Categories

Most Viewed

24 नोव्हेंबर 1940 भाषण

आता पालवी फुटली आहे उद्या फळे येण्याचा रंग दिसत आहे.

श्री. सोमवंशीय समस्त मंडळ, चिखलपाडा, फोरास रोड, मुंबई यांचेतर्फे इमारत फंडास निधी अर्पण समारंभ रविवार तारीख 24 नोव्हेंबर 1940 रोजी सायंकाळी 6 वाजता दलितांचे एकमेव पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अध्यक्षतेखाली मोठ्या थाटाने साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी बॅरिस्टर माने, मोहिते मास्तर, श्री. मडकेबुवा, उपशाम मास्तर, सेक्रेटरी, इमारत फंड, श्री. धयाळकर, जी. ओ. सी. समता सैनिक दल, मुंबई, श्री. मिंढे पाटील वगैरे प्रमुख मंडळी हजर होती. लोकसमुदाय 4 ते 5 हजारावर होता. डॉ. बाबासाहेबांचे स्वागत जमलेल्या लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय, आंबेडकर कौन है दलितोंका राजा है वगैरे सुभाषितांनी केले.

सभेस श्री. एन. एम. साळवे यांनी सुरुवात केली. त्यांनी डॉ. बाबासाहेब आमच्या आमंत्रणास मान देऊन आपला बहुमोल वेळ खर्च करून या ठिकाणी आले याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच ते सभेचे नियोजित अध्यक्ष असल्यामुळे त्यांना अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली. श्री. बी. एस. गायकवाड यांनी अनुमोदन दिल्यानंतर डॉ. बाबासाहेब अध्यक्षस्थानी विराजमान झाले.

इमारत फंडाचे सेक्रेटरी श्री. एस. ए. उपशाम मास्तर यांनी अत्यंत उदबोधक असे भाषण केले.

तद्नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात बोलावयास उभे राहिले, ते म्हणाले,

प्रिय भगिनींनो आणि बंधुजनहो,
आजच्या सभेत इमारत फंडाकरिता जमा केलेली रक्कम स्वीकारून येथील मंडळींना आशीर्वाद देणे या पलीकडे काही बोलावे असे मला वाटत नाही. मला जे काही बोलावयाचे होते ते मी कालच वरळीच्या सभेत सांगून टाकले आहे. शिवाय माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी जे काही बोलावयाचे होते ते सांगितले आहे. तेव्हा माझ्यापासून लांबलचक भाषणाची आपण अपेक्षा करू नये. या कार्यास नुकतीच सुरवात झालेली आहे व त्याचा ठसा जितका चांगला उमटवता येईल तितका उमटवणे प्राप्त आहे. अर्थात रात्रीच्या भाषणाचा गोषवारा मी सांगणार आहे. तसेच ज्यांना इमारत फंडाची कल्पना झालेली नसेल त्यांना ती करून देणे आवश्यक आहे. येथे जमलेल्या प्रत्येक स्त्री-पुरुषाने विचार करावा की गेल्या वीस वर्षात आपली बरीच प्रगती झालेली आहे. तसेच ही प्रगती कायम कशी राहील याचाही विचार करावा. गेल्या वीस वर्षात समाजाच्या प्रगतीची जबाबदारी माझ्या शिरावर होती. मी ती माझे कर्तव्य म्हणून समजतो. पुष्कळ लोकांना माझे कार्य नापसंत वाटत असेल आणि म्हणून ते माझ्यावर टीकाही करतात. सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यावर टीका ही व्हावयाचीच. मी देखील दर आठवड्यास जनतेतून गांधीवर टीका करतो. अर्थात माझ्यावर काही माणसांना टीका करण्याचा अधिकार आहेच. मात्र टीका करताना स्वतःचे मन शुद्ध असावे, त्यात कसल्याही त-हेचा कल्प अगर अढी ठेवून टीका करू नये. मला सार्वजनिक कार्यात उपलब्ध असलेल्या साधनांचा आणि गांधींना उपलब्ध असलेल्या साधनाचा तारतम्य दृष्टीने विचार करावा. आपली सर्वांची वीस वर्षापूर्वीची स्थिती काय होती ? आता कशी आहे ? या सर्वांचा विचार केला तर माझ्या नावावर केव्हाही शून्य पडणार नाही.

माझ्या बरोबरीने कार्य करीत असलेले इतर पक्ष देखील हिंदुस्थानात आहेत. ब्राह्मणेतर पक्ष सन 1850 पासून कार्य करीत आहे. मराठ्यांचे राजे देखील दोन दोन पैशानी त्यांना मदत करीत आहेत. त्यांच्या ‘विजय मराठा’ या वर्तमानपत्रास त्यांनी तीस हजारावर मदत केलेली आहे. तर मला अवघे अडीच हजार रुपये मदत केलेली आहे. यातच वीस वर्षेपर्यंत हा कारभार मी चालविला आहे. पण ब्राह्मणेतर पक्षाचे काय झाले ? आज व्हाइसरॉय मुंबईस आले तर शेकडो लोकांच्या भेटी घेतात. पण आमच्या भास्करराव जाधवांचा मागमूसही नाही. असो.

वीस वर्षापूर्वी मी हे सार्वजनिक कार्याचे झाड लावले आहे. त्याला आता पालवी फुटली आहे. उद्या फळे येण्याचा रंग दिसत आहे. झाली ही प्रगती अखंड कशी राहील याची व्यवस्था करणे प्राप्त आहे. आतापर्यंतचे कार्य झाले ते शुष्क, निर्फळ झाले असे कोणीही म्हणणार नाही आणि जो म्हणेल तो माझा शत्रु असला पाहिजे. मी म्हणतो ते सत्य आहे. हे कार्य पायाशुद्ध आहे. कोणापुढेही दात विचकण्याचा प्रसंग न येईल अशी व्यवस्था करणे आवश्यक आहे.

पुष्कळ लोक काँग्रेसमध्ये जातात. काँग्रेसचे लोक त्यांच्या हातावर पावली ठेवतील तर माझ्या हातावर बंदा रुपया ठेवतील अशी माझी खात्री आहे. (टाळ्या)

मुंबईतील काँग्रेसचे एक मोठे पुढारी श्रीयुत भुलाभाई देसाई मला म्हणतात. ‘तुम्ही सेवाग्रामला चला व गांधींशी बोला !! पण माझ्याच्याने हे शक्य होणार नाही.

मी लहानपणी पुराण वाचले आहे. त्यात दुसऱ्याचे अन्न खाणारा कधीही स्वतंत्र असू शकत नाही. भीष्म द्रोण वगैरे लोकांना कौरवांची बाजू खोटी आहे हे माहीत होते. गादीवर पांडवांचाच हक्क होता. लढाईत पांडवांनाच विजय मिळणार हेही त्यांना माहीत होते, तरी देखील ते कौरवांच्या बाजूने लढले. एकाने विचारले हे तुम्ही असे का केले ? भीष्माने सांगितले ‘आम्ही त्यांचे अन्न (भात) खातो म्हणून.

आमचे स्वातंत्र्य हिंदू लोकांची पायपिटी करून मिळणार नाही. त्यांच्याशी लांगूलचालन करून भागणार नाही. आमच्या वाडवडिलांनी ते सर्व काही करून पाहिले. त्यांनी त्यांच्यासमोर हिंदूसमोर, छत्री घेतली नाही. पायात जोडे घातले नाहीत वगैरे अनेक गोष्टी करून पाहिल्या, पण काय उपयोग झाला ? त्यांच्याशी संग्रामात दोन हात करून झगडाच करावयास पाहिजे. त्याशिवाय दुसरा मार्ग नाही. (टाळ्या)

मला त्यांचा भात (अन्न) खायचा नाही. मला स्वतःला समाजाचा उद्धार करावयाचा आहे. एखादा गरीब मनुष्य आपल्या गोधडीस ठिगळ वगैरे लावून शरीर कसेतरी झाकतो. त्याप्रमाणे मी आजपावेतो सामाजिक कार्य चालविले आहे. भिक्षा मागून स्वातंत्र्य मिळणार नाही. हे सांगितलेलेच ठीक. या वीस वर्षात माझ्या हातून एकही चूक झाली नाही अशी माझी मनोदेवता मला सांगत आहे. कोणाही माणसाने माझ्याकडून अमुक एक चूक झाल्याने सामाजिक नुकसान झाले आहे असे सिद्ध करून द्यावे. आतापर्यंतचे कार्य निराशजनक नाही. जे करावयाचे आहे ते आत्मबलानेच करावयाचे आहे. आपल्याला पैशाची आवश्यकता आहे. राजकारण पैशावाचून चालणार नाही. माणसाच्या संसारास पैशाची जरूरी असते. त्याचप्रमाणे सामाजिक संसारात पैशाची त्याहीपेक्षा अधिक जरूरी असते. आपल्याजवळ पैसा नाही. काँग्रेसमागे पैशाच्या थैल्या आहेत. त्यांना या कार्यास एक रुपया खर्च झाला तर आपणास निदान पावली तरी खर्च लागणारच. महाड आणि नाशिकचे सत्याग्रह आम्ही भिक्षा मागूनच पार पाडले आहेत, पण हे कोठवर चालणार ? घागरीस छिद्र असल्याने तीतून पाणी गळून जाणार हे खास. तेव्हा काही तरी कायमची व्यवस्था असावी, असे माझे मत आहे. इमारतीसाठी अंदाजे दोन अडीच लाख रुपये खर्च येईल. त्याच इमारतीपासून दरवर्षाला पाच हजार रुपये भाडे मिळाले तर आपली स्थिती सुधारेल. आपण सर्व लोक तन-मन-धनाने या कार्यासाठी झटले पाहिजे. कोणी म्हणतील डॉ. साहेब बेकारांपासूनही पैसे मागतात, पण मला असे विचारावेसे वाटते की. मनुष्य आयुष्यभर बेकार असू शकतो काय ? महिना दोन महिने बेकार असू शकेल, पण जन्मभर बेकार असू शकणार नाही. बेकार असताना जीवनास अवश्य असणाऱ्या गोष्टी त्याला मिळतात. इतकेच नव्हे तर तो आपली तल्लफ देखील भागवितो. कोणाही माणसास आपली दोन रुपये वर्गणी भरण्यास काहीही हरकत नाही.

दुसरे असे की, आपल्यात श्रीमंत लोक नाहीत. ज्यांना पन्नास रुपये पगार मिळतो अशांना श्रीमंत म्हणता येईल. दोन चार आणे मजुरी मिळणाऱ्या मजुरापेक्षा त्यांची स्थिती काहीशी बरी असे म्हणता येईल. तेव्हा अशा लोकांनी शिंगे मोडून वासरात शिरू नये. ज्याची जशी इभ्रत असते तितकीच त्याची जबाबदारी असते. माझ्यावर लोक टीका करतात. कारण मला विद्या आहे व सामाजिक कार्याची सर्व जबाबदारी माझ्या शिरावर आहे. दोन रुपये देऊन स्वतःची किंमत करून घेऊ नये.

तिसरे असे की, ज्यांचा पगार तीस रुपये किंवा त्याहून जास्त आहे, अशांनी स्वतःचा पगार द्यावा, बहुतेक लोक आपले नाव इमारतीवर यावे अशी अपेक्षा करतात. आपले नाव इमारतीवर यावे अशी इच्छा असेल, तर एक महिन्याचा पगार देणगी दाखल देणे प्राप्त आहे. यापेक्षा जास्त सवलत ती कोणती पाहिजे ?

एखाद्या माणसास अंगात हुशारी असल्यामुळे काम मिळू शकते, पण बहुतेक शिक्षक, शिक्षकिणी व कारकून वगैरे लोक समाजाच्या दुर्दैवाचा फायदा घेतात. अशा लोकांनीच समाजाचा फायदा करण्यास पुढे आले पाहीजे. सर्वांनी आपल्या वाट्याची वर्गणी भरली पाहिजे, मला त्याचे काय ? माझे नाव हिंदुस्थानच्या त्रिकोणात आहे. मी आज आहे उद्या नाही. माझ्या कार्याचा इतिहास जर कोणी लिहिला तर तो बराच मोठा होईल असे मला वाटते. पण माझ्या पश्चात तुमचे काय? मी आहे तो पुष्कळसे होईल. आज पावेतो पुष्कळ मजल मारली आहे. ‘अजून दिल्ली बहोत दूर अजून पुष्कळ मजल मारावयाची आहे. हा एक खांबी तंबू मी उभारला आहे. त्यास चोहोकडून खुंट्या मारून मजबूत करणे आवश्यक आहे. तसे न केले तर गेलेला पतंग कनी कापल्यानंतर जसा खाली येतो तशी तुमची स्थिती होता कामा नये. माझ्यानंतरही तुमचा मार्ग फार दूर आहे. तो सुखकर व्हावा म्हणून मी हे कार्य करीत आहे, तरी बंधु-भगिनींनो या कार्यास नेटाने सुरवात करा, अशी सूचना करून मी माझे भाषण संपवितो.

शेवटी श्री. मडकेबुवा यांनी डॉ. बाबासाहेबांना हार अर्पण केल्यानंतर श्री. साळवे मास्तर यांनी सर्वांचे आभार मानून फुलहार दिले. सभा बाबासाहेबांच्या जयघोषात बरखास्त झाली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password