Categories

Most Viewed

26 नोव्हेंबर 1927 भाषण

अस्पृश्योन्नतीचा आर्थिक पाया.

पूर्वी प्रसिद्ध केल्याप्रमाणे शनिवार तारीख 26 आणि रविवार तारीख 27 नोव्हेंबर 1927 रोजी सोलापूर जिल्हा वतनदार महार परिषदेचे दुसरे अधिवेशन सोलापूर मुक्कामी डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते. परिषदेला सोलापूर जिल्ह्यातील दरेक खेड्यातील प्रतिनिधी आले होते. तारीख 26 रोजी शनिवारी पाच वाजल्यापासूनच लोकांची अलोट गर्दी जमण्यास सुरुवात झाली. सर्वांचे डोळे डॉ. आंबेडकर साहेबांच्या येण्याचे वाटेकडे लागून राहिले होते. बरोबर सात वाजता डॉ. आंबेडकर साहेब आपल्या परिवारातील मंडळीसह सभामंडपात आले. त्यांच्या येण्याबरोबर सर्व मंडळीने उभे राहून प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. नंतर मुलांनी ईशस्तुतिपर गायन म्हटल्यावर परिषदेचे स्वागताध्यक्ष जिवाप्पा ऐदाळे यांनी परिषदेच्या कामास सुरवात केली व त्यांचे स्वागतपर भाषण झाले.

नंतर अध्यक्ष डॉ. आंबेडकर साहेब यांचे सुविचार परिप्लुत असे भाषण झाले. डॉ. आंबेडकर यांचे भाषण चालू असता सर्व लोक अगदी चित्रासारखे तटस्थ होऊन शांत चित्ताने ऐकत होते. त्यांचे भाषण अगदी साधे पण मार्मिक आणि परिणामकारक झाले. ते म्हणाले,

सद्गृहस्थ हो!
गेल्या मार्च महिन्याच्या 18 तारखेस महाड येथे जी अस्पृश्य वर्गाची एक परिषद भरली होती, त्या परिषदेने आपले सार्वजनिक हक्क बजाविण्याच्या हेतूने महाड येथील चवदार तळ्यावर जाऊन पाणी घेण्याचा जो उपक्रम केला त्यामुळे ती परिषद अस्पृश्योन्नतीच्या इतिहासात चिरस्मरणीय झाली आहे. याबद्दल काहीच शंका नाही. कारण स्थानिक स्पृश्य लोकांनी प्रतिकार करून चवदार तळ्यासारख्या सार्वजनिक पाणवठ्याच्या ठिकाणी अस्पृश्यांना पाणी भरू देणार नाही, असा दुराग्रह धरला त्या वेळीच महाड म्हणजे आपण पानिपत समजतो व ते पुन्हा काबीज केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असे त्या परिषदेच्या चालकांनी तत्क्षणी जाहीर केले. इतकेच नव्हे, तर प्रसंग पडल्यास या कार्याच्या सिद्धीसाठी सत्याग्रह करून बोलला बोल साच करण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली.

ही वार्ता प्रसिद्ध झाल्याबरोबर अस्पृश्य लोकांस स्पृश्य लोकांकडून उपदेश करण्यास सुरुवात झाली. महाडचे प्रकरण घडते न घडते तोच ज्यांना काहीच कळत नसले, तरी हिंदुस्थानातील ‘हवा पाणी कळते’ असा दंभ धरणाऱ्या चित्राव शास्त्र्यांनी मोठ्या गंभीर शब्दात सांगितले की, “स्पृश्य आणि अस्पृश्य यांच्या लोकसंख्येतील फरक या चळवळी करताना केव्हाही ध्यानात घेतला पाहिजे. आपल्या मराठी भागात तरी तीन भाग स्पृश्य आणि चवथा अस्पृश्यांचा अशी स्थिती आहे. स्पृश्यांमध्ये कितीही भेद व विरोध असले तरी अस्पृश्यतेबद्दल सर्वांचे एकच मत आहे. याचा अनुभव महाड वगैरे स्थळी नित्यशः येतच आहे. अस्पृश्यांची उपजीविका सर्वस्वी अशा वृत्तीच्या स्पृश्यांच्या हातात आहे. ज्या दिवशी अस्पृश्यांची उपजीविका स्वतंत्र होईल व ते स्वतःच्या मानवी हक्कांकरिता स्वतःचे जीवितही वेचण्यास तयार होतील तो दिवस अस्पृश्यांच्या काय पण हिंदू व हिंदुस्थान यांच्या दृष्टीनेही काही वेगळाच असेल यात शंका नाही.” एका हाताने हिंदू संघटनेच्या कार्याकरिता व दुसऱ्या हाताने स्वजातीच्या श्रेष्ठत्त्वासाठी रण माजवणाऱ्या मुंबईतील एका साप्ताहिक पत्रकर्त्यानेही अशाच प्रकारचा भेसूर सूर काढला आहे. हे संपादक महाशय म्हणतात. सत्याग्रह हा शब्द कानाला फार गोड लागतो ही गोष्ट खरी आहे पण सत्याग्रह हे दुधारी शस्त्र आहे हेही तितकेच खरे आहे. सत्याग्रहाच्या जोरावर डॉ. आंबेडकर हे उद्या आपल्या अनुयायांसह महाडच्या तलावाचे पाणी पितील, पण या त्यांच्या क्रियेची प्रतिक्रिया जेव्हा गावोगाव सुरू होऊ लागेल तेव्हा गरीब बिचाऱ्या अस्पृश्यांची वैलातून काढून चुलीत टाकल्याप्रमाणे जी स्थिती होईल तिला जबाबदार कोण! अस्पृश्यांचा एक दोन ठिकाणचा सत्याग्रह सिद्धिस गेल्याने उभ्या हिंदुस्थानातली अस्पृश्यता नष्ट होईल अशी डॉक्टर साहेबांची समजूत आहे काय ? आमचे तर असे ठाम मत आहे की, डॉक्टर साहेबांच्या या सत्याग्रहाचे पर्यवसान भयंकर सामाजिक कलहात व कदाचित रक्तपातातही होणार!”

जसे या प्रांतातील लोक महाड येथे सत्याग्रह करणाऱ्या अस्पृश्य लोकास ही धोक्याची सूचना देत आहेत तसेच वऱ्हाड प्रांतातील लोक अमरावती येथील अंबा देवीच्या देवळात जाण्यासाठी सत्याग्रह करण्यास सिद्ध झालेल्या अस्पृश्य लोकांसही देत आहेत, असे पुणे येथे प्रसिद्ध होणाऱ्या ‘स्वराज्य’ पत्रावरून समजते. अमरावती येथील श्री हनुमान व्यायाम मंदिराच्या पटांगणात स्पृश्याची एक जाहीर सभा गेल्या ऑक्टोबर महिन्यात भरली होती. तीत अस्पृश्य वर्गातील लोकास असे बजाविण्यात आले की, तुम्ही दरिद्री व परोपजीवी असल्याकारणाने स्पृश्य हिंदुंची मने दुखवून व धमक्या देऊन तुम्ही हा प्रश्न नेटास लावल्यास तुम्हाला मिळत असलेला आश्रय बंद करून स्पृश्य लोक उपासमारीने तुम्हास वठणीवर आणतील!

संपत्ती ही राष्ट्राच्या भरभराटीस मोठी कारणीभूत अशी वस्तू आहे. या दृष्टीने तिचा संग्रह करणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु संपत्तीचा उपयोग गरीब प्रजेस जखडून ठेवण्याकडे किंवा तिची वाढ खुंटविण्याकडे आणि आपली प्रौढी व वर्चस्व माजविण्याकडे जेव्हा संपत्तीवान लोक करतात तेव्हा त्यांच्या संपत्तीला स्त्रकारांनी आसुरी संपत्ती असे म्हटले आहे व तिचा धिक्कार केला आहे. ही धर्मशास्त्राची शिकवण जे आम्हास उपदेश करीत आहेत त्यांनाही मान्य आहे. तसे जर नसते तर मुंबईसारख्या शहरात जेव्हा मालक आणि मजूर यांच्यातील भांडणे विकोपास जातात तेव्हा हे शिष्ट लोक, मालक तुमच्यावर बहिष्कार टाकतील, सांभाळा! तुमच्या उपजीविकेची साधने त्यांच्या हाती आहेत असा उपदेश संप करण्यास सिद्ध झालेल्या मजूर लोकास करते. पण हे लोक मजूर लोकास हा झगडा करण्यास नुसते उत्तेजन देतात इतकेच नव्हे तर मालक लोकास तुम्ही संपत्तीच्या जोरावर न्यायासाठी झगडणाऱ्या गोरगरीबांना दडपण्याचे आसूरी कृत्य करू नका, असा उपदेश करतात. याबद्दल आम्हास काही वाईट वाटत नाही उलट, आम्ही त्यांचे अभिनंदनच करतो. पण त्यांना आम्हास एक प्रश्न विचारावासा वाटतो, तो हा की आर्थिक स्वातंत्र्यासाठी झगडा करणाऱ्या लोकांविरुद्ध संपत्तीचा दुरुपयोग करणे हा जर अधर्म आहे तर सामाजिक समता प्राप्त करून घेण्यासाठी झगडा करणाऱ्या अस्पृश्य लोकांविरुद्ध संपत्तीचा दुरुपयोग करणे हा धर्म आहे काय? व तो जर अधर्म आहे. तर मग ज्या तुम्ही लोकांनी सत्याग्रहाच्या बाबतीत उपदेश करण्याचा योग ओढून घेतला आहे त्यांनी आमच्या प्रतिपक्षास आमच्यावर संपत्तीच्या जोरावर बहिष्कार टाकणे व आमची गती खुंटविणे हे पाप आहे, असे का सांगितले नाही? तसे जर त्यांनी केले असते तर त्यांच्या मनाच्या निर्मळतेची कसोटी आम्हास पटली असती. तसे न केल्यामुळे त्यांचा उपदेश केवळ अस्पृश्यांना सावध करण्याकरिता केला आहे यावर आमचा विश्वास बसत नाही. त्यात चिथावणीचे जहर भरले आहे. असे आम्ही मानतो. कारण जसे उघडपणे निषेध करण्याची शरम वाटली म्हणजे काही लोक कधी कधी उपदेशाच्या मिषाने निषेध करण्याची आपली मनीषा तृप्त करून घेतात तशापैकी तर हा प्रकार आहेच, पण हा उपक्रम, साधा उपदेश अगर साधा निषेध याच्या पलिकडला असून ज्या स्पृश्य लोकांविरुद्ध हा सत्याग्रह करण्यात येत आहे त्या लोकांना त्यांच्या हाती “फाजील उत्साही “अस्पृश्यांना शासन करून वठणीवर आणण्यास कोणते शस्त्र आहे याची आठवण करून देण्यासाठी हा इषारा आहे असे आम्हास वाटते. कारण ज्या लोकांची या गोष्टीला खरी सहानुभूती आहे व अस्पृश्यांची उपजीविका स्पृश्यांच्या हातात असून, स्पृश्य लोक आपला आश्रय बंद करून अस्पृश्यांना सत्याग्रहापासून परावृत्त करतील असे त्यांना पूर्णपणे माहीत आहे. त्यांनी जसा अस्पृश्यांना स्पृश्यांच्या हाती कोणते शस्त्र आहे याची जाणीव ठेवा! असा इशारा दिला. तसाच स्पृश्यांनाही सत्याग्रहासारखे सत्कार्य हाणून पाडण्यासाठी हाती असलेल्या शस्त्राचा दुरुपयोग कराल तर खबरदार! असाही इशारा दिला असता. पण ते यांना सुचले नाही. खरे म्हटले असता सत्याग्रहास प्रतियोग म्हणून बहिष्कार टाकला जाईल हे अस्पृश्य लोकाना सांगत सुटण्याचे काहीच प्रयोजन नाही. ज्या अस्पृश्यांनी सत्याग्रहाची चळचळ सुरू केली आहे. त्यांना या भविष्याची प्रथम पासूनच पूर्ण कल्पना होती. पण या बहिष्काराला भ्यावे कोणी? ज्याला ध्येय नाही तोच भिईल. ज्याच्या डोळ्यापुढे धगधगीत ध्येय आहे तो कदापि भिणार नाही. कारण, ध्येयवादी लोकांस पूर्णपणे माहीत असते की कोणतेही ध्येय कितीही हलके असले तरी ते साध्य करण्यास तपाची आवश्यकता असतेच. हे ध्येय जितके उच्च असेल तितकी ते मिळविण्याकरिता करावी लागणारी तपश्चर्याही खडतर प्रकारची पाहिजे. तपश्चर्येवाचून कोणीही आपले ध्येय गाठल्याचा इतिहासात पुरावा नाही. केवळ सुख आणि स्वास्थ्य हे माणसाचे जीवित कर्तव्य आहे असे नाही. तसे जर असते तर मनुष्यत्त्वाला साजेशी तेजस्वी कार्ये या जगात घडून आली नसती. पशूंना साध्या स्वास्थ्यामध्ये समाधान वाटणे शक्य आहे. पण मनुष्य आणि पशू यामध्ये आहार, निद्रा, भय वगैरे शारीरिक धर्म जरी सामान्य असले तरी बुद्धी ही खास देणगी परमेश्वराने फक्त मनुष्यालाच दिली आहे. ती जेव्हा जागृत नसेल तेव्हा मनुष्य हा पशुच असतो व साध्या स्वास्थ्यामध्ये तो सुख मानू शकतो. परंतु तीच बुद्धी जागृत होऊन जिवंतपणाची जाणीव झालेल्या मनुष्याला ही स्मशान शांतता पटणे शक्य नाही. त्याला साधे स्वास्थ्य हवे किंवा आपले बुद्धीने ठरविलेले ध्येय हवे याचा निर्णय करावा लागतो. अस्पृश्य वर्ग आज जागृत झाला आहे. त्यास साधे स्वास्थ्य हवे किंवा समता हवी, या दोहोंपैकी कोणत्या तरी पक्षी निश्चय करण्याची वेळ येणार होती. ती आज आली आहे व त्याप्रमाणे समता प्राप्त करून घेण्याचा त्याने निश्चय केला आहे. आमची खात्री आहे की जागृत झालेली अस्पृश्य जनता आपली गती कुंठित करणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्यास अवश्य तो स्वार्थ त्याग करील, इतकेच नव्हे तर प्राणावरही तिलांजली देण्यास तयार होईल! इतक्या थराला गेलेल्या प्रजेस बहिष्काराची तमा काय असणार? व ज्यांनी जाणूनबुजून ही तपश्चर्या पत्करली आहे त्यांना इशारा देण्याचे काय कारण ? बरे या विघ्नसंतोषी लोकांनी वाजविलेल्या सत्याग्रह विरुद्ध बहिष्कार या भयसूचक घंटेचा नाद ऐकून भेदरून जाण्याचे काहीच कारण नाही. कारण बहिष्कारासारखे आत्मघातकी शस्त्र कोणीही हाती धरू शकत नाही व धरलेच तर ते फार दिवस पाजळू शकत नाही. ज्याप्रमाणे आम्ही अस्पृश्य आहोत हे आम्ही कबूल करणार नाही असे अस्पृश्य लोक म्हणतात त्याचप्रमाणे तुम्ही स्वराज्याला लायक आहात असे आम्ही कबूल करणार नाही, असे इंग्रज लोकही स्पृश्य लोकाना म्हणतात. जसे आज अस्पृश्य लोकांना ताळ्यावर आणण्यासाठी बहिष्कार पुकारण्याची इशारत दिली जात आहे. त्याचप्रमाणे इंग्रज सरकारलाही ठिकाणावर आणण्यासाठी स्वदेशीची उर्फ बहिष्काराची मोहीम सुरू करण्यात आली होती व ती किती तरी वर्षे चालू होती. परंतु सर्वांना ठाऊक आहे की, त्यापासून इंग्रज सरकारच्या केसालाही धक्का लागला नाही. याचे कारण अगदी उघड आहे. जेथे परस्परातील आर्थिक संबंध दाता व याचक अशा परीचा असतो तेथे ही बहिष्काराची मात्रा लागू पडण्याचा संभव असतो. कारण दात्याने जर याचकावर बहिष्कार घातला तर त्याने दात्याचे काहीच नुकसान होत नाही. परंतु जेथे परस्परातील संबंध दानाच्या स्वरुपाचा नसून विनिमयाच्या स्वरूपाचा असतो तेथे बहिष्काराची मात्रा चालत नाही. अशा अवस्थेत बहिष्कार घालणे म्हणजे विनिमयाने होणारा स्वार्थ बुडविणे असाच त्याचा परिणाम होतो. दरेकाची स्वार्थावर नजर असल्याकारणाने परस्परांवर बहिष्कार घालून विनिमयाने होणारा स्वार्थ बुडविण्यास कोणीच तयार नसतो. तसे जर नसते तर गिरणीच्या मालकांना पोटभरू मजूरांवर कायमचा बहिष्कार टाकता आला असता. इंग्रज व्यापाऱ्यांविरूद्ध स्वदेशीच्या काळात पुकारलेला बहिष्कार सिद्धीस गेला असता. हे घडत नाही याचे कारण असे की बहिष्काराने जर फक्त शत्रूलाच घाव बसता तर त्याच्यासारखे इतरास वठणीवर आणण्याचे दुसरे महान शस्त्र नव्हते. परंतु त्या शस्त्राची अशी विचित्र गती आहे की त्याच्या मा-याने शत्रूच्या बरोबर स्वतःलाही घाव होतो. जे लोक बहिष्काराची धमकी देतात त्यांना हे बहिष्काराचे शस्त्र एकेरी आहे किंवा दुहेरी आहे, याचा समज झाला नसावा किंवा अस्पृश्य समाज परोपजीवी असून स्पृश्य समाज त्यांचे पोषण करतो अशी त्यांनी खोटी समजूत तरी करून घेतली असावी. हिंदू समाजाची रचना इतर समाजाप्रमाणे विनिमयावरच झालेली आहे. अशा परिस्थितीत कोणी कोणावर उपकार करतो असे मानण्याचे मुळी कारणच नाही. धन्याने नोकरास चाकरीस ठेविले तर तू मजवर काही उपकार करीत नाहीस असे धनी त्यास मोठ्या दिमाखाने म्हणतो. परंतु मी उपकार करीत नाही हे तर खरेच, परंतु तू देखिल मजवर काही उपकार करीत नाहीस असे नोकरालाही धन्याला ठासून सांगता येण्यासारखे आहे. जे काम स्वतःला करता येते ते काम इतरांकडून कोणीही सहसा करून घेत नाही. न होणारे काम करून घेण्यासाठीच परक्याची जरूरी लागते. आपल्याकडून धन्याने संबंध सोडला तर नोकरलोक हवालदील होतील. पण नोकराने संबंध तोडला तर जवळ पैका असूनही धन्याची कुचंबना होईल. एकूण एकाला दुसऱ्याची जरुरी भासते, म्हणून हा परस्परांचा संबंध जुळून येतो. स्वार्थाच्या पायावर उभारलेला हा संबंध सहजासहजी कोणाच्याने तोडवत नाही. कारण, त्यात उभयपक्षाची हानी होते. तोच न्याय स्पृश्य व अस्पृश्य यांच्या संबंधास लागू आहे. अस्पृश्य लोक जे स्पृश्यांची नोकरी करितात ते आपण स्पृश्यांना उपकृत करतो. असे म्हणत नाहीत. तसेच स्पृश्यांनीही त्यांना आपण पोसतो अशी घमेंड मारू नये. उभयतांचा संबंध निव्वळ स्वार्थाचा आहे. एकमेकांचे एकमेकावाचून अडते, म्हणून दोघेही पडतात. अशा व्यवस्थेने सांधलेल्या लोकांना परस्परांवर बहिष्कार टाकणे शक्य नाही व टाकलाच तर तो फार दिवस टाकणे अशक्य आहे.

स्पृश्य व अस्पृश्य यांच्यातील आर्थिक संबंध जरी परस्परातील स्वार्थाच्या भावनेवर अधिष्ठित झालेला असला तरी या दोनही वर्गाच्या धारणपोषणशक्तीत थोडा बहुत फरक आहे हे कबूल करणे प्राप्त आहे. त्यामुळे एक दुसऱ्याला जितका मारक होऊ शकतो तितका पहिला दुसऱ्याला मारक होऊ शकत नाही. ज्यांची धारणपोषणशक्ती कमी प्रतीची आहे. त्यांनी ज्यांची धारणपोषणशक्ती श्रेष्ठ प्रतीची आहे. त्यांच्याशी झगडण्याचा जर प्रसंग आला तर तो प्रसंग त्यांना शेवटास नेणे जड जाते. कारण, “समर्थांसी द्वंद बांधुनी मग कोठे तगावे” अशी भ्रांत ज्यांची धारणपोषणशक्ती कमी प्रकारची असते त्यांना पडते व तशी भ्रांत पडल्यामुळे ज्यांची धारणपोषणशक्ती श्रेष्ठ असते त्यांना विरोध करून एखादे शाश्वतहित प्राप्त व्हावयाचे असते ते देखील त्यांना सोडून द्यावे लागते. याचे उत्कृष्ट उदाहरण महाभारतात पहावयास सापडते. कौरव पांडवांची सैन्ये कुरुक्षेत्रावर लढाईस सज्ज झाली असता युद्धास प्रारंभ करण्यापूर्वी भीष्म, द्रोण व शला अशा महापुरुषांचे पाद वंदन करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा, असे युधिष्ठिरास वाटले व रणांगणावर आपले कवच काढून ठेवून नम्रपणाने तो त्याजकडे जाता झाला. शिष्टसांप्रदायाचे योग्य अनुकरण करणा-या युधिष्ठिराला आशीर्वाद देणे त्यांना क्रमप्राप्त होतेच. परंतु आशीर्वाद देताना आपल्या स्थितीची आठवण झाली. आमची बाजू सत्य आहे व कौरवांची बाजू असत्य आहे हे तुम्ही मान्य करीत असूनही सत्याच्या बाजूने का लढत नाही असा प्रश्न युधिष्ठिर कदाचित आपणाला विचारील याची जाणीव होऊन ते आपल्या मनात ओशाळले व तो विचारण्यापूर्वीच त्यांनी युधिष्ठिरास सांगितले की,

अर्थस्य पुरुषो दासो दासस्त्वर्थो न कस्यचित् ।
इति सत्य महाराज बद्धोऽस्म्यर्थेन कौरवैः ।।

“मनुष्य अर्थाचा गुलाम आहे; अर्थ कोणाचा गुलाम नाही. असा खरा प्रकार असल्यामुळे हे महाराज युधिष्ठिरा! कौरवांनी आम्हाला अर्थाने बांधून टाकिले आहे.” असे म्हणण्याचा प्रसंग अस्पृश्य लोकावर का येणार नाही याचे दिग्दर्शन वरती केलेच आहे. तथापि, आलाच तर त्यांची धारणपोषणशक्ती कशी तग धरील व ते स्वावलंबी कसे होतील याचा विचार करणे इष्ट आहे, व म्हणून त्या विषयावर आमचे विचार प्रगट करण्याचे आम्ही आज योजिले आहे.

प्रथमतः अस्पृश्य वर्गात ज्या अनेक जातींचा समावेश झाला आहे त्या जातींपैकी कोणकोणत्या जातीस या बहिष्काराचा विशेष जाच होणार आहे हे ध्यानात घेतले पाहिजे. चांभार व ढोर या दोन धंदेवाईक जाती आहेत. अर्थात त्यांच्यावर बहिष्काराची मात्रा लागू होणे शक्य नाही. उलट त्यांनीच जर स्पृश्य लोकांवर बहिष्कार टाकला, नवीन जोडे बांधावयाचे किंवा जुने जोडे सांधावयाचे बंद केले तर त्यांचे चालण्यासारखे आहे. त्याचप्रमाणे मांग लोकही धंदेवाईक लोक आहेत. त्यांनी दोऱ्या, दोरखंडे, अगर केरसुण्या करावयाचे बंद केले, तर त्यांच्यानेही स्पृश्य लोक अडले जाणार आहेत. कारण बैलाला कासरा आणि मोटेला नाडा ही शेतकऱ्यांच्या आयुधांपैकी महत्त्वाची आयुधे आहेत. ती मांग लोकांच्या हाती असल्यामुळे स्पृश्य लोकांना त्यांच्यावर बहिष्कार टाकणे हितावह होणार नाही. उलट त्यांनीच जर बहिष्कार टाकला तर स्पृश्य लोकांना त्यांच्यापुढे नमावे लागेल. भंगी लोक तर स्पृश्य लोकांना एका क्षणात नमवू शकतील. त्यांचा धंदा जरी नीच मानण्यात आला असला तरी त्या धंद्याची उपयुक्तता इतकी जबरदस्त आहे की, त्यांनी मनात आणले तर रोगाचे सत्र साऱ्या शहरात पसरुन ते सारी वस्ती नामशेष करण्यास कारणीभूत होऊ शकतील, आता महारांची काय गत आहे हे पाहू. महारांना त्यांचा म्हणून जातीचा धंदा असा काही नाही. अगदी शेवटच्या पायरीचे का होईनात पण ते राजपुरुषच आहेत. कारण सरकारी नोकरीवरतीच त्यांची उपजीविका आहे. सरकारी नोकराला कोणाचे घेणे नाही कोणाचे देणे नाही. त्यालाही बहिष्काराचे भय नाही, असे महारानाही म्हणता येण्यासारखे आहे. पण ते केव्हा ? सरकारी नोकरी भली आणि आपण भले असे महारांना म्हणता येईल तेव्हा. परंतु त्यांच्या दुर्दैवाने त्यांना आज तसे म्हणता येत नाही असे आम्हास वाटते. याचे मुख्य कारण म्हटले म्हणजे महारांचे वतन हे होय, या वतनामुळे महार लोक स्पृश्याधीन झाले आहेत. त्यांना स्पृश्याधीन होण्याचे कारण असे की, ज्यांच्या हाताखाली महारांना नोकरी करावयाची असते ते अधिकारी सारे स्पृश्य लोकच असतात. हे लोक महारापासून सरकारी नोकरी घेण्यापुरताच आपल्या अधिकाराचा उपयोग करतात असे नाही ते आपल्या अधिकाराचा उपयोग महार लोक पायरीने वागतात की नाही याची खबरदारी ठेवून त्यांनी पायरी सोडली तर त्यांना शासन करण्याकडेही त्या अधिकाराचा उपयोग करतात. सरकारी नोकरी वेळचे वेळी न केल्यामुळे महारांना शासन झाल्याचे एक उदाहरण देता आले तर त्याच्या जोडीला पाटलाची लाकडे फोडली नाहीत म्हणून, मामलेदाराच्या घोड्याला गवत घातले नाही म्हणून, कुळकर्ण्याची जमीन नांगरली नाही म्हणून, गावात रयतेला जोहार घातला नाही म्हणून, गावात भाकरी मागण्याचे सोडून दिले म्हणून, मेलेल्या जनावरांचे मांस खाण्याचे बंद केले म्हणून, अंगात चांगला पोषाख घातला म्हणून, महारांना दंड झाल्याची हजारो उदाहरणे देता येतील. या गोष्टीचा आणि सरकारी नोकरीचा काही संबंध नाही. एखादा मुसलमान, पाटील किंवा पारशी कुळकर्णी असता तर वतन म्हणजे महारांना सुखाची सावली झाली असती. त्यांनी जर दंड केला असता तर सरकारी नोकरीत कुचराई केल्यामुळेच केला असता. महाराने चांगला पोषाख केल्यामुळे भाकरी मागण्याचे सोडून दिल्यामुळे किंवा मृतमांस खाण्याचे बंद केल्यामुळे केला नसता. कारण, महारांनी गलिच्छपणा टाकून सुव्यवस्थितपणे राहण्याचा उपक्रम केल्यामुळे त्यांची काही मानहानी झाली किंवा महार मातला असे त्यास वाटले नसते. परंतु तेच पाटील कुळकर्ण्याचे जोडपे स्पृश्य हिंदुधर्मीयाचे असल्यामुळे त्याला महाराने पायरी सोडली तर संताप येतो. संतापाच्या भरात हे जोडपे गुजगोष्टी करावयास लागून वतनामुळे प्राप्त झालेल्या अधिकाराचा दुरुपयोग करून महार सरकारी काम करीत नाहीत, असा खोटाच रिपोर्ट मामलेदाराकडे रवाना करतो. मामलेदार त्यास दुजोरा देऊन प्रांताकडे पाठवितो. प्रांत हुकूम करतो की महारांना ‘सस्पेंड’ करा. अशापरी केवळ वरचे अधिकारी स्पृश्य जातीचे असून खोट्या धर्माभिमानाला बळी पडले असल्यामुळे वतनाची गदा महारांवर बसते. यामुळे महारांना स्पृश्याधीन होऊन राहिल्याशिवाय गत्यंतर उरत नाही. वतनामुळे महार लोकांस जसे स्पृश्याधीन होणे भाग पडते तसेच त्यांना वतनामुळे स्पृश्यावलंबी व्हावे लागते. महार हे वतनदार कामगार या नात्याने सरकारचे नोकर आहेत. परंतु या नोकरीबद्दल मिळावयाचा पगार त्यांना सरकारकडून मिळत नाही. त्यांचा पगार म्हणजे बलुते व ते त्यांना देणार ती स्पृश्य जनता! अशी ही वतनाची व्यवस्था असल्याकारणाने महार जात ही सहजासहजी स्पृश्यावलंबी झाली आहे. काम जरी सरकारचे करणे झाले तरी त्या कामाबद्दल पगार द्यावयाचा किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार रयतेकडे आला आहे. ती रयतही खोट्या धर्माभिमानाला बळी पडली असल्यामुळे महार लोक पायरीने वागतात किंवा नाही याची खबरदारी घेतल्याशिवाय बलुते अदा करीत नाही. एकूण अधिकाऱ्यांच्या व रयतेच्या कैचीत सापडलेल्या महार प्रजेला या वतनव्यवस्थेमुळे स्पृश्यांची गुलामगिरी पत्करावी लागत आहे. ह्या गुलामगिरीतून जर महार लोकांना आपली सुटका करून घ्यावयाची असेल तर त्यांनी आर्थिक स्वातंत्र्य मिळविले पाहिजे. म्हणूनच आम्ही सांगतो की प्रथम महार वतनव्यवस्थेत सुधारणा करा. त्यातील पहिली सुधारणा ही की इनाम जमिनीवर कर आकार देऊन जर जमीनी त्यांना ठेवता आल्या तर त्यांनी वतनी नोकरी अजिबात सोडून द्यावी. म्हणजे एका दमात स्पृश्याधीन व स्पृश्यावलंबी झालेली महार प्रजा आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होईल. एवढे जरी करता आले नाही तरी त्यांनी रयतेकडून बलुते घेण्याऐवजी सरकारकडून पगार मागावा. याने ती स्पृश्याधीन राहिली तरी ती निदान स्पृश्यावलंबी राहणार नाही. ही सुधारणा घडून आल्यास बहिष्काराचा जाच आपणास होईल अशी चिंता करण्याचे काही विशेष कारण महार लोकांस उरणार नाही.

वतन सोडून तुम्ही स्वतंत्र व्हा असे महार लोकास सांगितले असता, वतन सोडले तर आम्हास दुसरा उपजीविकेचा मार्ग कोणता, असा ते लोक उलट प्रश्न करीत असतात. खरे म्हटले असता हा प्रश्न महार लोकांनी करावयाचे काही कारण नाही. जो माणूस जन्माला येतो तो काही आपल्यासाठी एकादा पोट भरण्याचा धंदा बरोबर घेऊन येत नाही. जन्मास आल्यानंतर त्याच्या लायकीप्रमाणे तो कोणता ना कोणता उद्योग करून आपले पोट भरतोच. मग महारांनाच का भरता येणार नाही? तथापि, आर्थिक स्वातंत्र्याचे उपाय म्हणून आम्ही त्यांना एक दोन सूचना करीत आहोत. आमची महार लोकांना पहिली सूचना अशी आहे की, तुम्ही आपल्या निराळ्या वसाहती करा. महार लोकांना गावाचा मोठा अभिमान आहे. वडिलांचा गाव सोडून जाणे याचे त्यांना मोठे कोडे पडते. वडील मेले तेथेच मरणे हे आपले कर्तव्य आहे असे ते समजतात. गावात महारांना जर मानापानाने लोक वागवते तर गावाबद्दल अभिमान बाळगणे रास्त होते. गावातले लोक महारांना कसपटासमान लेखतात, लहान सहान कारणावरून पण जेथे त्यांचा गाव बंद करतात, ज्या गावात शिवीशिवाय कोणी बोलत नाही, त्या गावात राहण्याचा आग्रह महारांनी धरावा ही मोठ्या शरमेची गोष्ट आहे. अशा प्रकारच्या जुलूमाची कहाणी महार लोकांस कोणी सांगावयास नको. सोलापूर जिल्ह्यात मासणूर, रातंजन, राळेरास, पानगाव, सुरडी, मालवंडी, चिखरडे, कासेगाव, शिरबाबी वगैरे गावात महार लोकांवर गावकऱ्यांचा कसा जुलूम चालला आहे हे बहिष्कृत भारताच्या वाचकांस श्रुत आहेच. या गावापैकी कित्येक गावांनी महारांना हाकून द्यावयाचा निश्चय केला आहे व तो ते शेवटास नेण्याच्या विचारात आहेत. या परिस्थितीस तोंड देणे महार लोकांना कठीण पडते. कारण दोन अडीचशे उंबऱ्यांच्या गावात महारांची काय ती दहा-पाच घरे असतात. अशा चिमुकल्या लोकास बहुसंख्याक जातीतील गुंड लोकांच्या अत्याचारास पुरे पडणे शक्य नाही. तेव्हा दरेक गावात पाच-पाच, दहा-दहा घरांची तुरळक वस्ती ठेवून कोंडमारा करून घेण्याऐवजी निरनिराळ्या गावातील लहान लहान वस्ती उठवून त्यांची एक निराळी वसाहत केली तर ही व्यवस्था त्यांच्या सर्वस्वी हिताची होणार आहे. अशा प्रकारच्या वसाहती जेथे जेथे फॉरेस्ट जमीनी आहेत तेथे जर करण्यात आल्या तर वतन गेल्यामुळे होणारे नुकसान शेती करून महारांना हजारो पटीने भरून काढता येईल. तेही कोणाची गुलामगिरी न करता स्वतंत्रपणे करता येईल. अशा वसाहतीपासून नुसती उपजीविकाच होईल इतकेच नव्हे तर त्यापासून दुसरे पुष्कळसे फायदे होण्यासारखे आहेत. गावात राहिल्याने महारांना कोणताच व्यवसाय करता येत नाही. परंतु तेच महार लोकांनी निराळी वस्ती केली तर त्यांना सर्व प्रकारचे मार्ग मोकळे होतील. महार पाटील होऊ शकेल. महाराला किराणा मालाचे दुकान घालता येईल. महाराला शिंप्याचे दुकान घालता येईल. जो उद्योग आज महारांना गावात राहून करता येत नाही तोच उद्योग निराळी वस्ती केल्यावर महारांना करावयास सापडेल. निराळी वस्ती केल्यापासून एवढाच फायदा आहे असे नाही त्याशिवाय आमच्या मते दुसराही आणखी महत्त्वाचा फायदा आहे. उपजताच महाराच्या मुलाच्या पोटात शिवाशिवीचे भय बसते. ह्याला शिवशील, त्याला शिवशील हा नित्याचा शब्द त्याच्या कानावर पडत गेल्याने ते मूल स्वतःस जे अपवित्र व हीन मानू लागते ते शेवटपर्यंत तसेच मानून राहाते. हे त्याच्या मनावरील दडपण एकदा बसले की ते कायमचे राहते. त्याचे मन असे कमकुवत झाल्यामुळे त्याच्या हातून पुढे कोणतेच पुरुषार्थाचे कार्य होत नाही. या नव्या वस्तीत वाढलेली महारांची मुले निर्भयपणे वाढतील, शिवाशिवीची भाषा त्यांच्या कानावर पडण्याचा कूयोग येणार नाही. आपण इतर कोणापेक्षा कमी आहोत व इतर कोणी आपणापेक्षा श्रेष्ठ आहेत असे त्यांना वाटणार नाही. ती मनाने दुबळी होणार नाहीत. हा लाभ फार महत्त्वाचा आहे. त्याबरोबरच जर शेतीसारख्या स्वतंत्र उपजीविकेचे साधन हाती येत आहे तर याचा फायदा महार लोकांनी अवश्य घ्यावा. या नव्या वसाहती घडवून आणण्यास दोन प्रकारची मदत पाहिजे आहे. (1) सरकारचे सहाय्य पाहिजे. (2) महार लोकांनी गाव सोडण्यास तयार झाले पाहिजे. पैकी सरकारचे सहाय्य मिळणे कठीण नाही. म्हैसूर संस्थानात अस्पृश्य वर्गातील लोकांना प्रत्येक कुटुंबास सात एकर जमीन देऊन त्यांची निराळी वसाहत करण्याचे निश्चित झाले आहे. आपल्या इलाख्यातही इंग्रज सरकारने बेरड लोकांची अशाच प्रकारची वसाहत करण्याचे योजिले आहे. तेव्हा तीच योजना महार लोकास लागू करण्यास सरकार माघार घेईल असे वाटत नाही. प्रश्न इतकाच आहे की, महार लोक आपला गाव सोडून आपली निराळी वसाहत करण्यास तयार होतील काय?

सर्वच महार लोकांना शेतीवर उपजीविका करता येईल इतके मोठे क्षेत्र सापडणे कठीण आहे. तेव्हा शेतीला जोडून दुसरा काही तरी धंदा महार लोकांनी करणे अवश्य आहे. महार जात ही धंदेवाईक जात नाही. करता येईल तो धंदा तिने करण्यास काही हरकत नाही. अर्थात तिला जो धंदा एवढी गोष्ट कबूल करणे प्राप्त आहे की, पैशाच्या व अनुभवाच्या अभावी श्रेष्ठ प्रतीचे किफायतशीर धंदे या जातीतील लोकांना करता येणे शक्य होणार नाही. शक्य झालेच तर एखादा कनिष्ठ प्रकारचा धंदा हाती घेता येईल. परंतु ब्राह्मण्याच्या भुताटकीने पछाडलेले महार लोक हीन धंदा पत्करण्यास तयार होतील असे संभवत नाही. ज्या धंद्याला घाण नाही किंवा जो अमूक एका जातीचा धंदा होऊन बसला नाही असा एखादा धंदा करता येण्यासारखा असला तर तो करण्यास कदाचित महार लोक उद्युक्त होतील, आमच्या मते अशा प्रकारचा एकच एक धंदा म्हणजे खादी विणण्याचा आहे. महार लोकांना आमची शिफारस आहे की, तुम्ही खादी विणा.

त्यांना आता कदाचित असे वाटेल की, आम्ही विणलेली खादी घेणार कोण? व ती जर कोणी घेतली नाही तर खादी विणल्याचा उपयोग काय? परंतु हा प्रश्न सोडविणे काही बिकट नाही. महार लोकांना स्वतःचे उपयोगासाठी कपड़ा विकत घ्यावा लागतोच. तेव्हा सर्व महार लोकांनी जर खादीचे कपडे वापरण्याचा निश्चय केला आणि महारांनी विणलेल्या खादीशिवाय दुसऱ्या कोणाची खादी घ्यावयाची नाही अशी जरी शपथ घेतली तरी विणकर महारांना स्वजातीची इतकी मोठी गि-हाईकी होईल की ते त्यांना पुरून उरेल. या दोन गोष्टी अंमलात आणण्यास द्रव्याचे साहाय्य लागेल. परंतु ते साहाय्य मिळण्यास फारसे प्रयास पडणार नाहीत. महार लोकांचा निश्चय झाला म्हणजे बस्स आहे.

महारांना जर आपली माणुसकी मिळवावयाची असली तर रयतेच्या गुलामगिरीतून मुक्त झाले पाहिजे. जर त्यांना मुक्त व्हावयाचे असेल तर त्यांना वरील गोष्टी एकनिश्चयाने करावयास पाहिजेत. त्याशिवाय त्यांचा मार्ग सुकर होणार नाही हे त्यांनी ध्यानात घ्यावे.

पहिल्या दिवसाचे काम आटोपले. नंतर त्याच मंडपात त्याच वेळी महार वतनाचे दुरुस्तीचे जे बिल डॉ. आंबेडकर साहेबांनी मुंबई कौन्सिलमध्ये आणले आहे त्याला पाठिंबा देण्याकरिता शेट माणेकचंद शहा यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी सभा सुरू झाली. त्या सभेत पुढे लिहिलेला ठराव मांडण्यात आला. “डॉ. आंबेडकर साहेब यांनी महार वतनात सुधारणा करण्याच्या दृष्टीने जे बिल आणले आहे. त्या बिलास ही वतनदार महार परिषद आपला पूर्ण पाठिंबा देते.”

हा ठराव श्री. हरीभाऊ तोरणे यांनी मांडला. त्यास गो. गो. कांबळे यांनी अनुमोदन व भिमा तात्या वेसकर आणि निवृत्ती बंदसोडे यांनी पुष्टी दिल्यावर शेट माणेकचंद यांनी महार वतनाच्या बिलाचे स्पष्टीकरण करण्याकरिता डॉ. आंबेडकर साहेबांना विनंती केली. त्यांनी लोकांना आपण आणलेल्या दुरुस्तीचे बिल अगदी साध्या आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले. लोकांना ते तात्काळ पटले. सर्व लोक सभेत म्हणू लागले की, डॉ आंबेडकर साहेब यांनी आता समजावून सांगितल्याप्रमाणे जर बिलात सुधारणा झाली तर आम्हा वतनरूपी रौरव नरकात पडलेल्या किड्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. असे म्हणून सर्व लोकांनी डॉ. आंबेडकर यांचा जयजयकार केला व म्हणू लागले की जे लोक महार वतनावर गदा म्हणून महार लोकांची दिशाभूल करीत आहेत ते महामूर्ख किंवा पाजी तरी असले पाहिजेत. सभेचे अध्यक्ष माणेकचंद यांनी देखील बिलाच्या पुष्ट्यर्थ भाषण केले. लोकांना या ठरावाच्या विरुद्ध किंवा काही प्रश्न विचारावयाचे असतील ते खुशाल विचारा असे सांगितले. पण कोणीही प्रश्न विचारले नाहीत. नंतर ठराव मताला टाकता तो प्रचंड टाळ्यांच्या गजरात पास झाला. नंतर सभेचे काम दुसऱ्या दिवसापर्यंत तहकूब ठेवण्यात आले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password