Categories

Most Viewed

20 नोव्हेंबर 1956 भाषण

बुद्ध की कार्ल मार्क्स.

काठमांडू येथील विश्व बौद्ध परिषदेच्या समाप्तीपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रतिनिधींना उद्देशून एक खास भाषण दिनांक 20 नोव्हेंबर 1956 ला ठेवण्यात आले होते. व्याख्यानाचे स्थळ नेपाळचे वैभवशाली राजदरबार होते. बौद्ध धर्म भारतात अस्तंगत झाल्यावर तो कित्येक वर्षे नेपाळमध्ये भरभराटीत होता. परंतु आज मात्र तेथे मनुप्रणीत विषमतेवर आधारलेला हिंदू धर्म कायदेशीर रीतीने जारी आहे. अशा देशाच्या दरबारात बाबासाहेबांनी बौद्ध धर्माच्या सर्व श्रेष्ठतेचा पुरस्कार करणे ही एक अपूर्व क्रांतिकारक घटना होती. या भाषणात बौद्ध धर्माकडे पाहाण्याचा आपला मूलभूत दृष्टिकोन त्यांनी दिग्दर्शित केला आहे.

दिनांक 20 नोव्हेंबर 1956 रोजी विश्व बौद्ध परिषदेच्या शेवटच्या दिवशी विश्व बौद्ध परिषदेचे अध्यक्ष डॉ. जी. पी. मलालशेखर (सिलोन) यांनी बाबासाहेबांना विनंती केली की, त्यांनी बौद्ध धम्मात अहिंसेचे स्थान या विषयावर भाषण द्यावे. ही विनंती बाबासाहेबांनी स्वीकारली परंतु विश्व बौद्ध परिषदेतील बहुसंख्य प्रतिनिधींनी आग्रह केला की, बाबासाहेबांनी ‘ बुद्ध की कार्ल मार्क्स यावर भाषण द्यावे. बाबासाहेबांनी याच विषयावर बोलण्याचे मान्य केले. विश्व बौद्ध परिषदेच्या समारोप समारंभाचा आरंभ दुपारी तीन वाजता होणार होता. त्याप्रमाणे काही वेळ अगोदर बाबासाहेब निर्धारित स्थळी आले. बाबासाहेब येताच विश्व बौद्ध परिषदेचे माजी अध्यक्ष व ब्रह्मदेश सुप्रिम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश ऊ चॉन टून व त्यांच्या पत्नी यांनी बाबासाहेबांना आदरपूर्वक त्या भव्य अशा मंचाकडे नेले. बाबासाहेबांना सर्व प्रतिनिधींनी सन्मानपूर्वक उत्थापन दिले. बाबासाहेब खुर्चीवर बसले. स्टेजवर नेपाळचे राजे महेंद्र वीर विक्रम सहदेव एका सजवलेल्या खुर्चीवर विराजमान झाले. बाजूला पूज्य चंद्रमणी महास्थविर, जी. पी. मलालशेखर, पूज्य अमृतानंद महास्थविर आणि ऊ चॉन टून स्थानापन्न झाले. प्रथम पूज्य चंद्रमणी यांनी उपस्थितांना त्रिशरण व पंचशील दिले. त्यानंतर विश्व बौद्ध परिषदेचे अध्यक्ष डॉ. जी. पी. मलालशेखर माईकवर आले आणि म्हणाले,

“आजच्या विश्व बौद्ध परिषदेमध्ये भगवान बुद्धाच्या भारतभूमीमधून एक महान पुरुष आलेला आहे. त्याचे नाव आहे डॉ. बी. आर. आंबेडकर (प्रचंड टाळ्या). त्यांनी भारतातील नागपूर मुक्कामी पाच लाख पददलित लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन महान धम्मक्रांती केली आहे. आज या विश्व बौद्ध परिषदेत संपूर्ण जगातील बौद्ध प्रतिनिधीच्या वतीने मी त्यांचे हार्दिक स्वागत करतो. नंतर त्यांनी रंगीबेरंगी फुलांचा फार मोठा हार बाबासाहेबांच्या गळ्यात घातला. भाषण देण्यासाठी नंतर बाबासाहेबांना विनंती करण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले. पुन्हा एकदा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. सविताबाई बाबासाहेबांच्या मागे उभ्या राहिल्या. कॅमे-यांनी भराभर फोटो टिपले. मग धीरगंभीर वाणीने बाबासाहेबांनी ‘युद्ध की कार्ल मार्क्स’ या विषयावर अस्खलित असे ऐतिहासिक भाषण दिले. “

ते आपल्या भाषणात म्हणाले.

“सन्माननीय अध्यक्ष महाराज, आदरणीय भिक्षुगण आणि सद्गृहस्थहो.
जागतिक बौद्ध परिषदेच्या निमित्ताने नेपाळमध्ये येऊन सुद्धा परिषदेच्या कामकाजात एखाद्या प्रतिनिधी सारखा प्रत्यक्ष भाग घेऊ शकलो नाही याबद्दल मी अत्यंत दिलगीर आहे. आज जरी मी या ठिकाणी उपस्थित असलो तरी मी शारीरिकदृष्ट्या आजारी असल्याने परिषदेच्या कामकाजातील दगदग व त्रास माझ्याने सोसवला जाणार नाही, याची जाणीव प्रतिनिधींना असावी अशी मला खात्री आहे. परिषदेचा अनादर करण्यासाठी मी मुळीच गैरहजर राहिलो नाही. माझ्या शरीरस्वास्थामुळे मी परिषदेच्या कामकाजाच्या कर्तव्यास बरोबर जागू शकणार नाही, याच कारणास्तव मी उपस्थित राहू शकलो नाही. कदाचित परिषदेला गैरहजर राहिल्याबद्दल नुकसान भरपाई म्हणून की काय आज ह्या भरदुपारी तुमच्यापुढे भाषण देण्याबद्दल मला सांगण्यात आले आहे. मी भाषणासाठी मान्यता दिली आहे खरी, परंतु इथे उपस्थित झाल्यावरच ही अनपेक्षित गोष्ट माझ्यावर सोपविण्यात आली. तुम्हा लोकांपुढे व्याख्यान द्यावे लागेल याची मला किंचितही पूर्वसूचना नव्हती. मी कोणत्या विषयावर बोलू इच्छेन ह्याची मला विचारणा केल्यावर बौद्धधर्मातील अहिंसा हा विषय मी सांगितला होता. परंतु सर्वसाधारण मी ज्या विषयाचा ओझरता उल्लेख केला होता त्याच विषयावर म्हणजे बौद्धधम्म व साम्यवाद ह्यावर मी बोलावे असे परिषदेला उपस्थित असलेल्या बहुसंख्यांक लोकांना वाटत असल्याचे मला सांगण्यात आले. भाषणाचा विषय बदलण्यास जरी मी मान्यता दिली असली तरी प्रामाणिकपणे मला हे सांगितले पाहिजे की, हा विषय आकस्मिकपणे सोपविला गेला असल्याने एवढ्या महान व विस्तृत विषयावर बोलण्याची माझी तयारी झालेली नाही. हा विषय केवळ महान व विस्तृतच नाही तर अत्यंत भारदस्त आहे. या भारदस्त विषयाच्या दडपणाखाली अर्थअधिक जग सापडलेले आहे. एवढेच नव्हे तर बौद्ध राष्ट्रातील तरुण विद्यार्थी वर्गसुद्धा या विषयाच्या मगरमिठीत सापडलेला आहे. ही दुसरी बाब मला अत्यंत चिंताजनक वाटते.

साम्यवाद जी जीवनप्रणाली सांगते त्या जीवनप्रणालीपेक्षा बौद्ध धम्माने सांगितलेली जीवनप्रणाली उत्कृष्ट व सरस आहे. अशी प्रशंसा जोपर्यंत बौद्ध राष्ट्रातील तरुण पिढी करीत नाही तोपर्यंत बौद्ध धर्माचे भवितव्य उज्ज्वल आहे. असे म्हणता येणार नाही. बौद्ध धर्मावरील श्रद्धा दोन अंक पिढ्याही तग धरू शकणार नाही. यास्तव बौद्ध धम्मावर ज्यांची दृढ श्रद्धा आहे अशा लोकांनी तरुण पिढीस बौद्ध धर्माची महत्ता पटवून देऊन साम्यवादाला बौद्ध धर्मच पर्याय आहे. किंबहुना बौद्ध धर्मच एकमेव सर्वोत्तम जीवनमार्ग आहे असे सांगणे अत्यंत आवश्यक आहे. ही गोष्ट पटवून दिल्यावरच बौद्ध धर्म टिकवून धरण्याची आशा बाळगता येऊ शकते. आपण हेही तेवढेच ध्यानात घेतले पाहिजे की, युरोपमधील बहुसंख्यांक लोक व आशियामधील बहुसंख्यांक तरुण असा दृष्टिकोन बाळगतात की, आजच्या जगात कार्ल मार्क्स हाच केवळ एक पूजनीय महापुरुष किंवा प्रेषित आहे. त्याचबरोबर ते असाही विचार प्रदर्शित करतात की, बौद्ध भिक्खु संघातील फार मोठा भाग केवळ निरुपयोगीच नव्हे तर एक मोठे पिवळे संकट आहे. अशा प्रकारची विचारसरणी कशाचे द्योतक आहे हे भिक्खुनी लक्षात घेतले पाहिजे. तिच्यामागची पार्श्वभूमी त्यांनी समजून घेतली पाहिजे. कार्ल मार्क्सशी तुलना केली जावू शकेल अशाप्रकारे स्वतःला घडवून घेण्याची त्यांनी पराकाष्ठा करावयास पाहिजे. तेव्हाच बौद्ध धर्माचे श्रेष्ठत्व शाबीत केले जावू शकेल.

ह्या प्रास्ताविक नंतर बौद्ध तत्त्वज्ञान व मार्क्सवाद किंवा साम्यवाद ह्यातील ठळक वैशिष्ट्यपूर्ण मुद्दे कोणते आहेत याबद्दल मी आपणास विवेचन करून सांगेन. हे विवेचन बुद्धाचे तत्त्वज्ञान व मार्क्सचे तत्त्वज्ञान यांच्या आदर्शातील साम्य व भेद ह्या संबंधात असेल. जीवनातील उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी साम्यवादी जीवन मार्गापेक्षा बौद्धजीवन मार्ग मानवी जीवनाचे ध्येय हस्तगत करण्यात चिरंतन ठरू शकेल किंवा नाही ह्याचाही त्यात उहापोह असेल जो जीवनमार्ग अल्पकालीन असेल. रानावनातून भटकविणारा असेल किंवा अराजकतेकडे घेवून जाणारा असेल अशा जीवनमार्गाचा पाठपुरावा करणे उचित ठरणार नाही. परंतु तुम्हाला अवलंबण्यास सांगितलेला मार्ग जर मंदगतीचा व लांब पल्ल्याचा असेल. तथापि तो खात्रीचा असून सुरक्षित व भक्कम पायावर पोहचविणारा असेल. तुमच्या आदर्श तत्त्वांना सहाय्यभूत ठरविणारा व तुमच्या जीवनाला स्थायीभाव देणारा असेल तर तोच मार्ग चोखाळणे न्यायाचे ठरेल. कमी अंतराचा शॉर्टकट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काटेरी मार्गापेक्षा मंदगतीचा लांब पल्ल्याचा मार्गच आक्रमण करीत राहाणे केव्हाही रास्त असते. जीवनातले शॉर्टकट नेहमीच घातकी असतात. नुसतेच घातकी नव्हे तर महाघातकी असतात. हे सतत ध्यानात ठेवले पाहिजे.

आता मी माझ्या प्रमुख विषयाला हात घालतो. मार्क्सच्या साम्यवादाची विचारसरणी तरी काय आहे ? त्याचे मूलभूत तत्त्वज्ञान तरी काय आहे ? साम्यवादी विचारसरणीचा मूलारंभ असा आहे की, या जगात पिळवणूक चाललेली आहे. ही पिळवणूक धनिकांकडून गरिबाची होत आहे. कारण धनिकांना संपत्तीची हाव आहे. त्यांना अधिकाअधिक मालमत्ता हवी आहे. त्यासाठी ते जनसमुदाय गुलाम करीत आहेत. ही गुलामगिरी शेवटी यातना, दुःख व गरिबी यांच्या निर्मितीस कारणीभूत होत आहे. हेच मार्क्सवादाच्या प्रारंभाचे मूळ आहे. मार्क्स याने पिळवणूक ह्या शब्दप्रयोगाचा उपयोग केला आहे. ही पिळवणूक नष्ट करण्यासाठी मार्क्सने कोणती उपाययोजना सांगितली आहे ? पिळवणूक होणाऱ्या ह्या एका वर्गाचे दैन्य व दुःख नष्ट करण्यासाठी वैयक्तिक मालमत्तेवर प्रतिबंध घातला पाहिजे असे मार्क्सचे सांगणे आहे. व्यक्तीशः कोणीही मालमत्ता बाळगू नये किंवा धनसंचय करू नये. कारण कार्ल मार्क्सच्या तांत्रिक भाषेत सांगावयाचे झाल्यास असे म्हणता येईल की, कामगारांच्या किंवा मजुरांच्या श्रमशक्तीपासून उत्पादित झालेले अतिरिक्त धन स्वतःच घेणारा किंवा स्वतःच गिळंकृत करणारा हा खाजगी मालमत्तेचा एक मालक बनतो. कामगार आपल्या निढळाच्या घामाने उत्पादन वाढवितो व अतिरिक्त धन मिळवून देतो. परंतु ह्या अतिरिक्त धनावर त्या कामगारांचा कोणताच अधिकार राहात नाही. त्याला त्यामधून काहीही हिस्सा मिळत नाही. ते सारे अतिरिक्त धन केवळ मालकच बळकावून बसतो. ही बाब लक्षात घेवून कार्ल मार्क्सने असा प्रश्न उपस्थित केला की, कामगारांनी आपल्या श्रमशक्तीच्या जोरावर निर्माण केलेल्या अधिक उत्पादित धनावर मालकाने काय म्हणून हक्क सांगावा ? मार्क्सच्या मतानुसार अतिरिक्त धनावर मालकाचा केव्हाही अधिकार असता कामा नये. अतिरिक्त धनावर केवळ राज्याचाच अधिकार असावा आणि हे राज्यसुद्धा कामगारांचे असावे. याच कल्पनेवर मजुरांच्या किंवा कामगार वर्गाच्या हुकूमशाहीचा सिद्धांत मार्क्सने प्रस्थापित केला. मार्क्सने जे सिद्धांत प्रस्थापित केले, त्यातील हा एक तिसरा सिद्धांत आहे. कामगार वर्गाची हुकूमशाही ह्याचा अर्थ मार्क्स असा करतो की, शासन हे शोषिकांचे म्हणजे कामगारांची पिळवणूक करणाऱ्याचे नसावे. ते शोषितांचे म्हणजे पिळवणूक होत असलेल्या कामगारांचे असावे. अशाप्रकारचे कार्ल मार्क्सचे मूलभूत सिद्धांत आहेत. याच सिद्धांतावर आधारित साम्यवादाची उभारणी रशियात झालेली आहे.. या सिद्धांतात भरही घातली गेलेली आहे आणि भर घालणे सतत चालूही आहे. मात्र मूलभूत सिद्धांत सुरुवातीस सांगितल्याप्रमाणेच कायम आहेत.

मी आता क्षणभर बुद्ध तत्त्वज्ञानाकडे वळतो. कारण कार्ल मार्क्सने उपस्थित केलेल्या मूलभूत विचारसरणीच्या बाबतीत बुद्धाचे काही म्हणणे आहे का हेही पाहाणे आवश्यक आहे. मार्क्सने गरिबीच्या संबंधी किंवा कामगारांच्या पिळवणुकीसंबंधी प्रश्न उपस्थित करून आपल्या मार्क्सवादाची किंवा साम्यवादाची उभारणी केलेली आहे. बुद्ध काय म्हणतो ? बुद्धाने कोठून सुरुवात केलेली आहे ? बुद्ध तत्त्वज्ञानाची किंवा बुद्धाच्या धम्माची इमारत कोणत्या पायावर उभारली गेली आहे ? कार्ल मार्क्सप्रमाणे बुद्धानेही 2500 वर्षापूर्वी म्हणजे कार्ल मार्क्सच्या कित्येक वर्षे अगोदर हीच गोष्ट सांगितली आहे. बुद्धाने म्हटले. जगात दुःख आहे. बुद्धाने कार्ल मार्क्सप्रमाणे पिळवणूक हा शब्दप्रयोग उपयोगात आणला नाही. मात्र पिळवणुकीमधून जे दुःख, दैन्य निर्माण होते, त्याच दुःखाची कल्पना देवून बुद्धाने आपल्या तत्त्वज्ञानाची, आपल्या धम्माची उभारणी केली. ‘जगात दुःख आहे हे जगमान्य सत्य आहे असे सांगून बुद्धाने दुःखाची परिभाषा निरनिराळ्या अर्थाने केली. दुःख म्हणजे पुनर्जन्म, दुःख म्हणजे जीवनमरणाचा फेरा असाही अर्थ बुद्धाने केलेला आहे. परंतु ह्या अर्थाशी मी सहमत नाही. दुःख हा शब्द दारिद्र्य, गरिबी ह्या अर्थानेही उपयोगात आणला गेला असल्याचे बौद्ध वाङ्मयातून दिसून पडते. तेव्हा बौद्ध तत्त्वज्ञानाचा मूलभूत पाया व कार्ल मार्क्सच्या तत्त्वज्ञानाचा मूलभूत पाया यात काहीही फरक आढळत नाही. याचाच अर्थ असा की, कार्ल मार्क्सने प्रस्थापित केलेला सिद्धांत हाही नवीन नाही. तेव्हा जीवनाचा मूलभूत पाया शोधण्यासाठी कोणत्याही बौद्ध बांधवास कार्ल मार्क्सचे दार ठोठावण्याची काहीही गरज नाही. बुद्धाने तो पाया केव्हाचाच अगदी उत्तमप्रकारे प्रस्थापित करून ठेवलेला आहे. तो त्याने आपल्या पहिल्या प्रवचनातील उपदेशात केलेला आहे. हे प्रवचन बौद्ध वाङ्मयात धम्मचक्रप्रवर्तन सुत्त ह्या नावाने ओळखले जाते. ज्या लोकांच्या मनावर कार्ल मार्क्सच्या विचाराचा पगडा बसलेला आहे त्यांना मला हेच सांगावयाचे आहे की, तुम्ही धम्मचक्रप्रवर्तन सुत्ताचा अभ्यास करा. बुद्धाने काय म्हटले आहे हे समजून घ्या. मला खात्री आहे की, तुम्हाला त्यात मानवी जीवनसंग्रामाचे उत्तर खचितच आढळेल. बुद्धाने आपल्या तत्त्वज्ञानाची किंवा धम्माची उभारणी ईश्वर, आत्मा किंवा अशाच अनाकलनीय अति मानवी बाबींवर केव्हाही केलेली नाही. त्याने मनुष्याच्या वास्तव जीवनाकडेच अंगुलीनिर्देश करून आपले सारे तत्त्वज्ञान विशद केलेले आहे. मनुष्य यातना, दुःख यानी पिडलेला असतो. ही मानवी जीवनाची वास्तवता आहे. केवळ मार्क्सनेच ह्या गोष्टीचा उहापोह केला असे नव्हे तर त्याच्या जन्माअगोदर दोन हजार वर्षांपूर्वी बुद्धाने ह्या गोष्टी जाणल्या व त्यावर उपायसुद्धा सांगितले, हे एक विशेष आहे. हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. याप्रमाणे गरिबीच्या संदर्भात बुद्धाच्या तत्त्वप्रणालीत व कार्ल मार्क्सच्या तत्त्वप्रणालीत कमालीचे साम्य आहे, हे तुम्हास कळून चुकेल.

मार्क्सच्या विचारानुसार कामगारांच्या पिळवणुकीचा प्रतिरोध करण्यासाठी उत्पादनापासून प्राप्त होणारी संपत्ती राज्याने आपल्या मालकीची करावयास पाहिजे. सा-या जमिनी राज्याच्या मालकिच्या असाव्यात. सा-या उद्योगधंद्यावर केवळ राज्याचाच अधिकार असावा, म्हणजेच व्यक्तिगत मालकास हुकूमत गाजविण्यास वाव मिळणार नाही. तसेच मजुरांच्या श्रमशक्तीने निर्माण केलेल्या उत्पादित वस्तूवरील अतिरिक्त फायद्याचा लाभ त्या मालकास होणार नाही व मजुरांना लुबाडण्याचा प्रसंगच येणार नाही. अशी ही पिळवणुकीच्या संदर्भात कार्ल मार्क्सची विचारसरणी आहे.

व्यक्तिगत मालकी हक्काच्या संदर्भात बुद्धाची विचारसरणी काय आहे ते आपण तपासून पाहू या. ह्यासाठी आपणांस बौद्ध भिक्खुसंघाचा विचार करावा लागेल. बुद्धाने भिक्खुंसाठी लावलेल्या त्यांच्या जीवनविषयक नियमाची चिकित्सकपणे परीक्षा करावी लागेल. बुद्धाने भिक्खुसाठी असे काय नियम केले आहेत ? बुद्धाने कटाक्षाने सांगितले की, कोणत्याही बौद्धभिक्खुने खाजगी मालमत्ता बाळगता कामा नये. वस्तुतः बोलावयाचे झाल्यास कोणत्याच भिक्खुजवळ स्वायत्त मालमत्ता असू नये, असा कडक निर्बंध असूनही आज तुम्हाला अपवादात्मक काही उदाहरणे दिसतील. काही देशातील भिक्खुवर्गात त्यांच्याकडे वरील मालमत्ता असल्याचे मी स्वतः पाहिले आहे. परंतु बहुसंख्यांक कोणतीच मालमत्ता नाही, मालमत्ता बाळगण्याच्या बाबतीत बौद्ध भिक्खुसंघाचे निर्बंध एवढे कडक आहेत की, रशियातील साम्यवाद्यांनी केलेले नियमसुद्धा एवढे कडक नसावेत. हा विषय अद्याप कोणीही विचारविनिमयासाठी न घेतलेला व निश्चित निर्णयाप्रत कोणीही न पोहचू शकलेला असा, म्हणून मी आज हाती घेतलेला आहे.

भिक्खुसंघ निर्मितीमागे बुद्धाचे कोणते उद्दिष्ट असावे ? भिक्खुचा संघ असावा असे त्याला का वाटले असावे ? इतिहासाचा मागोवा जर आपण घेतला तर असे आढळून येते की, बुद्ध जेव्हा आपल्या धम्माचा प्रचार व प्रसार करीत होता तेव्हा परिव्राजक म्हटले जाणारे लोक इतस्ततः भटकत होते. एवढेच नव्हे तर बुद्धाच्या अगोदरपासून ते वावरत होते. परिव्राजक हया शब्दाचा अर्थ निराश्रित म्हणजेच ज्यांना घरदार नाही असे लोक असा होतो. आर्यकाळात आर्याच्या निरनिराळ्या टोळ्या इतर वन्य टोळ्यासारख्या आपापसात लढत होत्या. विजयी टोळ्या स्थायिक होऊन राहात. पराभूत टोळ्यातील काही लोक मात्र आपले घरदार, मालमत्ता सोडून केवळ भ्रमंती करीत राहात. स्थायिक जीवन त्यांनी कधीही स्वीकारले नाही. अशा भटकणाऱ्या लोकांना कालान्तराने परिव्राजक म्हटले गेले. बुद्धाने अशा भटकत राहाणाऱ्या परिव्राजक लोकांना एकत्रित करून त्यांचा संघ निर्माण करण्याचे व त्यांच्या भ्रमणजीवनाला नियमबद्ध करण्याचे फार मोठे मोलाचे कार्य केले. ज्या नियमांनी अशा परिव्राजकांना बद्ध केले गेले त्या साऱ्या नियमांचा उल्लेख आपणास विनयपिटकात आढळतो. परिव्राजक बौद्धभिक्खु बनले व विनयपिटकात निर्देशिलेल्या नियमांप्रमाणे काटेकोरपणे वागू लागले. त्यातील नियमाप्रमाणे भिक्खुला मालमत्ता जमविण्याची किंवा बाळगण्याची परवानगी नव्हती. भिक्खुला पुढील केवळ सात वस्तुच बाळगण्यास सांगितले गेले होते. एक वस्तरा, एक लोटा, एक भिक्षापात्र, तीन चिवरे आणि एक सुई या त्या सात वस्तु होत. साम्यवादाच्या मूळ गाभ्याबरहुकूम व्यक्तिगत मालमत्ता असू नये अशी जर बाब असेल तर विनय पिटकातील बौद्ध भिक्खुसाठी सांगितलेला एवढा कडक निर्बंध कुठेतरी असेल का ? मला तरी असा नियम कुढे आढळत नाही. म्हणून व्यक्तिगत मालमत्ता नसण्याच्या बाबतीत साम्यवादी मतप्रणालीमध्ये एखाद्या आजच्या पिढीतील तरुणास आकर्षण वाटत असेल, तर त्याने खचितच बौद्ध तत्त्वज्ञानाच्या विनयपिटकात डोकवावे. त्याला ज्याचा शोध घ्यावयाचा आहे. ते त्यात निश्चितच गवसेल. परंतु प्रश्न असा निर्माण होतो की, व्यक्तिगत मालमत्ता नसण्याचा नियम साऱ्या समाजाला कसा काय लागू करता येईल व केव्हापर्यंत लागू करता येईल ? अर्थात ही सारी बाब उपाययोजना, काळ, परिस्थिती व मानवी जीवनाचा विकास यावर आधारित आहे. तात्त्विकदृष्ट्या विचार करता व्यक्तिगत मालमत्ता काढून घेणे खरोखरीच चुकीचे आहे का ? यदाकदाचित एखाद्यास खाजगी मालमत्ता बाळगण्याची इच्छा असेल, तर बौद्धधर्म आड येईल का? निश्चितच नाही. कारण बौद्ध भिक्खुसंघाची निर्मिती करताना बुद्धाने काही सवलती मान्य केल्या आहेत. आवश्यक गरजा भागविण्यास लागणारी मालमत्ता बाळगण्यास बुद्धाने मनाई केलेली नाही, ही बाब विशेषत्त्वाने ध्यानात घेतली पाहिजे.

आता ह्याच बाबीच्या दुसऱ्या मुद्यांकडे आपण वळू. साम्यवाद घडवून आणण्यासाठी कार्ल मार्क्स किंवा साम्यवादी लोक कोणता मार्ग अवलंबवावा म्हणून सांगतात ? हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. साम्यवाद (म्हणजेच दुःखाचे अस्तित्व मान्य करून व्यक्तिगत मालमत्ता नष्ट करणे हा वाद) प्रस्थापित करण्यासाठी साम्यवाद्यांचा मार्ग अत्याचारी मार्ग आहे. विरोधकांची हत्त्या करण्याचा मार्ग आहे. ह्यातच बुद्ध व कार्ल मार्क्स यांच्या उपाययोजनांच्या मार्गात मूलभूत फरक आहे. बौद्ध तत्त्वज्ञान किंवा बौद्धधम्म प्रस्थापित करण्यासाठी लोकांची मने वळविणे हा बुद्धाचा सनदशीर मार्ग आहे. नैतिक शिकवणीने व प्रेमाने लोकांची मने वळविणे यावर बुद्धाचा भर आहे. बुद्धाला विरोधकांना जोरजबरीने किंवा सत्तेने जिंकावयाचे नसून प्रेमाने व आपुलकीने जिंकावयाचे आहे. हा मूलभूत फरक लक्षात घेतला म्हणजे असे कळून येते की, तत्त्वज्ञान प्रस्थापण्यासाठी बुद्धाला रक्तपात मान्य नाही. हिंसा मान्य नाही. उलट साम्यवाद्यांना हिंसेचाच मार्ग पसंत आहे. या मार्गाने साम्यवाद्यांना ताबडतोब फलप्राप्ती होते किंवा त्यांची उद्दिष्टे जलद सफल होतात यात मुळीच वाद नाही. कारण तुम्ही जेव्हा मनुष्य निर्मूलनाचेच तत्त्व अंमलात आणता तेव्हा तुम्हाला विरोध करणारा किंवा तुमचा प्रतिकार करणाराच कोणी उरत नाही. अर्थात ही सफलता केवळ दिखाऊच असते. मार्क्सवादाच्या तुलनेत बुद्धाचा मार्ग मंदगतीचा व लांब पल्ल्याचा आहे. कदाचित तो लोकांना कंटाळवाणाही वाटण्याचा संभव आहे. कारण सफलता फार उशिरा प्राप्त होते. मात्र हेही तेवढेच खरे की त्या मार्गात सुरक्षितता आहे. तुमच्या जीवाची हमी आहे. यास्तव तुम्ही तुमच्या आदर्शाबरहुकूम मार्ग आक्रमित असताना बुद्धाच्याच बिनधोक मार्गावर पाऊल ठेवणे हितावह होणार आहे.

मी माझ्या साम्यवादी मित्रांना नेहमी दोन तीन प्रश्नांची उत्तरे मागत असतो. परंतु मला प्रामाणिकपणे सांगितले पाहिजे की, माझ्या प्रश्नाची उत्तरे देण्यास ते समर्थ नाहीत. ते मजूर वर्गाची हुकूमशाही रक्तपाताने प्रस्थापित करू इच्छितात. राजकीय सत्तेचे वर्चस्व असणाऱ्यांना ते नेस्तनाबूत करू इच्छितात. त्यांच्या मतानुसार लोकसभेत प्रतिनिधीत्व असू शकत नाही. मताधिकार असू शकत नाही. त्यांना केवळ राज्याची एकतंत्री महाप्रजा म्हणून राहावयाचे आहे. त्यांना सत्तावाटप किंवा अधिकार वाटप न करता राज्य करावयाचे आहे. त्यामुळे त्यांना मी असा प्रश्न करतो की, हुकूमशाही ही लोकांवर राज्य करण्याची योग्य पद्धती आहे का ? त्यावर ते असे उत्तर देतात की, हुकूमशाही त्यांना केव्हाही मान्य नाही. मग मी त्यांना परत विचारतो की, मजुरांची तरी हुकूमशाही त्यांनी का मान्य करावी? त्यावर ते उत्तर देतात की. सध्याचा काळ निर्वाणीचा काळ असल्याने कामगारांची हुकूमशाही निर्माण होणे अत्यावश्यक आहे. मजूर वर्गाची हुकूमशाही निर्माण झाल्याशिवाय प्रस्थापित भांडवलदारांची किंवा अतिरिक्त धन गिळंकृत करणाऱ्या मालक वर्गाचा नायनाट होणार नाही. अजून त्यांना प्रश्न केला की, हा निर्वाणीचा कालावधी तरी केवढा आहे ? वीस वर्षे चाळीस वर्षे की पन्नास वर्षे ? याला त्यांचे निश्चित उत्तर नाही. ते गुळमुळीत उत्तर देतात की. साम्यवाद स्थिर झाल्यावर मजूरवर्गीय हुकूमशाही आपोआपच नष्ट होईल. कल्पना करू या की ती आपोआपच नष्ट झाली. मग पुढे काय? तिची जागा कोण घेईल ? मनुष्याला कोणत्याच प्रकारच्या शासनाची आवश्यकता वाटणार नाही काय ? ह्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नाही.

याच संदर्भात जेव्हा आपण बुद्धाकडे वळतो आणि त्याच्या धम्मासंबंधी प्रश्न उपस्थित करतो तेव्हा तो काय म्हणतो ? बुद्धाने जगाला एक अत्यंत महान अशी गोष्ट सांगितलेली आहे. मनुष्याची मनोधारणा बदलल्याशिवाय आणि पर्यायाने जगाची मनोधारणा बदलल्याशिवाय जगाची सुधारणा किंवा उन्नती होवू शकणार नाही असे बुद्धाचे सांगणे आहे. बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे मनुष्याची मनोधारणा बदलली गेली व त्यानुसार त्याने साम्यवादी विचारसरणी स्वीकारून तीवर निष्ठेने प्रेम केले व ती अंमलात आणण्याचा प्रयत्न केला, तर ती खचितच स्थायी स्वरूप प्राप्त करू शकेल. अशावेळेस मनुष्याला कायदेकानूनच्या बेडीत अडकविण्यास सैनिकी किंवा पोलिसी कारवाईची जरुरी पडणार नाही. असे का घडू शकेल ? याला उत्तर असे की, नैतिकतेने वागण्यास व योग्य मार्गाने चालण्यास तुमच्या मनाची जडणघडणच बुद्धाने तयार केलेली असेल. तुमचे मनच चिरंतन स्वरुपात सन्मार्गी झालेले असेल.

साम्यवादाची उपाययोजना संबंधाची विचारसरणी जुलूमजबरदस्तीवर आधारलेली आहे. कल्पना करा की, उद्या रशियातील साम्यवादी हुकूमशाही बारगळली किंवा तशी चिन्हे दिसू लागली तर काय होईल ? साम्यवादाची अवस्था कशी होईल हे जाणून घेण्यास मी निश्चितच उत्सूक राहीन. माझ्या कल्पनेप्रमाणे राज्याच्या मालकीची मालमत्ता बळकावण्यास रशियन लोक परस्परात रक्तपात घडवून आणतील. आपापसात लढाया करतील. ही परिणती अपरिहार्य अशीच राहील. कारण रशियातील लोकांनी साम्यवादी विचारसरणी सहजासहजी स्वीकारलेली नाही. आपणहून ती त्यांनी मान्य केलेली नाही. ती त्यांच्यावर जबरदस्तीने लादली गेली आहे. साम्यवाद प्रस्थापित करताना त्यांना ही भीती घातली गेली की, त्यांनी जर साम्यवादी विचारप्रणाली मानली नाही, तर त्यांना फासावर लटकविले जाईल. त्यामुळेच ते अजून ती निमूटपणे पाळीत आहेत. हे लक्षात ठेवले पाहिजे की, भयापोटी कोणतीच विचारप्रणाली मूळ धरू शकत नाही. एखादी विचारप्रणाली ग्रहण केली गेली परंतु कालांतराने तिची धारणाशक्ती नष्ट झाली, तर त्या विचारप्रणालीचे पुढे काय होईल, या प्रश्नाचे उत्तर जोपर्यंत देता येणार नाही, तोपर्यंत ती लोकांच्या मनावर बिंबविण्यात काहीच अर्थ नाही. कारण मनोभूमिकाच तयार केली गेली नसेल तर सत्तेची नेहमीच जरुरी भासेल. याच कारणास्तव मला नेहमी बुद्धाचे आकर्षण वाटते. बुद्धाची विचारसरणी ही लोकशाहीची विचारसरणी आहे.

अजातशत्रूला वज्जींना जिंकावयाचे होते. हे सांगण्यासाठी अजातशत्रूचा सरसेनापती बुद्धाकडे आला. बुद्ध त्याला म्हणाला की. राजा वज्जींचा पराभव करू शकणार नाही. कारण वज्जी जोपर्यंत आपल्या जुन्या पद्धतीला धरून राज्यशकट चालवीत आहेत, तोपर्यंत त्यांचा पराभव होणे शक्य नाही. बुद्धाने वज्जीच्या जुन्या पद्धतीचे उघड स्पष्टीकरण कोणत्या कारणामुळे केले नाही हे कळायला काही मार्ग नाही. परंतु ज्या बाबतीत बोलला ती बाब वज्जीच्या लोकशाहीप्रधान व गणतंत्री राज्यकारभार संबंधीच होती यात मात्र संशय नाही. म्हणूनच बुद्ध म्हणाला की, वज्जी जोपर्यंत आपल्या जुन्या पद्धतीप्रमाणे चालतील, तोपर्यंत ते कधीच पराजित होणार नाहीत. यावरून बुद्ध हा लोकशाहीचा मोठा पुरस्कर्ता होता हे उघड होते.

अध्यक्ष महाराज जर मला परवानगी देतील तर मला तुमच्या हेच निदर्शनास आणून द्यावयाचे आहे की, मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी होतो, मी अर्थशास्त्राचाही विद्यार्थी होतो. एवढेच नव्हे तर मी अर्थशास्त्राचा प्राध्यापकही होतो. माझ्या जीवनातील बराच कालावधी कार्ल मार्क्स, साम्यवाद व इतर अनेक विषय ह्यांचा अभ्यास करण्यात घालविला. तसेच बुद्धाच्या धम्माचाही अभ्यास करण्यात मी बराच काळ व्यतीत केला. बुद्ध तत्त्वज्ञान व मार्क्सवाद ह्यांचा जेव्हा मी तौलनिक अभ्यास केला, तेव्हा मी ह्याच निष्कर्षाला पोहचलो की, जगातील एका फार मोठ्या समस्येच्या बाबतीत म्हणजेच जगात दुःख आहे व त्याच्या निवारणाचा एक निश्चित उपाय आहे, ह्या बाबतीत बुद्धाचाच मार्ग सर्वोत्तम आहे, सुरक्षित आहे आणि भरभक्कम आहे. ह्याच कारणास्तव मी बौद्ध राष्ट्रातील तरुण पिढीस सांगू इच्छितो की, त्यांनी बुद्धाच्याच वास्तववादी तत्त्वज्ञानावर विशेष भर दिला पाहिजे व त्यावरच आपले सारे लक्ष केन्द्रिभूत केले पाहिजे,

यदाकदाचित बौद्ध धर्मावर संकट उद्भवण्याचा प्रसंग आलाच, तर बौद्ध राष्ट्रातील भिक्खुंनाच जबाबदार धरावे लागेल. कारण मला तरी व्यक्तीशः असे वाटते की, ज्या भिक्खुंनी तनमनधनाने आपली कर्तव्ये बजावयास पाहिजे, ती त्यांनी पाळली नाही. असाच त्याचा अर्थ असेल. आज कोठे धर्मप्रचार होत आहे ? बौद्ध धम्म प्रचाराची आज काय स्थिती आहे? भिक्खुचे खरे कर्तव्य धम्मप्रसार करणे असे आहे. तो भिक्खु आज काय करतो ? आजचा भिक्खु खावून पिवून विहारात स्वस्थ राहतो. तो केवळ एकच वेळ जेवण घेतो यात शंका नाही. परंतु बहुतांशी त्याचा वेळ निव्वळ आळसातच जातो. थोडेफार तो वाचन करतो. परंतु बहुधा तो झोपाच काढतो. संध्याकाळी स्वतःचे मन संगीतात थोडे रिझवितो. हा मार्ग धम्मप्रसार करण्याचा खचितच नव्हे. मित्रहो, कोणावर टीका करण्याचा माझा हेतु नाही. परंतु धम्मात जर समाजात नवजागृती करण्याची नैतिक शक्ती असेल, तर धम्माची विचारसरणी तुम्ही सतत लोकांच्या कर्णपटलांवर आदळत ठेवली पाहिजे. धम्म तत्वज्ञान लोकांच्या कानात सतत ओतत राहिले पाहिजे. शाळेत मुलाला किती वर्षे घालवावी लागतात ? तुम्ही मुलाला केवळ एका दिवसासाठी शाळेत पाठवीत नाही. त्यानंतर त्याला घरी ठेवून त्या मुलाने सारे शिक्षण ग्रहण करावे. सारे ज्ञान प्राप्त करून घ्यावे, अशी तुम्ही अपेक्षा करीत नाही. मुलगा दररोज शाळेत गेला. पाच तास तेथे तो बसला व सतत त्याने अभ्यास केला. तरच तो थोडेफार ज्ञान मिळवू शकतो. थोडी फार विद्या हस्तगत करू शकतो. आजचे भिक्खु एकही दिवस लोकांना विहारात बोलावित नाहीत किंवा एखाद्या विषयाचे शिक्षण देत नाहीत किंवा धर्मोपदेशही करीत नाहीत. माझ्या तरी पहाण्यात अशी गोष्ट नाही.

मी एकदा सिलोनला गेलो होतो. भिक्खु कसा काय धम्मप्रचार करतात हे मला अवलोकन करावयाचे आहे. असे मी तेथील लोकांना सांगितले. त्यांनी मला सांगितले की, त्यांच्याकडे ‘दान’ ही पद्धत आहे. नंतर मला समजले की, वणाक’ या अर्थाने ‘दान’ या शब्दाचा उपयोग केला जातो. त्यांनी मला अकरा वाजण्याच्या सुमारास ओका ठिकाणी नेले. तेथे टेबलाच्या आकाराची अंक चौरस वस्तू होती. मी जमिनीवर बसलो. थोड्या वेळात अंक भिक्खु आले. बऱ्याच उपस्थित स्त्री-पुरुषांनी पाणी घेऊन त्याचे पाय धुतले. नंतर ते चौरंगावर बसले. त्यांच्याजवळ हवा करण्यासाठी एक हातपंखा होता. ते काहीतरी पुटपुटले. पण काय पुटपुटले ते येका ईश्वरासच ठावूक! अर्थात त्यांनी ते धम्मप्रवचन सिंहली भाषेत केले असावे. पण ते सुद्धा केवळ दोन मिनिटेच! त्यानंतर ते निघून गेले.

आता तुम्ही खिश्चनांच्या चर्चमध्ये जावून बघा. तेथे काय होते ? तेथे प्रत्येक आठवड्याला लोक एकत्र जमतात. तेथे ते प्रार्थना करतात. एखादा त्यांचा धर्मगुरू बायबल मधील एखाद्या विषयावर प्रवचन करून खिस्ताने काय सदुपदेश केला हे समजावून सांगतो. त्या सदुपदेशाचे पुन्हा पुन्हा स्मरण करा. म्हणून लोकांना आवाहन करतो. तुम्ही हे ऐकून निश्चितच आश्चर्यचकित व्हाल की, खिस्ती धर्माचा नव्वद टक्के भाग तत्त्वशः व रचनात्मकदृष्ट्या बौद्धधर्मापासूनच घेतला गेलेला आहे. तुम्ही रोममध्ये जा. तेथील मुख्य चर्च पाहा, तुम्हाला भरहूत येथील ‘विश्वकर्मा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मंदिराची निश्चितच आठवण होईल.

व्हिशबिग्ने हा चीनमध्ये एक खिश्चन मिशनरी होता. त्याने बौद्ध धर्मावर एक पुस्तकही लिहिले आहे. बौद्ध धर्म व खिस्ती धर्म ह्यात असलेल्या कमालीच्या साम्याबद्दल त्याने आपले आश्चर्य प्रकट केले आहे. बाह्यात्कारी जरी तो बौद्धांनी ख्रिश्चनांची नक्कल केले असे म्हणण्याचे धारिष्टय करीत नसला तरी खिश्चनानी बौद्ध तत्त्वज्ञानाची उसणवारी केली हेही मान्य करण्यास तो तयार नाही. या बाबतीत सांगण्यासारखे खूप आहे.

काळ आता खूपच पालटलेला आहे. खिश्चनानी बौद्ध तत्त्वज्ञानाची नक्कल केली यात मुळीच वाद नाही. परंतु बौद्ध धम्मप्रसारासाठी खिश्चनानी स्वीकारलेल्या मार्गाची बौद्धांनी नक्कल करण्यास कसलीच हरकत नसावी. जरी ते मार्ग बहकले तरी बुद्धाचा धम्म त्यांच्या मार्गदर्शनासाठी एखाद्या पोलिसासारखा सदैव उभा आहे. लोकांच्या मनावर ही गोष्ट बिंबविल्याशिवाय बौद्धधर्माचा होणारा -हास थांबविता येणार नाही. आजसुद्धा बौद्ध राष्ट्रात बौद्ध धर्माची अत्यंत वाईट स्थिती आहे. एवढे असूनही लोकांवर बौद्ध धर्माचा पगडा अजूनही कायम आहे यात संशय नाही.

जाता जाता मला एका अत्यंत मनोरंजक व महत्त्वपूर्ण बाबीची माहिती द्यावयाची आहे. ती मी ब्रम्हदेशात गेलो असताना पाहिली. तेथे मला एका परिषदेसाठी बोलावण्यात आले होते. त्यावेळेस तेथील लोकांनी मला ब्रह्मदेशात खेड्याची पुनर्रचना कशी केली जात आहे. हे दाखविण्यासाठी एका खेड्यात नेले. मला फार आनंद वाटला. तेथील एका कमिटीने खेड्याच्या पुनर्रचनेचा आराखडा तयार केलेला होता. त्या खेड्यातील सारे रस्ते नेहमीसारखे वाकडे तिकडे व अव्यस्थित होते. त्यांना ते रस्ते सरळ करावयाचे होते. त्यासाठी त्या कमिटीने लोखंडी खांब रोवून सरळ असे दोर बांधले आणि रस्ते अशा प्रकारे सरळ केले पाहिजेत असे ठरविले. मला असे आढळले की कमिटीने आखल्याप्रमाणे रस्ता बऱ्याच लोकांच्या खाजगी जागेतून जात होता. त्यावर मी प्रश्न केला की, अशा परिस्थितीत कमिटी कसा काय रस्ता तयार करू शकेल ? ज्यांच्या खाजगी जागेतून रस्ता जाणार त्या लोकांना त्याची भरपाई देण्यास कमिटीकडे तेवढा पैसा आहे का ? तेव्हा त्यांनी मला सांगितले की, कोणीही पैशाची मागणी केलेली नाही. उलट रस्ता करण्यास जागा हवी असल्यास ती खुषीने घेतली जावी अशी प्रत्येकाने तयारी दाखविलेली आहे. हे ऐकून मी खरोखरीच आश्चर्यचकित झालो. हे कसे शक्य झाले ? कारण माझ्या देशात नुकसान भरपाई केल्याशिवाय एखाद्याची थोडीसी जरी जमीन घेतली गेली तर रक्त सांडले जाते; परंतु ब्रह्मदेशात तसे घडत नाही, असे का? ब्रह्मी लोक आपल्या मालमत्ते बाबतीत एवढे उदार कसे ? त्यांना आपल्या जमिनीचा लोभ नाही का ? त्यांना आपल्या मालमत्तेची काळजी वाटत नाही का ? याचे कारण हेच की, बुद्धाचा सर्वम अनित्यम् हा उपदेश त्यांच्या मनावर चांगला ठसलेला आहे. जगातील कोणतीच वस्तू नित्य नाही. शाश्वत नाही, तर ती नश्वर आहे. मग अशा अनित्य वस्तुसाठी भांडावे तरी कशाला ? जमीन जर हवी आहे. तर ती खुशाल घ्या, अशी त्यांची मनोधारणा बनलेली आहे.

बंधु भगिनींनो, इतःपर मी अजून काही सांगावे असे काहीच राहिलेले नाही. आपणास केवळ काही मुद्यांचे दर्शन घडवावे एवढीच माझी मनीषा होती. साम्यवादाच्या विजयदुंदुभीने तुम्ही बावरून जाऊ नका किंवा भुलून जाऊ नका किंवा दिपूनही जाऊ नका. तुम्ही जर बौद्ध विचारसरणीचा व तत्त्वज्ञानाचा एक दशांस भाग जरी आत्मसात करू शकलात तर साम्यवाद जे काही निर्माण करू इच्छितो, ते तुम्ही करुणा, न्याय व सद्भावना ह्यांच्या जोरावर घडवून आणू शकाल, यात तिळमात्र शंका नाही. धन्यवाद !

“बाबासाहेबांच्या ह्या भाषणातील विचार परिषदेच्या अनेक प्रतिनिधींना बौद्ध धर्माचे एक अभिनव दर्शनच वाटले. बुद्धाच्या चार आर्यसत्यांपैकी एक आर्य सत्य, जे दुःख, त्याचे मार्क्सच्या आर्थिक पिळवणुकीशी त्यांनी दाखविलेले साम्य, आणि बौद्ध धर्माचे एक स्फूर्तिप्रद जिवंत सामाजिक शक्ती म्हणून त्यांनी केलेले विवरण हे नवे दृष्टिकोन आहेत. त्याला बुद्धवचनांचा आधारही आहे असे काही विद्वान भिक्खुंनी बाबासाहेबांजवळ मुद्दाम येऊन बोलून दाखविले”.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password