Categories

Most Viewed

25 नोव्हेंबर 1956 भाषण

बुद्ध धर्म हिंदू धर्माची एक शाखा आहे हा खोडसाळ प्रचार होय.

दिनांक 25 नोव्हेंबर 1956 रोजी सकाळी 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काशी विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेचे उद्घाटन केले.

उद्घाटनपर भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
“बौद्ध धर्माच्या उत्पत्तिसंबंधी पुष्कळच अज्ञान दृष्टीस पडते. प्राचीन भारताचा त्रयस्थपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला बुद्धपूर्व काळात दोन संघर्ष आढळतात. पहिला संघर्ष आर्य व नाग लोकातील व दुसरा ब्राह्मण व क्षत्रियातील.

सध्या हिंदू म्हणून समजले जाणारे पुष्कळसे लोक नागवंशीय आहेत. ज्या नाग लोकांनी आर्यापूर्वी भारतात वस्ती केली होती ते आर्यापेक्षा अधिक सुसंस्कृत होते. त्यांना आर्यांनी जिंकले. एवढ्यावरून आर्यांची संस्कृती त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ ठरत नाही. आर्याच्या विजयाचे कारण म्हणजे त्यांचे वाहन. आर्य घोड्यावर स्वार होऊन लढत तर नाग पायदळी लढत. आर्य-नागांमधील लढा प्राणपणाने लढला गेला. महाभारतातील खांडववन व सर्पसत्र या कथांवरील कल्पनेचे परिवेष्ठन दूर केले तर या आर्य-नाग युद्धाचे भयानक स्वरूप आपल्या दृष्टीस पडते. आर्यांनी खांडववन दहनासारखी म्हणजे Scorched earth policy ची कृत्ये करून नागांची ससेहोलपट चालविली. या विध्वंसातून अगस्तीने एका नागाला वाचविले अशी एक कथा आहे. कथेत अतिशयोक्ती असली तरी नागांच्या वसाहती संपूर्ण नष्ट करण्यासाठी आर्य कसे झगडत होते हे त्यावरून दिसून येते. पराभवामुळे नागांच्या मनात आर्यांविषयी द्वेष वसत होता. परिक्षिताचा प्राण घेणारा तक्षक हा कोणी सर्प नसून एक नागवंशी पुढारी होता. आर्य लोकांच्या मनात नागांसंबंधी वसत असलेल्या द्वेषाचे उदाहरण म्हणून, कर्ण व अनंत यांच्या कर्ण अर्जुन युद्धापूर्वी झालेल्या संभाषणाचा उल्लेख करता येईल. युद्धापूर्वी अनंत हा नागवंशीय योद्धा कर्णाला भेटला. आपण अर्जुनाविरूद्ध सहाय्य करू असे आश्वासन देऊ लागला. कर्णाने ते देऊ केलेले सहाय्य नाकारले. कारण कर्ण आर्य होता आणि अनंत हा नाग होता. आर्यांनी आपापसातील युद्धासाठी नागांचे सहाय्य घेणे निषिद्ध होते.

बौद्धपूर्व काळातील दुसरा संघर्ष म्हणजे ब्राह्मण क्षत्रियांमधला. या लढ्याची वर्णने पुढे पुराणातून आली आहेत. त्याप्रमाणेच मनुने आपल्या स्मृतीत, क्षत्रियांनी ब्राह्मणांना आदराने का वागविले पाहिजे त्याची कारणे देताना, पूर्वकालीन ब्राह्मण-क्षत्रियांच्या संग्रामाचा उल्लेख केला आहे.

आर्य व नाग, ब्राह्मण व क्षत्रिय यांच्यामधील झगडे चालू असता ब्राह्मणांनी ऋग्वेदात पुरुषसुक्तांचा अंतर्भाव केला असावा. पुरुषसुक्तापूर्वी चातुर्वर्णातील चारही वर्ण एकाच समान पातळीवर होते. पुरूषसुक्ताने उच्चनीचतेचे तत्त्व समाजात आणले. या सुमारास भगवान बुद्धाने भारतीय जीवनात प्रवेश केला. ज्या शाक्य कुळात गौतमाचा जन्म झाला त्या शाक्यांचे गणराज्य लोकशाहीप्रधान होते. या लोकशाहीच्या परंपरेत वाढलेल्या गौतमास चातुर्वर्ण्य अमान्य होते. सध्याच्या स्वरूपातील बौद्ध धर्म हा एक नानाविध सिद्धातांचा महासागरच झाला आहे. परंतु बौद्ध धर्माचा मध्यवर्ती सिद्धांत अथवा बुद्धमत हे समतेवरच आधारलेले आहे. बौद्ध धर्माचा स्वीकार करणारे लोक बव्हंशी नागवंशीय आणि चातुर्वर्ण्यात हीन समजल्या जाणाऱ्या वर्णांपैकी होते. नागांची युद्धप्रीती मुचलिंद नागाच्या कथेवरून सिद्ध होते. मुचलिंदाचे अग्निहोत्री कश्यपाशी वैर होते. परंतु कश्यपाकडे आतिथ्यासाठी आलेल्या बुद्धाचा तो सेवक बनला. बौद्ध धर्माच्या अभिवृद्धीचे कारण शुद्रादिशुद्रांनी त्याचा बहुसंख्येने केलेला स्वीकार बौद्ध वाङ्मय व विशेषतः थेर व थेरीगाथा यांच्या आधारे हे सिद्ध करता येईल.

बौद्ध धर्म ही हिंदू धर्माचीच एक शाखा आहे, अशा मताचा प्रचार अलिकडे फारच बोकाळला आहे. वस्तुतः बौद्धप्रणीत धर्म समकालीन होता. तो वैदिक अथवा ब्राह्मणी धर्माहून अतिशय भिन्न होता. वैदिक वेदग्रंथांना प्रमाणे मानीत तर बुद्धाचा त्यांना विरोध होता. कलामसुक्तांमध्ये बुद्धाने माणसाला विचार स्वातंत्र्य असले पाहिजे. वेदांनी माणसासाठी सदासर्वकाळ टिकणारा विचार करुन ठेवला नाही असे प्रतिपादिले आहे. बुद्धाच्या वेदप्रामाण्यावरील आघाताचा पुढील काळात हिंदुच्या भगवद्गीतेसारख्या ग्रंथावरही परिणाम झाला आहे. वेदपाठकांची गीतेने एके ठिकाणी बेडूक म्हणून संभावना केली आहे. बुद्धाने वेदांना वाळवंट म्हटले आहे. वेदामध्ये प्राधान्याने इंद्रादी देवतांना उमदे घोडे, तेजस्वी शस्त्रास्त्रे, शत्रुवर विजय इत्यादी ऐहिक सुखोपभोगासाठी केलेल्या प्रार्थना आहेत. त्यात उदात्त नीतितत्त्वांची शिकवण नाही. म्हणून बुद्धाने त्याचा धिक्कार केला.

बुद्धाचा समकालीन धर्मावरील दुसरा आघात म्हणजे यज्ञसंस्थेवरील होय. गाई-बैलांचे बळी देऊन तुम्हाला कोणते उच्चश्रेय लाभणार आहे, असा त्यांचा याज्ञिकांना प्रश्न असे. यज्ञसंस्थेवरील बुद्धाच्या टिकेमुळे हिंदुना इंद्रवरुणादि आद्य देवतांचा त्याग करावा लागला. थोडेसे विषयांतर करून मी तुम्हाला विचारतो, हिंदू धर्मात ईश्वराची (God) कल्पना खरी आहे काय ? काशीतील तुमचा पूजनीय महादेव देव मानावा तर त्याचे लग्नही झाले होते व तो आपल्या बायकोबरोबर नाचतोही. ब्रह्मा, विष्णूचीही तीच कथा. यांना काय देव म्हणायचे ? सामान्य माणसालासुद्धा आज लाज वाटेल अशी दृष्कृत्ये त्यांच्या हातून घडल्याचे तुमची पुराणेच सांगतात. असा एक तरी देव दाखवा की ज्याचे निष्कलंक चारित्र्य आजच्या माणसाला आदर्शवत् व अनुकरणीय वाटेल? हिंदुचे देव म्हणजे राजांची कुलदैवते. त्यांचे पराक्रम म्हणजे राजांचे पौरोहित्य मिळविण्यासाठी ब्राह्मणांनी रचलेली त्यांच्या दैवतांच्या खुशामतीची पुराणे. इंद्र, कृष्ण काय हे देव ? ऋग्वेदाच्या शेवटच्या भागात इंद्रपत्नीने इंद्रास मोजलेल्या शिव्या वाचून पहा! दुर्योधन संपूर्ण वज्रदेही होऊ नये व गदायुद्धात भीमास यश मिळावे म्हणून कृष्णाने योजलेले कपट नाटक पहा. तुमचा शेजारी असे वागू लागता तर तुम्ही त्याला काय म्हणाल! असो ! बुद्धाने पशुहत्त्येची निर्भत्सना केली आणि यज्ञाचे वैफल्य जनतेस पटवून दिले. म्हणूनच ब्राह्मणांना आपले प्राचीन याज्ञिक आचार सोडावे लागले.

आश्रम व्यवस्थेसंबंधीही बुद्धाचे मत प्रचलित वैदिक धर्मापेक्षा वेगळे होते. ब्राह्मणांच्या मते ब्रह्मचर्य आश्रमानंतर गृहस्थाश्रम स्वीकारणे आवश्यक होते. बुद्धाच्या मते ब्रह्मचर्यानंतर परिव्रज्या स्वीकारण्यास प्रत्यवाय नव्हता. ब्रह्मचर्याचा मूळचा अर्थ ज्ञानार्जनाची अवस्था अविवाहित अवस्था हा त्यास नंतर चिकटविलेला अर्थ आहे. ब्राह्मणांनी गृहस्थाश्रमाचा काळ वाढविण्यासाठी त्याला वानप्रस्थाश्रम जोडला. ब्रह्मचर्यानंतर संन्यास (परिव्रज्या) स्वीकारण्यास ब्राह्मणांची हरकत होती, अकराशे वर्षांनी कुमारिल भट्टाने बुद्धावर घेतलेल्या आक्षेपात बुद्धाच्या परिव्रज्येच्या स्वातंत्र्यावरच भर दिलेला आहे.

बुद्धाचा वैदिक धर्माशी चवथा विरोध चातुर्वर्ण्याबाबत होता. त्याचे शिष्य उच्च कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या सर्व जातीतील होते. आपल्या शिष्यांत उच्चनीचतेच्या भावनेला जागा राहू नये, याबाबतीत ते अत्यंत दक्षता पाळीत असे. आपल्या चुलत भावांना आपल्या क्षत्रियत्वाचा अभिमान वाटू नये म्हणून त्याने त्यांच्या समवेत आलेल्या ‘उपाली’ स प्रथम दीक्षा दिली. ज्याची दीक्षा अगोदरची तो नंतर दीक्षा घेणारास वंद्य समजला जाई. म्हणून क्षत्रिय शाक्यांना उपाली या त्यांच्या पूर्वाश्रमीच्या नापित सेवकास अभिवादन करावे लागे. आपल्या जीवनाच्या शेवटच्या दिवसात चुन्द या हीनजातीय समजल्या जाणाऱ्या लोहाराच्या घरचे अन्न ते प्रकृतीस अनिष्ट आहे, असे समजूनही त्याने ग्रहण केले आणि सामाजिक समतेसाठी प्राणाचे मोल दिले. असे चातुर्वर्ण्य विरोधी प्रसंग बुद्धाच्या जीवनात अनेक दाखविता येतील. तो आपल्या संघाला सागराची उपमा देई. ज्याप्रमाणे सागरास मिळाल्यावर नदीची पृथगात्मता राहात नाही आणि सर्व जल एकरूप होते. त्याप्रमाणेच संघात येणाऱ्या भिन्न वर्णीय भिख्खुंचे वर्णवैशिष्ट्य नष्ट होते. जैन मतालाही चातुर्वर्ण्य निषिद्ध होते. परंतु त्या मुद्यावर भांडण करायला ते सिद्ध नव्हते. बुद्ध मात्र आपल्या मुद्यांबाबत गुळमुळीत मौन धारण करीत नसे. आपल्या धर्माचे आपण वीर आहोत आणि त्याच्या स्थापनेसाठी आपणाला अज्ञानाशी झगडावे हे लागणारच असे त्यांचे मत होते. बुद्धाची ही चातुर्वर्ण्यविरोधाची तीव्रता ब्राह्मणांच्या मनात सदैव डाचत राहिली. म्हणूनच चातुर्वर्ण्याविषयी मूक असलेल्या निरिश्वरवादी सांख्याचार्य कपिलमुनीस त्यांनी आपले म्हटले परंतु बुद्धाशी सदैव वैर मानले.

बुद्धाचा वैदिक धर्माला पाचवा विरोध देव आणि आत्मा यांच्या अस्तित्वाबाबतचा होता. बुद्धाच्या मते सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, सर्वव्यापी, न्यायी आणि प्रेममय अशा देवाचे अस्तित्व ज्ञानाची साधने जी पंचेंद्रिये आणि तर्क यांच्या साह्याने सिद्ध करता येत नाही. शिवाय धम्माचा उद्देश दुःख परिहार आहे. देव मानल्याने दुःख कमी होत नाही. माणसाने दुसऱ्या माणसाशी कसे वागावे म्हणजे सर्व माणसे सुखी होतील हे शिकवणे हे धर्माचे मुख्य कार्य आहे. म्हणून धम्माचा देवाशी संबंध येत नाही. देवाचे अस्तित्व केवळ पोकळ तर्कावर (Speculation) आधारलेले आहे. या अस्तित्वाच्या श्रद्धेतून पूजा, प्रार्थना, पुरोहित इत्यादी अष्टांग मार्गातील समार्दिठ्ठीला घातक अशा खुळ्या समजुतीचे (Superstition) पेव फुटते. माणसाचे परस्पर संबंध प्रज्ञा, शील, करुणा, मैत्री यांनी नियंत्रित होण्याऐवजी पावित्र्य, उच्चनीचता अशासारख्या भ्रामक समजुतींनी नियंत्रित होतात. देवाचे अस्तित्वावरील बुद्धाचे आक्षेप केवळ व्यावहारिक दृष्टीचेच होते असे नाही. प्रतिच्च समुत्पाद या त्यांच्या सिद्धांतात देवाच्या अस्तित्वावर सर्वसामान्य तार्किक स्वरूपाचे आक्षेप घेतलेले आहेत. या सिद्धांताप्रमाणे देव आहे किंवा नाही हा मुख्य प्रश्न नाही. त्याप्रमाणे विश्व देवानी निर्मिले की नाही हाही मुख्य प्रश्न नाही. मुख्य प्रश्न असा की, देवाने जग कसे निर्माण केले ? देवाच्या अस्तित्वाचे मंडण अथवा खंडण या प्रश्नाच्या उत्तराने होईल. यादृष्टीने महत्त्वाचा प्रश्न असा “देवाने हे जग अभावातून निर्मिले की, पूर्वी अस्तित्वात असलेल्या कशातून तरी निर्मिले ?” काहीच नव्हते त्यातून काहीतरी निर्मिले या गोष्टींवर माणसाच्या बुद्धीला विश्वास ठेवता येत नाही. जर या तथाकथित देवाने हे जग पूर्वी काहीतरी होते त्यातून निर्मिले असेल तर जे नवे काहीतरी त्याने निर्मिले ते आपल्या निर्मितीपूर्वीही अस्तित्वात होते असे मानावे लागते. मग जे पूर्वी होते त्याच्या निर्मितीचा कर्ता देव ठरू शकत नाही. देवाने काहीतरी निर्मिण्यापूर्वी कोणीतरी काहीतरी निर्मिलेले असेल तर देवाला आद्यनिर्माता किंवा आदिकारण म्हणता येणार नाही. एकूण कारण अस्तित्वासंबंधीची विचारसरणी तर्कदुष्ट असल्यामुळे देवावरील श्रद्धा बुद्धाच्या समदिठ्ठीप्रधान धम्माला अमान्य आहे.

वेदांतातील मोक्ष सिद्धांत म्हणजे आत्म्याने ब्रह्मात विलीन होणे यालाही तर्कदुष्ट ठरवून आणि मानवी जीवन सुखी करण्याच्या दृष्टीने निरूपयोगी म्हणून बुद्धाने विरोध केला आहे. ब्रह्मविषयक बुद्धाची विचारसरणी त्याच्या वसिष्ठ व भारद्वाज या दोन ब्राह्मणांशी झालेल्या संवादात व्यक्त झाली आहे. बुद्धाचे आत्म्याच्या अस्तित्वावरील व्यावहारिक दृष्टीचे आक्षेप त्याच्या देवकल्पनेवरील आक्षेपासारखे आहेत. शिवाय तो आत्म्याचे म्हणून समजले जाणारे व्यापार नामरूप या सिद्धांताच्या आधारे स्पष्ट करून दाखवितो. कायेच्या उत्पत्तीबरोबरच जाणिवेचा (Consciousness) प्रारंभ होतो. इच्छात्मक भावनात्मक आणि विचारात्मक कार्य ही जाणिवेचीच आहेत. तेव्हा आत्मा हे वेगळे तत्त्व गृहीत धरण्याची आवश्यकताच उरत नाही.

अशारितीने वैदिक धर्माशी विरोध असणाऱ्या बौद्ध धर्माचा पाडाव करण्यासाठी ब्राह्मणांनी भल्याबुल्या सर्व प्रकारच्या साधनांचा उपयोग केला. बौद्ध धम्म ज्या गोष्टींमुळे लोकप्रिय झाला त्या गोष्टी आपल्या पूर्वापार धर्मास संमत नसल्या तरी त्यांचा त्यांनी उपयोग केला. या प्रचार पद्धतीस अनुसरूनच वेरूळच्या बौद्ध लेण्याजवळ त्यांनी आपली ब्राह्मणी लेणी कोरली. गृहस्थाश्रमी अग्निहोत्र हे त्यांचे नित्यव्रत वस्तुतः ब्राह्मण हा त्याला परिमार्जित भिख्खुसारखे गुहेत राहाण्याचे कारण नव्हते. भिख्खुना पावसाळ्याच्या तीन महिन्यात कुठेतरी निवाऱ्याच्या जागी वास करण्याचा बुद्धाचा आदेश होता. त्यामुळे त्यांना लेण्याची आवश्यकता होती. गृहस्थाश्रमी ब्राह्मणाला ती तशी नव्हती. परंतु बौद्ध लेण्यांकडे उपासकांचा मोठा मेळावा आकृष्ट होतो म्हणूनच केवळ त्यांच्या लेण्याच्या बाजूला आपली लेणी कोरून आपल्या धर्माकडे उपासक ओढून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला, बौद्ध धर्माच्या -हासाचे मुख्य कारण म्हणजे, हिंदू पंडित सांगतात त्याप्रमाणे, कुमारिल शंकराचार्य इत्यादींनी बुद्धमताचा वागयुद्धात केलेला पराभव हे नव्हे. कारण दोघांनीही बुद्धाच्या शिकवणुकीचे मध्यवर्ती सिद्धांत जे सामाजिक समता, जगातील दुःख परिहारासाठी प्रत्येक व्यक्तिचे मनःपरिवर्तन, नीति तत्त्वांची सामाजिक जीवनातील प्रतिष्ठापना, बुद्धिवाद इत्यादी, त्यावर या पंडितांनी मुळीच आघात केलेला नाही. या दोघाही पंडितांनंतर बौद्ध धर्म भारतात कित्येक वर्षे समृद्धावस्थेत होता. बौद्ध धर्माच्या -हासाचे मुख्य कारण म्हणजे ज्या भिन्न संस्कृतीच्या व भिन्न सांस्कृतिक पातळीच्या लोकांमध्ये त्याचा प्रचार झाला, त्यांच्या आचारांची व समजुतीची बौद्ध धर्मावर झालेली अनुचित प्रतिक्रीया भारतातील बौद्ध धर्मावर झालेला सर्वात मोठा आघात म्हणजे इस्लामी आक्रमणाचा. भारताकडे वळताना मुसलमान आक्रमकांना जे परधर्मी लोक भेटले ते बौद्धधर्मीयच होते. त्यांच्या भाषेत मूर्तिला “बुत्” असे म्हणत. बुत्शिकन म्हणजे मूर्तिभंजक होणे हे त्यांच्या मते गाझीपणाचे लक्षण होते. हिंदूंपेक्षा बौद्धांवर चढविलेले त्यांचे हल्ले अधिक हिंस्त्र व विध्वंसक स्वरूपाचे होते. त्यांनी केलेल्या बौद्ध भिख्खुंच्या कत्तलीने 11 पासून 13 व्या शतकापर्यंतची इतिहासाची पाने रक्ताने रंगलेली आहेत. नालंदा सारख्या जगविख्यात बौद्ध विद्यापिठाचा त्यांनी पूर्ण नाश केला. हिंदुप्रमाणे बौद्धांमध्ये धर्मप्रचाराचे पिढिजात काम करणारा ब्राह्मणासारखा वर्ग नसल्याने, भिख्खुंच्या कत्तलीनंतर बौद्ध धर्माचा झपाट्याने -हास सुरू झाला. सत्याचाही कधी कधी पराभव होतो हे ह्याचे हे एक उदाहरण आहे. परंतु आज त्यानंतर सहाशे वर्षांनी भारताला बुद्धाची आठवण होत आहे. आज जर त्याने बुद्धाच्या विचारसरणीचा स्वीकार केला नाही तर त्याचे भवितव्य ठीक नाही.

भाषणानंतर विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाने विचारलेल्या सर्व प्रश्नांची बाबासाहेबांनी उत्तरे दिली. ती प्रश्नोत्तरे एका स्वतंत्र वृत्ताचा विषय होतील. विषय ऐतिहासिक असूनही व्याख्यानाच्या अभिनव दृष्टिकोनाने प्रतिगामी मानलेल्या काशी विद्यापिठाच्या विद्यार्थी व आचार्य गणांस चांगलेच खडबडविले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password