Categories

Most Viewed

25 नोव्हेंबर 1956 भाषण 1

माणसा-माणसातील संबंध प्रेम, करुणा या तत्त्वानुसार जोडणाऱ्या बौद्ध धर्माचा मध्यवर्ती सिद्धांत समता आहे.

दिनांक 25 नोव्हेंबर 1956 ला सायंकाळी सारनाथ येथील मूलगंध कुटी विहाराच्या मैदानात महाबोधी सभेद्वारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वागताप्रित्यर्थ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सुरवातीला मंगलाचरण झाल्यानंतर लद्दाखचे लामा लोबजड़ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खदा’ (वस्त्रे विशेष) भेट केली. त्यानंतर वाराणसीच्या अठरा संस्थांनी त्यांना हार प्रदान केले. सेवासंगम ट्रस्टच्या वतीने डॉ. एन. एन. शर्मा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दोन सुंदर सुवर्ण स्मृतिचिन्ह भेट केले. डॉ. बाबासाहेबांचे भाषण ऐकण्याकरिता सारनाथच्या जवळपास असलेल्या जिल्ह्यातील जनसमुदाय प्रचंड प्रमाणात उपस्थित होता.

सदरहू कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ही सभा महाबोधीच्या बुद्ध मंदिराच्या आवारात धम्मेक स्तुपाच्या सावलीत होती. बुद्धाने ज्या ठिकाणी पंचवग्गीय भिख्खुंना आपला पहिला उपदेश करून धम्मचक्रप्रवर्तन केले त्या जागी अशोकाने एक स्तूप उभारला. त्या स्तुपास धम्मेक स्तूप असे नाव आहे. तेथेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दलित जनतेला उद्देशून शेवटचे भाषण व्हावे हा हृदयंगम व क्रांतिकारक योगायोग होय.

बाबासाहेबांसंबंधी चार शब्द सांगताना भिख्खु धर्मरक्षित म्हणाले, “बौद्ध देशात अशी एक श्रद्धामय समजूत प्रचलित आहे की, बुद्धाच्या महापरिनिर्वाणापासून अडीच हजार वर्षांनी भारतात बौद्ध धर्माचे पुनरूत्थान घडणार आहे. ते कार्य जो बोधिसत्त्व तडीस नेईल, तो आज बाबासाहेबांच्या रूपाने आमच्यामध्ये उपस्थित आहे, अशी माझी श्रद्धा आहे. याच सारनाथात, पंचवीस शतकामागे, पाच भिख्खुसमोर आजच्या सारख्याच एका रविवारी, या समोरच्या धम्मेक स्तुपाच्या जागी भगवंतांनी धर्मचक्राचे परिवर्तन केले. त्याच धर्मचक्राला नागपूर येथे गति देऊन, पाच लाख लोकांच्या हृदयात धम्माचा पवित्र संदेश ज्याने नेऊन पोचविला. त्याच महापुरूषाचे आज आम्ही स्वागत करीत आहोत.”

सारनाथचे प्रशांत व पवित्र स्मृतीने भारलेले वातावरण, सभोवार भक्तिभावाने बसलेली दलित जनता आणि लंका, तिबेट, ब्रह्मदेश, जपान या देशातील काही लामा भिख्खु व उपासक मंडळी, या सर्व घटनांमुळे की काय बाबासाहेबांचे मन भरून आले. कंठ किंचित् सद्गदित झाला.

पाणावल्या डोळ्यांनी आणि भरल्या कंठाने केलेले ते कारूणिक भाषण होते. बाबांचा तो अंतिम संदेश ठरला.

स्वागताला उत्तर देताना केलेल्या आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले.
दीर्घ प्रवासाच्या दगदगीने मला शीण आला आहे. मी येथे केवळ तुमच्या स्वागताच्या फुलमाळेसाठी आलो होतो. परंतु माझ्या भेटीसाठी तुम्ही जी उत्सुकता व आस्था दाखविलीत तिची परतफेड म्हणून तुम्हाला चार शब्द सांगणे मी माझे कर्तव्य समजतो. तुम्हांपैकी पुष्कळसे लोक अस्पृश्य गणले जातात. भगवान बुद्धाच्या काळी अस्पृश्यता नव्हती. सांस्कृतिकदृष्ट्या कमी प्रतीच्या जमाती त्यावेळी होत्या परंतु त्यांना अस्पृश्य मानीत नसत. अस्पृश्यतेचा शाप गेल्या दीड हजार वर्षांचा आहे आणि त्याला जबाबदार हिंदू धर्म आहे. अस्पृश्यता हा आमचा कलंक नसून तो उच्च हिंदू जातींच्या हृदयाचा कलंक आहे. आज इतकी वर्षे झाली परंतु तो कलंक धुवून काढण्याची हिंदुंना कधीही प्रामाणिक इच्छा झाली नाही. आमच्या राहणी व करणीवरून काही ते आम्हाला अस्पृश्य मानीत नाहीत. आम्ही स्वच्छता राखली. स्वच्छ कपडे घातले, उच्च व्यवसाय केले, मन निष्पाप व चारित्र्य निष्कलक ठेवले आणि निर्भयतेने वागू लागलो तरीही हे हिंदू आम्हाला अस्पृश्य मानतात. तेव्हा हा हिंदू धर्म आम्हाला सोडलाच पाहिजे व जो बौद्ध धर्म भारतात उदयाला आला आणि ज्याने माणसामाणसात भेद करण्याचे नाकारले, ज्या धर्माचा मध्यवर्ती सिद्धांत समतेवर आधारलेला आहे, तो आता आम्ही स्वीकारला पाहिजे. भगवंतानी आपला धर्म जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी स्थापिला. इतर धर्म, देव व मनुष्य यांच्यामधील संबंध जोडणारे आहेत. माणसामाणसातील संबंध प्रेम, करुणा या तत्त्वानुसार जोडणारा धर्म बौद्ध धर्म हा एकमेव आहे. बुद्धाने आपल्या धर्माचरणाचा आदर्श संघाच्या रूपाने जगासमोर मांडला. त्या समाजात जातपात नाही. समुद्रात नदी मिळाल्यावर ती जशी समुद्राशी एकरूप होते त्याप्रमाणे बुद्धाच्या समाजात जातपात नाहिशी होऊन सर्व एकरूप होतात.

आज दीड हजार वर्षे हिंदू समाजाची सुधारणा होईल आणि त्यात समता येईल, शहाणपणा येईल याची गाव शिवेवर बसून आम्ही वाट पाहात आलो. परंतु कोणालाही सुधारणा सुचली नाही. कोणीही आम्हाला आत बोलाविले नाही. उलट धर्माच्या नावाखाली आमची शतकानुशतके अधिकच विटंबना आणि गळचेपी होऊ लागली. कोणी म्हणतात, समता ही भारताला अज्ञात होती. गेल्या शतकातच समतेची कुजबूज येथे सुरू झाली आहे. तेव्हा हळूहळू हिंदू धर्मही सुधारेल आणि समतेचा अंगीकार करील! हिंदू धर्म सुधारला जाईल हा एक भ्रम आहे. इतिहास ग्वाही देत आहे की सामाजिक समतेचा संदेश भगवान बुद्धाने अडीच हजार वर्षांमागे या भारताला दिला. परंतु हा संदेश दडपून टाकण्याचा या देशात बुद्धिपुरःसर नीच असा प्रयत्न झाला. अगदी त्याच्या विरुद्ध विषमतेवर आधारलेला आणि काही विशिष्ट वर्गाच्याच हिताची पर्वा करणारा हिंदू धर्म प्रभावशाली करण्यात आला. जोपर्यंत हिंदू धर्म पाळला जात आहे तोपर्यंत या देशातून सामाजिक विषमतेचे उच्चाटन होणार नाही. हिंदू धर्माने बौद्धिक पातळीवर कितीही उदात्त तत्त्वांचा उद्घोष केला तरी त्यांचा आचार हा वर्ण, जातपात, स्पृश्यास्पृश्यता असल्या विषमतेचा असतो. चातुर्वर्ण्य हा त्याचा पृष्ठकणा आहे. तेव्हा हिंदू धर्म सोडल्याशिवाय तुम्हाला तरणोपाय नाही. तुम्ही बौद्ध झालात तर तुम्हाला बांधव म्हणून मानणारे या जगात काही लोक लाभतील. आज आमच्या देशात जो अन्याय होत आहे त्याने आम्ही विव्हळत आहोत, परंतु त्याला सहानुभूतीची साथ कोठे तरी मिळत आहे काय ? नाही. कारण अन्याय करणारे सर्व हिंदू आहेत व त्यांच्या शब्दाप्रमाणे येथील राज्यतंत्र हालत आहे. तुम्ही बौद्ध झालात तर परदेशस्थ बौद्धधर्मीय तुम्हाला बंधु मानतील व तुमच्या दुःखाच्या हाकेला ते ओ दिल्याशिवाय राहाणार नाहीत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password