ब्रह्मं सत्यं जगन्मिथ्या ‘ ही एक बौद्धिक लटपट आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिनांक 23 नोव्हेंबर 1956 रोजी रात्री 9 वाजता असनसोल पॅसेंजरने असल्यामुळे वाराणसी कँट स्टेशनवर त्यांचे स्वागत करण्यासाठी सन्माननीय व्यक्ती, काशी विद्यापीठ आणि हिंदू विश्वविद्यालयाचे विद्यार्थी, महाबोधि सभेचे कार्यकर्ते तसेच दलित वर्गातील लोक प्रचंड प्रमाणात उपस्थित होते. स्टेशनवर आलेल्या लोकात प्रामुख्याने श्री. प्रभुनारायणसिंह एम. एससी., भिक्षु धर्मरक्षित, भिक्षु संघरत्न, मेळा अधिकारी श्री. जगदीशशरणसिंह, श्री. जगन्नाथ उपाध्याय उपस्थित होते..
स्टेशनवर बैंड वाजविण्यात येत होता तसेच घोषणा दिल्या जात होत्या. लोक बौद्ध पताका घेऊन गाडी येण्याची वाट पाहात होते. गाडी येताच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय’ ‘आंबेडकर जिंदाबाद’ असे नारे दिल्या जात असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वागत केल्या गेले. गर्दी अनावर असल्यामुळे काही लोक त्यात दबले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेशनहून हॉटेल दी पॅरिस मध्ये गेले. जेवण केल्यानंतर ते सारनाथ करिता रवाना झाले. ते तेथील नवनिर्मित अतिथीगृहात थांबले. त्यांचा तेथे 23 नोव्हेंबर 1956 ते 27 नोव्हेंबर 1956 दुपारपर्यंत मुक्काम होता. या दरम्यान त्यांनी त्या विभागात भाषणे दिली.
दिनांक 24 नोव्हेंबर 1956 रोजी 3 वाजता काशी हिंदू विश्वविद्यालय संघाच्या द्वारे आयोजित आर्टस् कॉलेजच्या मैदानात भरलेल्या सभेला त्यांनी संबोधित केले.
डॉ. बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले,
मी आपल्यासमोर कोणत्या विषयावर बोलावे हे मला सुचविण्यात आलेले नाही. तरी तुमच्या हिंदू विद्यापीठाच्या आवारात प्रवेश केल्यावर जे विचार माझ्या मनात घोळू लागले आहेत तेच मी तुमच्यापुढे मांडणार आहे. हिंदू समाज रचनेचा एक अभ्यासक या नात्याने हिंदू-जीवनविषयक तत्त्वज्ञानाचा अभ्यास करताना मला भिन्न भिन्न तात्विक विचारसरणी आढळल्या. बुद्धकाळी 92 दर्शने प्रचलित होती. त्यापैकी सहा अभ्यासनीय मानली जात. वर्तमान काळातील सर्वसामान्य हिंदू समाज बव्हंशी शंकराचार्याचे तत्त्वज्ञान प्रमाण मानतो. शंकराचार्याचा मुख्य सिद्धांत म्हणजे ब्रह्म सत्य जगन्मिथ्या ! ब्रह्म तेवढे सत्य व इतर जग मायामय आहे. या विचाराची हिंदू मनावर घट्ट पकड़ बसलेली आहे. आपण हा सिद्धांत मनुष्याला कितपत उपयुक्त आहे याचा विचार केला आहे किंवा नाही हे मला माहीत नाही. माझा तुम्हास प्रश्न आहे की, हा सिद्धांत माणसाला कितपत मार्गदर्शक आहे ? शंकराचार्य म्हणतात ब्रह्मं सत्यं परंतु या सत्याची व्याख्या काय ? व्यावहारिक जीवनात माणसाची पंच-ज्ञानेंद्रिये हीच सत्यासत्याचा निर्वाळा देतात. हीच त्याची ज्ञानार्जनाची अंतिम साधने आहेत. ज्ञानेंद्रिये फुलाचा सुगंध घ्राणेंद्रियाने कळतो. रंग, आकार दृष्टिद्रियाने प्रतीत होतो. त्याच्या चवीची साक्ष जिव्हा देते. परंतु शंकराचे ब्रह्म ‘नेति नेति’ शब्दानेच वर्णिले जाते. शंकराची ब्रह्माची व्याख्या नकारात्मक आहे. याउलट महायानाची ब्रह्म विहाराची कल्पना चित्य आहे. त्यांच्या ब्रह्मविहारात दान, उपरेखा (त्याग), करूणा आणि मैत्री या चार गुणांच्या परमोत्कर्षाचा अंतर्भाव आहे. ज्या ज्या ठिकाणी या गुण चतुष्टयीचा वास आहे. त्या त्या ठिकाणी त्यांच्या दृष्टीने ब्रह्म आहे. शंकर आपले ब्रह्म कुठे आहे किंवा कसे आहे याची चाहूलही लागू देत नाही.
एखाद्या विधानात (Proposition) वास्तव सत्य नसले, केवळ काल्पनिक सत्य असले तरी व्यवहारात त्याचा उपयोग होऊ शकतो. कायद्यामध्ये आम्ही सामाजिक हितासाठी कायदेशीर काल्पनिक सत्य (Legal fiction) मानतो. उदाहरणार्थ एखाद्या माणसाकडे जमिनीचा तुकडा आहे परंतु त्याने तो कोणापासून खरेदी केला किंवा वारसा हक्काने मिळविला त्यासंबंधी त्याच्याजवळ खरेदीखत अथवा इतर कायदेशीर कागदपत्रे नाहीत. अशावेळी कोर्ट एक सिद्धांत निर्मिते की त्याला ती जमीन राजाने बक्षिस दिलेली असेल असे काल्पनिक सत्य गृहीत धरण्यात काहीच चुकत नाही. शंकर ब्रह्म सर्वत्र आहे असे सांगतो. हे सार्वत्रिक ब्रह्म काल्पनिक सत्य म्हणून मानावयास हरकत नाही. पण मग असा प्रश्न उद्भवतो की ब्रह्म सर्वत्र आहे तर सर्वच समान मानले पाहिजेत. जर ब्राह्मणात ब्रह्म तर तो अस्पृश्यातही असला पाहिजे. पण मग ब्राह्मण श्रेष्ठ व अस्पृश्य नीच असा भेद का केला जातो ? जर शंकराने ब्रह्माच्या सार्वत्रिकतेच्या आधाराने अखिल मानवजात एक आहे असे मानून समतेचा पुरस्कार केला असता तर तो सिद्धांत विचारार्ह व गंभीर गणला गेला असता, मग शंकराशी वाद घालण्याचे आम्हाला कारणच उरले नसते. माझा शंकरावरील आक्षेप असा आहे की, तो ब्रह्मं सत्यं ” हे विधान केवळ बौद्धिक पातळीवर राखून ठेवतो, तो ते सामाजिक पातळीवर आणण्यास धजत नाही.
जगन्मिथ्या म्हणजे जग एक दृष्टिभ्रम आहे. हा सिद्धांत तरी व्यावहारिक दृष्टीने कितपत साधार आहे. आमच्या ज्ञानाची साधने जी ज्ञानेंद्रिये ती जगाच्या वास्तवाची आम्हाला जाणीव करून देत आहेत. असे असताना जगाचे अस्तित्व आम्हास कसे नाकारता येईल? जर जगालाच अस्तित्व नसेल तर मला व तुम्हाला तरी अस्तित्व कुठचे उरते ? माझ्या जाणीवेला (Consciousness) तरी काय अर्थ उरतो ? अशी एक कथा आहे की, एके दिवशी शंकरावर एक उन्मत्त हत्ती धावून आला. शंकर जग मिथ्या आहे हा आपला सिद्धांत विसरून पळू लागला. त्याला पळताना पाहून आजूबाजूचे लोक त्याला उद्देशून म्हणाले अहो पळता काय ? हत्ती मिथ्या आहे ” शंकराने उत्तर दिले ‘माझं पळणंही मिथ्या आहे या उत्तरात शंकराचे प्रत्युत्पन्नमतित्व दिसून आले असेल, परंतु त्याने कोणाही बुद्धिवाद्याचे समाधान होणार नाही. एकूण ” ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या” ही एक बौद्धिक लटपट आहे. ज्या सिद्धांताचा तात्त्विक परिणाम चातुर्वर्ण्याला मूठमाती देण्यात झाला असता, तो सिद्धांत शंकराने बौद्धिक पातळीपुरता खरा मानून सामाजिक जीवनात त्याच्या प्रवेशाला प्रतिबंध केला. विचार आचारांची ही विसंगती आणि अप्रामाणिकपणा थेट शंकरापासून गांधीपर्यंत दिसून येतात. गांधींना मी एकदा प्रश्न केला होता की, तुमचे चातुर्वर्ण्य हाताच्या उभ्या पंजाच्या बोटांसारखे एकावर एक असे आहे की, आडव्या पंजाच्या बोटासारखे सम् पातळीवर आहे ? माझ्या प्रश्नाचे त्यांनी उत्तर दिले नाही. परंतु त्यांची श्रद्धा क्रमिक विषमतेवर (Graded Inequality) होती यात संशय नाही. त्यांचे ‘वर्णव्यवस्था’ व “गांधी शिक्षण हे गुजराती ग्रंथ त्याची साक्ष देत आहेत.
हिंदू लोक वेद मानतात आणि त्यातील पुरुषसुक्त तर त्यांच्या नित्य पठणात असते. या सुक्तात समाजाची रचना कशी असते एवढेच केवळ सांगितले असते तर ते फारसे आक्षेपार्ह ठरले नसते. समाजात चार वेगळे व्यवसाय करणारे लोक असतात. हे विधान केवळ ऐतिहासिक सत्य ठरेल. परंतु या चार प्रकारच्या व्यवसायातील लोकांना श्रेष्ठ-कनिष्ठता, उच्च-नीचता धार्मिक दृष्टीने चिकटवून देणे हा शुद्ध दुष्टपणा आहे. म्हणूनच विषमतेला व उच्च – निचतेला धार्मिक अधिष्ठान मिळवून देणारा हिंदू समाजरचनेचा आद्य सिद्धांत म्हणजे तो पुरुषसुक्त सर्वतोपरी निषेधार्ह आहे. या पुरुषसुक्ताला व त्याची री ओढणाऱ्या हिंदू धर्मग्रंथांना तुम्ही मानणार की, स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या चार उदात्त तत्त्वांवर आधारलेल्या राज्यघटनेला मानणार ? केवळ आपले पोट भरण्याचे एक साधन म्हणून विद्यार्जनाकडे तुम्ही पाहात नसाल आणि संपादित विद्येने आपल्या मनाला सुसंस्कृत करण्याचा प्रयत्न तुम्ही करीत असाल तर, एक तर तुम्ही राज्यघटने विरूद्ध बंड पुकारले पाहिजे किंवा विषमताप्रधान वैदिक व ब्राह्मणी धर्मग्रंथांना तिलांजली दिली पाहिजे. भारतातील प्रत्येक नागरिक भारतीय राज्यघटनेशी एकनिष्ठ राहाण्याला बांधलेला आहे. तुम्ही जर प्रामाणिक असाल तर हिंदू संस्कृतीचा तुमच्या निष्ठेशी होत असलेला विरोध विसरता कामा नये. तो विरोध विसरून गुळमुळीत जीवन तुम्ही जगाल तर तुमचे शिक्षण व्यर्थच आहे असे समजावे लागेल. असे विचार व्यक्त करून बाबासाहेबांनी आपले भाषण संपविले.
हिंदू संस्कृतीला चिरस्थायी स्वरूप देण्यासाठी पंडित मालवियांनी स्थापिलेल्या बनारस विद्यापिठातील बाबासाहेबांचे वरील व्याख्यान सर्व श्रोत्यांनी अतिशय शांतपणे ऐकले नव्हे, बाबासाहेबांच्या अधिकारवाणीचा आणि रोखठोक प्रश्नांचा श्रोत्यांवर असा काही प्रभाव पडला की, काही अनुचित विरोध करून सभा उधळण्यास सरसावलेले विद्यार्थी, मांत्रिकाने भारल्यासारखे स्तब्ध होते. व्याख्यानानंतरच्या उपहार प्रसंगी एका प्राध्यापकाने बोलूनही दाखविले की, अशा विवाद्य विषयावर इतके निर्भय व स्पष्ट भाषण विरोधाशिवाय पार पडले ही विद्यापिठातील एक अपूर्व गोष्ट आहे.