आपला भविष्यकाळ उज्ज्वल आहे.
अखिल भारतीय दलित फेडरेशनच्या वर्किंग कमिटीची बैठक तारीख 19-20 नोव्हेंबर 1949 रोजी दिल्ली येथे भरण्याचे निश्चित झाले आहे. अध्यक्षस्थानी एन. शिवराज (बी. ए. बी. एल.) राहातील. खास निमंत्रणावरुन या वर्किंग कमिटीच्या बैठकीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर हजर राहणार आहेत.
वर्किंग कमिटीपुढील कार्यक्रम पत्रिका खालीलप्रमाणे नमूद केली आहे.
(1) दलित फेडरेशनच्या देशभर कार्याचा आढावा घेणे.
(2) अखिल भारतीय दलित फेडरेशनचे पुढील धोरण व कार्यक्रम ठरविणे;
(3) अखिल भारतीय दलित फेडरेशनच्या आगामी खुल्या अधिवेशनाचे ठिकाण व तारीख निश्चित करणे.
(4) समता सैनिक वगैरे दलावरील बंदीचा विचार करणे वगैरे
ज्या कोणास वर्किंग कमिटीकडे सूचना पाठवावयाच्या असतील त्यांनी, श्री. पी. एन. राजभोज, जनरल सेक्रेटरी, अखिल भारतीय दलित फेडरेशन यांच्या नावे, 1, हार्डिज एव्हिन्यू, न्यू दिल्ली या पत्त्यावर पाठवाव्यात असेही त्यांनी काढलेल्या या सर्क्युलरमध्ये नमूद केले आहे. जवळ जवळ तीन वर्षांनी वर्किंग कमिटीची बैठक भरत असल्यामुळे तिच्या निर्णयाकडे व आदेशाकडे अखिल अस्पृश्य जनता कुतुहलाने पहात आहे.
श्री. राजभोज यांनी दुसरे एक पत्रक, फेडरेशनच्या निरनिराळ्या प्रांताध्यक्षांना उद्देशून काढले असून, त्यांचेकडून अद्यापही फेडरेशनच्या कार्याचे अहवाल आलेले नाहीत याबद्दल त्यांनी खेद प्रदर्शित केला आहे. निरनिराळ्या प्रांतामध्ये किती जिल्हा शाखा आहेत. किती तालुका शाखा आहेत, किती गाव शाखा आहेत त्याचप्रमाणे फेडरेशनचे सभासद किती झाले, पैसे किती जमले व संघटनेचे कार्य कितपत झाले याबद्दलचा रिपोर्ट त्यांनी दरेक प्रांताध्यक्षांकडून शक्य तो त्वरित मागविला आहे. त्यांना सदर रिपोर्ट वर्किंग कमिटीपुढे सादर करावयाचा आहे.
वर्किंग कमिटीची हालचाल मोठी सूचक वाटते. विशेषतः तिचा समय महत्त्वपूर्ण आहे. सुमारे तीन वर्षानंतर 19-20 नोव्हेंबरलाच वर्किंग कमिटी बोलाविली आहे, ही गोष्ट नमूद करण्यासारखी आहे. आता लवकरच घटना समितीचे काम संपेल आणि घटना जाहीर होताच, नवीन पार्लमेंट जन्मास येईल. नव्या पार्लमेंटातील अस्पृश्यांच्या हक्कांची जाणीव भारतवासियांना सदर वर्किंग कमिटी करून देईल. अस्पृश्य समाजाचे हक्क रक्षिण्यात व त्याजबद्दल डोळ्यात तेल घालून हालचाल टेहळण्यात वर्किंग कमिटी कर्तव्यतत्पर असल्याचा हा पुरावा आहे.
काँग्रेस अगर इतर पक्षांशी दलित फेडरेशनचे संबंध कसे असावेत याबद्दल अफवा पसरून जो नाहक गोंधळ उडाला आहे तो दूर करण्याच्या दृष्टीने वर्किंग कमिटीचे ठराव उपयुक्त ठरतील यात शंका नाही.
अखिल भारतीय दलित फेडरेशनची वर्किंग कमिटी म्हणजे अस्पृश्य समाजाचे सर्वश्रेष्ठ न्यायालय आहे. त्या न्यायालयाकडूनच अस्पृश्य समाजास खरा न्याय मिळेल आणि असा न्याय मिळवावयाचा असेल तर, वर्किंग कमिटीच्या आदेशाप्रमाणे वागण्यास व तन मन धन खर्चून दलित फेडरेशनची संघटना मजबूत करण्यास दरेक अस्पृश्य बांधवाने सज्ज झाले पाहिजे.
ठरल्याप्रमाणे तारीख 19-20 नोव्हेंबर 1949 रोजी अखिल भारतीय दलित फेडरेशनच्या वर्किंग कमिटीची बैठक श्री. डी. एल. पाटील (मध्य प्रांत) यांचे अध्यक्षतेखाली दिल्ली येथे भरली होती. सदर बैठकीचे कामकाज गुप्तपणे करण्यात आले. वर्किंग कमिटीच्या बैठकीत चालू राजकीय परिस्थितीचा खल सूक्ष्म रितीने करण्यात आला. दलित फेडरेशनने पूर्वीचेच धोरण कायम ठेवावे असा निर्णय घेण्यात आला. तथापि दलित फेडरेशन असहकाराची भूमिका घेणार नाही असेही विषद करण्यात आले. जो पक्ष अस्पृश्यांकरता खास कार्यक्रम आपल्या पक्षात ठेवू शकेल आणि राजसत्तेचा समान हिस्सा देऊ शकेल. त्याच्याशी सहकार्य करण्याचा विचार दलित फेडरेशन करील, असेही जाहीर करण्यात आले.
खास निमंत्रणावरून भारत सरकारचे कायदेमंत्री, ना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वर्किंग कमिटीच्या बैठकीस हजर होते. निरनिराळ्या प्रांतातील वर्किंग कमिटीचे बहुतेक सर्व सभासद हजर होते. खालीलप्रमाणे प्रांतवार सदस्य बैठकीत दिसत होते.
पंजाब : (1) श्री. शेठ किसनदास (2) श्री. बालमुकुंद
मध्य प्रांत : (1) आर. व्ही. कवाडे (2) श्री. डी. एल. पाटील (3) श्री. एस. ए. खंडारे
मुंबई : (1) दादासाहेब गायकवाड (2) कु. शांताबाई दाणी (3) श्री. आर. आर. भोळे (4) श्री बी. एच. वराळे
संयुक्त प्रांत : (1) श्री. तिलकचंद कुरील (2) श्री. गोपिचंद पीपल (3) श्री. परसरामजी
बिहार : (1) श्री गणेशरामजी
मध्य भारत : (1) डॉ. विवेकानंद (2) श्री. नितनवरे
आंध्र : (1) श्री. एवाडापल्ली
आसाम : (1) श्री. शेखीभाई
हैद्राबाद : (1) श्री. सुबय्या
याशिवाय, अखिल भारतीय दलित फेडरेशनचे सर चिटणीस बापूसाहेब राजभोज हेही हजर होते. श्री. एन. शिवराज काही अपरिहार्य कारणास्तव येऊ शकले नाहीत. त्यामुळे वर्किंग कमिटीची बैठक मध्यप्रांतचे श्री. डी. एल. पाटील यांचे अध्यक्षतेखाली झाली.
तारीख 19-20 असे दोन दिवस वर्किंग कमिटीचे कामकाज चालले होते.
पहिल्या दिवसाच्या कामकाजाची सुरूवात दलित फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी श्री. बापूसाहेब राजभोज यांच्या अहवाल वाचनाने झाली. तीन वर्षांच्या कार्याचा आढावा श्री. राजभोज यांनी आपल्या अहवालात घेतला. सत्याग्रहाचे वर्णन करून त्यांनी सत्याग्रहींचे अभिनंदन केले. गेल्या मद्रास, संयुक्तप्रांत, मध्यप्रांत या विभागातील दौऱ्यात त्यांना जे अनुभव आले त्याचेही वर्णन संघटनेच्या दृष्टिकोनातून त्यांनी केले. निरनिराळ्या प्रांतिक शाखांमध्ये मोठीच शिथिलता आली आहे. यासंबंधीचा उल्लेख त्यांनी कटाक्षाने केला. प्रांतिक शाखांकडून फेडरेशनचे सभासद वाढविले जात नाहीत, हिशेब मिळत नाही, प्रचारार्थ दौरे काढले जात नाहीत अशातऱ्हेची तक्रार पुन्हा एकदा त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समक्ष वकिंग कमिटीच्या बैठकीत केली. श्री. राजभोज यानी आपल्या अहवालाच्या शेवटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा गौरव केला डॉक्टर साहेबांनी घटना लिहिण्याची कामगिरी करून शत्रुकडून देखील वाहवा मिळविली हा त्यांचा व फेडरेशनचा विजय आहे, असे श्री. राजभोज म्हणाले. श्री राजभोज यांना संघटनेत शिस्त ठेवण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या सूचना मिळाल्या असून, त्याबद्दल ते लवकरच सर्क्युलर काढणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण : श्री. राजभोज यांच्या अहवाल वाचनानंतर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी छोटेसे भाषण केले. डॉक्टरसाहेब आपल्या भाषणात म्हणाले, आपली संघटना आपण स्वतंत्रच ठेवली पाहिजे. स्वतंत्र संघटने शिवाय आपल्याला स्वाभिमानाने राहता यावयाचे नाही. सध्या जे लहान मोठे राजकीय पक्ष दिसतात, त्यांनी अस्पृश्य समाजाच्या उन्नतीच्या दृष्टीने कोणताच खास कार्यक्रम ठेवलेला नाही. तसा कार्यक्रम कोणी ठेवला असता तर त्याचा आम्ही विचार केला असता. पण म्हणून आपण काही अडून राहावयाचे नाही, आपली सध्याची सुप्तावस्था फेकून पाहिजे. येथून पुढे आपल्याला आपण काही मिळवावयाचे आहे ते इज्जतीनेच मिळविले पाहिजे. कोणाची हाजी हाजी करून अथवा भीक मागून आम्हास काहीही नको. आपला भविष्यकाळ उज्ज्वल आहे. भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठी मला निष्ठेची माणसे हवीत.
शेवटी एक गोष्ट मला स्पष्ट कराविशी वाटते आणि ती ही की जर तुम्हास माझे पुढारीपण मान्य असेल तर मी सांगतो त्याप्रमाणे तुम्ही वागले पाहिजे.
तद्नंतर, दलित फेडरेशनच्या वर्किंग कमिटीने चार महत्त्वाचे ठराव संमत केले.
दलित फेडरेशनच्या सध्याच्या धोरणात कोणताच बदल करण्यात आला नसून, येत्या हंगामी पार्लमेंटच्या निवडणुकीच्या अमिषास दलित फेडरेशनच्या अनुयायांनी बळी पडू नये, असा आदेश पहिल्या ठरावान्वये देण्यात आला आहे.
दुसरा ठराव समता सैनिक दलासंबंधी आहे. इतर स्वयंसेवक संस्थांनी जशी घातपाती व हिंसात्मक कृत्ये केली तशी कृत्ये समता सैनिक दलाच्या हातून कधीही घडली नसता आर. एस. एस. सारख्या संघटनावरील बंदी उठवावी आणि समता सैनिक दलावर मात्र ती तशीच राहावी त्याचा निषेध करणारा दुसरा ठराव आहे.
अखिल भारतीय दलित फेडरेशनच्या जनरल सेक्रेटरींना संघटनेबाबत महत्त्वाच्या सूचना देणारा तिसरा ठराव असून त्या ठरावान्वये पक्षामध्ये शिस्त ठेवण्यासाठी शिस्तभंगाचा इलाज करण्याचे अधिकारही त्यांना देण्यात आले आहेत. श्री. ठवरे, गोपालसिंग यांची दलित फेडरेशनमधून हकालपट्टी करण्याचे ठरविण्यात आले.
चौथा ठराव अखिल भारतीय दलित फेडरेशनच्या आगामी खुल्या अधिवेशनासंबंधी आहे. येणारे अधिवेशन पंजाबमध्ये घेण्याचे ठरले असून अधिवेशनाची जागा व तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असे ठरावात नमूद करण्यात आले आहे.