुका- बापू ऐलूनी सर्वगोड
करमाळे तालुका – गोविंद गोपाळ कांबळे
माळशिरस तालुका–तात्याबा पांडुरंग सावंत
सांगोले तालुका-चोखा शिंदू काटे
मांढे तालुका – पिराजी मरीबा सरवदे
बार्शी तालुका-सखाराम महादू बोकेफोडे
सोलापूर शहर-जिवाप्पा सुभानराव ऐदाळे
सेक्रेटरी- हरिभाऊ तोरणे
वरील नेमलेल्या लोकांस या संघाचे नियम तयार करण्याचा अधिकार ही सभा देत आहे आणि त्यांनी केलेले नियम पुढील वतनदार जिल्हा सभेत मंजूर करुन घ्यावेत व ती सभा निदान दोन वर्षाच्या आत भरविण्यात यावी.
(4) सोलापूर, पंढरपूर वगैरे म्युनिसीपालिटीच्या गावी आणि जिल्ह्यातील रातंजन, कारी देगाव वगैरे गावी महारांच्या मालकीच्या जागा गावठाणामध्ये सामील करण्यात आल्या आहेत, त्यामुळे महारांचे अतिशय नुकसान झाले आहे. तरी जिल्ह्याच्या कलेक्टरास या बाबतीत फेरचौकशी करण्याची ही सभा विनंती करते.
(5) या जिल्ह्यात ज्या गावी महारांना वतनी इनाम जमीनी नाहीत अशा गावच्या महार लोकांना त्यांच्या गावी जर पडित अगर फॉरेस्ट जमीनी असतील तर त्या जमीनी त्यांना वतन इनाम म्हणून देण्यात याव्या.
(6) बेलापूर मासणूर, राळेरास, पानगाव, चिखरडे कोसगाव चाकुरे, शिखावी, मेडद, दहिगाव, भांबुर्डी, रातजन, सुरडी, गुरसाळे ता. माळशिरस, लोणंद या गावात पाटील कुळकर्ण्याच्या चिथावणीवरून रयत लोकांनी कट करून महारांना गावातून हाकून देण्याचा घाट घातला आहे. तरी सदरहू गावात होत असलेल्या जुलूमाची चौकशी सरकारने करून महारांचे संरक्षण करण्यास योग्य तो उपाय योजावा. अशी या संस्थेची आग्रहाची विनंती आहे.
(7) या सोलापूर जिल्हा वतनदार महार परिषदेचे असे मत आहे की, जिल्ह्या-जिल्ह्यातील महार लोकांची आर्थिक गुलामगिरी नाहीशी करण्यासाठी व त्यांचा संसार अधिक सुखमय व्हावा म्हणून प्रत्येक जिल्हा वतनदार महार संघाने सहकारी मंडळ्या स्थापन करण्याची सूत कातणे व कापड विणणे या कामांचा प्रसार करण्याची व सहकारी शेतवर्ग वसाहती स्थापन करण्याची शक्य तितक्या लवकर व्यवस्था करावी.
(8) या सभेची सरकारला अशी विनंती आहे की, फॉरेस्ट जमीनी इतर वर्गांच्या लोकांना देण्यापूर्वी अस्पृश्यांच्या अर्जाचा विचार प्रथम करण्यात यावा व जर ज्या अटीवर फॉरेस्ट जमीन देण्याचे ठरले असेल त्या अटी अस्पृश्य वर्गातील माणसास कबूल असतील तर इतर जातीतील अर्जदारास न देता त्या अस्पृश्य वर्गातील अर्जदारासच देण्यात याव्या.
वरील ठरावावर मेसर्स सीताराम नामदेव शिवतरकर, धोंडीराम गायकवाड, बोरकर, माने, कांबळे, बंदसोडे, गोविंद कांबळे, वेसकर, शिवणकर, बोकेफोडे, साबळे, तोरणे या वक्त्यांची समयाला अनुसरून भाषणे झाली.
येणेप्रमाणे ठराव पास झाल्यावर अध्यक्षाचे व आलेल्या मंडळीचे आभार: मानल्यावर हारतुरे झाले नंतर डॉ. आंबेडकर यांच्या जयजयकारात परिषदेचे काम संपले.