Categories

Most Viewed

15 नोव्हेंबर 1951 भाषण

योजना कोणी केली ते न पाहाता ती कशी आहे ते पाहा.

भुसावळ येथे दिनांक 15 नोव्हेंबर 1951 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले. आपल्या भाषणात ते म्हणाले,

भगिनींनो आणि बंधुनो,
पूर्वी जेव्हा दारूबंदी नव्हती, सरकारी दारू दुकाने होती तेव्हा बेकायदा दारू करण्याचे काम फारच कमी होते. कोणत्याही परराष्ट्रापेक्षा आमच्या देशात दारूचे व्यसन फार आहे. आज दारूबंदी झाल्यानंतर मात्र घरोघरी दारूची निर्मिती सुरू झाली आहे. घरीच दारू तयार होत असल्याने स्त्रियात, मुलातही दारूचे व्यसन सुरू झाले आहे. नीतीचा अधःपात फार जोरात सुरू आहे.

हे दारूचे व्यसन बंद करण्यासाठी म्हणून अत्यंत अल्पसंख्य अशा व्यसनाधीन दारूबाजांना व्यसनमुक्त करण्याचे यशस्वी प्रयत्न करण्यासाठी म्हणून सरकारने शिक्षण फार कठीण करून ठेवले आहे. केवळ प्राथमिक शिक्षण मिळून आज मागासलेला समाज पुढे येणे शक्य नाही. त्यांना उच्च शिक्षण दिले पाहिजे. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वरच्या वर्गाच्या हातातच राज्यकारभार राहील आणि असे जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत मिळालेल्या स्वराज्याचा आम्हा अस्पृश्यांना मागासलेल्या वर्गातील लोकांना काय फायदा ?

ह्या दारूबंदीसाठी म्हणून मुंबई सरकारने 1946 साली 9 कोटी रुपये बुडविले. एवढेच नव्हे तर दारूबंदी कायदा जारी करण्यासाठी म्हणून पोलीस वगैरेसाठी गरीब नागरिकांचे 3 ते 4 कोटी रुपये आणखी खर्च होत आहे. मला येथे जमलेल्या लोकांना एक प्रश्न विचारावासा वाटतो की, समाजात अत्यंत अल्पसंख्य असलेल्या अशा दारूबाजांना दारूच्या व्यसनापासून मुक्त करणे, नव्हे मुक्त करण्याचा भ्रम निर्माण करणे हे जास्त महत्त्वाचे की समाजातील बहुसंख्य अशा भूकग्रस्त लोकांस, ज्यांना अन्न मिळत नाही त्यांना जगविणे, ज्यांना कपड़ा नाही त्यांना निदान अंगभर वस्त्र मिळवून देणे, ज्याना रहावयास घर नाही त्यांना आसरा मिळवून देणे अधिक महत्त्वाचे ? ह्या प्रश्नाचे आपणच उत्तर द्या.

ह्या योजनेतून दोन गोष्टी मात्र पार पडणार आहेत. पहिली म्हणजे नियोजन कमिशनचे अध्यक्ष पंडित नेहरू हे प्रधानमंत्री या नात्याने एक सर्वाधिकारी बनणार आहेत. माझा स्वतःचा अनुभव आपणास सांगतो. प्रत्येक खात्यातील कामकाजावर आणि प्रत्येक खात्याच्या मंत्र्यावर पंडित नेहरू आपला ताबा ठेवू पाहतात. ते कोणालाही स्वतंत्रपणे काम करू देणार नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे या योजनेमुळे लाचलुचपतीत अधिकच भर पडणार आहे. प्रत्येक स्त्री पुरुषांचा, ज्यांचे सरकारी अधिका-यांशी काम असते अशा सर्वांचा असा अनुभव आहे की, लाच दिल्याखेरीज सरकारी अधिकाऱ्यांकडून काही काम होत नाही. ह्या पंचवार्षिक योजनेप्रमाणे एक लाख रुपयांहून अधिक भांडवल असणारा उद्योगधंदा सुरू करण्यास सरकारी अधिकाऱ्याची परवानगी लागणार आहे. ह्यामुळे लाचलुचपतीचे क्षेत्र हजारोपटीने वाढणार आहे. एकंदरीत पाहिले तर ह्या योजनेत आशा करण्यासारखे काही नाही.

जेव्हा आपल्या कार्याविषयी समाधानकारक असे काहीही एखाद्यास सांगता येत नाही. तेव्हा तो दुसऱ्याबद्दल गैरसमज निर्माण करण्यासाठी, दुसऱ्याची निंदा करण्यासाठी सर्व शक्य ते प्रयत्न करतो. काकासाहेबाचे शेवटी तसेच झाले. दलित फेडरेशन आणि समाजवादी यांचा जो निवडणूक करार झाला आहे त्यावर गरळ ओकण्याचा त्यांनी अखेर प्रयत्न केला. दलित फेडरेशन ही जातीय संस्था आहे आणि आपण कधीही कोणत्याही जातीय संस्थेशी सहकार्य करणार नाही असे म्हणणाऱ्या समाजवाद्यांनी ह्या जातीय संस्थेशी सहकार्य का केले, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. काही पक्ष जातीय आहेत, काही नाही असा काँग्रेसवाल्यांचा दावा आहे. दलित फेडरेशन ही जातीय संस्था आहे. असा प्रचार 1920 पासून काँग्रेसकडून चालू आहे. फक्त काँग्रेस तेवढी जातीय नाही. असा काँग्रेसचा दावा आहे. काँग्रेस पुढा-यास माझा असा सवाल आहे की काँग्रेस पुढाऱ्यांनी जातीभेद बाजूस टाकला आहे का? सहभोजन, सहविवाह काँग्रेस पुढाऱ्यांनी कृतीत आणला आहे का ? काकासाहेबांनी आपल्या कन्येच्या विवाहासाठी उच्चकुलीन सरदार पुत्रच निवडला ? अधिकाराच्या जागांवर नेमताना आपापल्या जातीकडेच पाहण्याची प्रवृत्ती काँग्रेस पुढाऱ्यात फारच प्रकर्षाने दिसते. आम्हा अस्पृश्य जमातीत हजारो जाती आहेत पण जातीभेद मोडण्याचा आम्ही जसा प्रयत्न केला आणि करीत आहोत तसा काँग्रेस पुढाऱ्यांनी केला आहे का ? केवळ जातभाईची भरती करणे हेच आज आपणास दिसते. मला काँग्रेसचा विरोध का, तर मी जातीचा महार आहे म्हणून.

नदीचा उगम आणि ऋषीचे मूळ कोणी पाहात नाही. त्याचप्रमाणे आमच्या दलित फेडरेशनच्या कार्यक्रमाकडे, योजनेकडे पाहा. ही योजना कोणी केली ते न पाहाता ती योजना कशी आहे ते पाहा, इतर योजनाशी कसाला लावा आणि मग बोला, उगाच निंदा का करता ?

काँग्रेसला आम्ही समाजवाद्यांशी संगनमत केले ह्याचे वाईट वाटते. त्यांना वाटते की सर्वांनी काँग्रेसचा पदर धरावा. समाजवाद्यांशी आम्ही संगनमत केले ह्यामुळे काय अनर्थ निर्माण झाला ते कळत नाही. काँग्रेसबाहेरील सर्व पक्षांची एकजूट करण्याचा माझा विचार होता, परंतु निवडणुकीस आता फारसा अवधी नसल्याने ते शक्य झालेले नाही. परंतु निवडणुकीनंतर मी त्या बाबतीत पुन्हा प्रयत्न करून पाहणार आहे. दोन पक्षातील योजनात आणि कार्यक्रमात जर फारशी विसंगती नसेल तर निवडणुकीच्या बाबतीत संगनमत केल्यास त्यात वाईट काय ? ह्याच भूमिकेवरून आम्ही हे संगनमत केले आहे. पूर्व आणि पश्चिमाभिमुख अशा दोन पक्षात सांगड करणे हे अप्रामाणिकपणाचे आहे. परंतु एकाच दिशेने दोन माणसे जात असली तर त्यांनी काही मार्गापर्यंत एकत्र गेल्यास त्यात अप्रामाणिकपणा कसा होईल ? त्यात पाप काय आहे ? आज तरी ही एकी निवडणुकीपुरती आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password