Categories

Most Viewed

15 नोव्हेंबर 1951 भाषण 1

फेडरेशनचा जाहीरनामा सर्वोत्कृष्ट असल्याचा जगातील राष्ट्रांचा अभिप्राय.

तारीख 15 नोव्हेंबर 1951 गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिल्लीहून मुंबईस जात असताना मध्येच खानदेशात भुसावळ, चाळीसगाव या ठिकाणी त्यांनी प्रचार सभा घेतल्या.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या हस्ते चाळीसगाव तालुक्यातर्फे दलित समाजाने बाबासाहेब यांना 2,001 रुपयांची थैली अर्पण केली. त्यानंतर टाळ्यांच्या कडकडाटात आणि भीमभगवानच्या जयघोषात बाबासाहेबांनी भाषणास सुरुवात केली. बाबासाहेबांच्या भाषणाचा जोर विशेषतः निवडणुकीवर आला. ते म्हणाले,

देशातील निरनिराळ्या राजकीय पक्षांनी आपापले निवडणूक जाहीरनामे प्रसिद्ध केले. त्यात शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनने प्रसिद्ध केलेला जाहीरनामा सर्वोत्कृष्ट असल्याचा अभिप्राय जगातील सर्वच राष्ट्रांनी दिलेला आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आश्वासनापेक्षा अधिक काही नाही. मागे दिलेली आश्वासने कॉंग्रेस पूर्ण करू शकली नाही त्यामुळे काँग्रेसचा जाहीरनामा फोल ठरला. कॉंग्रेसच्या पुढा-यांमध्ये आपसात वैर होते आणि आहे. मी कॉंग्रेसच्या राज्यकारभारात चार वर्षे होतो. एवढ्या अवधीत मला काँग्रेस पुढाऱ्यात एकी दिसली नाही. पंडित जवाहरलाल नेहरू व टंडणबाबू तसेच पंडित जवाहरलाल नेहरू व कै. वल्लभभाई पटेल यांच्यामधील एकमेकातला वैरभाव जाहीर आहे. तेव्हा यावरून आपल्याला काय करता येईल की काँग्रेस ही वरकरणी जरी बरी दिसत असली तरी ती तशी नसून वांझोटी आहे. तिच्यात ऐक्य नाही, तरी अशा काँग्रेसला मते देण्यात काय अर्थ ? तेव्हा याचा विचार प्रत्येक स्पृश्य-अस्पृश्य बांधवांनी करावयास पाहिजे. काँग्रेस आता पैलतीराला जावू शकणार नाही.

शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनने समाजवादी पक्षाशी हातमिळवणी केली असून शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन व समाजवादी पक्ष यांनाच निवडून द्यावे. शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनतर्फे चाळीसगाव-भडगाव भागातून जनरल सीटवर श्री. टी. टी. पवार यांना उभे केले आहे. त्यांनाच आपण मते देऊन निवडून आणावे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password