Categories

Most Viewed

20 नोव्हेंबर 1937 भाषण

पुढाऱ्यांच्या निधनानंतरही समाजकार्य अव्याहत चालून ते चिरकाल टिकले पाहिजे.

जनता दिनांक 13 नोव्हेंबर 1937 मध्ये जाहीर केल्यानुसार शनिवार दिनांक 20 नोव्हेंबर 1937 रोजी रात्री 8 वाजता वडाळा, मुंबई येथे श्री. भाऊराव गायकवाड यांना मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले. या प्रसंगी श्री. शंकरराव वडवलकर यांचे श्री. भाऊराव गायकवाड यांनी केलेल्या कामगिरीचे ओझरते सिंहावलोकन करणारे भाषण झाले. त्यानंतर श्री. भाऊराव गायकवाड यांचे मानपत्राला उत्तरादाखल भाषण झाले.

यानंतर मानपत्र अर्पण समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे भाषण झाले. ते आपल्या भाषणात म्हणाले.

आजच्या प्रसंगी या समारंभाला मला हजर राहता आले याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो. हा समारंभ घडवून आणल्याबद्दल मी येथील चालक मंडळीचा फार आभारी आहे. आपण नेहमी चळवळीची ज्योत पाजळण्यासाठी ज्या कामचलाऊ सभा करतो तशा प्रकारची ही सभा नाही. एका सन्माननीय अशा व्यक्तीच्या अभिनंदनाची ही सभा असून तिचे महत्त्व तितकेच मोठे आहे. श्री. भाऊराव यांचा दर्जा किती मोठा आहे, हे नव्याने सांगावयास नको आजच्या मानपत्रातील भाषा त्यांना अतिशयोक्तीची वाटते पण माझ्या मते उलट ती पाण्यासारखी पातळ आहे. त्यामानाने भाऊरावांची कामगिरी अधिक अमोल अशी आहे. मला यावेळी वाईट वाटते हे की, हा मानपत्र अर्पण समारंभ वडाळा येथील सर्व रहिवाशांतर्फे न होता काही लोकांतर्फेच तो होत आहे. दुसरे हा समारंभ सर्व मुंबई इलाख्यातर्फे निदान मुंबई शहरातर्फे तरी व्हावयास पाहिजे होता. असो, तरी पण या गोडप्रसंगी अध्यक्षपद स्वीकारण्या विषयीच्या विनंतीला मला नाही म्हणता येईना.

गेल्या दहा वर्षाच्या आपल्या समाजाच्या प्रगतीचा जेव्हा मी शांतपणे विचार करतो त्यावेळी माझ्या मनात वारंवार दोन विचार घोळत असतात. एक गांधीजी सारख्या पुरुषाबरोबर झगडण्यात यश मिळून आम्हास राजकीय हक्क मिळाले. आपणाला राजकारणात समानतेचा दर्जा मिळाला. ब्राह्मण, क्षत्रिय यांच्या मांडीला मांडी लावून कायदेमंडळात बसण्याची त्याच्याबरोबर विचारविनिमय करण्याची संधीही मिळाली. हे सारे मिळवून घेण्याला मी फक्त निमित्तमात्र झालो आहे, असे मला वाटते. दुसरी गोष्ट श्री. भाऊराव गायकवाड सारख्याचे सहाय्य मिळाले नसते तर एकटा काही करू शकलो नसतो. आज जनतेकडून माझ्या कामगिरीबद्दल जे मला धन्यवाद मिळत आहेत त्यापैकी शेकडा 80 टक्के भाग श्री. गायकवाड यांचा आहे. हे येथे नमूद करावयाला मला मुळीच दिक्कत वाटत नाही. अशा या सर्वतोपरी लायक पुढाऱ्याचा आज जो येथे मानपत्र देऊन सन्मान करण्यात येत आहे तो माझ्या दृष्टीने योग्य व अपूर्व असा आहे.

आता याप्रसंगी आपल्या चळवळीसंबंधी दोन गोष्टी सांगण्यास काही हरकत नाही. या हिंदुस्थान देशात राष्ट्रीय काँग्रेस ही मोठी प्रबळ संस्था मानण्यात असे असूनही मी स्वतंत्र मजूर पक्षाचा सवतासुभा का निर्माण केला? याचे कारण एकच की, काँग्रेसमध्ये ज्या भांडवलदार वर्गाचा अधिक भरणा आहे ते आपले हित करावयाचे सोडून गोरगरीब, कामगार व शेतकरी वर्गाचे खरे हित कधीही करणार नाहीत. तसेच दुसरा एक पक्ष कामगार वर्गात निर्माण झालेला आहे. या लाल बावट्याच्या चळवळीने श्रमजिवी वर्गाचे आजच्या परिस्थितीत हित होईल किंवा नाही याची मला शंका वाटते. म्हणून या नवीन स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना आपणाला करावी लागली आहे. आपल्या पक्षाच्या वतीने गेल्या मुंबई प्रांतिक असेंब्लीच्या निवडणुकीत नाशिक श्री भाऊराव गायकवाड यांची आपल्या पक्षातर्फे उमेदवार म्हणून निवड केली होती आणि काँग्रेसबरोबर सामना दिला. या निवडणुकीचा जेव्हा निकाल लागला तेव्हा काँग्रेस पक्षाचा उमेदवार पहिला येऊन त्याला 16,900 मते तर श्री. भाऊरावांना 16,650 मते पडली. अवध्या 250 मतांचे अंतर या उभय उमेदवारात पडले खरे पण माझ्या मते हा हिशोब दुकीचा आहे. आमच्यातील एक इसम आयत्यावेळी विरूद्ध उठला. कारण त्याचे नाव घेणेही याप्रसंगी योग्य वाटत नाही. त्याला 4,000 मते पडली. ही मते विभागली गेली नसती तर श्री. भाऊराव गायकवाडांनी काँग्रेसच्या उमेदवाराला 3,750 मतांनी मारला असता. सहज खात्री पटेल यावरून श्री भाऊरावांची लायकी किती आहे. याची मला सांगावयास आनंद वाटतो की, कायदेमंडळात निवडून आलेली सर्व माणसे लायक आहेत. ज्या माणसांविषयी कायदे कौन्सिलमध्ये लोकांना आदर वाटतो त्यापैकी श्री. भाऊराव हे एक आहेत.

आपण स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाचे हरेक स्त्री पुरुषांनी सभासद झाले पाहिजे. आपणास आव्हान देऊन सांगतो की मी या सर्व राजकारणाच्या बाबतीत चांगला अभ्यास केला आहे. या अभ्यासानुसार स्वतंत्र मजूर पक्षाचा कार्यक्रम आखला आहे. ज्यांना या कार्यक्रमाविषयी शंका वाटत असेल त्यांनी माझ्याकडे यावे. त्यांची संशयनिवृत्ती मी करीन. असे न करता लोकाची दिशाभूल करणारा मनुष्य खास लुच्चाच असला पाहिजे. असो, काँग्रेस ही विश्वामित्राची माया आहे. मायेविषयी मुक्तेश्वराने जे वर्णन केले आहे त्यात मुंगूस सापाची मैत्री होती. उंदीर-मांजरीचे दूध पीत आहे. सिंह व हत्ती बंधुप्रेमाने राहात होते वगैरे गोष्टी आहेत. या गोष्टी सत्यसृष्टीत किंवा व्यवहारात कितपत पटतील ? तीच काँग्रेसची गोष्ट आहे. समाजाची अशी घटना झाली पाहिजे की तिचे प्रमुख पुढारी निघून गेले, दिवंगत झाले तरी समाजकार्य अव्याहत चालून ते चिरकाल टिकले पाहिजे. अशाच प्रकारच्या कार्याची योजना झाली तरच तो पक्ष किंवा समाज जगात वैभवशाली ठरेल.

डॉ. बाबासाहेबांचे भाषण संपल्यानंतर त्यांना व श्री. भाऊरावांना अनेक संस्थातर्फे पुष्पहार अर्पण करण्यात आले. या गोड मानपत्रसमारंभ प्रसंगी प्रि. दोदे, अँ. आर. डी कवळी मॅचेस्टर मिल चे मॅनेजर हेमीसाहेब, कास्टीलसाहेब, द. वि. प्रधान, मा. र. कद्रेकर, देवराव नाईक, वडवलकर, कमलाकांत चित्रे, उपशाम मास्तर, श्री. मडकेबुवा, निळे, गायकवाड, रामजी बोरीकर, श्री. कोतवाल, आरोळकर वगैरे प्रमुख मंडळी हजर होती. शेवटी आभार प्रदर्शनानंतर हा समारंभ निरनिराळ्या मनोरंजक कार्यक्रमानंतर संपविण्यात आला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password