Categories

Most Viewed

24 नोव्हेंबर 1956 भाषण

बौद्धांचे आद्यकर्तव्य आहे की, त्यांनी दर रविवारी बुद्धविहारात जावे.

दिनांक 24 नोव्हेंबर 1956 रोजी दुपारी 1 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर काशीहून सारनाथला आले. ते तेथील भिक्खुंना भेटले. त्यांच्याशी चर्चा करताना बाबासाहेबांनी मुख्यत्त्वेकरून प्रत्येक बौद्धाने दर रविवारी नियमितरित्या बुद्ध मंदिरात जाऊन उपदेश ग्रहण करावा यावर जोर दिला. तसेच त्यांनी प्रत्येक भागात बुद्ध मंदीर निर्माण करून त्यात सभा घेण्यासाठी मुबलक जागा असलेले सभागृह असावे असे निक्षून सांगितले. या दृष्टीने सिलोन, ब्रह्मदेश, तिबेट, चीन इत्यादी देशातील भिक्खुंनी अग्रेसर होऊन आणि पैसा जमवून मदत करण्याचा त्यांनी सल्ला दिला.

याप्रसंगी उपस्थित लोकांना आणि भिक्खुंना संबोधित करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,

“जनतेने आता गंभीरपणे विचार केला पाहिजे. हिंदू धर्मग्रंथात जे जीवन वर्णन केलेले आहे त्याचा व आम्ही तयार केलेल्या घटनेत काही साम्य आहे काय ? जर साम्य नसेल तर त्याचे कारण काय ? आमचा धर्म, घटना या दोहोंपैकी एक गोष्ट आम्ही स्वीकारली पाहिजे. एक तर धर्माला जिवंत ठेवले पाहिजे किंवा घटनेलाच जगवले पाहिजे. दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी राहू शकत नाही. दोहोत मेळ बसू शकत नाही.”

हिंदू धर्मात अनेक मते आहेत. त्या सर्वात शंकराचार्यांचे मत सर्वात चांगले समजले जाते. शंकराचार्याचा ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या हा सिद्धांत सर्वात अधिक महत्त्वपूर्ण समजला जातो. परंतु बौद्ध धर्माच्या उच्च सिद्धांतासमोर तो अगदी तुच्छ व निरर्थक आहे. नवीन झालेल्या बौद्धांचे आद्य कर्तव्य आहे की, त्यांनी दर रविवारला बौद्ध मंदिरात गेले पाहिजे. असे जर झाले नाही तर नवीन बौद्धांना धर्माचा परिचय होणार नाही. यासाठी ठिकठिकाणी बुद्ध मंदिरे निर्माण झाली पाहिजेत. मंदिरात सभा घ्यायला जागा असावी. लंका, बर्मा, तिबेट, चीन आदी देशातील बौद्ध भिक्खुनी पुढाकार घेऊन पैसा गोळा करावा व हिंदुस्थानातील बौद्ध लोकांना मदत करावी.

आज सकाळी उत्तर प्रदेशचे माजी सभाप्रमुख श्री द्वारकाप्रसाद मला मिळाले होते. त्यांनी मला डिसेंबरमध्ये जोनपूरला येण्याबद्दल आग्रह धरला. मी त्यांना येण्याचे आश्वासन दिले. परंतु तारीख अजून ठरलेली नाही. जोनपूरमध्ये विराट सामुदायिक धर्मांतराच्या कार्यक्रमाची तयारी सुरू झालेली आहे. या प्रसंगी उत्तर प्रदेशातील पुर्णिया जिल्ह्यातील लाखो मागासलेले लोक दीक्षा घेतील. या मागासलेल्या लोकांचे सवर्ण हिंदुकडून शोषण आजही सुरू आहे. बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन ते आपल्या पूर्वजांचा मार्ग पुन्हा स्वीकार करतील.

बौद्ध धर्माचा प्रारंभ पक्क्या पायावर झालेला आहे. हा धर्म मानव धर्म आहे. या धर्माशिवाय मानवाच्या कल्याणाचा दुसरा कोणताही उपयुक्त धर्म नाही.

आपण भारताचा प्राचीन इतिहास समजून घेतला पाहिजे. हिंदुस्थानात सर्वात प्रथम आर्य आणि नाग लोकांचे युद्ध जुंपले, आर्याजवळ युद्धात घोडे होते. त्या बळावर त्यांनी नाग लोकांवर विजय मिळविला. हेच नाग आज हिंदू आहेत. नागांनी सर्वात प्रथम बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्यांना बौद्ध धर्माचा प्रसार करण्यात सफलता परंतु या नागांचा नायनाट करण्याकरिता आर्यांनी वेळोवेळी प्रयत्न केले. याचे पुरावे महाभारतात अनेक ठिकाणी आढळून येतात. पुढे आर्यांनी ब्राह्मण धर्माला व्यापक बनविले. त्यात अनेक दोष निर्माण झाले. चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा उदय हा ब्राह्मणांनीच केला. भगवान बुद्धाने चातुर्वर्ण्याला घोर विरोध केला. त्यांनी चातुर्वर्ण्य नष्ट करून समतेचा प्रचार केला व याच आधारावर बौद्ध धर्माची स्थापना केली. भगवान बुद्धाने ब्राह्मणांच्या यज्ञांना अमान्य केले व त्यांना तिलांजली दिली. ब्राह्मणांनी हिंसेची प्रथा सुरू केली होती. ती नष्ट करून भगवंताने अहिंसेचा प्रचार केला.

भगवंताने म्हटले आहे की, बौद्ध धर्म महासागराप्रमाणे आहे. यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही. भगवान बुद्धाने करुणेचा प्रचार करून त्या काळातील पददलित लोकांची मने आकर्षित केली व त्यांना योग्य मार्ग दाखविला.

हिंदू धर्माच्या मुळात रोग झालेला आहे. याच कारणामुळे आम्हाला वेगळा धर्म ग्रहण केला पाहिजे. माझ्या समजुतीप्रमाणे बौद्ध धर्म हाच योग्य धर्म आहे. यात उच्च-नीच, श्रीमंत-गरीब, जाती-पाती आदी भावना नाहीत.

अस्पृश्य वर्गाचे कल्याण बौद्ध धर्म स्वीकारल्यानेच होण्याची शक्यता आहे. हिंदू समाजात असलेली असमानता, भेदाभेद, अन्याय व कुप्रथा बौद्ध धर्म स्वीकार केल्याने दूर होऊ शकतात.

भारतातील अस्पृश्यांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यावर बर्मा, चीन, जपान, लंका आदी सर्व बौद्ध देशांची सहानुभूती आमच्या करूण दशेवर होईल व आम्ही नेहमीकरिता हिंदू धर्माच्या जाचातून मुक्त होऊ शकू. वरील देशांनी आमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध का आवाज उठविला नाही याचे कारण म्हणजे त्यांचा समज होता की हिंदुंचे हे घरगुती भांडण आहे. जर बौद्ध धर्म स्वीकार केल्यानंतरही हिंदू लोक आम्हाला समता, स्वतंत्रता आणि बंधुत्वापासून दूर ठेवतील तर आम्ही वरील बौद्ध राष्ट्रांच्या सहयोगाने तो मिळविल्याशिवाय राहणार नाही.

हिंदू धर्माच्या कपाळावर अस्पृश्यता हा एक भयंकर कलंक लागला आहे. याचमुळे हिंदू जातीच्या हृदयातील दुष्टता दिसून येते. अस्पृश्य पवित्र व शुद्ध होवूनही देवदर्शनासाठी जातात तरी त्यांच्यासाठी मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. शिवाशिवी, भेदाभेद, जातपात यांना समूळ नष्ट करणे हे सवर्ण हिंदुचे कर्तव्य आहे. आम्ही त्यांचा मुर्दा आपल्या खांद्यावर का वाहवा.

आज मी अस्पृश्यांना आवाहन करतो की त्यांनी अशाच धर्माचा स्वीकार करावा की ज्या धर्मात मनुष्यमात्रात भेदाभेद नाही. सारखेपणा आहे व मित्रत्वाच्या नात्याने ते एकत्र येऊ शकतात. हाच उच्च आदर्श बौद्ध धर्मात आहे. ज्याप्रमाणे अनेक नद्या समुद्राला येऊन मिळतात व आपले अस्तित्व विसरतात. त्याप्रमाणे बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर सर्व लोक समान होतात. कोणत्याही प्रकारची विषमता त्यांच्यात राहात नाही. बौद्ध धर्म हा अस्पृश्यांनाच नव्हे तर अखिल मानवांना देखील कल्याणकारक आहे. सवर्ण हिंदुंनी या धर्माचा अवश्य स्वीकार करावा.

इतर धर्मात सृष्टी निर्माता ईश्वर समजला जातो व जे दोष राहिले त्याबद्दल ईश्वराला जबाबदार पकडले जाते. तशी विचारसरणी बौद्ध धर्मात नाही. बौद्ध धर्मात जगात दुःख आहे असे म्हटले आहे. त्या दुःखाचे निरोधन होऊ शकते व त्याकरिता कोणते मार्ग आहेत ह्याचा विचार केला आहे. हिंदू धर्मात रूढीवर सारी विचारसरणी आधारित आहे. ही रूढी चातुर्वर्ण्य पद्धतीतून जन्माला आली. बौद्ध धर्मात अनेक भिक्षु व भिक्षुणी झाल्या. त्यांच्याबद्दलची माहिती थेर गाथा व थेरी गाथा यांच्यात सापडते.

हिंदुंना न्याय करण्याचा अधिकार होता पण त्यांनी आजवर अस्पृश्यावर अन्यायच केला आहे. हिंदुपासून आपण पृथक होऊन भगवान बुद्धाच्या चरणावर नम्र झाले पाहिजे,

मला काठमांडू येथील पशुपतिनाथाच्या मंदिरात जाऊ दिले नाही, असे खोटेच वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाल्याचे मी ऐकले. मी कोणत्याच हिंदू मंदिरात जात नाही. मला शंभर वेळा प्रार्थना केली असती तरी मी त्या देवळात जाणे शक्य नव्हते. माझ्या खाजगी सेक्रेटरीला नेपाळच्या महाराजाने आदले दिवशी बोलावून डॉक्टरसाहेबास मंदिरात न जाऊ देण्याबद्दलची सूचना केली होती व म्हटले होते की, बौद्धांना हिंदू मंदिरात जाऊ देण्याइतपत आजची परिस्थिती नाही. नेपाळचे, लंकेचे व भारतीय भिक्षु मंदिरात जात होते. त्यांना मनाई करण्यात आली. जी व्यक्ती देवावर विश्वास करीत नाही. तिने तसे करणे म्हणजे स्वतःच्याच मनाची फसवणूक करणे होय. हिंदुच्या देवाचा अपमान करणे होय. बौद्धांनी कधीही हिंदुच्या देवळात जाऊ नये. बौद्ध मंदिरात सर्व समान आहेत. कोणाचाही तेथे निषेध करू नये.

जे अस्पृश्य हिंदू धर्मात राहून मंदीर प्रवेश करू इच्छितात हा त्यांचा नुसता दुराग्रह आहे. त्यांना अन्याय, अपमान व विटंबना करून घ्यायची असेल तर ह्याबाबतीत मला बोलायचे नाही. पण बौद्धांनी या भानगडीत पडू नये. आपल्या रोजच्या प्रार्थनेत आपण म्हणतो, ‘नत्थि मे सरणं अञ्जु, बुद्धो मे सरणं वरं . मी बुद्धाशिवाय इतर कोणाला शरण जाणार नाही. असे म्हणणाऱ्यांनी हिंदू मंदिरात जाण्याचा हट्ट का पकडावा.

काशी येथील मंदीरप्रवेश हा राजकीय स्टंट, डाव आहे. त्यापासून दलितांना कसलाच फायदा व्हावयाचा नाही. म्हणून बौद्ध धर्माचा स्वीकार करूनच बंधुत्वाचा व समतेचा दर्जा प्राप्त करणे एवढेच आपले मुख्य कर्तव्य आहे.

भाषणानंतर वेगवेगळ्या देशातून आलेल्या अंदाजे 150 भिक्खुंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाला अनुमोदन देऊन सर्वप्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले.

सायंकाळी 5 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सारनाथ येथील भग्न अवशेषांचे निरीक्षण केले. धम्मेक स्तुपाजवळ अंदाजे एक तास थांबून तिबेटी लामाच्या पूजेचे अवलोकन केले आणि त्यानंतर त्यांनी काही सूचना केल्या ज्याचे सर्वांनी मनःपूर्वक स्वागत केले.

रात्रौ 7 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूलगंध कुटीमध्ये विधिवत बराच वेळ बुद्ध पुजा केली. त्यानंतर त्यांनी भिख्खुचे सूत्रपाठ ऐकले. त्याचबरोबर त्यांनी अर्धा तास, तिबेटी उपदेश विधीचे अवलोकन केले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password