लोकशाहीत विरोधी पक्षाची फार आवश्यकता असते.
रविवार तारीख 25 नोव्हेंबर 1951 रोजी संध्याकाळी चार वाजता शिवाजी पार्क, मुंबई येथे शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन आणि समाजवादी पक्षाच्या वतीने निवडणूक प्रचाराची जंगी सभा होणार आहे. सभेत प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व साथी अशोक मेहता यांची भाषणे होतील. तत्पूर्वी भायखळ्यापासून प्रचंड मिरवणूक निघेल. त्यात सर्वांनी सामील व्हावे. असे पत्रक ज. ग. भातनकर, जनरल सेक्रेटरी, मुंबई दलित फेडरेशन शाखा यांच्या नावाने जनतेच्या 24 नोव्हेंबर 1951 च्या अंकात प्रसिद्ध झाले होते. समेत किमान दोन लाख जनसमुदाय हजर असावा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,
पंडित नेहरूनी परवाच्या भाषणात माझ्या टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मी त्यासंबंधी बोलणे अप्रस्तुत होणार नाही. मी काँग्रेसवर ज्या प्रकारची टीका करतो तीच टीका मी माझ्या राजीनाम्याच्या पत्रात केली आहे. नेहरूंनी गेल्या कित्येक दिवसात माझ्या टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न केला नाही. लोकसभेतसुद्धा मी निघून गेल्यानंतर सायंकाळी सहा वाजता त्यांनी त्यांचा व माझा केवळ पत्रव्यवहार वाचून दाखविला. माझ्या आरोपांचे निरसन केले नाही. ठिकठिकाणी आपल्या दौ-यातसुद्धा त्यांनी त्यासंबंधी खुलासा केला नाही. बरे परवाच्या भाषणात तरी त्यांनी काय सांगितले ?
माझे काँग्रेसवर मुख्यतः दोन आरोप आहेत. एक असा की काँग्रेस सरकारने हरिजनांच्या उन्नतीसाठी काही कार्य केले नाही. पंडित नेहरूंनी सांगितले की, माझे म्हणणे खोटे आहे. पण हा मताचा प्रश्न नाही. वास्तविकतेचा आहे. पंडित नेहरूच केवळ सत्य वक्ते आहेत आणि दुसरे नाहीत असे जग मानीत नाही. निदान मी तरी तसे मानीत नाही. माझे म्हणणे नेहरूंना फक्त एकाच तऱ्हेने खोडून काढता आले असते आणि ते म्हणजे त्यांनी आपल्या सरकारने हरिजनांसाठी काय केले आहे याची समग्र वस्तुस्थिती निदर्शक माहिती देणारे प्रत्रक काढायला पाहिजे होते. निदान त्यांच्या सरकारी दप्तरात तर ही माहिती असेल की नाही ? मुंबईला येण्यापूर्वी व जाहीर सभेत माझ्या आरोपाला उत्तर देण्यापूर्वी आपल्या खात्याकडून त्यांनी ही माहिती का आणली नाही ? माझी पत्रके व वेळोवेळी पाठविलेली पत्रे पंडित नेहरूंजवळ असतीलच. निदान माझ्याजवळ त्यांच्या प्रती आहेतच. तेव्हा त्यातील आरोपांना मुद्देसूद उत्तर द्या असे माझे नेहरूना सांगणे आहे.
त्यांच्या परराष्ट्र धोरणावर माझा दुसरा आरोप आहे. मंत्रीमंडळात असताना मी त्यासंबंधी काहीही बोललो नाही असे नेहरूंचे म्हणणे आहे. पहिली गोष्ट अशी की, मी 15 ऑगस्ट 1947 पासून ते 26 जानेवारी 1950 पर्यंत घटनेच्या कामात व्यग्र होतो. तेव्हा परराष्ट्र धोरणावर मला नेहरूंशी बोलायला वेळच मिळाला नाही. दुसरे असे की, समजा त्यावेळी मी नेहरूशी बोललो नाही म्हणून माझे म्हणणे चूक कसे ठरते ? समजा त्यावेळी त्याची वाच्यता न करण्यात माझी व्यक्तिगत चूक झाली पण तेवढीच सबब पुढे करून तुम्ही माझ्या मुद्यांना बगल कशी देता ? मी त्याच वेळी ते बोललो का नाही. म्हणजे राजीनामा देऊन निघून का गेलो नाही असेच जर पंडित नेहरूंना सुचवायचे असेल तर मी त्यांना एवढे सांगतो की, मंत्र्यांना असे मोठमोठे निर्णय तारतम्याने घ्यावे लागतात. प्रत्येक मुद्यावर मतभेद झाल्याबरोबर राजीनामे देण्याची साथ सुरू झाली तर मोठा अनवस्था प्रसंग ओढवेल.
मतभेद असतानाही मी मंत्रीमंडळात राहिलो याचे मुख्य कारण राष्ट्राची घटना तयार करण्याचे महान कार्य माझ्या शिरावर होते. मी ते सर्वात अधिक महत्त्वाचे समजत होतो. ते पार पाडण्यात माझ्या कर्तव्यबुद्धिचाच भाग होता. त्या कामावर मी लाथ मारून बाहेर जावे असे म्हणणाऱ्या माणसाला वेड्यातच काढले पाहिजे.
म्हणूनच मी म्हणतो की, अशा प्रकारची हास्यास्पद विधाने न करता काश्मीर प्रश्न किंवा भारताचे परराष्ट्रीय धोरण यावरील माझी विधाने कसोटीला लावून पहा व त्यांना उत्तरे देण्याचा प्रयत्न करा.
नेहरू म्हणजे काँग्रेस हा भ्रम आहे. नेहरू स्वप्नाळू व भोळे आहेत. काँग्रेसवाले नेहरूंच्या पाठिशी नाहीत याची अनेक उदाहरणे देता येतील, काँग्रेसच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी टंडण विरुद्ध कृपलानी असा झालेला सामना, खरा पटेल विरूद्ध नेहरू असा होता. प्रथम नेहरूंनी श्री. शंकरराव देवांना हळद लावून बाशिंग बांधून तयार केले. पण या नव-या मुलाला कोणतीही नवरी मिळणार नाही हे पाहून कृपलानींना उभे केले. अखेर कृपलानीही पडले. पर्यायाने हा नेहरूचाच पराभव होता. सरदार पटेलांच्या मृत्यूनंतर नेहरू हेच काँग्रेसचे एकमेव पुढारी म्हणून राहिले,
तरीसुद्धा नेहरूच्या मागे काँग्रेस आली नाही. बंगलोर काँग्रेसमध्ये नेहरूंच्या हाती सर्व सूत्रे सोपविण्याची सूचना त्यांच्याच एका दिल्लीच्या मित्राने आणली पण तिला दुजोरा द्यायलाही कुणी मिळाले नाही. नेहरूनी राजीनाम्याची धमकी दिल्यानंतरही टंडणजीनी राजीनामा देण्याचे काही कारण नाही, असे काँग्रेस कार्यकारिणीने सांगितले. याचा अर्थ असा की, नेहरू कॉंग्रेसमधून गेले तरी हरकत नाही इतकी काँग्रेसवाल्यांची तयारी होती. पण निवडणुका दिसू लागल्याबरोबर अकस्मात हे चित्र बदलले. एखाद्या मशहूर सिनेमा नटीच्या भूमिकेमुळे चित्रपटाला भाव येतो. मग त्यात इतर काही नसले तरी चालते. काँग्रेसवाल्यांना निवडणुका जिंकण्यासाठी टंडण ही काही विशेष योग्य नटी वाटली नाही. म्हणून माझा नेहरूना असा सवाल आहे की, काँग्रेसवाले आज तुमच्या पाठिशी आहेत ते तुमच्यावरील प्रेमामुळे की तुमचा निवडणुका जिंकण्यासाठी वापर करून घेण्यासाठी? मी जर नेहरूच्या जागी असतो तर माझ्या मनात हा प्रश्न निर्माण झाला असता. चार वर्षे मी काँग्रेसवाल्यांच्या सान्निध्यात होतो. त्यांच्या कानाकोपऱ्यात काय चालते, कोण लोक नेहरूविषयी काय काय बोलतात हे मी नेहरूपेक्षाही अधिक जाणतो.
काँग्रेस हाच देशातील एकमेव सुसंघटित पक्ष आहे. त्याशिवाय दुसरा कोणताही पक्ष स्थिर सरकार स्थापू शकणार नाही असे सांगणाऱ्यांना मी विचारतो की, काँग्रेसमध्ये जी बजबजपुरी माजली आहे ती सोडली तरीही काँग्रेस वरिष्ठात तरी मतैक्य आहे काय? मला वाटते निवडणुका संपल्यावर तर हे वाद अधिक उफाळून वर येतील. खुद्द राजेंद्रप्रसाद व पंडित नेहरू यांच्यात घुसफूस सुरू असावी असा माझा तर्क आहे. त्यांचे परस्पर आलिंगनाचे फोटो म्हणजे नागरी संस्कृतीतील खोटी औपचारिकता आहे. हिंदू कोडाच्या प्रश्नावर त्यांचे मतभेद दिसलेच. तसेच मागे राष्ट्राध्यक्ष कुणी व्हावे हे ठरविण्याच्या वेळी नेहरूंनी राजाजीना व पटेलांनी राजेंद्रप्रसादांना पाठिंबा दिला होता हेही माहीत आहे. निवडणुकानंतर पुन्हा यावर झुंज होईलच.
काँग्रेसमध्ये किती घाण माजली आहे हे मोठेमोठे कॉंग्रेस नेतेच काँग्रेसबद्दल काय म्हणतात त्यावरून पहा. खुद्द टंडणजींनी काँग्रेसचे तिकीट घेण्यास साफ नकार दिला. बाबू संपूर्णानंद यांनी तेच केले. संपूर्णानंद म्हणाले की, काँग्रेसचे राजकारण म्हणजे गटाराचे राजकारण झाले आहे.
पंडित नेहरूच्या मताविषयी मला अंदाज लागलेला नाही. ते कम्युनिस्ट, सोशालिस्ट, भांडवलदार धार्जिणे यापैकी काय आहेत, या प्रश्नाचे निश्चित उत्तर मी देऊ शकणार नाही. परंतु ते सर्वसामान्यपणे प्रगतीवादी आहेत असे मी मानतो. म्हणूनच त्यांचे सहकारी श्री. किडवाई जेव्हा काँग्रेसबाहेर पडले तेव्हा मी त्यांना म्हटले होते की, तुम्ही जर पंडित नेहरूंना घेऊन बाहेर पडणार असाल व सोशालिस्टांसारख्या प्रगतीशील पक्षांशी सहकार्य करणार असाल तर मी सुद्धा तुम्हाला येऊन मिळेन, पण ते चिखलात फसले आहेत त्याला कोण काय करणार? किडवाईत थोडासुद्धा राजनीतीचा अंश दिसला नाही.
लोकशाहीत कोणत्याही पक्षाच्या हाती अनियंत्रित सत्ता असू नये. त्यासाठी विरोधी पक्षाची फार आवश्यकता असते. इंग्लंड, अमेरिकेत किंवा फ्रांसमध्ये असे दोन किंवा तीन पक्ष असल्यामुळे लोकशाही यशस्वी झाली आहे. त्यासाठीच आम्ही सोशालिस्ट व शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन मिळून एक मजबूत विरोधी आघाडी उभारायचे ठरविले आहे. आमच्यात काही मतभेदाचे मुद्दे असले तरी साम्य पुष्कळ आहे आणि विशेष म्हणजे आम्हाला अशारितीने देशहित साधायचे आहे. देशात आमचे सरकार आम्ही स्थापू शकलो नाही, तरी सत्तारूढ पक्षाला लगाम घालू शकेल असा प्रबळ विरोधी पक्ष उभारू शकू.
भाषावार प्रांतरचनेबाबत सुद्धा आम्हाला झगडा करावा लागेल. कारण मुंबई शहर महाराष्ट्रापासून अलग करण्याचे डाव खेळले जात आहेत. नेहरूंचे मतही याबाबत महाराष्ट्राला प्रतिकूल आहे. हैदराबादचे विलीनीकरण करण्यास नेहरूंचा विरोध आहे. तेव्हा ही एक मोठी भानगडच होणार आहे.