सार्वजनिक कार्यासाठी एकजूट हवी.
बी. डी. डी. चाळ नं 96, वरळी, मुंबई येथील श्री. शंकर नाथा खैरमोडे यांच्या नवीन व्यायाम शाळेचा व डॉ. आंबेडकर स्पोर्टिंग क्लब यांचा सार्वजनिक उत्सव शनिवार तारीख 23 नोव्हेंबर 1940 रोजी रात्रौ 9 वाजता मोठ्या थाटाने साजरा करण्यात आला. उत्सवाचे अध्यक्षस्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारावयाचे कबूल केले होते. सभास्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर येताच आंबेडकर झिंदाबाद, आंबेडकरांचा जयजयकार, थोडे दिनमे भीमराज अशा गर्जनांनी वातावरण दुमदुमून गेले होते. बाबासाहेब मंडपात येताच टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटाने त्यांचे स्वागत करण्यात आले. बाबासाहेबांच्या बरोबर श्री. डी. व्ही. प्रधान, श्री. एम. ए. उपशाम, श्री. पी. एल. लोखंडे, श्री. व्ही. एल. केळशीकर, श्री. बी. एस. गायकवाड ही कार्यकर्ती मंडळी हजर होती.
सभामंडप उत्तम प्रकारे सजविण्यात आला होता. सभेस दहा हजार लोकसमुदाय होता. अध्यक्षाची सूचना श्री. झाल्टे यांनी मांडली. सूचनेस श्री. आर. बी. पगारे यांनी अनुमोदन दिल्यावर श्री. आर. एस. भालेराव यांचे भाषण झाले.
नंतर डॉ. बाबासाहेब यांचे भाषण झाले. ते म्हणाले.
प्रिय भगिनींनो व बंधुनो,
आज सभेचा वेळ निश्चित कोणता हे पुष्कळ लोकांना ठाऊक नसल्यामुळे त्यांना भुके ठेवून लांबलचक भाषण करण्याचा माझा इरादा नाही. ज्या कारणासाठी मी आलो आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे.
मी इमारत फंडाचा प्रश्न हाती घेण्याला कोणते कारण घडून आले असेल तर, आपल्या समाजाच्या भविष्यकाळाचे दृश्य डोळ्यांसमोर उभे राहाणे हेच होय. माझ्या आयुष्यात जेवढे करणे शक्य होते, तेवढे मी केले आहे. 1919 साली सार्वजनिक चळवळ सुरू झाली तेव्हा अस्पृश्य समाजात मुळीच जागृती नव्हती. आपण माणसे आहोत याची जाणीवही नव्हती. ब्राह्मण, मराठे, पाटील वगैरे स्पृश्य लोक जोड्यांप्रमाणे आपणांस वागवीत होते. सर्प म्हटला की, की सर्व लोक भितात त्याप्रमाणे पाटील, तलाठी, कुलकर्णी यांना अस्पृश्य समाज घाबरत होता. सुरवातीच्या काळात आपल्या लोकांना म्युनिसीपालिटी, लोकल बोर्ड, कौन्सिल यामध्ये प्रवेश मिळणे कठीण होते. त्याच ठिकाणी आपले लोक स्वाभिमानाने मांडीला मांडी लावून आपल्या हिताकरिता आज झगडत आहेत. (टाळ्या) आपल्यापैकी गृहमंत्री किंवा शिक्षणमंत्री झाला असता पण तसा योग आला नाही. जेथे पट्टेवाल्याची जागा देखील मिळणे महाग होती तेथे आपल्यापैकी डेप्युटी कलेक्टर होत आहेत. ज्याने शून्य पाहिले त्यानेच जर शंभर पाहिले, त्याला अभिमान व आनंद वाटणे स्वाभाविक आहे.
आपण आपल्या चळवळीचा पल्ला बराच गाठला आहे. तरीपण आपणास बरेच कार्य अजूनही करावयाचे आहे. ह्या कार्याच्या मार्गात गांधी व काँग्रेस हे दोन अस्पृश्यांना मोठे शत्रू आहेत. नुकत्याच झालेल्या मुलाखतीच्या वेळी व्हाईसरायने गांधींना विचारले “तुम्हाला स्वराज्य पाहिजे पण तुम्ही राजेरजवाडे, मुसलमान व अस्पृश्य यांची विल्हेवाट काय लावणार ?” पण गांधी आपल्या पत्रकात म्हणतात “राजेरजवाडे व मुसलमान यांच्याशी आम्ही तडजोड करू पण अस्पृश्यांबद्दल विचारणारे तुम्ही कोण? अस्पृश्यांचे आम्ही वाटेल ते करू”. राजेरजवाडे व मुसलमान यांच्याशी गांधी तडजोड करण्यास तयार असतात, पण अस्पृश्य समाजाचा प्रश्न सरकारने विचारल्याबरोबर गांधींच्या अंगाचा तिळपापड होतो. अस्पृश्य समाजाच्या प्रगतीच्या मार्गात हा एक खडक आहे. हा खडक माझ्या हयातीत नाहीसा करता आला, तर तुमचे भावी आयुष्य सुखकर झाल्याविना राहणार नाही. (प्रचंड टाळ्यांचा कडकडाट)
मला एक मोठी चिंता वाटत असते ती ही की, आजपर्यंत आपण केलेली एकजूट व प्रगती तुम्ही पुढे कशी टिकवाल ? एक खांबी तंबूत आज तुम्ही सुखासमाधानाने बसता. पण त्या तंबूचा खांव कोसळला तर मग तुमची काय स्थिती होईल ? याकरिता त्या तंबूला आजूबाजूला खांब व दोर बांधून मजबूत करण्याचा मी विचार केला आहे, म्हणूनच इमारत फंड उभारला आहे. हेतू हा की, माझ्या पश्चात तुमचा कोणीही पराभव करू नये. त्याचप्रमाणे तुम्हास सार्वजनिक कार्य चांगल्या रीतीने करता यावे, आज देखील आपणापुढे हजारो अडचणी आहेत पण त्या पैशाच्या अभावी तशाच राहून गेल्या आहेत. इमारत फंडाच्या उत्पन्नातून जो निधी जमेल तो आपली गा-हाणी दूर करण्याच्या उपयोगी पडेल.
मी आपल्या समाजात जास्त शिकलेला आहे, म्हणून सरकारजवळ अधिकाऱ्याची जागा मला मागता आली असती. मी अधिकारीही झालो असतो. पण मग माझ्या अज्ञान बांधवाचे काय झाले असते? मी अस्पृश्य समाजाकरिता माझ्या स्वार्थाकडे व संसाराकडे नजर न ठेवता हे कार्य करीत आहे. ज्याला जितके कार्य करता येईल तितके त्याने करावे. तसेच इमारत फंडास जितकी मदत करता येईल तितकी आपण अवश्य द्यावी. मनुष्यमात्राला तीन ऋणे असतात. एक आईबापाचे, दोन कुलदेवतेचे व तीन समाजाचे. ज्या समाजात आपला जन्म झाला आहे. त्या समाजाचे उपकार आपण न विसरता फेडले पाहिजेत. उपकार फेडण्याची संधी तुम्हाजवळ चालून आली आहे. तिचा फायदा जरूर घ्या व इमारत फंडाला प्रत्येक स्त्री-पुरुषानी, 18 वर्षावरील बेकार असला तरी, दोन दोन रुपये द्या.
तुम्ही जिल्हावार, तालुकावार व देशवार संघ स्थापन करून काम करीत असता, हे मला मुळीच आवडत नाही. मी कोणताही भेदाभेद मानीत नाही. आपल्यात भेदाभेद उत्पन्न झाल्यास हिंदू समाज त्याचा फायदा घेऊन आपल्या चळवळीचा नाश करील. मला पुढारीपणाची मुळीच हाव नाही. पण आपणाला पुढारी कशाला पाहिजे ? याचा आपण विचार करा. आपणाला पुढारी पाहिजे असेल, तर तो शत्रुस तोंड देण्याकरिता आपल्या कल्याणाकरिता झटणारा, आपल्या हिताच्या आड येणाऱ्या गांधी, नेहरू, वल्लभभाई पटेल यांच्याशी दोन हात खेळणारा असाच पुढारी आपणास हवा. तर मीही अशा माणसाला पुढारी म्हणावयास तयार आहे. (टाळ्या) वाटेल त्या दगडाला शेंदूर फासून मारुती होता येत नाही. (हशा) चाळीच्या पटांगणात तलवारीचे हात करणारा पण रणांगणात गुलूगुलू करून पळत सुटणारा योद्धा काय कामाचा ?
पांडवांनी जन्मभर श्रीकृष्णाची सेवा केली. शेवटी स्वर्गाला नेण्याविषयी श्रीकृष्णाला विनवू लागले. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला “मीच ओढ्या जगन्नाथला वाहात चाललो आहे”. अशाच प्रकारची स्थिती आपल्या चळवळीतून बाहेर आहेत त्यांची झाली नाही म्हणजे त्यांनी पुष्कळ मिळविले. आपल्या कार्यात कार्यकर्त्या मंडळीची उणीव आहे. ही उणीव शिक्षक वर्गाने भरून काढावी. इमारतीकरिता घेतलेली जागा अपुरी आहे असे आपले लोक म्हणत आहेत. अधिक जागा घ्या. आम्ही पैसे मिळवून देतो असे त्यांचे म्हणणे आहे. जास्त जागा घेण्याचा माझा विचार आहे. अर्थात आपल्याला ह्या कार्याकरिता एकंदर दोन-अडीच लाख रुपये खर्च येईल. त्याकरिता मी काही योजना तयार केल्या आहेत. ज्यांचा मासिक पगार 30 रूपये किंवा अधिक असेल त्यांनी आपला एक महिन्याचा पगार दिल्यास त्यांचे नाव इमारतीत बोर्डावर लिहिण्यात येईल.
मी खेडोपाडीही मागणी करणार आहे. पण खेडेगावात प्रत्येक माणसावर मागणी न करता, गावाची वर्गणी म्हणून त्या गावाचे नाव लिहिण्यात येईल. तेव्हा मित्रहो, आपला भावी काळ उज्ज्वल ठेवावयाचा असेल, तुमच्या समाजाचे कल्याण करावयाचे असेल, तर तुम्ही आपले कर्तव्य म्हणून हे कार्य पार पाडा. डॉक्टर बाबासाहेबांचे भाषण संपल्यावर डॉक्टर आंबेडकरांच्या जयजयकाराने वातावरण परत दुमदुमून गेले.
शेवटी बाबासाहेबांना पुष्पहार घालण्यात आला व सर्वांचे आभार मानल्यावर सभेचे काम संपविण्यात आले. तेथील व्यायाम शाळेला बाबासाहेबांनी भेट दिली. सभेची व्यवस्था आनंदा लालू मायणीकर. शं. ना. खैरमोडे, ठोकळे मास्तर, माने मास्तर, कांबळे वगैरे मंडळींनी फारच चांगली ठेवली होती. याच सभेत परगावचे श्री. सुकड्या सखाराम जाधव यांनी बाबासाहेबांचे दर्शन घेऊन एक रुपया इमारत फंडास दिला.