Categories

Most Viewed

22 नोव्हेंबर 1951 भाषण

एकांगी राजकारण कधीही यशस्वी होऊ शकत नाही.

महा. मुंबई दलित फेडरेशनच्या जनरल सेक्रेटरीने खालील पत्रक काढले होते. “महा. मुंबई दलित फेडरशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पंचवीस हजार रुपयांचा निवडणूक निधी अर्पण करणार !

दलित बंधु भगिनींनो, सढळ हाताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवडणूक निधीस हातभार लावा! आजच्या 10 तारखेच्या पगारातील आपला हिस्सा तुमच्या वार्ड कमिटीत जमा करा !! अगर दलित फेडरेशनच्या परळ येथील ऑफिसात आणून भरा नि शासनकर्ती जमात बना !!!

आगामी निवडणूक ही आपल्या जीवन मरणाच्या प्रश्नावर आधारलेली आहे. हिंदुस्थान स्वतंत्र होवून पाच वर्षे झाली पण दलित जनतेच्या जीवनात, त्यांच्या राहाणीत, त्यांच्या दुःखात कसल्याही तऱ्हेचा फरक झालेला नाही. उलट या स्वातंत्र्याच्या काळात दलित जनतेचे अनन्वीत हाल झाले. स्पृश्य गुंडानी खेडोपाडी धुमाकूळ घातला. खेड्यापाड्यातून अस्पृश्य वस्त्यांवर दिवसा ढवळ्या हल्ले केले. घरांना आगी लावण्यात आल्या. पिण्याच्या पाण्यात विष्टा, घाण टाकण्यात आली. सरकारी दरबारी कोणी दाद घेईना. एवढेच नव्हे तर काही ठिकाणी आमच्या पुढाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे सपशेल मुडदे पाडण्यात आले.

या सा-या जोर जुलूमांचा अन्यायाचा व दुःखाचा आवाज या देशातील कोठल्याही कायदे मंडळात उठला नाही हे लक्षात घ्या! नि या कराल काळाच्या दाढेतून आपली सुटका करून घ्यायची असेल, उद्याच्या निवडणुकीत तुमच्या हाडामासाची रात्रंदिवस तुमच्या हाकेस ओ देणारी, तुमच्या खांद्यास खांदा देवून लढणारी, आपली जीवाभावाची माणसे निवडून द्यायला नको काय ? व ती निवडून आणावयाची झाल्यास त्यास द्रव्यबळ ही व्यवहारी जोड आपण द्यायला पाहिजे. म्हणून निवडणूक निधीत सढळ हाताने भर घाला.

आपल्या सा-यांचे पंचप्राण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मुंबईतूनच लोकसभेच्या जागेसाठी उभे आहेत. त्यांना या निवडणुकीत निवडून न येऊ देण्याचा काँग्रेसने चंग बांधला आहे. तरी आपण आपल्या जवळचे तन मन नि धन स्वार्थत्यागपूर्वक अर्पण करून आपले जे शीर (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) ते येत्या निवडणुकीत सलामत ठेवले पाहिजे. हे ओळखून आपल्यातील कार्यकर्त्यांनी, स्त्री-पुरुषांनी व आबालवृद्धांनी या कामी पराकाष्ठेचे प्रयत्न केले पाहिजेत. मुंबईतील जनता आतापर्यंतचा लौकिक कायम राखील नि त्वरित कामाला लागेल, ही आम्हास पुरेपूर आशा आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे हिमाचल प्रदेश व पंजाब प्रांतांचा दौरा आटोपून दिल्लीस आलेले आहेत. ते पायाने अधू तर झालेले आहेतच. पण या दौऱ्यातील श्रमाने त्यांना नेत्र विकाराचा थोडासा त्रास झाला आहे. तरी ते मुंबई व मध्य प्रांतांच्या दौऱ्यावर तसेच निघणार होते. परंतु फेडरेशनच्या हायकमांडच्या विनंती नुसार थोडासा आराम घेऊन ते साधारणतः 20 ते 25 नोव्हेंबरपर्यंत मुंबईस येणार आहेत. एवढ्या अल्पावधित आपण रात्रंदिवस खपून आपल्या निधीचा संकल्प पुरा केला पाहिजे.

निवडणूक निधीचा पुरुषांकरिता दोन रुपये व स्त्रीयांसाठी एक रुपया अशा व तऱ्हेची तिकीटे छापली असून ठिकठिकाणच्या वार्ड कमिट्यांकडे रवाना करण्यात आलेली आहेत.

प्रतिष्ठित नागरिक, बाबासाहेबांचे चहाते व धंदेवाईक अशा सद्गृहस्थांची बसण्याची खास सोय करण्यात येणार आहे. मात्र त्यांनी उदार अंतःकरणाने निवडणूक निधीस सहाय्य करावे.

तसेच महा. मुंबईतील निरनिराळ्या शिक्षण संस्था, व्यायाम मंडळ, कला पथक वगैरे ज्या काही संस्था आहेत त्यांनी या निवडणूक निधीत आपल्या शक्तीनुसार भर घालावी अशी विनंती आहे.

कोणत्याही व्यक्तीस अगर संस्थेस डॉ. साहेबांना परस्पर हारतुरे अगर निधीचा हिस्सा देता येणार नाही.

तिकीटा व्यतिरिक्त कोणासही सभा मंडपात प्रवेश मिळणार नाही. या कामी समता सैनिक दलास खास अधिकार देण्यात आले आहेत. सभेची तारीख, वेळ व जागा लवकरच जाहीर केली जाईल.

त्यानुसार मुंबई येथील परळच्या सेंट झेवियर मैदानावर तारीख 22 नोव्हेंबर 1951 रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जत्रेचे स्वरूप त्याला आले होते. हजारो अस्पृश्य स्त्री-पुरुषांचा लोंढा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण ऐकण्यासाठी दुपारी तीन वाजल्यापासून लोटत होता. ही सभा निवडणुकीच्या मदतीसाठी तिकीट लावून भरविण्यात आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सौ. माईसाहेब समवेत बरोबर साडेसहा वाजता मैदानावर हजर झाले. तेव्हा समता सैनिक दलाने सलामी दिली. हजारो लोक शेवटी तिकीटाशिवाय आत घुसले.

श्री. आर. व्ही. खरात, उपाध्यक्ष, मुंबई दलित फेडरेशन, यांनी प्रास्ताविक भाषण केले व डॉ. बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली फेडरेशनचा झेंडा उंचच उंच राहील म्हणून सांगितले. श्री. भातनकर यांनी डॉ. बाबासाहेबांना निवडणुकीसाठी जमलेली रकमेची थैली फेडरेशनतर्फे अर्पण केली. सौ. माईसाहेबांच्या हस्ते समता सैनिक दलाच्या खेळात यश मिळविलेल्या सभासदांना कप व मेडल्स देण्यात आली.

सभास्थानी प्रि. दोंदे, श्री. चित्रे, श्री. भाऊराव गायकवाड, कु. शांतादेवी दाणी, श्री. बोराळे दलित फेडरेशनच्या वार्ड कमिटीचे अध्यक्ष व इतर कार्यकर्ते हजर होते. जवळ जवळ तीस हजारांच्या स्त्री-पुरुषांच्या समुदायाने मैदान फुलले होते. मैदानाबाहेरपण शेकडो लोक होते. अनेक वृत्तपत्रांचे प्रतिनिधी खास बाबासाहेबांचे स्फुर्तिदायक भाषण ऐकण्यास हजर होते. ते आपल्या भाषणात म्हणाले,

भगिनींनो आणि बंधुनो,
आज ही सभा एकाप्रकारे एकांगी आहे, असे म्हणायला हरकत नाही. ही सभा फक्त अस्पृश्यांची आहे. ही सभा एकांगी असल्याकारणाने मी एकांगी भाषण करणार आहे. सर्वसाधारण इलेक्शन मिटींगमध्ये जिथे मोठा समुदाय असतो तिथे एकांगी भाषण करणे अनुचित असते.

गेली चार वर्षे मी काँग्रेस सरकारात एक मंत्री म्हणून होतो. राजीनामा देऊन बाहेर पडलो. अशा स्थितीमध्ये मला जे काही लोक भेटतात. आज मी त्यांचेकडून मला दोन प्रश्न विचारण्यात येतात. एक, तुम्ही याचे अगोदर बाहेर का पडला नाहीत ? मी लवकर बाहेर आलो असतो तर काँग्रेस विरोधी संघटित योजना अंमलात आणता आली असती. जे काही काँग्रेस विरोधी गट व उपगट आहेत त्यात संघटितपणा आणता आला असता. दोन, दुसऱ्या लोकांचे म्हणणे असे की, चार वर्षाच्या कारकीर्दीत काँग्रेसशी संधी का करता आली नाही. घनिष्ठ संबंध का जुळला नाही.

या संबंधाने मी खुलासा करू इच्छितो. माझ्या चार वर्षाच्या कारकीर्दीत मला काँग्रेसच्या लोकांचे अस्पृश्य किंवा मागासलेल्या लोकांच्या उन्नतीसंबंधी काय अंतरंग आहे. किती प्रेम आहे. किती तळमळ आहे त्यांची उदात्त तत्त्वांबद्दल किती निष्ठा आहे हे अगदी जवळून पाहता आले. जे लोक अस्पृश्यांचा उद्धार करू म्हणत होते व आजही म्हणतात आणि पुढेही म्हणतील त्यांच्यामध्ये अस्पृश्यांबद्दल प्रेमाचा उमाळा किती आहे हे बघण्याची मला चांगली संधी मिळाली. एक ठाम कळून चुकले की, जे काही काँग्रेसचे संचालक आहेत. जे काँग्रेसचे राजकारण फिरवू शकतात त्यांचेकडे केवळ शब्दांपलिकडे काहीही नाही. त्याबद्दल काही उदाहरणे मी देऊ शकतो.

देशाची घटना बनविताना माझे अंग प्रमुख होते. पुष्कळसे लोक सांगतात की, या घटनेचा आराखडा जे काही कारकून होते त्यांनी तयार केला आणि मी फक्त सही केली. (हशा) माझ्याबरोबर ड्रॉफ्टींग कमिटीत जे सभासद होते ते किती दिवस हजर होते व किती दिवस बेपत्ता होते ते मी तुम्हाला सांगू शकतो. शेवटी मी व माझी प्रमुख सेक्रेटरी राहिलो. काहिंच्या कुठे नेमणुका झाल्या! जेव्हा मला माझे आत्मचरित्र लिहिण्यास सवड होईल तेव्हा या गंमती विस्ताराने लिहीन, जेव्हा मी कॉन्स्टीट्युअंट असेंब्लीमध्ये शेवटचे भाषण केले तेव्हा ही माहिती गोळा केली व त्यात हजेरी घेणार होतो. परंतु आपल्या सहकाऱ्यांवर आरोप करणे असभ्यपणाचे होईल म्हणून भाषणातून तो उतारा मी गाळला.

आमच्या घटना समितीत अस्पृश्यांचे वतीने दोन महत्त्वाचे मुद्दे होते –
(एक) राजकीय संरक्षण म्हणजे अस्पृश्यांना राखीव जागा असाव्यात, व
(दोन) सरकारी नोकरीची कायद्याने तरतूद हे दोन्ही प्रश्न वादग्रस्त ठरले.
ओढाताण करून कशीबशी राखीव जागांसाठी दहा वर्षापुरती मुदत मिळविली. यामुळे काही लोकांच्या पोटात पाप उत्पन्न झाले व दिलेली सवलत परत घेण्याची चळवळ काँग्रेसवाल्यांनी सुरू केली. त्यामुळे मात्र मुसलमान व ख्रिश्चनांच्या राखीव जागा गेल्या. पण इदीला दोन बोकडे कापले व तिसरा बोकड विकत घेतल्याचे भयंकर भूत आमच्या डोळ्यांसमोर नाचू लागले. दहा वर्षात फार तर तीन निवडणूका होतील. पुढे काय ?

मी काँग्रेसच्या लोकांना विचारतो की, तुम्ही असे आश्वासन देऊ शकता काय की, अस्पृश्यतेचे निर्मूलन या दहा वर्षात होईल ? पूर्वाश्रमीचा भेदाभेद नाहिसा होऊन सारे एका समाजाचे अवयव होतील? जर दहा वर्षात आमची उन्नती करण्याची तुमच्यात ताकद नाही. आमच्याविरूद्ध होणारे अनाचार थोपविण्याची शक्ती नाही तर त्यांना मी विचारतो की, ही राखीव जागांची सवलत दहा वर्षात काढून का घेता ? तशी सवलत निदान दहा वर्षासाठी काँग्रेस सरकारने दिली नसती तर पितांबर नेसविलेल्या बाईचे वस्त्रहरण ऐन सभेत केल्याने जगात नाचक्की होईल या भीतीनेच एवढी तरी मुदत काँग्रेस सरकारने दिली.

नोकरीच्या सवलतीपूर्वी मुदतीची मर्यादा नव्हती पण मुन्शींच्या पोटात दुखू लागले! अस्पृश्यता जाईपर्यंत असलेली सवलत ठेऊ नये म्हणून काँग्रेसच्या काही सभासदांनी प्रेसिडेंटना अर्ज पाठवून दिला व या कलमाचा फेरविचार व्हावा म्हणून सुचविण्यात आले. या कलमाचा व काँग्रेस पार्टीचा काय संबंध तेथ कळेना! काँग्रेस पार्टीत या प्रश्नावर खडाजंगी झाली. अखेर मी राजीनाम्याचा घाट घातला तेव्हा ते कलम तसेच राहिले.

यात आणखी एका गोष्टीची सोय मी करून ठेवली आहे. घटनेच्या एका कलमानुसार अस्पृश्य व इतर अल्पसंख्यांक लोकांना संरक्षणार्थ एक सरकारी अधिकारी नेमला जावा व त्याने या जमातीवर होणाऱ्या अत्याचारांचा अहवाल संग्रहित करून तो पार्लमेन्टात सादर करावा.

मला वाटत होते की, या जागेवर एका अस्पृश्याची नेमणूक होईल. कारण तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे कळवळ्याची याती आणि लाभाविन प्रीती पगारी आणि भाडोत्री माणूस नेमून काय होणार आहे ? यासाठी अस्पृश्य नेमण्यात यावा. आज अस्पृश्यात असे अधिकारी मिळणे दुरापास्त नाही. मला नेमलेल्या अधिका-याविरुद्ध काही म्हणायचे नाही. तरीपण एक शंका येते व ती ही की अस्पृश्यांच्या खऱ्या जीवनाचा सत्य अहवाल असले कॉंग्रेस सरकार त्या अधिका-याला प्रसिद्ध करू देईल की नाही याची कोण कसे छळतात हे प्रसिद्धीस यावयाचे नाही.

काँग्रेस सरकारने अस्पृश्यांना सवलत देऊन पाहावयाचे होते. पण ही गोष्ट काँग्रेस कशी करील ? अस्पृश्यांच्या दुःखाचा उमाळा तीस कसा येईल ?

यापूर्वी म्हणजे ब्रिटिश राजवटीत मी एक्झिक्युटिव कौन्सिलर होतो व मजूर मंत्री होतो. मला अनेक प्रमुख खात्याचा अनुभव होता. माझा अनुभव दोन्ही राजवटीचा आहे. म्हणून मी राजवटीची तुलना करू शकतो. ही पुराणातील वांगी नाहीत. हा वांगेभात मी खाल्ला आहे. (प्रचंड हंशा ) काँग्रेस राजवटीत अस्पृश्यांची प्रचंड अवहेलना झाली आहे. राजीनामा देताना काढलेल्या पत्रकात मी विस्तृतपणे खुलासा केला आहे. एवढेच नव्हे तर मंत्री असतानासुद्धा दिल्लीच्या एका सभेत काँग्रेस सरकारवर हा उघड आरोप केला होता.

अस्पृश्यांना राजकीय सवलतीचा उपभोग काँग्रेस सरकारने घेऊ दिला नव्हता, हा तो प्रमुख आरोप होता. माझ्या या विधानाला उत्तर देण्यास पंतप्रधान नेहरू यांना आजतागायत अवधी सापडला नाही माझ्या राजीनाम्याच्या पत्रात हे आरोप उघड केले असतानासुद्धा एकमेकाचा पत्रव्यवहार पार्लमेन्टपुढे वाचण्यापलीकडे अधिक बोलण्याचे पंडित नेहरूंना धैर्य झाले नाही. त्यांना उत्तर द्यायला भरपूर अवकाश होता. पुढे आठ दिवसानी काँग्रेस अधिवेशन झाले. त्यांना अनेकदा बोलण्याची संधी मिळाली असतानाही मी केलेल्या विधानांना समर्पक उत्तर देण्याची संधी पंडित नेहरूंनी घेतलेली नाही. उलट माझे प्रश्न टाळले. कारण मी जे म्हटले त्यात सर्व सत्य भरले आहे.

ब्रिटिश सरकारने पण अस्पृश्यांसाठी काही खास केले नव्हते. मुसलमान, खिश्चन अँग्लो-इंडियन लोकांवरच कृपादृष्टी होती. मी 1942 साली जेव्हा हिंदुस्थान सरकारचा कौन्सिलर झालो तेव्हा त्यांना पहिला प्रश्न विचारला की हा सापत्न भाव का ? त्यांनी म्हणजे ब्रिटिशांनी विशेष वितंडवाद न घालता आपली जबाबदारी कबूल केली. पण काँग्रेस सरकारला सांगून समजले नाही! त्यावेळी इतर जमातीप्रमाणे तीन लाख रुपये अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी ब्रिटिश सरकारने मंजूर केले.

पुढे मी काँग्रेस सरकारचा मंत्री झाल्यावर ही रक्कम वाढविण्यात आली व त्यात आणखी इतर वन्य जमातींचा समावेश करण्यात आला. अस्पृश्यांची खरी उन्नती कारकुनीत नाही. खरी उन्नती व्हावयाची असेल तर उच्च प्रकारचे शिक्षण मिळाले पाहिजे. साधे शिक्षण घेऊन कारकून होऊन काय उपयोग ! कारकून मनुष्य आयुष्यात काय करू शकतो. तो समाजाची घटना करू शकत नाही. उच्च शिक्षण घेऊन तज्ज्ञ झालेलाच समाजात आमूलाग्र आणि पोषक बदल करू शकतो. यासाठी माऱ्याच्या जागा अस्पृश्यांनी पटकावल्या पाहिजेत व त्यांना त्या मिळाल्या पाहिजेत. तीन लाख रुपये अशा विद्यार्थ्यांना पाश्चात्य देशात पाठविण्यासाठी उपयोगात आणले जात होते. 20 ते 30 अस्पृश्यांची मुले मी कौन्सिलर असताना याचा फायदा घेऊ शकली. पण पुढे उच्च शिक्षणासाठी 1946 सालापासून अस्पृश्य पाठविणे बंद झाले! अशा रीतीने काँग्रेस राजवटीत अस्पृश्यांचा उच्च शिक्षणाचा अंकूर मोडून टाकण्यात आला.

दिल्ली सेक्रेटरीएट मध्ये अस्पृश्य शिपाई पण नव्हते ! एक दोन कारकून होते. त्यांना शिपाई पाणी पण देत नसत! मी काही अस्पृश्य शिपायांची सोय करताच त्यांना तेथील जमादार रात्रपाळ्या देऊन हैराण करू लागला! मी तिथे गेल्यावर 24 किंवा 25 टक्के नोकरीच्या जागा राखून ठेवल्या. लढाईतील बेवीन बॉयज’ योजनेप्रमाणे काही शिकावू लोक इंग्लडला पाठविण्यात येत. त्यात एकही अस्पृश्य तरूण नसे. माझे अगोदर इतर समाजाच्या 500 तरुणांची वर्णी लागली होती. शेवटी बारा पूर्णांक एक द्वितीयांश टक्के अस्पृश्य तरूणांचा शिरकाव झाला व अस्पृश्यांची अदमासे शंभर मुले तो लाभ घेऊ शकली. त्यावेळी तीन अस्पृश्य एक्झिक्यूटिव्ह इन्जिनीयर्स लागले. पण पुढे म्हणजे काँग्रेसच्या राजवटीत एका तरी अस्पृश्याला वरची जागा मिळाली असेल. तर हराम (शेम-शेम)

. काँग्रेस सरकारने अस्पृश्यांसाठी वरीलप्रमाणे काही केले नाही, हे विधान दिल्लीच्या एका सभेत करताच होम मेंबर श्री. राजगोपालाचारी यांनी ते सारे खोटे आहे, असे पार्लमेंटमध्ये उत्तर दिले. पण त्यांचेच मन त्यांना खाऊ लागले व त्यांनी अस्पृश्यांच्या नोकरीच्या बाबतीत माहिती मिळविण्यासाठी एक सर्क्युलर काढले. त्यात त्यांना सगळीकडे शून्यच उत्तर आले असावे! काँग्रेस अस्पृश्यांचे काय भले करते व करू शकते त्याचा हा भला भक्कम पुरावा नाही काय ?

फाळणी झाल्यानंतर हिंदू-मुसलमानांचा प्रवाह चालला होता. तेव्हा पाकीस्तानने वरच्या वर्गाच्या हिंदुना जाऊ दिले पण अस्पृश्यांवर कोंडवाड्यात गुरांना ठेवतात त्याप्रमाणे अत्याचार होऊ लागले. काँग्रेस सरकारने अस्पृश्यांना हिंदुस्तानात आणण्याचे बाबतीत काडीचीही मदत केली नाही. त्यावेळी महाराच्या पलटणी पाकिस्तानमध्ये होत्या. श्री. भाऊराव गायकवाड व श्री. रमेशचन्द्र जाधव यांना पाठवून या महार पलटणीच्या सहकार्याने एक एक अस्पृश्य स्त्री-पुरुषांना आम्ही हिंदुस्थानात जवळ जवळ ओढून आणले. या बाबतीत माझ्या मनामध्ये खंत उत्पन्न होते, एवढेच नव्हे तर काँग्रेसबद्दल घृणा उत्पन्न होते. ज्या अस्पृश्यांना येता आले नाही त्यांना मुसलमान व्हावे लागले. मला विचारावयाचे आहे की हा काँग्रेसच्या औदार्याचा पुरावा आहे काय ? पूर्व पंजाबमधून गेलेल्या निर्वासितांना हिन्दुस्थानात व शीख हिंदुना निदान काही प्रमाणात जमिनी देण्यात आल्या. पण अस्पृश्य निर्वासितांना काय मिळाले ? फत्तर ? काही निर्वासितांनी राजघाटासमोर अन्न सत्याग्रह केला. पण त्याला वर्तमानपत्रांनी किंवा काँग्रेसच्या लोकांनी महत्त्व दिले नाही. हे सारे वर्णन करण्यास महाभारताचे ग्रंथ होतील !

काँग्रेसच्या लोकांना कबूल करावे लागले की चार वर्षात मंत्री असताना मी बेइमानी केली नाही. आजारी असूनही माझ्या रक्ताचा बिंदू न बिंदू सरकारसाठी खर्च केला. (प्रचंड टाळ्या) त्यांच्या अंतस्थ यादवीत मी भाग घेतला नाही किंवा अढी बाळगूनही वागलो नाही, चार वर्षाच्या अनुभवाने मात्र मी विचार करू लागलो की, या पार्टीत राहून अगर मंत्री राहून एक साधा सवालही टाकता आला नाही. आता आपला स्वतंत्र मार्ग स्वीकारावा म्हणून मी राजीनामा दिला. (जय भीम ! टाळ्या).

इतक्या वर्षाच्या अनुभवाने एक विचार मात्र ठाम झाला व तो हा की, ज्याचा उद्धार त्यानीच करावा. लावीण पक्षीण आणि तिची पिले ही तुम्ही शाळेत वाचलेली गोष्ट इथे लागू पडते. ज्याला आपले शेत कापायचे असेल त्याने स्वतःच कापण्याचा निश्चय करावा आणि कामास लागावे (प्रचंड टाळ्या.) आपणाला माणुसकी मिळवून घ्यावयाची असेल तर आपला लढा आपण केला पाहिजे. म्हणून मी काँग्रेसचे राजकारण सोडून फेडरेशनचा लढा लढवीत आहे. (प्रचंड टाळ्या).

आजच्या राजकारणात कोणत्यातरी एका पक्षाबरोबर संधी केली पाहिजे. शंभरात अस्पृश्य नऊ किंवा दहा आहेत. असे असता तह करणे भाग आहे. खेळीमेळीचे राजकारण यशस्वी होऊ शकते. एकांगी राजकारण यशस्वी होऊ शकत नाही. सोशॅलिस्टांच्या उमेदवारांना अशी खात्री वाटली पाहिजे की, आपले लोक या तडजोडीला मान्यता देऊन त्याप्रमाणे या निवडणुकीत वागतील. निश्चयाप्रमाणे वागणे यातच आमची इज्जत आहे.

मी पार्लमेन्टसाठी उभा आहे. तीस वर्षे राजकारण करीत आहे. राजकारण खुर्चीवर बसून सिगरेट पिण्याचे नाही. ते काही साधे काम नाही. माझे आता पुष्कळ वय झाले, पण समाजाची परिस्थिती मला गप्प बसू देत नाही. समाजाला चार पाऊले नेऊन पुढे सोडावे अशी माझी इच्छा आहे.

तरूण माणसे आता राजकारण लढवायला उतावीळ झाली आहेत! त्यांना राजकारणातला अनुभव हवा व तो आपल्यातील लोकात आहे की नाही याची शंका येते. आता त्यांची उमेदवारी जास्त दिवस नको! लवकरच त्यांना संधी मिळेल.

कोणत्याही राजकीय संस्थेला सहकारी असे एक दलही असले पाहिजे. जेव्हा अस्पृश्यांच्या याच विभागात सभा होत तेव्हा त्या भरविल्या न जाण्याची इतर लोक कोशिश करीत, दगडफेक करीत असे. सभातून गोंधळ उडवून दिला जात त्यासाठी समता सैनिक दल उभारले गेले. पण पुढे या सैनिक दलात बिघाड झाला. विनयशीलपणा राहिला नाही. मी दिल्लीला गेल्यावर ही गोष्ट घडली. आज या दलाचे पुनरुज्जीवन होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. त्यांनी आता दर एक चाळीत जाऊन एक मोठी कामगिरी बजावली पाहिजे. आज एवढा अफाट समुदाय जमला आहे. वर्तमानपत्रवाले नक्की किती आकडा सांगतील कोण जाणे! केवळ अशा सभांना संख्येने हजर राहून आपला कार्यभाग व्हायचा नाही तर प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. मुंबईत कार्याचा खरा दिवस 3 जानेवारी आहे.

अस्पृश्य समाजाप्रमाणे इतर मागासलेले समाज आहेत. त्यांच्या जीवनाकडे आपुलकीने फेडरेशन पाहीलच. मजुरांच्या अडचणीप्रमाणे आमच्याही अडचणी आहेत. पण केवळ जाती विरहित योजना आम्हाला आखता येत नाही. कारण काही गोष्टी अशा आहेत की, त्या अस्पृश्यांच्या खास अडचणी आहेत व त्या दलित फेडरेशनच सोडवू शकेल. यासाठी दलित फेडरेशनचे हात मजबूत ठेवा.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password