Categories

Most Viewed

25 नोव्हेंबर दिनविशेष

दिनांक 25 नोव्हेंबर 1927
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे ज्येष्ठ बंधू बाळाराम आंबेडकर यांच्या अंत्ययात्रेस हजर राहू शकले नसल्याकारणाने त्यांच्या गैरहजेरीत जे अस्पृश्य बंधू प्रेतयात्रेस हजर होते त्यांच्या प्रती ऋणनिर्देश करताना त्यांनी बहिष्कृत भारत या अंकात त्यांचे आभार मानले. त्यात ते म्हणतात की, माझ्या वडील बंधूच्या मरण समय मी मुंबईत नव्हतो. अंबादेवीच्या सत्याग्रहासाठी जी अमरावती येथे 13 नोव्हेंबर रोजी माझ्या अध्यक्षतेखाली परिषद भरण्याचे ठरले होते त्या परिषदेला मी गेलो होतो. माझ्या गैरहजेरीत ज्या 3 ते 4 हजार अस्पृश्य बंधूनी प्रेत यात्रेस हजर राहून असल्या दुःखप्रसंगी आपली सहानुभूती दर्शविली त्या सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे.

दिनांक 25 नोव्हेंबर 1948
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घटना कशी प्रभावी आहे व त्यात काय काय तरतुदी आहेत याचे सखोल विवेचन संसदेत केले.

दिनांक 25 नोव्हेंबर 1949
भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत शेवटचे भाषण केले. त्यांनी सांगितले की, “राजकीय पक्षांनी स्वत:च्या तत्व प्रणालीला देशापेक्षा मोठे मानले तर स्वातंत्र्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही.”

दिनांक 25 नोव्हेंबर 1949
घटना समितीतील वाद-विवादला उत्तर देताना भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की, “26 जानेवारी 1950 रोजी आम्हाला राजकीय समता लाभेल. पण सामाजिक आणि आर्थिक जीवनात असमानता राहील. जर ही विसंगती आपण लवकरात लवकर नष्ट करण्याचा प्रयत्न केला नाही तर, ज्यांना या विषमतेची झळ पोहोचलेली आहे, ते लोक घटना समितीने अत्यंत परिश्रमपूर्वक उभारलेला हा राजकीय लोकशाहीचा मनोरा उद्ध्वस्त करुन टाकल्या वाचून राहणार नाहीत.”

दिनांक 25 नोव्हेंबर 1951
शेड्युलड कास्टस फेडरेशन आणि समाजवादी पक्षाच्या वतीने शिवाजी पार्क दादर मुंबई येथे झालेल्या निवडणूक प्रचाराच्या जंगी सभेत विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकरांनी पंडित नेहरूंच्या धोरणावर टीका केली.

दिनांक 25 नोव्हेंबर 1956
काठमांडू वरून परत येत असतांना सायंकाळी सारनाथ येथील मूलगंधकुटी विहाराच्या मैदानात महाबोधी सभेद्वारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वागत प्रित्यर्थ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . सुरुवातीला मंगलाचरण झाल्यानंतर लद्दाखचे लामा लोबजड् यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खदा ( विशेष वस्त्रे ) प्रदान करण्यात आली . त्यानंतर वाराणसी च्या 18 संस्थानी त्यांना हार प्रदान करण्यात आला. सेवासंगम ट्रस्टच्या डॉ. एन. एन. शर्मा यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दोन सुंदर सुवर्ण स्मृतिचिन्ह भेट दिले. सदरहु कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ही सभा महाबोधिच्या बुद्ध विहाराच्या आवारात धम्मेक स्तुपाच्या सावलीत होती. तथागत गौतम बुद्धाने ज्या ठिकाणी पंचवर्गीय भिक्खुना आपला पहिला उपदेश करून धम्मचक्र प्रवर्तन केले त्या जागी सम्राट अशोकाने एक स्तूप उभारला . त्या स्तुपास धम्मेक स्तूप असे नाव आहे. तेथेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जनतेला उद्देशून शेवटचे भाषण व्हावे हा ह्रदयसंगम होय. बाबासाहेबांसंबंधी चार शब्द सांगताना पुज्य भिक्खु   धम्मरक्षित म्हणाले , “बौद्ध देशात अशी श्रद्धामय समजूत प्रचलित आहे की , गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणापासून अडीच हजार वर्षानी भारतात बौद्ध धम्माचे पुनरुत्थान घडणार आहे. ते कार्य जो बोधिसत्व तडीस नेईल , तो आज बाबासाहेब यांच्या रूपाने आपल्यामध्ये उपस्थित आहे, अशी माझी श्रद्धा आहे.  याच सारनाथ 2500 वर्षांपूर्वी पाच भिक्खु समोर आजच्या सारख्याच एका रविवारी या समोरच्या धम्मेक स्तुपाच्या जागी भगवंतानी धम्मचक्राचे प्रवर्तन केले. त्याच धम्मचक्राला नागपुर येथे गती देऊन, लाखों लोकांच्या ह्रुदयात धम्माचा पवित्र संदेश ज्याने नेऊन पोहचविला , त्या महापुरुषाचे आज आम्ही स्वागत करीत आहोत.” सारनाथचे प्रशांत व पवित्र वातावरण सभोवार बसलेली जनता आणि सिलोन, तिबेट, बर्मा, जपान या देशातील काही लामा, भिक्खु, उपासक मंडळी या सर्व घटनांमुळे की काय बाबासाहेबांचे मन भरून आले.  पाणावलेल्या डोळ्यांनी आणि भरल्या कंठाने केलेले ते करूणिक भाषण होते.

दिनांक 25 नोव्हेंबर 1956
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी काशी विद्यापीठाचा विद्यार्थी परिषदेचे उद्घाटन केले. उद्घाटनपर भाषणात त्यांनी सांगितले की, “बुद्ध धर्म हिंदू धर्माची एक शाखा आहे हा खोडसाळ प्रचार होय.” सदर भाषण धर्मदूध मासिक मध्ये डिसेंबर 1956 रोजी प्रकाशित झाले.

दिनांक 25 नोव्हेंबर 1956
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बनारस हिंदू विद्यापीठात विद्यार्थी परिषदेचे उद्घाटन केले विद्यार्थ्यांसमोर भाषण करताना त्यांनी सांगितले की, “बौद्ध धर्म समुद्रासारखा अथांग आहे ज्यात भेदभाव नाही. तो मानव धर्म आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी स्वीकार करावा.” हे त्यांचे शेवटचे जाहीर भाषण होय.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password