Categories

Most Viewed

15 नोव्हेंबर 1956 भाषण

दुःख निवारणाचा मार्ग दाखविणे बुद्ध धर्माचे अंतिम ध्येय.

भारताचे माजी कायदेमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सौ. सविता आंबेडकर दिल्लीहून आज दिनांक 13 नोव्हेंबर 1956 रोजी दुपारी काठमांडू येथे जगातील बौद्ध धर्मीय लोकांच्या चौथ्या जागतिक परिषदेत भाग घेण्यासाठी आले. काठमांडू विमानतळावर उभयतांचे भव्य स्वागत करण्यात आले. नेपाळ सरकारतर्फे चिफ ऑफ प्रोटोकॉल, भिक्षू आनंद कौशल्यायन, विविध संस्थांचे प्रतिनिधी, स्वयंसेवक तसेच स्त्री-पुरुषांचा मोठा जमाव त्यांच्या स्वागताकरिता हजर होता. डॉ. आंबेडकर पती-पत्नी विमानातून खाली उतरताच “आंबेडकर जिंदाबाद” अशा गगनभेदी घोषणांनी तेथील वातावरण दुमदुमून गेले होते. तशाच घोषणा करीत त्यांना मिरवणूकीने नेपाळ सरकारच्या ‘सितल महालात’ पोहोचविण्यात आले. नेपाळ सरकारचे खास पाहुणे म्हणून ते तेथे राहाणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रकृती चांगली असून त्यांना नेपाळी हवामान चांगलेच मानवले असे दिसते. काठमांडूतील अस्पृश्य समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांनी तसेच महिला संघटनेच्या मुख्यांनी आज रात्री डॉ. आंबेडकरांची भेट घेऊन नेपाळातील अस्पृश्यांच्या परिस्थितीची त्यांना माहिती सांगितली.

जगातील बौद्ध धर्मीय लोकांची चौथी जागतिक परिषद दिनांक 15 नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. या परिषदेस हजर राहाण्यासाठी जगातील निरनिराळ्या देशातून बौद्ध भिख्खु, भिख्खुणी, प्रतिनिधी, खास आमंत्रणावरून बोलविलेल्या प्रमुख व्यक्ती, ऑब्झरव्हर्स इत्यादी मिळून 625 लोकांना आमंत्रणे पाठविण्यात आली आहेत. ही परिषद धर्मोदय सभा काठमांडू हिच्यावतीने घेण्यात आली असून तिचे अध्यक्ष, महाथेरो अमृतानंद आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पती-पत्नीला बौद्ध धर्माची धर्मदिक्षा नागपूरला देणारे कुशीनगरचे 83 वर्षाचे महाथेरो भिख्खू चंद्रमणी आले असून त्यांच्या तिसऱ्या तुकडीत पाच लोक होते. तिचे नेतृत्व भिख्खू चंद्रमणी यांनीच केले होते. भिक्षु चंद्रमणी शिवाय भारतातून आलेल्या भिक्षुत वर्ध्याचे (नागपूर) भिक्षु भदन्त आनंद कौशल्यायन, अगरतला (त्रिपुरा, कलकत्ता) वेणुवन विहाराचे भिक्षु आर्यमित्रही, आज विमानाने काठमांडूत दाखल झालेले आहेत.

“पंडित राहूल सांकृत्यायन परिषदेसाठी आले होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेची आठवण सांगताना ते लिहितात, “नवम्बर 1956 का वह दिन नहीं भूल सकता, जबकी नेपाल में डॉ. बाबासाहाब आंबेडकरने बडे भावावेशमें पर गंभीरता के साथ घोषित किया. दो वर्ष और जी जावूं तो भारत मे पाँच करोड बौद्धों को दिखा दूँगा। हजार अफसोस की वह संकल्प पूरा नही हुआ”.

जागतिक बौद्ध धर्मीय परिषदेच्या चौथ्या सभेमध्ये जगातील चौतीस राष्ट्रांनी भाग घेतला असून, त्यात प्रामुख्याने बर्मा, कॅनडा, सिलोन, चायना, झेकोस्लोव्हाकीया, इस्थोनिया, फार्मोसा, फ्रान्स, जर्मनी, हाँगकाँग, हंगेरी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया, लडाख, लाटव्हिया, लाओस, मलाया, नेपाळ, पाकिस्तान, पेनांग, फिलीपाईन्स, स्वीडन, सिक्कीम, सिंगापूर, थायलंड, तिबेट, युनायटेड किंगडम, यु. एस. ए. यू. एस. एस. आर. त्या त्या देशातील प्रतिनिधी, खास निमंत्रणाने बोलाविलेले पाहुणे, बुद्ध भिक्षु बुद्ध भिक्षुणी, ऑब्झरव्हर्स इत्यादी मिळून 400 निमंत्रित परदेशीय प्रतिनिधी काठमांडूतील सभेच्या ठिकाणी उपस्थित होते. काठमांडूतील भव्य अशा तुडखेल ग्राउंडवर हा जागतिक चौथ्या बौद्धधर्मीय परिषदेचा मेळावा भरला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आज भारतीय पद्धतीचा पोषाख केला होता. उलनची पँट आणि गळ्यापर्यंत बटन असलेला भारतीय पद्धतीचा त्याच रंगाचा कोट घातला होता आणि डोक्यावर बफ रंगाची नक्षीदार टोपी घातली होती.

बौद्धधर्मीय लोकांची चौथी जागतिक परिषद यशस्वी होवो अशी सदिच्छा व्यक्त करणाऱ्या तीस देशांनी आणि संस्थांनी आपापले संदेश पाठविले होते. हे संदेश वाचून झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले.

आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
“मी माझ्या देशातून किंवा संस्थेकडून तुम्हाला संदेश घेऊन आलो नाही. या देशामध्ये, नेपाळात, बुद्धाचा जन्म झाला. परंतु 2500 वर्षानंतर बुद्ध धर्म नाहीसा झाला आहे. बुद्ध धर्माचा वृक्ष अद्याप आहे, त्याचा पाला सुकलेला आहे. परंतु त्याचे मूळ सुकलेले नाही. त्याला पाणी घातले तर तो वृक्ष वाढेल अशी माझी खात्री आहे. म्हणून मी येथे संदेश आणला नाही. मी तुम्हाला संदेश आणला नाही. परंतु मी बौद्ध धर्म का स्वीकारला हे तुम्हाला सांगू इच्छितो. मी बौद्ध धर्म का स्वीकारला ? कारण त्यात समता, बंधुभाव आणि स्वातंत्र्य आहे. इतर धर्मामध्ये ईश्वर आणि आत्मा यांचेशिवाय दुसरे काही नाही. मनुष्य मात्राच्या उन्नतीला ही जी तीन कारणे आहेत त्यांचा इतर धर्मामध्ये समावेश केलेला नाही. बौद्ध धर्माचे अधिष्ठान, जगात दुःख आहे ह्या तत्त्वावर बसविलेले आहे. ईश्वर व आत्मा यांचेवर बसविलेले नाही. माणसे जगामध्ये दुःखी आहेत ह्या तत्त्वावर बसविलेले आहे. इतकेच नव्हे तर त्या दुःखाचे निवारण करणे व ते निवारण्याचा मार्ग दाखविणे हे धर्माचे अंतिम ध्येय आहे, असे भगवंताने सांगितले आहे. जो धर्म या कसाला (कसोटीला) उतरणार नाही त्याला धर्म म्हणता येणार नाही, असे भगवंताने आपल्या पहिल्या सूत्रामध्ये- धर्मचक्र प्रवर्तनामध्ये सांगितले आहे. असे कोणत्याच धर्मसंस्थापकाने सांगितले नाही. या कारणामुळे मी बौद्ध धर्म स्वीकारला आहे. दुःख निवारण्याकरिता प्रज्ञा पारमिता बुद्धाने सांगितली आहे.

यानंतर नेपाळचे प्रा. मिनिस्टर श्री. टंका प्रसाद आचार्य यांनी आलेल्या पाहुण्याचे स्वागत करून भाषण केले. त्यानंतर गव्हर्नमेंट कमिटीचे चेअरमन आणि नेपाळ महाराजांचे प्रिन्सिपल प्रायव्हेट सेक्रेटरी श्री. लोक दर्शन यांचे स्वागत करणारे भाषण झाले. त्यानंतर नेपाळचे राजेसाहेब वीर विक्रम सहदेव आणि भिक्षु चंद्रमणी यांची चेअरमन आणि धर्म शासक म्हणून नावे जाहीर झाली. त्यानंतर नेपाळच्या महाराजांचे भाषण झाले.

त्यानंतर सभेच्या शेवटी महाथेरो भिक्षु चंद्रमणी यांचे भाषण झाले. शेवटी नेपाळच्या राजेसाहेबांनी सर्वांचे आभार मानले. नेपाळी राष्ट्रगीत बँडवर वाजविल्यावर त्या दिवशीच्या सभेचा कार्यक्रम संपला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password