Categories

Most Viewed

17 नोव्हेंबर 1951 भाषण

सत्तेवर येणाऱ्या कोणाही पक्षाला, जनतेच्या सर्वांगीण हितासाठी जोतीबा फुल्यांचे धोरण आणि लोकशाहीवादी तत्त्वज्ञान घेऊनच पुढे जावे लागेल.

जनता, दिनांक 17 नोव्हेंबर 1951 मध्ये जाहीर केल्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मनमाड व नाशिक येथील सभेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यानुसार त्यांच्या नाशिक येथील सभेच्या कार्यक्रमाला दिनांक 17 नोव्हेंबर 1951 रोजी संध्याकाळी 6 वाजता सुरूवात झाली. त्याप्रसंगी ते आपल्या भाषणात म्हणाले,

भगिनींनो आणि बंधुजन हो,
माझे मित्र श्री. भाऊराव गायकवाड ह्यांनी मी आपणास दोन शब्द सांगावे अशी मला विनंती केली. निवडणुकीचा हा माझा दौरा असल्याने मी आपणास निवडणुकी संबंधानेच काहीतरी सांगणार. ह्या भागातर्फे उभे असलेल्या फेडरेशनच्या आणि समाजवादी पक्षाच्या उमेदवारांनाच आपण निवडून द्यावे हीच माझी आपणास विनंती आहे.

ह्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करणे अगदीच अशक्य आहे असे नाही, काँग्रेसबाबत जनतेत किती असंतोष पसरलेला आहे हे सर्वांना माहीत आहेच. स्वतंत्र विचाराचे नागरिक काँग्रेसला परवडत नाहीत. काँग्रेसला केवळ बंदे लोक पाहिजेत. ज्यांना ते पटत नाही ते कॉंग्रेसमधून बाहेर पडतात. आज देशात जे अनेक पक्ष आहेत त्यात जनतेला अत्यंत अप्रिय झालेला असा काँग्रेससारखा दुसरा कोणताही पक्ष नाही.

तरीही ह्या निवडणुकीत काँग्रेस कदाचित यशस्वी होईल अशी भीती मला वाटते. त्याचे कारण एकच आणि ते म्हणजे आज काँग्रेसविरोधी गटात एकवाक्यता नाही. अनेक पक्ष आहेत आणि त्या प्रत्येक पक्षाने आपापले उमेदवार उभे केले आहेत. हे उमेदवार आपापसात झगडतील आणि त्यायोगे काँग्रेसविरोधी शक्तीचे बळ कमी होईल आणि त्यामुळेच काँग्रेसचा जय होईल.

काँग्रेसविरोधी सर्व पक्षांची एकजूट करून एका मतदार संघातून काँग्रेसविरोधी एकच उमेदवार उभा राहावा अशी माझी इच्छा होती. परंतु निवडणुकीस फारच कमी अवधी राहिला असल्याने माझे त्याबाबतीत प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत. तथापि ज्या पक्षात जास्त प्रमाणावर एकवाक्यता आहे अशा पक्षांची निवडणुकीपुरती एकजूट आणावी ह्या हेतूनेच फेडरेशनने समाजवादी पक्षाशी निवडणूक करार केला आहे. आपणास माहीत आहेच की, आपणास पंढरपूरास जावयाचे असेल तर अनेक मार्ग आहेत. सर्वांना एकाच मार्गाने जाणे शक्य नसते. काहीचा असा विश्वास असतो की, अमुक मार्गाने गेलो तरच आपणास वैकुंठ प्राप्त होईल. अजून आपणास राजकारणाचा मिळावा तसा अनुभव मिळालेला नाही. जेव्हा तो अनुभव येईल तेव्हा सर्व पक्ष एकत्रित येऊन मार्गाची विलक्षणा करतील आणि त्यातूनच आपणास काँग्रेसविरोधी पक्षांची एकजूट दृष्टीस पडेल. आज मात्र प्रत्येकास आपला मार्ग खरा असे वाटत आहे. अशा परिस्थितीत मार्गाकडे जास्त लक्ष न देता कोणत्या दिशेने जावयाचे आहे ते पाहून त्या दिशेने जाणाऱ्या इतरांशी हातात हात घालून रस्ता काढला तर त्यात कोणाची दिशाभूल केल्यासारखेही होणार नाही अगर कोणावर अप्रामाणिकपणाचा आरोपही लादता येणार नाही.

ह्या दृष्टीनेच फेडरेशन आणि समाजवादी पक्ष ह्यांनी हा निवडणूक करार केलेला आहे. आम्हा दोघांमध्ये काही बाबतीत मतभिन्नता आहे. पण आम्हा दोघांचीही दिशा मात्र एकच आहे. वरिष्ठ वर्गाचे दडपणातून जनतेस खरे स्वातंत्र्य मिळवून देणे ह्याबाबत आमच्यात एकमत आहे. तेव्हा सर्वच बाबतीत एकमत नसले तरी उभयतांनी एकदिलाने, संघटितपणे ह्या लढाईस तोंड देणे शक्य आहे असे आम्हा दोघासही पटल्यानेच आम्ही ही निवडणूक संयुक्तपणे लढवीत आहोत.

मला असा प्रश्न विचारण्यात आला की, महाराष्ट्रातील शेतकरी कामगार पक्षाशी तुम्ही करार का केला नाही ? मी अजूनपर्यंत ह्याबाबत जाहीरपणे कोठे बोललो नव्हतो. आज मी ह्या प्रश्नाचे उत्तर देणार आहे. पूर्वी ब्राह्मणेतर पक्ष अस्तित्वात होता. आपल्या प्रांतातच नव्हे तर मध्यप्रांत, व-हाड, मद्रास येथेही असा पक्ष अस्तित्वात होता. महात्मा जोतीबा फुले ह्यांनी ह्या पक्षाची मुहूर्तमेढ रोविली. म्हणून ह्या पक्षाचे अनुयायी आपणास जोतीबा फुले यांचे अनुयायी म्हणवू लागले. पण ह्या पक्षातील लोक केवळ नाममात्र अनुयायी राहिले. जोतीबांचा कार्यक्रम, त्यांचे धोरण ह्यास या पक्षातील लोकांनी तिलांजली दिली. स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व आपल्याच हातांनी जमिनीत गाडून हे लोक कॉंग्रेसमध्येही सामील झाले. हा ब्राह्मणेतर पक्ष काही काळाने नामशेष झाला.

जोतीबांचा अनुयायी म्हणवून घेण्यात मला ह्यापूर्वीही कधी लाज वाटली नाही आणि आजही वाटत नाही. आत्मविश्वासाने मी आज असे म्हणू शकतो की मीच तेवढा खरा आज जोतीबांना एकनिष्ठ राहिलो आहे. मला अशी खात्री आहे की, ह्या देशात जनतेचे सर्वांगीण हित करणारा असा कोणताही पक्ष पुढे आला. त्याने कोणतेही नाव धारण केले तरी त्याला जोतीबांचे धोरण, त्यांचे तत्त्वज्ञान आणि त्यांचे कार्यक्रम घेऊनच पुढे यावे लागेल. तोच एक खराखुरा लोकशाहीचा मार्ग आहे. समाजातील 80 टक्के लोकास विद्याप्राप्ती करून देणे आणि त्यांना सामाजिक, आर्थिक व राजकीय गुलामगिरीत जखडून ठेवणे हे दिसत असता स्वराज्य, स्वराज्य म्हणून ओरडण्यात काय फायदा? स्वराज्याचा फायदा सर्वांना मिळाला पाहिजे. मागासलेल्या वर्गाच्या सर्वांगीण उन्नतीचा कार्यक्रम घेऊन पुढे आल्याशिवाय कोणताही पक्ष आज जनतेचे नेतृत्व घेऊ शकत नाही हे सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट आहे. समाजवादी पक्षानेही ह्या गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे, असे मला वाटते.

आजचा शेतकरी कामगार पक्ष हा ब्राह्मणेतर पक्षाची आवृत्ती म्हणून पुढे आला आहे. परंतु ब्राह्मणेतर पक्ष म्हणवून घेण्यास त्या पक्षास लाज का वाटते ते मला कळत नाही. ह्या पक्षाच्या पुढा-यांशी जुने आणि फार घनिष्ठ संबंध आहेत आणि असे असतानाही ह्या पक्षाशी फेडरेशनने सहकार्य का केले नाही, ह्या प्रश्नाचे उत्तर मला आज द्यावयाचे आहे.

ह्या पक्षाबाबतची एक गोष्ट जगजाहीर आहे की हा पक्ष एकेकाळी कम्युनिस्ट पक्ष बनावयास पाहत होता. नाशिक जिल्ह्यातच दाभाडी येथे ह्या पक्षाची बैठक भरून ह्या पक्षाने एक प्रबंध मान्य केला. त्या प्रबंधास “दाभाडी प्रबंध” म्हणण्यात येते. हा प्रबंध पूर्णपणे कम्युनिस्ट तत्त्वज्ञानावर आधारलेला असा आहे. कम्युनिझमला आज ह्या देशात जागा देण्यास मी तयार नाही. कदाचित पंडित नेहरूंच्या आंतरराष्ट्रीय राजकारणातील घोडचुकांमुळे कम्युनिझम हा येईलही आणि चीन व रशिया ह्यांच्या नियंत्रणाखाली हा देश जाऊन ह्या देशाचे स्वातंत्र्य लयास जाईल.

आजच येथील गावकरीत मी एक महान संकटकारक अशी बातमी वाचली. नेपाळमध्ये कम्युनिस्ट सेना शिरकाव करून घेण्यासाठी ज्या संधीची वाट पाहात होत्या तशी संधी नेपाळमधील अंतर्गत परिस्थितीमुळे त्यांना मिळत आहे अशी ती बातमी आहे. आज भारताच्या सरहद्दीवर कम्युनिस्ट सेना सज्ज होऊन येऊन ठेपली आहे. ही सेना आपल्या देशात केव्हा घुसेल ह्याचा नेम नाही, ही भीती आज दिसत आहे. एवढेच नव्हे तर एक वर्षापूर्वी मी ही धोक्याची सूचना पंडित नेहरूंना दिली होती. त्यावेळेस माझे कोणी ऐकले नाही, आज दुर्दैवाने माझी भीती खरी ठरू पाहत आहे.

आपणास आपल्या देशाचे स्वातंत्र्य टिकविले पाहिजे. स्वातंत्र्य टिकवून आपणास आपला देश समृद्ध राखावयाचा आहे. कम्युनिझमला ह्या देशात थारा दिला तर आपले स्वातंत्र्य रसातळास जाईल. आपला देश रशियाचा अंकित होऊन राहील. पूर्व युरोपातील राष्ट्रांचा अनुभव आपणास हेच सांगत आहे. आज आपल्या देशापुढे जे मोठे मोठे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपले स्वातंत्र्य गमावून आपण सोडवू शकणार नाही. देशाच्या स्वातंत्र्याची राखरांगोळी कम्युनिझममुळे होणार हे आपण दृष्टीआड करू शकत नाही.

कम्युनिझम खेरीज दुसरे मार्ग आहेत आणि ह्या दुसऱ्या मार्गाने जाऊन आपण आपल्या देशाचे स्वातंत्र्यही टिकवू आणि पददलित, पिडीत अशा जनतेस सुखी-समृद्ध बनवू असा मला विश्वास आहे. हा लोकशाहीचा मार्ग अपुरा आणि अयशस्वी ठरला तरच आम्ही कम्युनिझमचा विचार करू.

आज कम्युनिझमशी सोयरिक करणाऱ्या कम्युनिझमच्या मार्गावर पावले टाकणाऱ्यांना आणि त्यांच्या अनुयायांना मला हे विचारावयाचे आहे की ह्या देशात कम्युनिस्ट राजवट आली तर काय होईल ह्याचा त्यांनी विचार केला आहे काय ? शेतकरी कामगार पक्षामागे सारा मराठा समाज आहे असे आपणास सांगण्यात येते आणि म्हणूनच मला हे विचारावेसे वाटते. कम्युनिझम म्हणजे प्रथम सर्व संपत्ती सरकारच्या मालकीची करणे होय. सारे उद्योगधंदेच नव्हे तर सारी शेती, जमीन, घरे सर्व काही सरकारच्या मालकीची होतील आणि हे सर्व हुकूमशाही राजवटीखाली पार पाडण्यात येईल. शेतकरी कामगार पक्षाच्या मागे असलेल्या मराठा समाजास हे पसंत आहे का ? त्यांची जमीन, त्यांची शेती, त्यांचे मळे, त्यांची घरेदारे सरकारच्या मालकीची झालेली त्यांना चालतील का हा माझा प्रश्न आहे.

लोकशाही राजवटीत हे होणे शक्य नाही, म्हणून हुकूमशाहीची प्रस्थापना येथे करण्यात येईल. विधीमंडळे नेस्तनाबूत करून लोकशाही राज्यपद्धतीला मूठमाती देऊन कम्युनिस्ट राजवट हे घडवून आणील. हे “दाभाडी प्रबंध” हे आमचे ब्रीद आहे असे बेंबीच्या देठापासून ओरडणाऱ्यांना आता तो प्रबंध म्हशीच्या गळ्यातील लोढण्यासारखा झाला आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या पुढाऱ्यांना है लोढणे काढणे आता जड झाले आहे. आता ते लोढणे फेकून देणे म्हणजे राजकीय अप्रामाणिकपणा असे त्यांना वाटते. परंतु आज ना उद्या ह्या पक्षास हे लोढणे दूर फेकलेच पाहिजे. जोतीबांचे अनुयायी म्हणविणाऱ्यांना कम्युनिझमची वाटचाल योग्य नाही हे लवकरच समजून येईल अशी आपण आशा करू या.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password